रिच डॅड पुअर डॅड –
(Rich Dad Poor Dad)
नोव्हेंबर २०१२ मध्ये माझा एक आर्किटेक्ट मित्र एम्वे कंपनीचे नेटवर्क मार्केटींग करण्यासाठी माझ्याकडे खुपदा यायचा. अशाच एका संध्याकाळी तो ऑफीसला येवुन माहीती देऊ लागला, “तु खुप पैसे कमवशील, फ्री मध्ये विदेशात जायला मिळेल, ह्या कमाईच्या सापळ्यातुन आपण मुक्त होवु”,
मी म्हणालो, “खरं सांगु, आजकाल मला पैसे कमवण्यात इंट्रेस्टच वाटत नाही, आपण एवढी मरमर का करतो? पैशाच्या मागे धावुन काय साध्य होतं?”
तु “Rich Dad Poor Dad” वाचलंयस का? स्मितहास्य करत त्याने प्रतिप्रश्न केला, त्याच्या डोळ्यात एक आनंददायी चमक होती, मी पहील्यांदाच त्या पुस्तकाचं नाव ऐकत होतो, तेव्हा मी म्हण्टलं, “नाही!”
तीन दिवसांनी मला न सांगता त्या एक पुस्तकाची प्रत घेऊन आला, मी एम्वे बिजनेसचे अनेक सेमिनार अटेन केले, अनेक पुस्तके खरेदी केली, अनेक प्रॉडक्ट खरेदी केले, पण बिजनेस काही जॉईन केला नाही, पण त्या आर्किटेक्ट मित्रांने चांगली चांगली पुस्तकांची ओळख करुन दिली, पैशाचं महत्व मला समजावलं, आणि नेटवर्कची महती मला समजावली, आयुष्याच्या आर्थिक प्रांतांकडे बघण्याच्या दृष्टीकोण बदलवला, इतका की मी त्याचा आजही शतशः ऋणी आहे, अशीच माझी आजही प्रामाणिक भावना आहे.
त्यानंतर आर्थिक स्वातंत्र्य, गुंतवणुक याविषयी अनेक उत्कृष्ट पुस्तके वाचली, पण ‘रिच डॅड पुअर डॅड’ नेच ह्या गुहेचं दार उघडुन दिलं, जीवनशैली बदलायला भाग पाडलं, ह्या पुस्तकाची अनेक पारायणे केली, ह्या पुस्तकाचा आशय आणि त्याबद्द्लचे माझे अनुभव आज तुमच्यासमोर मांडत आहे.
ही गोष्ट आहे अमेरीकेतल्या हवाई बेटावरच्या रॉबर्ट कियोसॉकीची, त्याच्या मित्राचे वडील त्याला श्रीमंत कसं व्हावे याचे गुपितं सांगतात. आर्थिक साक्षरतेबाबतचं हे ज्ञान आणि रॉबर्टच्या आयुष्याचा प्रवास ह्या पुस्तकात वर्णन केला आहे.
धडा पहीला – श्रीमंत लोक पैशासाठी काम करत नाहीत.
गरीब आणि श्रीमंत लोक दोघेही, जेव्हा खिशात पैसे नसतात, तेव्हा संधी मिळेल ते काम करतात, त्यातुन त्यांना जेमतेम पैसे मिळतात, पण गरीब लोक हे पैसे खुप तुटपुंजे आहेत, असा समज करुन घेतात आणि आहेत तेवढे पैसे खर्च करुन टाकतात आणि पुन्हा दुःख व्यक्त करत बसतात, बचत, गुंतवणुक आणि कमाईचे दुसरे मार्ग यापैकी काहीही त्यांच्या गावीही नसते.
श्रीमंत लोक कितीही कमी उत्पन्न असु दे, नियमित बचत-गुंतवणुक करतात, मालमत्ता तयार करतात, ज्या त्यांच्यासाठी पुन्हा उत्पनांची साधने बनतात. त्यासाठी अडचणीच्या दिवसात ते साधी जीवनशैली जगतात, एकेक रुपया विचार करुन खर्च करतात. हे फक्त काही दिवसांसाठीच आहे, हे त्यांना माहीत असते.
श्रीमंत लोक पैशासाठी काम करत नाहीत. ह्याच्याच अर्थ असा की श्रीमंत लोकांचा पैसा त्यांच्यासाठी काम करतो. ते आधी आयुष्यभरासाठी संपत्तीचे निष्क्रीय स्त्रोत उभे करतात आणि मग आयुष्यभर मौजमजा करतात. गरीब आणि मध्यमवर्गीय लोक हातात आलेल्या पैशाचं महत्व जाणुन घेत नाहीत, त्यांच्या अतृप्त इच्छा त्यांच्यावर हावी होतात, आणि निष्क्रीय कमाईचे स्रोत उभे करण्याच्या आजुबाजुला दडलेल्या संधी त्यांना दिसत नाहीत.
लेखक सांगतो, रोज कमवणे आणि खाणे हा सापळा आहे, कमवण्याच्या नादात आपल्याला अनेक स्वप्नांचे बळी द्यावे लागतात, आयुष्यातला रस कमी होत जातो, जगणं ही शिक्षा बनु लागते. बहुतांश प्रश्नांचे मुळ पैशामध्ये आहे, तेव्हा हा सापळा तोडा आणि जीवनाचा खरा आनंद घ्या.
धडा दुसरा – अर्थसाक्षरता कशासाठी?
पैशाच्या अभावाने चिंताग्रस्त लोक सतत भय आणि लोभ यांच्या छायेखाली वावरत असतात. पैसा त्यांना हवं तसं नाचवतो, लेखक सांगतो, कृपया तुमचं आयुष्य पैशाच्या हाती सोपवु नका, त्याऐवजी तुम्ही पैशावर नियंत्रण ठेवा.
आपण आजुबाजुला अनेक उदाहरणे पाहतो, अचानक झटपट श्रीमंत झालेले लोक असतात, जसं की जमिन विकुन रग्गड पैसा आलेले, इन्शुरंसचे पैसे आलेले, व्हीआरएस घेतलेले किंवा मोठ्या रकमेची लॉटरी लागलेले बरेचशे लोक तेवढ्याच वेगाने आलेला पैसा गमावतात, कारण त्यांच्याजवळ आर्थिक साक्षरता नसते, गुंतवणुकीचे ज्ञान नसते,
आजचा एक रुपया उद्या एक हजार रुपये बनु शकतो, याबद्द्ल ते अनभिज्ञ असतात. मला २०१३ मध्ये माझे ग्रह खुप जोरात होते, त्या वर्षात माझा निव्वळ नफा जवळपास बारा लाख रुपये होता पण तो पैसा जितक्या वेगाने आला तेवढ्याच वेगाने तो निघुनही गेला, तेव्हा मी अर्थसाक्षर नव्हतो, जेव्हा दुष्काळ पडला तेव्हा माझ्याजवळ निष्क्रीय स्र्तोत नव्हते, तेव्हा माझी आधीची उधळपट्टी आठवुन मला अजुनच त्रास व्हायचा. मात्र त्याच दिवसांनी मला मॅचुअर बनवले. त्या अनुभवानंतर असे उत्पन्नाचे स्त्रोत उभे करण्याचे महत्व मला कळाले,
त्यानंतरच्या दोन वर्षांमध्ये जिद्दीने, मी माझ्या महीन्याच्या खर्चापेक्षा दुपटीहुन जास्त रक्कमेची निष्क्रीय कमाई उभी करण्यात यशस्वी झालो. सापळ्यातुन मुक्त झालो, मनसोक्त खर्च करुनही माझी गुंतवणुक दरमहा वाढतेच आहे,
हे मी करु शकतो ते तुम्हीही सहज करु शकता, संकल्प करा, आणि त्याची जोमाने दररोज अंमलबजावणी करा.
पैशामध्ये अफाट शक्ती आहेच, पण त्याच्यापेक्षा मोठी शक्ती म्हणजे आपली बुद्धी आहे, तिचा वापर करुन जास्तीत जास्त पैसा कमवा, पैसा जमवा, पैसा गुंतवा आणि मग त्यातुन बोनसरुपाने मिळालेल्या पैशाचा मनमुराद आनंद घ्या.
धडा तिसरा – तुमचा उद्योग कोणता?
रॉबर्टने एक क्वांड्र्ंट मांडला, नौकरी म्हणजे इतरांसाठी काम करणं, त्यातुन दिर्घकालीन फायदा होत नाही, उलट नौकरीमुळे आपल्याला चाकोरीबद्ध जगायची सवय लागते, चौकटी मोडायचं धैर्य संपुन जातं, ताण देणारी वरिष्ठ माणसं असल्यास सतत दडपण आणि भीती वाटते, मन दुबळं आणि कमकुवत बनतं, परावलंबी असल्याची जाणीव अस्वस्थ करते, पंख छाटले जातात.
मान्य आहे, नौकरी कोणी स्वेच्छेने करत नाही, मजबुरी असते. पण नौकरी करताना स्वतःचे स्किल्स डेव्हलप करण्याकडेही लक्ष द्यावे. दरमहा रक्कम जमवावी, पाच वर्षांनी स्वतःचा एक व्यवसाय उभा करु असे ध्येय डोक्यात असावे. उद्योजकाच्याच थाटात वावरावे. आत्मविश्वास बळकट बनवावा.
महागाईच्या पटीत पगारवाढ होत नाही, मुले मोठी होतात, खर्चे आवासुन उभा राहतात, आणि त्यासोबतच आपलीही काम करण्याची शक्ती आणि धमक कमी कमी होत जाते,
आज बक्कळ वाटणारी पगार उद्या कुठे कुठे संपुन गेली, तेच कळत नाही, वेळीच सावध होवुन तरुणपणीच गुंतवणुकीचा मार्ग अवलंबल्यास आपल्याच जीवनाचे भले होते.
आज बक्कळ वाटणारी पगार उद्या कुठे कुठे संपुन गेली, तेच कळत नाही, वेळीच सावध होवुन तरुणपणीच गुंतवणुकीचा मार्ग अवलंबल्यास आपल्याच जीवनाचे भले होते.
धडा चौथा – आयकराची जुळवणी
श्रीमंत लोक कमावतात, खर्च करतात आणि कर भरतात.
गरीब लोक कमवतात, कर भरतात, आणि खर्च करतात.
नौकरी करताना हातात पगार पडण्याआधीच टॅक्स कापुन घेतला जातो, व्यवसायात नियमात राहुन कमीत कमी टॅक्स भरण्याचे अनेक मार्ग उपलब्ध असतात. श्रीमंत लोक टॅक्स सिस्टीमचा, बारीकसारीक अभ्यास करतात, सवलतींचा अभ्यास करतात, त्यांचा वापर करतात.
गरीब लोकांजवळ हा पर्यायच नसतो, म्हणुन दिर्घकालीन उद्दिष्ट ठेवुन, प्रत्येकाने व्यावसायिक बनण्यासाठी लेखक आग्रह करतो.
धडा पाचवा – श्रीमंत लोक पैसा निर्माण करतात.
आपल्या सगळ्यांमध्येच प्रचंड कार्यशक्ती आणि प्रगती करण्याची क्षमता लपलेली आहे, आपल्या सर्वांमध्येच ईश्वरी देणगी लपलेली आहे, पण आत्मविश्वासाच्या अभावी आपण ती वापरत नाही, स्वतःबद्द्ल शंका घेत आपण मागे राहतो.
जे लोक ह्या दुर्गुणावर मात करतात, ते स्वतःचा आर्थिक बुद्ध्यांक वाढवतात, जोडीला धैर्य वाढवतात, भीती आणि शंका यांच्यावर मात करतात, श्रीमंत बनतात.
श्रीमंत लोक असं तंत्र उभं करतात की त्यातुन आपोआप पैशाची निर्मिती होत जाते.
धडा सहावा – शिकण्यासाठी काम करा, पैशासाठी नको.
आपल्या प्रत्येकातचं काही ना काही कला आहे, आपण सगळे बुद्धीमान आणि सुशिक्षित आहोत, आपण प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या क्षेत्रात तज्ञ आहोत, पण श्रीमंत होण्यासाठी तितकं पुरेसं नाही, त्यासाठी आपल्याला आपल्या कलेला आकर्षक स्वरुपात इतरांसमोर व्यक्त करता आलं पाहीजे. त्याची योग्य किंमतीत विक्री करण्याचं कौशल्य असल्यासच आपल्या कलेची जगासमोर चीज होते.
आर्थिक बुद्धीमत्ता म्हणजे अकांउटींग, मार्केटींग, गुंतवणुक आणि कायद्याचं ज्ञान! ह्या चार गोष्टी शिकल्या तर पैशाने पैसा मिळवणं, खरंच सोप्पं आहे.
प्रत्येक गोष्टीची मला थोडी थोडी माहीती असावी, अशी श्रीमंत व्यक्तीचा आग्रह असतो. श्रीमंत लोक नेतृत्वगुण शिकतात, स्वतःला तसं घडवतात. मनातली पुर्ण भीती नाहीशी होईपर्यंत त्या गोष्टीवर काम करत राहतात.
लेखक म्हणतो, सतत शिकत रहा, कारण, दुरचा विचार केल्यास शिक्षण ही गोष्ट पैशापेक्षा जास्त महत्वाची आहे.
नौकरी करत असताना मला कंपनीने खर्च करुन बिल्डींगचे थ्रि-डी सॉफ्टवेअर शिकवले, शिकताना खुप दमछाक झाली, पण चिकाटीने मी कोर्स पुर्ण केला, पुढे स्वतःचा व्यवसाय सुरु केल्यास ह्या सॉफ्टवेअरचा मला प्रचंड फायदा झाला!
असंच कधीतरी मी फावल्या वेळात कॉम्पुटरवर मराठी टायपिंग शिकलो, आज अर्ध्या तासात मी एक हजार शब्दांचा लेख टाईप करु शकतो, सुरुवातीला छंद म्हणुन लिहत असलेले लेख, आता वर्तमानपत्र आणि मॅग्झीनवर प्रकाशित झाल्याने माझ्या निष्क्रीय कमाईचे स्त्रोत बनत आहेत.
रॉबर्ट कियोसोकीचं हे पुस्तक आपला जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलुन टाकतो,
धडा सातवा – अडथळ्यांवर मात करा.
अर्थसाक्षर झाल्यानंतर लगेचच आर्थिक दृष्ट्या स्वातंत्र्य मिळतं, असं नाही. त्यासाठी अनेक अडथळ्यांना तोंड द्यावं लागतं, श्रीमंत बनन्याच्या मार्गात पाच अडथळे आहेत,
पैसे गमावण्याच्या भीतीवर मात करावी लागते. पैसे न गमावलेला एकही श्रीमंत माणुस मल दाखवा, असं आव्हान रिच डॅड देतात.
भीती आणि संशयावर मात करा, पळा, पळा आभाळ कोसळत आहे, असं सांगत फिरणार्या भित्र्या सशाच्या गोष्टीतला ससा बनु नका,
लेखक गंमतीत सांगतो, के. एफ. सी. चे संस्थापक कर्नल सॅंडर्स यांनी जगाला खोटं ठरवलं, वयाच्या पासष्टाव्या वर्षी नवा व्यवसाय सुरु करुन अवघ्या काही वर्षात उत्तुंग उंचीवर पोहचवला, कारण त्यांनी त्या भित्र्या सशाला चक्क तळुन विकलं!..
आळस झटका. कामाला लागा. मनात लोभ बाळगा, थोडीशी हाव आणि काही मिळवण्याची तीव्र इच्छा तुमच्यातला आळस नाहीसा करायला तुम्हाला प्रेरीत करेल, म्हणुन ‘दाग अच्छे है’ च्या धर्तीवर “सेल्फीश बनना अच्छा है” असं अनोखं समीकरण लेखक प्रस्तुत करतो.
सवयी बदला. जर तुम्ही सर्वात आधी स्वतःला पैसे दिले, म्हणजे खर्चा आधीच बचत-गुंतवणुक करण्याची सवय लावली, तर तुम्ही आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या जास्तीत जास्त मानसिक सामर्थ्यवान बनाल.
उद्धटपणा सोडा. अहंकार आणि अज्ञान माणसाला खड्ड्यात घेऊन जातात. फाजील आत्मविश्वासाचा शेवट पैसा गमावण्यामध्ये होतो. एखादी गोष्ट माहीत नसल्यास, मान्य करुन, समजुन घ्यावी, अज्ञान लपवण्यासाठी उद्धटपणाचा वापर करणारे, लोक बढाईखोर असतात. तोर्यात वागतात. तेव्हा एखाद्या विषयात आपण अज्ञानी आहोत असं समजताच, आधी शिक्षण घ्यायला सुरुवात करा, सोबत त्या विषयावरचं चांगलं पुस्तक शोधा.
धडा आठवा – सुरुवात करा.
आपण भरपुर शिकतो, आणि पैशासाठी काम करत राहतो, कारण नौकरी शोधणं आणि पैशासाठी काम करणं, हे खुप सोपं आहे,
श्रीमंत होण्यासाठी एक मोठं आणि प्रबळ कारण शोधा. आजुबाजुला असलेली, प्रेम करणारी माणसं प्रत्येक अडचणीवर मात करण्याचं बळ, उर्जा आपल्याला देतात.
मला आयुष्यभर काम करत राहयचं नाही, मी नौकरदार असलेलं मला आवडणार नाही, अशी मनाशी खुणगाठ बांधा. मग ते तुमच्याकडुन हवं ते करुन घेईल.
श्रीमंत लोक खुप मेहनत करतात, त्यांना जगभर फिरण्याचं स्वातंत्र्य हवं असतं, तरुण वयातच, त्यांना उत्तम जीवनशैली हवी असते, आणि ती उपभोगण्यासाठी स्वतः मोकळं असणंही त्यांना आवश्यक असतं.
माझ्या आयुष्यावर आणि माझ्या वेळेवर माझाच ताबा हवा, असा स्वतःकडेच हट्ट धरा.
मग पैशाने आपल्यासाठी काम करणं, आपल्यासाठी काम करणं, गरजेचं होतं.
श्रीमंत लोक आपल्या मुलासाठी खुप काही मागे ठेवुन जातात.
या मार्गात अनेक अडथळे येतील, पण तेच तुम्हाला ताठ रहायला शिकवतील.
श्रीमंत होण्यासाठी प्रबळ कारण नसेल, तर आयुष्य कठिण असेल.
धडा नववा – निवड करा.
आता निवांत जगुन, आयुष्यभरासाठी गरीब रहायचयं का आता थोडेसे कष्ट करुन आयुष्यभर श्रीमंतीत जगायचंय यापैकी एकाची निवड करा.
रोज आपल्या हातात पडणार्या रुपयाचं सामर्थ्य ओळखा.
रोज आपल्या हातातल्या मालमत्ता आणि डोक्यातलं ज्ञान वाढवत रहा.
शिक्षणात गुंतवणुक करा. वेगवेगळे कोर्स जॉईन करा, पुस्तके वाचा, व्हिडीओ बघा, यशस्वी लोकांच्या सहवासात रहा, अयशस्वी लोकांना टाळा.
यश मिळवण्यासाठी आजुबाजुंच्यांना प्रेरित करा.
खरे बुद्धीमान लोक नेहमीच नव्या कल्पनांचं स्वागत करतात.
धडा दहावा – मित्रही काळजीपुर्वक निवडा.
मैत्रीमध्येही प्रचंड सामर्थ्य आहे. मित्रांची निवड आर्थिक परिस्थीतीवरुन करा असा ह्याचा अर्थ नक्कीच नाही,
गरीबांशी संबध ठेवु नका असे लेखक अजिबात सांगत नाही, फक्त त्यांच्या विचारांचा प्रभाव आपल्यावर पडु देऊ नका, असे सांगत आहे.
पण जेव्हा मार्गदर्शनाची गरज असेल, तेव्हा ज्यांच्याकडे सल्ले मागायला जाल ते, आपल्यापेक्षा जास्त बुद्धीमान असतील, अशाच लोकांशी चर्चा करा, असा लेखकाचा मतितार्थ आहे.
ज्यांच्याकडे पैसे नाहीत असे मित्र पैसे कसे मिळतात हे कसे काय सांगु शकतील.
त्यासाठी तुमच्या आतल्या गोटात श्रीमंत मित्रच हवेत, असा लेखकाचा आग्रह आहे.
धडा अकरावा – प्रथम स्वतःला पैसे द्या.
स्वयं शिस्त अंगी बाळगा. स्वतःवर ताबा नसेल तर श्रीमंत होता येत नाही. पैसे कमवावेत आणि पैसे उधळावेत याला काहीच अर्थ नाही. माणसं कफल्लक होतात ती स्वयंशिस्तीच्या अभावानेच.
स्वयंशिस्त ही गरीब आणि श्रीमंत यांच्यातला फरक सांगणारी फार महत्वाची किंबहुना पहील्या क्रमांकाची गोष्ट आहे.
आर्थिक दबाव आल्यावर जे स्वतःला हीनदीन समजु लागतात. दबाव सहन करण्याची ज्यांची क्षमता खुप कमी आहे, ते कधीच श्रीमंत होवु शकत नाहीत.
ज्यांच्याकडे शिस्त आणि धैर्य नसतं, ते इतरांकडुन पराजीत होतात.
म्हणुन एकुन लोकसंख्येच्या नव्वद टक्के लोक आयुष्यभर फक्त कष्ट करतात.
धडा बारावा – चांगले आदर्श डोळ्यासमोर ठेवा.
गल्लीत क्रिकेट खेळताना मुलांचा आवेश बघीतलाय तुम्ही, ते कधीचेच, विराट, धोनी आणि सचिन तेंडुलकर झालेले असतात.
तसंच रोजच्या कामामध्ये, आर्थिक गोष्टींचे निर्णय घेताना आपण धीरुभाई अंबानी, जे आर डी टाटा, आणि वॉरेन बफे होवुन निर्णय घ्यायला पाहीजे, मग यश मिळते.
निदान संदीप महेश्वरी आणि विवेक बिंद्रा, यांना पाहुन पाहुन त्यांच्यासारखे तर होवुच शकतो आपण!
हे नायक आपल्याला स्फुर्तीशिवाय आणखीही खुप काही देतात, ते गोष्टी खुप सोप्या करुन सांगतात! ते करु शकतात, तर मी ही करु शकतो, ही जिद्द निर्माण होते.
धडा तेरावा – द्या, म्हणजे मिळेल
रिच डॅड म्हणायचे, तुम्हाला एखादी गोष्ट हवी असेल तर ती आधी तुम्ही द्या, मग ती तुमच्याकडे भरभरुन येईल. खुप पैसे हवे आहेत, तर थोडे पैसे दान द्या, खुप हसणारी, हसवणारी लोकं आजुबाजुला हवी आहेत, तर लोकांना खदखदुन हसवा! खुप प्रेमाचे भुकेले आहात, तर मन खुलं करुन सर्वांवर मुक्तहस्ताने खुप प्रेम करा, जिवलग मैत्रीसाठी आसुसलेले आहात तर मैत्री करण्यासाठी आधी एक हात पुढे करा.
जे तुम्हाला मनातुन हवं आहे, ते आधी द्या. कारण ते दिलं की नेहमी चक्रवाढ व्याज घेऊन कित्येक पटींनी परत येतं.
बॅंकेत आपण पैसे डिपॉझीट भरतो मगच आपल्याला व्याज मिळतं, इतकं सोप्पं गणित आहे हे! बॅंकेत शहाणपणाने वागणारे आपण मात्र व्यावहारीक जगात इतरांनी आपल्याजवळ येण्याची, पुढाकार घेण्याची वाट का पाहत राहतो?
जर आपण एखाद्या शेगडीसमोर लाकुड घेऊन उभे राहीलो आणि तिला म्हणालो, की आधी तु मला उब उष्मा दे, मगच मी तुला इंधन म्हणुन लाकडं देईन, हे हास्यास्पद नाही का?
मग रोजच्या जीवनात आपण असं का करतो?
रॉबर्टच्या ह्या फिलॉसॉफीने मला मंत्रमुग्ध केलं, आयुष्याकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन बदलवला, आणि माझ्या आर्थिक आयुष्याला निश्चित दिशा दिली, मला आर्थिक स्वातंत्र्य मिळवुन देण्यात मदत केली, अगदी असंच आयुष्य तुमच्याही वाटयाला येवो, अशा शुभेच्छांसह,
by - https://www.manachetalks.com/3177/rich-dad-poor-dad-marathi
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा