गुरुवार, ६ डिसेंबर, २०१८

भारतातील सर्वात श्रीमंत गाव

भारतातील सर्वात श्रीमंत गाव

गुजरात राज्यातील आणंद जिल्ह्यातील "धरमाज' हे केवळ त्या राज्यातीलच नव्हे, तर देशातीलही सर्वात श्रीमंत गाव आहे. आणंदपासून अवघ्या 70 किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावाची लोकसंख्या 11 हजार 333. ग्रामस्थांचा व्यवसाय शेती आणि व्यापार. पण, या गावात असलेल्या 13 राष्ट्रीयीकृत बॅंकात ग्रामस्थांच्या 1 हजार कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. हे गाव धनाढ्य झालं आहे, ते गावातील शेती व्यवसायामुळे नाही. गेली अनेक दशकं या गावातील हजारो लोक परदेशात नोकऱ्या करतात आणि गावाकडे पैसे पाठवतात. गावातील 3 हजार पाटीदार कुटुंबातील घरटी 1 तरी माणूस परदेशात आहे. हे परदेशी अनिवासी ग्रामस्थ दरमहा आपल्या गावी, कुटुंबांना पैसे पाठवतात. हा पैसा लाखांच्या आसपास असतो. तो काही खर्च होत नाही. मग, घरचे लोक हे पैसे विशेषत: राष्ट्रीयीकृत बॅंका आणि पोस्टाच्या शाखेत ठेव ठेवतात. एवढ्या छोट्या गावात 13 बॅंका असाव्यात हाही जागतिक विक्रम असावा. 1959 मध्ये देना बॅंकेची पहिली शाखा या गावात सुरू झाली. त्यानंतरच्या 60 वर्षात स्टेट बॅंक, बॅंक ऑफ बडोदा, सेंट्रल बॅंक, अलाहाबाद, कॅनरा, इंन्डूसलॅंड, एच. डी. एफ. सी., आय. सी. आय. सी. आय. कार्पोरेशन या बॅंकांनी आपल्या बॅंकांच्या शाखा सुरू केल्या. या सर्व शाखात कोट्यवधी रुपयांच्या ठेवी आहेत. त्यात बॅंक ऑफ बडोदाच्या शाखेत सर्वाधिक म्हणजे 125 कोटी रुपयांच्या आणि त्या पाठोपाठ देना बॅंकेत 100 कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. धरमाज पिपल्स को-ऑपरेटिव्ह या  ग्रामस्थांनी स्थापन केलेल्या बॅंकेतही कोट्यवधींच्या ठेवी आहेत. इथले लोक ठेवी ठेवतात. पण, कर्जदार मात्र फारसे नाहीत.
हे गाव धनाढ्यांचे असल्याने गावातील घरं आलिशान आणि बंगल्यासारखी आहेत. प्रत्येक घराच्या दारात महागड्या मोटारींचे ताफे आहेत. गावातील सर्व रस्ते चकाचक आणि स्वच्छ आहेत. गावातील शाळा, कॉलेजच्या इमारती देखण्या आहेत. ग्रामस्थांनी वर्गणी काढून कोट्यवधी रुपयांच्या निधीतून गावाचा चौफेर विकास घडवतानाच शहरासारखे मोठें उद्यान आणि तलावही बांधला आहे. राज्यातील स्वच्छ आणि सुंदर गाव असाही धरमाज गावचा राज्यभरात लौकिकही आहे. गाव धनाढ्यांचे असले तरी, ते आळशी नाही. आधुनिक शेतीचा मूलमंत्र जपणाऱ्या या गावाने विहिरी, शेततळी, कूपनलिका याद्वारे शेतीसाठी हमखास पाण्याची सोय करून विविध बागायतींच्या पिकातही आपलं गाव आघाडीवर ठेवलं आहे. दुग्धोत्पादनातही धरमाज हे गाव आणंद जिल्ह्यात अग्रेसर आहे. एवढा प्रचंड पैसा असला तरी, त्याचा माज मात्र ग्रामस्थांना नाही. इथले लोक कष्टाळू आणि प्रामाणिक आहेत. आपल्या गावावर आणि गावासाठी-कुटुंबासाठी वर्षानुवर्ष परदेशात राहणाऱ्या आपल्या माणसांचा ओढा साऱ्या ग्रामस्थांना असल्यानेच अधून मधून गावात स्नेहमेळावेही होतात.
फक्त एकाच देशात या गावातील नोकरदार आहेत, असंही नाही. सर्वाधिक 1700 कुटुंबं ग्रेट ब्रिटनमध्ये, 300 कुटुंबं अमेरिकेत, 160 न्यूझीलंडमध्ये, 200 कुटुंबं कॅनडामध्ये आणि 60 कुटुंबं ऑस्ट्रेलियात नोकरीसाठी वास्तव्या-साठी आहेत. या गावातील एकूण 3120 लोक परदेशी राहतात.
केरळमधील अनिवासी भारतीयांच्या ठेवीची रक्कम 90 हजार कोटी रुपयांच्या आसपास असली तरी, या राज्यातील बहुतांश चाकरमाने सौदी अरेबिया आणि कुवेतमध्येच नोकऱ्या करतात. धरमाज गावातील लोक मात्र मध्य पूर्वेत नाहीतच. इतकी वर्षे परदेशात राहूनही तिथलं नागरिकत्व घ्यावे, असे धरमाज गावातील धनाढ्य नोकरदारांना मुळीच वाटत नाही. त्यांना आपल्या गावाची ओढ कायम असते आणि वर्षभरातनं एकदा तरी महिनाभराची सुट्टी घेऊन ही कुटुंबं आपल्या गावात राहण्यासाठी येतातच! गड्या आपुला गाव बरा, असं वाटणाऱ्या धरमाजकरांना परदेशातील वैभवाची, श्रीमंतीची भुरळ पडत नाही, पडलेली नाही हे विशेष!








vasudeo kulkarni
Monday, December 22, 2014 AT 11:41 AM (IST)
Tags: lolak1
http://www.dainikaikya.com/20141222/5520141464565292837.htm

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल