माणसं जन्माला येतानाच हुषारी घेऊन येतात असा एक समज आहे. पण एका संशोधनानुसार माणसं आपल्या क्षमता वाढवू शकतात आणि जगण्याचा उत्कट आनंद घेऊ शकतात. त्यासाठी काही सवयी लावून घ्यायला हव्यात. या 7 सवयी अंगी बाणवा आणि व्हा एकदम स्मार्ट...
1. एखाद्या संगीतातलं वाद्य शिका
 
 
संगीताची गोडी आणि सराव सर्जनशीलता वाढवतो. त्यामुळे भाषा तर सुधारतेच शिवाय मेंदू तरतरीत होतो आणि बुद्धीशी संबंधित अनेक कौशल्यं आत्मसात करता येतात. वाद्य वाजवताना, मेंदूमधला विशिष्ट भाग अत्यंत कार्यरत होतो जो आपली सर्जनशीलता वाढवतो, ज्याचा फायदा स्मरणशक्ती, समस्यांचं निराकारण करणे अशा अन्य क्षेत्रांतही होतो. विशेष म्हणजे याचा वयाशी संबंध नाही. वृद्ध व्यक्तीपण संगीताची वाद्य शिकली तर त्यांनाही लाभ होतो.
 
2. काहीही वाचा... पण वाचा
 
 
वाचाल तर वाचाल... असं आपण म्हणतो. पण प्रत्येकानं काहीतरी वाचायलाच हवं. अमुकंच वाचायला हवं, तमकं नको असं काही नाही. संशोधन सांगतं की तुम्ही अर्थविषयक वृत्तपत्र वाचा, हॅरी पॉटर वाचा व एखादी रहस्यकथा वाचा, तुम्हाला आनंद यायला हवा, मजा वाटायला हवी. त्यामुळे मेंदूमध्ये असे काही स्त्राव तयार होतात, जे तुम्हाला बौद्धिक व भावनितदृष्ट्या समृद्ध करतात.
यामुळे तुम्हाला लोकांच्या समस्या कळतात, त्या तुम्ही सोडवू शकता. आयुष्यामधल्या घटनाक्रमांचा अर्थ चांगल्या प्रकारे लावता येतो आणि लाइफ तुलनेनं सोप्पं होतं. यामुळं ऑफिसमधलं व्यवस्थापनकौशल्य देखील वाढतं असं हे संशोधन सांगतं.
 
3. नियमित व्यायाम करा...
 
 
व्यायाम सगळेच करतात. पण नियमित नाही करत. नियमित, रोजच्या रोज व्यायाम महत्त्वाचा आहे. त्यामुळे स्मरणशक्तीसाठी अत्यावश्यक असलेली प्रोटिन्स मोठ्या प्रमाणावर शरीरात तयार होतात. यामुळे एकाग्रता वाढते आणि बौद्धिक क्षमताही वाढते.
 
4. नवी भाषा शिका
 
 
एखादी अपरिचित भाषा शिकणं हा स्मरणशक्ती व बौद्धिक क्षमता सुधारण्याचा एक चांगला मार्ग असल्याचं या संशोधनात आढळलं आहे. ज्या व्यक्तिंना एकापेक्षा जास्त भाषा येतात, त्या व्यक्ती कोडींची उकल करण्यात जास्त तरबेज असतात असं दिसून आलंय. नवी भाषा शिकायचा प्रयत्न केला तर मेंदूला चांगला व्यायाम होतो,ज्यामुळे नियोजन, समस्या सोडवणं अशा व्यावहारिक गोष्टींमध्ये तुम्ही तरबेज होता.
 
5. आधीच्या शिक्षणाची उजळणी करा
 
 
बहुतेकवेळा आपण आधी जे शिकलेलं असतं, त्याचा व्यावहारिक जगात काही उपयोग नाही म्हणून कधीच वापर करत नाही. त्यामुळे परीक्षेसाठी जोरदार तयारी करायची आणि नंतर ते विसरून जायचं असं आपण करतो. याचा परिणाम असा होतो, की शिकलेलं लवकर विसरण्याची आपल्या मेंदूला सवय लागते. त्यामुळे आधी जे शिकलंय ते विसरू नका, तर शक्य तेव्हा उजळणी करा. त्यामुळे मेंदूची साठवण क्षमताच वाढेल असं नाही, तर जे काही शिकलोय ते सगळं लक्षात ठेवण्याची मेंदूची कार्यक्षमता वाढेल ज्याचा फायदा सगळ्याच बाबतीत होईल.
एखादं पुस्तक वाचलंत, तर त्यातील पॉइंट काढा. ते पॉइंट अधेमध्ये वाचा, तुमच्या लक्षात येईल की हळूहळू अख्खं पुस्तक तुमच्या स्मरणात आहे. याच प्रकारे कामाच्या गोष्टी, अभ्यासाच्या गोष्टी, प्रकल्प मुद्यांच्या माध्यमातून आठवत रहा त्यांची उजळणी करा. 
 
6. मेंदूचा व्यायाम करा
 
 
व्यायाम म्हटलं की आपल्याला जिम, पोहणं, सायकलिंग आठवतं. पण मेंदूलादेखील व्यायामाची गरज असते. सुडोकू, शब्दकोडी, बोर्डगेम, व्हिडीयो गेम, कार्ड गेम असे मेंदूला प्रश्नांची उत्तरं सोडवायला लावणारे खेळ खेळा आणि मेंदूचा व्यायाम करा. यामुळे तुमचा मेंदू सदैव तरतरीत राहील आणि बुद्धीमत्तेचं एक वेगळंच तेज तुमच्या चेहऱ्यावरही झळकेल. 
मेंदूच्या व्यायामामुळे एकाच गोष्टीकडेतुम्ही अनेक अंगाने बघू शकाल, तुमची विचारशक्ती वाढेल आणि प्रत्येक गोष्टीतले बारकावे, कंगोरे तुमच्या लक्षात येईल. मग तुम्हाला चिंतातूरपणासारखे विकार होणार नाहीत किंवा डिप्रेशनचा सामना करावा लागणार नाही.
 
7. ध्यानधारणा करा
 
 
मेंदूवर व त्याच्याशी संबंधित लहरींवर नियंत्रण मिळवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे ध्यानधारणा. ध्यानधारणा करणारी व्यक्ती कितीही अडचणींचा सामना करत असेल, किंवा कुठल्याही प्रतिकूल परिस्थितीत असेल तरी मनाचं संतुलन ढळू देत नाही आणि शांतचित्ताने मार्ग काढते. त्यामुळे मेंदूवर पूर्ण नियंत्रण राखण्यासाठी आणि कुठल्याही परिस्थितीत अविचल राहण्यासाठी ध्यानधारणा अत्यंत मोलाची भूमिका बजावते.
रोज 15 मिनिटं 20 मिनिटं वेळ काढा आणि मेडिटेशन नक्की करा... त्यासाठी काही खास जागाच लागते असं काही नाही. सरावानं अगदी प्रवास करताना म्हणजे, बसमध्ये किंवा ट्रेनमध्येही ध्यानधारणा करता येऊ शकते.
सगळ्यात मुख्य म्हणजे ध्यानधारणेचा प्रचंड फायदा तुम्हाला तुमच्या नोकरी अथवा व्यवसायातही होतो, कारण मन अविचल असेल, शांत असेल, संयमी असेल की योग्य मार्ग हे सापडतातंच.