सोमवार, १० डिसेंबर, २०१८

#यशस्वी माणसांची यशाची सूत्रे...



#यशस्वी माणसांची यशाची सूत्रे

संधीचा शोध:-

या जगात प्रत्येक माणसासाठी अमर्याद संधी उपलब्ध आहेत. एक संधी गेली तरी दुसऱ्या अनेक संधी पुढे उभ्या राहतील, हे जरी खरे असले तरी एकदा गेलेली संधी परत येत नाही. ही पण वस्तुस्थिती काणाडोळा करता येण्यासारखी नाही. तेव्हा उद्योजकांमधील नेमकी संधी हेरून त्या संधीचे वास्तवात रूपांतर करण्याच्या गुणाची आवश्‍यकता आहे. त्यामुळे आपल्याला नेमके काय करायचे आहे हे ठरवणे, त्यासाठी असणाऱ्या संधीचा शोध जागरूकतेने घेत राहणे आणि नेमकी संधी पकडणे हा महत्त्वाचा टप्पा आहे.

बांधिलकी:-

बांधिलकी किंवा झपाटलेपणाने काम करणे म्हणजेच समर्पण. आत्यंतिक उत्कटता, विशिष्ट कल्पनेने मनाचा ताबा घेतलेला असणे. या सगळ्या परस्परपूरक भावना आहेत. हाती घेतलेले कार्य कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करणे, प्रत्यक्षात आणणे याचाच अर्थ बांधिलकी.

"सचोटी' आणि "शहाणपण' या दोन्हींच्या भक्‍कम आधाराने वचने द्यायची आणि ती पूर्ण करावयाची. एक मुलगा आपल्या लग्नानंतर आपल्या वडिलांना नमस्कार करण्यासाठी जातो. वडील त्याला म्हणतात, "बाळ, दोन गोष्टी आयुष्यात लक्षात ठेव. एक म्हणजे प्रामाणिकपणा आणि तारतम्य.' त्यावर मुलगा वडिलांना म्हणतो, "बाबा, जरा स्पष्ट करून सांगाल का?' "अरे, प्रामाणिकपणा म्हणजे दिलेला शब्द पाळणे आणि शहाणपण किंवा तारतम्य म्हणजे मूर्खपणाने शब्द न देणे.' आपले यश म्हणजे आपले विचार आणि आपण घेतलेले निर्णय यांचा परिणाम असतो. आपल्या आयुष्यात कोणत्या प्रकारच्या विचारांवर प्राबल्य असावे, हा आपला निर्णय असतो. यश मिळणे हा काही अपघात नसतो, तो आपल्या दृष्टिकोनांचा आणि आपल्या प्रयत्नांचा परिपाक असतो. ध्येयाशी एकनिष्ठता असेल तरच जिंकण्याची जिद्द निर्माण होते.

निष्ठेतूनच बांधीलकी निर्माण होते कारण निष्ठा कधीही तडजोड करीत नाही. निष्ठा नेहमीच आपल्या मूल्यांशी सुसंगत असतात. म्हणूनच आपली मूल्यप्रणाली उत्तम आणि योग्य असायला हवी. योग्य उद्दिष्टांशी बांधील असणाऱ्या निष्ठाच ध्येयप्राप्तीसाठी आपल्याला बांधील करतात. बांधिलकी म्हणजे प्रसंगी आपल्या मौजमजांचा त्याग करण्याची आणि दु:ख स्वीकारण्याची तयारी ठेवणे. जसे ग्राहकांशी बांधिलकी असणे म्हणजे उत्तम सेवा देणे. विवाहाशी बांधिलकी असणे म्हणजे एकनिष्ठ राहणे. नोकरीशी बांधिलकी असणे म्हणजे त्याग करणे इत्यादी. बांधिलकी हे परिपक्वतेचे लक्षण आहे. बांधिलकी म्हणजे दुसरा पर्याय किंवा अडचणी दिसू लागल्या, तरी स्वीकृत मार्गावरून न ढळणं. भक्‍कम बांधिलकी असणाऱ्या माणसांमुळे भक्‍कम समाजाची निर्मिती, बांधणी होत असते.

चिकाटी:-


एखादा माणूस शूर, हिंमतवान ठरतो तो इतरांपेक्षा अधिक धैर्यवान असतो म्हणून नाही तर, इतरांपेक्षा धैर्य दहा-वीस मिनिटे जास्त टिकवतो म्हणून ः राल्फ इमर्सन.
एखादी ठरलेली गोष्ट साध्य होईपर्यंत तिचा पाठपुरावा करण्याची वृत्ती, निश्‍चय आणि त्यासाठी कठोर परिश्रम करण्याची तयारी, आपल्या मनाचा आग्रह आणि चिवटपणा, या सर्वातून निश्‍चय आणि निर्धार व्यक्‍त होतो. एक प्रकारची शक्‍ती, ताकद निर्माण होते. कृतीतून घर्षण आणि त्यातून ऊर्जा असा हा क्रम आहे.



कार्यसिद्धीपर्यंत लागणारा ऊर्जेचा स्रोत सतत वाहता ठेवला जातो. "कठोर परिश्रम' ही गंमत तर नाहीच, पण केवळ पूजाही नाही, केवळ कर्तव्यही नाही. हे आपल्यालाच आपली अनुभूती देणारे साधे, शुद्ध माध्यम आहे. आयुष्यात सतत नुसतेच यश मिळत राहते असे होत नाही. मोठे यश मिळवायचे म्हणजे काही अपयशांचा सामना करावाच लागतो, चढ-उतार पचवावे लागतात, प्रतिकूल परिस्थितीची गाठही पडणारच. केवळ बुद्धीच्या कल्पना सर्वकाळ चालत नाहीत. अर्थात, सर्वच यशस्वी व्यक्‍ती अपयशांकडे आपल्याला मिळालेला एक चांगलाधडा म्हणून पाहतात आणि त्यातून तावूनसुलाखून बाहेर पडताना दिसतात. चिकाटीचे आणि चुकांतून होणारी निराशा टाळणे याचे आदर्श उदाहरण म्हणजे थॉमस अल्वा एडिसन.

विद्युत दिव्याचा शोध लावताना हजारो वेळा अपयश आले तरी त्यांनी चिकाटी न सोडता आपल्या ध्येयाचा सतत पाठपुरावा केला. मला हजार वेळा अपयश आले नाही, तर दिवा तयार करू न शकणारे हजारो मार्ग मी शोधून काढले अशी त्यांची भूमिका होती. ही चिकाटी म्हणजेच सकारात्मक दृष्टिकोन. एडिसनने दिव्याच्या शोधाचा प्रयत्न चिकाटी न धरता सोडला असता तर आज आपण अंधारातच बसलो असतो ना? संकटाच्या तडाख्यात सापडलेले आपले तारू सुखरूप किनाऱ्याला लागेल असाच त्यांचा आत्मविश्‍वास असतो. त्यामुळेच ही माणसे आपली चिकाटी सोडत नाहीत, आपले मनोधैर्य टिकवून धरतात. याच चिकाटीमुळे रतन टाटांसारखे मुलखावेगळे उद्योजक आपल्या कंपनीला पाचशे कोटींहून अधिक तोट्यातून बाहेर काढतात आणि जागतिक स्तरावर प्रचंड भरारी घेऊ शकतात.

वेगळेपण:-


बहुतेक सर्व यशस्वी व्यक्‍तींचा अभ्यास करताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे नेहमीच्या मळलेल्या वाटा तुडवायचे त्यांनी स्पष्टपणे नाकारले आहे. काही तरी नवीन, काहीतरी वेगळे करण्याची जिद्द त्यांनी जाणीवपूर्वक जोपासलेली दिसते. आपल्या कार्यपरिघात काही तरी वेगळं करून दाखविण्याची इच्छा जोपासताना दिसतात.
यशस्वी माणसे आपल्या बुद्धीचे तेज प्रकट करून आपले वेगळेपण सिद्ध करून दाखवितात. आत्ताचे एक उदाहरण अगदी प्रकर्षाने जाणवते ते म्हणजे माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांचे. भारतातील त्यांच्या अगोदर झालेल्या इतर राष्ट्रपतींशी त्यांची तुलना करून बघा. किती वेगळेपण जाणवते! भारताला "सुपर पॉवर' बनण्याचे स्वप्न त्यांनी दिले. सर्व मुले आणि तरुणांना उत्साहाने भारले, त्यांच्यात देशप्रेम निर्माण केले. एवढेच नव्हे तर राष्ट्रपतिपदालाच रूढींच्या जोखडातून बाहेर काढून एक नवे परिमाणच दिले आणि तेही किती साधेपणाने. प्रयोग आणि मेहनत यातून आपले वेगळेपण दाखवीत वर्गीस कुरियन हा धातुशास्त्रज्ञ या विषयातील तंत्रज्ञ, जगप्रसिद्ध "गो पालक' झाला.



जिज्ञासा:-

यशस्वी माणसांपैकी अगदी चटकन लक्षात येणारी कल्पक माणसे म्हणजे जगदीशचंद्र बसू, रवींद्रनाथ टागोर, स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि जमशेदजी टाटा. या सर्व मोठ्या आणि कल्पक माणसांध्ये तुम्हाला काय सारखेपणा दिसतो? अनेक गोष्टींमध्ये ते जिज्ञासू होते असे स्पष्ट जाणवते.


म्हणजेच त्यांना काही चांगले आणि मार्गदर्शक प्रश्‍न सुचले होते आणि त्या प्रश्‍नांचा त्यांनी आयुष्यभर पाठपुरावा केला, त्यांचा पिच्छा पुरवला. काय होती ही त्यांची जिज्ञासा?
जगदीशचंद्र बसू - वनस्पतीला जीव असतो का?
रवींद्रनाथ टागोर - सौंदर्य म्हणजे काय?
स्वामी विवेकानंद - मला देव दिसू शकेल काय?
महात्मा गांधी - भारताला स्वराज्य कसे मिळेल?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर -
माणसा-माणसांत भेद का?
जमशेदजी टाटा - भारताची
औद्योगिक प्रगती कशी साधावी?
अशी ही त्यांची जिज्ञासा होती आणि ती भागविण्यासाठी त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्यच वेचले आणि अद्वितीय यश संपादन केले.



आपले म्हणणे दुसऱ्याला पटवून देण्याची क्षमता:-

आपले म्हणणे दुसऱ्याला पटवून देण्याची क्षमता अथवा आपले विचार दुसऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचे कौशल्य, वाटाघाटीचे आणि सादरीकरणाचे कौशल्य, आपल्या व्यक्‍तिमत्त्वाची छाप पाडता येणं या कला आजच्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात खूपच महत्त्वाच्या ठरत आहेत, कारण हे युग खूपच पारदर्शी आहे. माणसाच्या जीवनाचा एकूण प्रवास तीन टप्प्यांतून होत असतो. पहिला टप्पा "परावलंबना'चा. मग "स्वावलंबना'चा आणि त्यानंतर "परस्परावलंबना'चा असा हा प्रवास आहे. यशस्वी माणसांना आपल्या अवतीभोवतीच्या माणसांना आपल्या कार्यात सहभागी करून घेणे फार गरजेचे असते. कारण परिणामकारी आणि अर्थपूर्ण असे कार्य एकट्याला करता येत नाही. त्यासाठी इतरांची मदतही आवश्‍यक असते आणि त्यासाठी वरील कौशल्ये फार महत्त्वाची ठरतात. अनेक यशस्वी माणसांचे निरीक्षण केल्यास त्यांच्यात आपले म्हणणे दुसऱ्याला पटवून देण्याची क्षमता विपुल प्रमाणात दिसते. किरण मुजुदार यांचे उदाहरण घेता येईल. त्या म्हणतात, "मी माझ्या सहकाऱ्यांना "बायोकॉन'चे स्वप्न आणि माझे व्यक्‍तिमत्त्व पटवून दिले आणि माझ्या कामासाठी त्यांना प्रेरित केले.'

योग्य माणसांची निवड:-

जे. आर. डी. टाटा, रतन टाटा, राहुल बजाज आणि आदित्य विक्रम बिर्ला यांसारख्या यशस्वी उद्योजकांची चरित्रे अभ्यासताना त्यांनी आपल्या यशाचा एक महत्त्वाचा पैलू उलगडून दाखविताना म्हटले आहे,

"आमचे यश हे आम्ही चांगली माणसे निवडली. त्यांना योग्य ते स्वातंत्र्य आणि साधनसामग्री उपलब्ध करून दिली आणि मग त्यांनी त्यांच्य क्षमता पणाला लावून आम्हाला अपेक्षित परिणाम दिले.''

यावरून असे स्पष्ट होते, की कोणताही उद्योजक उद्योगातल्या सर्वच गोष्टी फक्‍त स्वत: आणि स्वत:च करू शकत नाही. त्यासाठी त्याला इतरांची मदतही लागतेच. यासाठी योग्य माणसांची निवड करून त्यांच्याकडून उत्कृष्ट कामगिरी करून घेणे आवश्‍यक असते.

धोका पत्करण्याची तयारी:-


यशासाठी डोळसपणे धोका पत्करणे आवश्‍यक आहे, नव्हे अपरिहार्यच आहे. जबाबदारीने धोका पत्करणे हे ज्ञान, प्रशिक्षण, परिश्रम, आत्मविश्‍वास आणि क्षमता यांवर आधारित असायला हवे. त्यामुळे अडचणीला धैर्याने सामोरे जाण्याचे बळ माणसाला मिळते. कधीच काही न करणारा माणूस चुका करीत नाही, परंतु धोका असल्यामुळे काहीच न करणे हीच मोठी चूक ठरते. योग्य धोका आणि जुगार यामधला फरक फार महत्त्वाचा आहे. एकदा एका माणसाने एका शेतकऱ्याला विचारले, ""चालू हंगामात गहू पेरला का?'' शेतकऱ्याने उत्तर दिले, ""नाही, कारण यंदा पावसाची काही खात्री नाही.'' मग त्या माणसाने विचारले, ""मग तू मका पेरलास का?'' तो शेतकरी म्हणाला, ""नाही, मक्‍याच्या पिकावर कीड पडेल अशी मला भीती वाटली.'' त्या माणसाने त्यानंतर विचारले, ""मग तू पेरलेस तरी काय?'' त्यावर शेतकरी म्हणाला, ""काही नाही! मी ठरवले की कोणताही धोका पत्करायचा नाही.''
धोका पत्करणे हा तर यशस्वी व्यक्‍तिमत्त्वाचा अविभाज्य भाग आहे. जबाबदारी स्वीकारणे, परिणामांना जबाबदार राहणे, अपयशाला न जुमानता प्रयोग करीत राहणे आणि पडत, धडपडत चुकांमधून शिकणे, त्यांची जबाबदारी घेणे या गोष्टी प्रगतीसाठी आवश्‍यक असतात.



मूल्यवर्धन:-

बाबा कल्याणींनी सर्वांना एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे. उद्योग सुरू करण्यापूर्वी ते जेव्हा व्यापार करत होते तेव्हाचा अनुभव सांगताना ते म्हणतात, ""लक्षात ठेवा, जिथे पिकते तिथे ते विकत नाही. जेव्हा पिकते तेव्हा विकत नाही आणि जसे पिकते तसे विकत नाही.'' यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की, आपण जी कृती करतो ती नेहमी वस्तूंचे किंवा सेवेचे मूल्यवर्धन करणारी असावी. या मूल्यवर्धनात आपला वाटा जितका जास्त, जितका मोलाचा, त्या प्रमाणात आपला फायदाही मोठा होतो.

एकाग्रता:-

"आयुष्याच्या महामार्गावरून प्रवास करताना तुमची नजर ध्येयावर असू द्या. नेके मुद्‌द्‌याचेच काय ते पाहा. अनावश्‍यक किरकोळ बाबींकडे दुर्लक्ष करा.' एकाग्रता म्हणजे लक्ष केंद्रित करण्याची मध्यवर्ती संकल्पना, ध्येयापर्यंत पोचण्याच्या दृष्टीने एकवटलेले ध्यान. आपण ठरवलेल्या उद्दिष्टांवर लक्ष एकाग्र करणे. ध्येयावर लक्ष केंद्रित केल्याशिवाय, एकाग्र केल्याशिवाय आपल्याला आपलं ध्येय गाठता येणार नाही.

मूल्य:-

मूल्य म्हणजे सचोटी, प्रामाणिकपणा, आपल्या बांधिलकीची सन्मानपूर्वक जाणीव ठेवणे, सत्यवचनीपणा, स्वतंत्रता यांसारख्या गुणांचा संचय. आपल्या कार्याच्या ध्यासाने झपाटलेल्या व्यक्‍ती मूल्याधिष्ठित वर्तन करतात. जगात मूल्यं नसती तर आपले पूर्ण सामाजिक झाले असते आणि वैयक्‍तिक आयुष्यंही अर्थहीन. आयुष्य अर्थहीन आपल्या प्रत्येकाला आपले आयुष्य अर्थपूर्ण व्हावे असेच वाटते. त्याला एक विशिष्ट दिशा असावी, स्वत:ची काही शिस्त असावी, अधिकार असावा आणि इतरांनाही आपण मार्गदर्शक बनावे. मूल्यांमुळे हे सर्व स्थायी स्वरूपात प्राप्त होते आणि म्हणूनच उद्योजकांचे व्यवहार मूल्यवर्धक असावयास हवेत. उद्योग हे उत्तम माणसांचे एक शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक प्रगट रूप आहे. कोणतीही संस्था ही पैशांच्या किंवा यंत्राच्या सामर्थ्यावर नाही तर माणसांच्या दर्जावर नावारूपाला येते.

अपरिमित ऊर्जा:-

अपरिमित ऊर्जा, चैतन्यमयता, शारीरिक क्षमता या बाबी परस्परावलंबी असतात. जगावेगळे काही करायचे म्हणजे अमर्याद ऊर्जा हवीच. त्यामुळेच ही जगावेगळी माणसे प्रचंड ऊर्जेनं सळ असतात. एवढेच नाही तर, ही माणसं उत्साह उत्सर्जित करीत असतात. आपल्या अवती-भोवतीचे वातावरण भारूनच टाकीत असतात. कार्यग्नता ही त्यांच्यासाठी सर्वांत महत्त्वाची गोष्ट असते. आपण करीत असलेल्या कामावर आपले प्रेम आणि श्रद्धा मात्र असावी लागते, तेव्हाच अशी निरंतर ऊर्जा उत्पन्न होऊ शकते.

ज्ञानग्रहण:-


शिकत राहणे, ज्ञान मिळवणे आणि ते ग्रहण करणे यासाठी योग्य अभ्यास आणि अनुभव यांची गरज असते. या गोष्टींमुळे माणूस अधिकाधिक सक्षम होत जातो. आपली कौशल्ये वाढतच जातात. बऱ्याच वेळा मोठ्या उद्योजकांचे शिक्षण एका क्षेत्रातील असते; पण कामगिरी मात्र दुसऱ्याच क्षेत्रात असते आणि यासाठी तर सतत ज्ञान ग्रहण करण्याची आवश्‍यकता असते आणि त्याचा फायदाही होतो. कमी शिकलेली माणसेही निवडलेल्या क्षेत्रात प्रचंड यश संपादन करू शकतात.
जे. आर. डी. टाटा हे काही कारणांमुळे पदवी संपादन करण्याआधीच व्यवसायात उतरले पण सतत शिकत राहण्याच्या वृत्तीमुळे ते हिमालयाएवढी उंची गाठू शकले. अनेक गोष्टी जवळून बघितल्यामुळे आत्मसात करता येतात. परिषदांतील सहभागामुळे, प्रदर्शनांना दिलेल्या भेटींमुळे आणि प्रवासामुळे माणसाला ज्ञानग्रहणाची उत्तम संधी प्राप्त करता येते. अर्थात, यासाठी हेतुपूर्वक परिश्रम मात्र घ्यावे लागतातच.



विनयशीलता:-

वृक्ष जेव्हा प्रचंड फळांनी बहरतो, तेव्हा तो स्वाभाविकपणे खाली झुकतो. त्याचप्रमाणे एखादे व्यक्‍तिमत्त्व नैसर्गिकपणे बहरते, समृद्ध होते तेव्हा नम्र होते, विनयशील बनते. विनयशीलता म्हणजे अहंकारावर नियंत्रण, नम्रता. या गुणुांळे यशस्वी व्यक्‍तिमत्त्व अधिकच खुलते, उठावदार बनते. विशेष काही करून दाखविणारे आणि सौम्य, विनयशील स्त्री-पुरुष हे विकासासाठी धडपडणाऱ्या लोकांचे स्फूर्तिस्थान बनतात. अशी माणसे आपल्या यशाचे श्रेय न चुकता आपल्या सहकाऱ्यांना, गटाला, कुटुंबाला, गुरुजनांना आणि नशिबालाही देताना दिसतात. त्यांना गर्व नसतो. स्वाभिमान मात्र नक्‍कीच असतो. गर्वाने डोके जड होते तर स्वाभिमानाने ते भारावते. जड डोक्‍यामुळे डोकेदुखी निर्माण होते तर भारावलेल्या हृदयामुळे माणूस विनयशील बनतो; त्यामुळे स्वाभिमानी माणसे थोडीफार स्तुती ऐकून सुखावतात परंतु खुशामत करणाऱ्यांना चार पावले दूरच ठेवताना दिसतात. त्यांचा स्वाभिमान नेहमीच संयमित असतो.

सर्वाधिक खपाचे "बिझनेस महाराजा' हे गीता पिरामल यांचे पुस्तक नुकतेच वाचण्यात आले. त्यांनी भारतातील आठ महान उद्योगपतींमधील तीन समान गुणवैशिष्ट्यांचे वर्णन केले आहे. हे महान उद्योगपती म्हणजे रतन टाटा, आदित्य बिर्ला, धीरूभाई अंबानी, राहुल बजाज, रामप्रसाद गोएंका, ब्रिजमोहन खैतान आणि भरत/विजय शहा. या सर्वां ध्ये आत्यंतिक एकाग्रता, अपरिमित ऊर्जा आणि आपण हाती घेतलेल्या कार्याचा प्रचंड ध्यास ही तीन वैशिष्ट्ये आहेत. या सर्वांनी आपल्या महत्त्वाकांक्षेला संपूर्ण वाहून घेतलेले आहे.

आपलं ध्येय वास्तवात उतरवण्यासाठी या व्यक्‍ती तासन्‌ तास काम करतात. या सर्वांनीच काही मूलभूत आणि साध्या व्यवस्थापन तत्त्वांचा वापर केलेला आढळतो. तो म्हणजे कामासाठी उत्कृष्ट माणसे निवडा, त्यांना उत्तम वागणूक द्या, त्यांना जबाबदारी द्या आणि त्यांच्याकडून सर्वश्रेष्ठ कामगिरीची अपेक्षा करा. या सर्वांमध्ये आढळलेले सर्वसाधारण गुण असे की, ते सव आपल्या कामात अतिशय दक्ष होते. त्यांच्यात प्रचंड एकाग्रता होती. प्रचंड ऊर्जा होती. त्या सर्वांना आपल्या कामाने पछाडलेले होते. त्यांच्या महत्त्वाकांक्षेशी त्यांची प्रचंड बांधिलकी होती. वेळेची तमा न बाळगता ते आपल्या कामात गर्क होते. ते दुराग्रही होते. एकदा का त्यांच्या मनात कल्पनेचा अंकुर रुजला, की सहजासहजी तो त्यांच्या डोक्‍यातून जात नाही. त्या कल्पनांचा पाठपुरावा ते अतिशय चिकाटीने करताना दिसतात.

या सर्व व्यक्‍तिमत्त्वांमध्ये त्यांची हुशारी, कार्यक्षमता, योग्य पार्श्‍वभूमी, आर्थिक पाठबळ, कार्याची प्रचंड तळमळ आणि चिकाटी या गोष्टी तर होत्याच यात काहीही शंका नाही; परंतु त्यांच्या प्रचंड यशाला कारणीभूत असलेल्या आणि त्यांच्या नियंत्रणाबाहेरील पण प्रभावी अशा दोन गोष्टी अगदी स्पष्ट जाणवतात ज्या त्यांना त्यांनी गाठलेल्या यशाच्या शिखरावर घेऊन जाण्यास उपयुक्‍त ठरल्या आहेत. त्या म्हणजे त्यांना भेटलेले मार्गदर्शक की, ज्यांनी त्यांना त्यांच्या कठीण काळात मदतीचा हात देऊन पुढे नेले आहे. त्याचबरोबर नशिबाने त्यांना दिलेली साथही खूप मोलाची वाटते.


या गोष्टी अगदी निर्णायक जरी नसल्या तरी त्या त्यांच्या बाजूने नसत्या तर काय झाले असते? त्यांनी मिळवलेले यश ते मिळवू शकले असते का? हा विचारही आपल्या मनात येऊन जातोच.









by- Internet

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल