बुधवार, १२ डिसेंबर, २०१८

युवा शेतकरी उतरला बटाटा वेफर्स उद्योगात...


-----------------
कुटुंबाचे पाठबळ, कल्पकता, व्यवसाय
बांधणीसाठी केलेले "होमवर्क",
जोखीम घेण्याची वृत्ती या
गुणांच्या जोरावर पुणे जिल्ह्यातील बोरी
बुद्रुक येथील भरत बाळू वाजे या युवकाने बटाटा वेफर्स
निर्मिती उद्योग सुरू केला आहे. परिसरात सहा ते सात
वितरक नेमून स्थानिक स्तरावरच बाजारपेठ हस्तगत करण्याचे
प्रयत्न सुरू केले आहेत.
-----------------
संतोष डुकरे
-----------------
पुणे जिल्ह्यात बोरी बुद्रुक (ता. जुन्नर)
येथील मारुती नाना वाजे यांचे एकत्र कुटुंब.
सुमारे 18 ते 20 एकर शेती. भरत हा
कुटुंबातील नव्या पिढीचा
प्रतिनिधी. त्याने बी. कॉमनंतर पुण्यात
"अकाउंट मॅनेजर'चा एक वर्षाचा अभ्यासक्रम केला आणि
नोकरीचा शोध घेतला. पण आठ-दहा हजार रुपयांहून
अधिक पगार मिळेना. कुटुंबाची
शेतीची पार्श्वभूमी, व्यवसाय
मार्गदर्शन, "डिस्कव्हरी' चॅनेलवरील
"फुड फॅक्टरी' हा कार्यक्रम, जगप्रसिद्ध
उद्योगपतीच्या आयुष्यावरील पुस्तक
आदींमधून त्याला उद्योजक होण्याची
प्रेरणा मिळाली. पुण्यातील खाद्यपदार्थ
विक्रीच्या दुकानांची पाहणी,
इंटरनेटरील "प्रकल्प', बाजारपेठ सर्वेक्षण हे सर्व
टप्पे पार केल्यानंतर बटाटा वेफर्सला मार्केटमध्ये मोठी
मागणी असल्याचे प्रकर्षाने जाणवले. त्यानंतर हाच
व्यवसाय उभारण्याचे नक्की केले.
सुरवातीचे प्रयत्न
भरत यांनी व्यवसायाचा कच्चा आराखडा तयार केला.
बटाटा, तेल, पॅकेजिंग मटेरियल सहज उपलब्ध होते. अनेक
प्रकल्पांची पाहणी केली.
नारायणगाव, पुणे, रांजणगावला घरगुती वेफर्स तयार
करून विक्री करणाऱ्यांच्या भेटी घेतल्या. या
व्यवसायातील संभाजी गाढवे यांचे अनुभवाचे
बोल मार्गदर्शक ठरले. काही कंपन्यांच्या
अधिकाऱ्यांनीही सहकार्य केले. प्रत्येक
ग्रॅमच्या वेफर्स पॅकिंगमागे किमान 5 पैसे निव्वळ नफा शिल्लक
राहतो इथपर्यंत गणित जुळले. त्यानंतर भांडवल
उभारणीसाठी कुटुंबासमोर प्रस्ताव ठेवला.
कुटुंबीयांनी भरतची कल्पना
उचलून धरत प्रक्रिया केंद्र उभारणीचा
श्रीगणेशा केला.
प्रकल्पाची जुळवाजुळव
इंटरनेटवरील संकेतस्थळावरुन वेफर्स
निर्मितीच्या यंत्रांची ऑनलाइन'
खरेदी केली. प्रक्रिया युनिटचा आत्मा
असलेले मुख्य यंत्र पाच लाख रुपयांना पडले. पॅकिंग यंत्रासोबत
हवा भरण्यासाठी "कॉम्प्रेसर', वेफर्स जास्त काळ
टिकून रहावेत व त्याची चव दीर्घकाळ
रहावी यासाठी पॅकिंगमध्ये
भरण्यासाठी नायट्रोजन, प्लॅस्टिक पॅकेजिंग मटेरियल
आदींची खरेदी
केली. बटाट्याची साल
काढण्यासाठी पोटॅटो पिलर, चकत्या कटर, वेफर्स ड्रायर
ही यंत्रे पुण्यातून खरेदी
केली. एका "इंजिनिअरिंग फर्म'कडून बटाटे
धुण्यासाठी "वॉशिंग युनिट व वर्किंग टेबल' घेतले.
.....................................
भरत यांचा वेफर्स उद्योग दृष्टिक्षेपात
-यंदाच्या एक जूनपासून वेफर्स निर्मिती सुरू
-सध्या बटाटा मंचर व नारायणगाव परिसरातून व्यापाऱ्यांकडून
खरेदी केला जातो.
-परिसरातील शेतकऱ्यांसोबत करार शेतीद्वारे
बटाटा उपलब्ध करणार
-पूर्ण क्षमतेने प्रकल्प चालवला तर दररोज एक टन बटाट्यापासून
तयार होतात 100 ते 250 किलो वेफर्स
-सध्या भरत तयार करतात दररोज 50 किलोपर्यंत वेफर्स
-सध्या बटाट्याचे "शॉर्टेज'असल्याने उत्पादन तात्पुरते थांबवले.
-आत्तापर्यंत एकूण दोन ते अडीच टन उत्पादन व
विक्री
-बटाटा कमी असेल त्या वेळी फरसाण
निर्मिती करून उत्पन्न सुरू ठेवले.
.....................................................................
वेफर्सचा दर
प्रत्येकी 18 ग्रॅमचे पॅकेट- त्याची
एमआरपी- पाच रुपये.
मार्केट
सध्या सहा ते सात डीलरची नेमणूक.
त्यांच्यामार्फत तालुक्यात किरकोळ दुकानांची
साखळी तयार झाली आहे. त्यामार्फत
विक्री होते. मागणी चांगली
असून त्यानुसार पुरवठा करण्याचे प्रयत्न. वर्षाला 20 टन वेफर्स
निर्मितीचे उद्दिष्ट.
अर्थकारण
एकूण प्रकल्प उभारणीसाठी सुमारे 20
लाख रुपये खर्च आला. शेतातील उत्पन्नातून पैसे
जमवले. आता बॅंकेचे कर्ज काढणार असून कृषी
विभागाच्या अनुदानाचाही लाभ घेण्याचा प्रयत्न आहे.
एक किलो बटाट्यापासून सुमारे 250 ग्रॅम वेफर्स तयार होतात. या
प्रति पॅकेटमागे किमान 50 पैसे नफा हे आर्थिक गणित समोर ठेवले
आहे.
...............................................................
मनुष्यबळ
वेफर्स निर्मितीसाठी मनुष्यबळ जास्त
लागते असे भरत सांगतात. बटाटा प्रतवारी, धुणे, कापणे,
सुकवणे, फ्राय करणे, पॅकिंग या सर्व कामांसाठी कुशल
कामगार लागतात. कुटुंबातील सात जण प्रकल्पात
कार्यरत आहेतच. शिवाय उत्तर प्रदेशातील दोन भैये
(वेफर्स तळण्यासाठी), बटाटा धुण्यासाठी
स्थानिक तीन व्यक्ती असे मनुष्यबळ
आहे.
स्वतःची कंपनी, स्वतःचा ब्रॅन्ड
वेफर्स निर्मितीतील प्रत्येक
बाबीवर बारकाईने लक्ष ठेवून गुणवत्तेशी
तडजोड न करण्याचा भरत यांचा प्रयत्न असतो. अनेकांप्रमाणे
सुट्या स्वरूपात विक्री किंवा मोठ्या कंपनीला
सुट्या वेफर्सचा पुरवठा हे दोन पर्याय सुरक्षित व्यवसायाच्या
दृष्टीने अनेकांनी सुचवले. मात्र ते नाकारून
श्री राजमाता फूड्स ऍन्ड वेफर्स प्रा. लि या
नावाची स्वतःची कंपनी स्थापन
केली.
गुणवत्ता
अन्नसुरक्षा विषयक संस्थेकडून (एफएसएसएआय) परवाना
घेतला आहे. सध्या "श्री' या ब्रॅन्डने
वेफर्सची विक्री केली जाते.
उत्पादन निर्मितीत कोणतेही रासायनिक
घटक वापरले जात नाहीत. वेफर्समधील
खारटपणा संतुलित ठेवल्याने आपले उत्पादन चविष्ट झाल्याचे भरत
सांगतात. गुणवत्ता सर्वोत्तम देणार असू तर दुसऱ्यांच्या
ब्रॅंडसाठी माल का द्यायचा? आपल्यात व्यवसाय
वृद्धीची क्षमता असताना केवळ माल
पुरवठादार का व्हायचे? या विचारसरणीने भरत
यांची वाटचाल सुरू आहे.
जोखीम
वेफर्स निर्मिती उद्योगात बटाटा हा कच्चा माल
असल्याने त्याचा पुरवठा सतत होणे गरजेचे असते.
त्याच्या दरात अचानक वाढ झाली की
नफ्याचे मार्जीन बिघडते. त्याचा आर्थिक
फटकाही सहन करावा लागतो. अन्य
ब्रॅंडचीही स्पर्धा आहे, त्यामुळे गुणवत्ता
सतत टिकवावी लागते.
भरत यांच्यातील उद्योजकाचे गुण
1) पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील
सातगाव पठार हा बटाटा उत्पादनाचा सर्वात मोठा परिसर आहे. या
भागातील शेतकरी काही
कंपन्यांसोबत वेफर्ससाठी बटाटाची करार
शेती करतात. बटाट्यावर आधारीत प्रक्रिया
उद्योग सातत्याने चालू शकेल का, तोटा झाला तर काय? अशा
शंकांनी इथले शेतकरी अद्याप प्रक्रियेत
उतरलेले नाहीत. मात्र भरत यांनी
स्वतःकडे बटाटा उत्पादन नसतानाही
परिसरातील ही कोंडी फोडण्याचा
प्रयत्न करताना स्थानिक व्यापाऱ्यांकडून बटाटा खरेदी
केला.
2) खेड्यापाड्यात किराणा माल, खाद्यपदार्थांची दुकाने
आहेत. त्यांना विविध जिन्नसांचा पुरवठा करणारी
साखळी कार्यरत असते. पुणे जिल्ह्यातील
एकेका तालुक्यात अशा साखळ्या कार्यरत आहेत. भरत
यांनी अशाच साखळीवर लक्ष केंद्रित करून
वेफर्सचे वितरण सुरू केले.
3) शेती व संलग्न व्यवसाय किंवा शेतमाल
प्रक्रियाविषयक कोणत्या प्रकारचे शिक्षण, अनुभव नसताना
प्रक्रिया उद्योग उभारण्याचा निर्णय घेतला. कागदपत्रे
जमविण्यासाठी बऱ्याच अडचणी आल्या.
वेफर्स निर्मितीच्या प्रमाणीतर
पद्धतींपासून सर्व बाबींची
खातरजमा केली. इच्छा असेल तर मार्ग दिसेल यानुसार
प्रक्रीयेच्या वेगळ्या वाटेने वाटचाल सुरू
केली.
--------------------
भरत वाजे - 7775965025, 7387825756

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल