गुरुवार, ६ डिसेंबर, २०१८

गुजराती श्रीमंत का असतात?

गुजराती श्रीमंत का असतात?


_Gujarati_Shrimant_1.jpgगुजराती श्रीमंत का असतात या प्रश्नाचे उत्तर सोपे आहे. ते दुकानदार-व्यापारी असतात, सकाळी नऊ ते रात्री नऊ काम करतात. म्हणजे सर्वसामान्य नोकरदार-कामगार यांच्यापेक्षा चार तास अधिक काम करतात. त्याचा त्यांना मोबदला मिळणारच. व्यापारी-उद्योजक बचत करून भांडवल निर्मिती करतो. त्या भांडवलाची जास्त गुंतवणूक करतो. त्या गुंतवणुकीचा फायदा त्याला मिळतो. तो व्यसनमुक्त असतो, कुटुंबप्रेमी असतो. त्याची धोका पत्करण्याची तयारी असते. तो पैसे कमावण्यासाठी कोठेही स्थलांतर करण्यासही तयार असतो. तो या सगळ्या गुणांमुळे गरीब राहूच शकत नाही.
मार्क झुकेरबर्ग म्हणाला होता, की ‘जे आयुष्यात धोका पत्करत नाहीत ते स्वत:ला धोका देत असतात’. व्यापारी वृत्तीचे गुजराती झुकेरबर्गचे म्हणणे वाचल्याशिवाय दोन हजार वर्षांपासून तसा धोका पत्करत आले आहेत. भडोच, सुरत, वेरावळ ही पुरातन बंदरे. त्यांचा व्यापार युरोपपर्यंत होता. गलबतातून सामान घेऊन ग्रीस, मस्कत येथे जाणे हे धोका पत्करणेच आहे, नाही तर काय? पैठणहून सामान घेऊन कल्याण, शूर्पारक (नालासोपारा) बंदरातून लोक युरोपपर्यंत जात होते हाही इतिहास आहे. नंतर तो थांबला, पण गुजराथी थांबले नाहीत. आज, अमेरिकेत पंधरा-सोळा लाख, इंग्लंडमध्ये सहा लाख, आफ्रिकेत तीन लाख गुजराती आहेत. एकूण, भारताबाहेर असलेल्या भारतीयांपैकी तेहतीस टक्के छोट्याशा गुजरात राज्यातील आहेत. अमेरिकेतील मोटेल्सपैकी चाळीस टक्के पटेलांच्या मालकीची आहेत. म्हणून त्यांना पोटेल्स असेही म्हटले जाते. जगातील एकशेनव्वद देशांपैकी एकशेएकोणतीस देशांत गुजराती आहेत; अगदी कॅनडापासून उत्तर ध्रुवाजवळच्या गावात हिऱ्याच्या खाणीजवळ आहेत.
माझ्या वडोदऱ्यातील मित्रांपैकी दोन मराठी श्रीमंत उद्योजक आहेत. बाकी नोकरीवाले. मात्र काही गुजराती कारखानदार मित्र करोडपती आहेत. तीन-चार जण बांधकाम व्यवसायात आहेत. त्यांच्याकडे किती पैसे आहेत त्याची कल्पना नाही, कारण ते फार साधे राहतात. त्यांची श्रीमंती त्यांच्या कुटुंबातील लग्नाच्या वेळी लक्षात येते.
काठेवाडातून सुरतेला जाऊन उद्योगधंदा करणारे लोक खूप आहेत. माझ्या आर्किटेक्चरच्या वर्गात सहा-सात मुले शिकत होती. ती सगळी करोडपतींची मुले. एका विद्यार्थिनीचे वडील सोने-हिरे यांचा व्यापार करतात. ती मुलगी किती संपत्तीची मालकीण आहे ते माहीत नाही. तिच्या कानातील कुडीत आणि अंगठीत भारीपैकी हिरे असतात. अशा तऱ्हेने, विद्यार्थ्यांमार्फत मला करोडपतींच्या संगतीत वावरण्यास मिळते. पण त्यांच्याशी बोलल्याशिवाय त्यांच्या श्रीमंतीची कल्पना येत नाही. ती मुले सगळे मोकळेपणाने सांगून टाकतात. माझा आर्किटेक्चर हा व्यवसाय असल्याने वडोदऱ्यातील काही बिल्डर ओळखीचे आहेत. ते चाळीस वर्षांपूर्वी सर्वसामान्य स्थितीत होते. ते पंचवीस वर्षांत करोडपती झाले.
भारतीयांना आदर्श वाटणाऱ्या अहमदाबादच्या ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट’मध्ये गुजराती विद्यार्थी नसतात. ते तितका वेळ पुस्तकी ज्ञान मिळवण्यात घालवत नाहीत, पण ते तेथे पास झालेल्यांना नोकरी देतात. त्यांचे पुष्कळ बचत करावी, प्रत्यक्ष अनुभव घ्यावा आणि जमलेले पैसे धंद्यात गुंतवावे हे ब्रीद असते. गुजराती कच्छी जैन भयानक श्रीमंत असतात.
ग्राहक जिवंत असेपर्यंत विक्रेता गरीब नसतो. कारण तो दहा रूपयांची वस्तू पंधराला विकतो. दैनंदिन गरजेच्या वस्तू बनवतात ते श्रीमंत होतातच. टुथपेस्ट, साबण, औषधे, तेले बनवणारे आणि विकणारे श्रीमंत आहेत. नुसती पटापट आठवणारी नावे घ्यायची तर धीरूभाई अंबानी - त्यांची दोन मुले मुकेश आणि अनिल, सनफार्मा औषध कंपनीचे अमरेलीत जन्मलेले दिलीप संघवी, दुसरे औषध बनवणारे टारेंट ग्रूपचे मेहता बंधू, अमेरिकेत धनाढ्य असलेले भरत देसाई, भारतात जन्मलेले पण अमेरिकेतील श्रीमंत रोमेश वाधवानी, कॅडिला औषध कंपनीचे पंकज पटेल, कोटक महेंद्र बँकवाले उदय कोटक. त्यांच्या बँकेत सत्तावीस लाख लोकांची खाती आहेत. मोटारी रिक्षांसाठी गॅस वितरण करणारे गौतम अदाणी. ‘निरमा’ साबण कंपनीचे शंकरभाई पटेल. अलेम्बिक केमिकलचे अमीन. साराभाई कुटुंब. मुंबई आणि अहमदाबादेतील कापडगिरण्यावाले. या सर्व गुजराती मालकीच्या कारखान्यांतील नोकऱ्यांत उच्च पदांवर मराठी माणसे असतात असे आढळले. कारखानदारांचा मराठी माणसावर विश्वास असे, कारण ते इमानदार असत.
पालनपुरी जैनांनी आणि काठेवाडच्या पटेलांनी - एकत्र कुटुंब असलेल्या गुजरात्यांनी, बेल्जियममध्ये अँटवर्पला हिऱ्यांचा व्यापार ज्यू लोकांच्या हातून हाती घेतला आहे. हिरे व्यापारी विनोद गौतम अठराव्या वर्षी पॅरिसला गेला. गौतमने बेल्जियम विमानतळावर लहानसे दुकान 1995 साली काढले. ते जगभर शंभर दुकाने काढण्याच्या बेतात आहेत. बेल्जियमला गेलो होतो तेव्हा त्यांचे अस्तित्व जाणवले होते. मुंबईचे शेअर बाजारवाले, हिरा बाजारवाले, त्रिभुवनदास भीमजी, असंख्य अडत्ये, होलसेलवाले आणि भारतभर पसरलेले नाना वस्तूंचे व्यापारी हे सगळे गुजराती, सिंधी आणि मारवाडी आहेत. पारशी लोकांची मातृभाषा गुजराती आहे. त्यांनाही गुजरात्यांमधे सामील केले तर टाटा-गोदरेजपासून शापुरजी पालनजींपर्यंत अनेक येतील. शापुरजींच्या कंपन्यांमध्ये जगभरात मिळून साठ हजार माणसे काम करतात.
सिनेसृष्टीत संजय लीला भन्साली, शीतल भाटिया, महेश-मुकेश-पूजा भट्ट, ‘कहानी’ सिनेमामुळे माहीत झालेला जयंतीलाल गाडा, साजिद नडियादवाला, ‘तेजाब’ सिनेमाचे निर्माते हिरा बाजारातील प्रतिष्ठित दिनेश गांधी. निर्माते मनमोहन देसाई... अशी सर्वांना माहीत असलेली अनेक नावे. ते सगळे नामवंत गुजराती. गुजरात्यांमध्ये अनेक जाती आहेत, ज्या नोकरी करत नाहीत. त्यांपैकी गुजरातींमध्ये संख्येने मोठी असलेली जात रजपूत होय. गुजरातेत राजपूत पुष्कळ आहेत. कारण बहुतेक संस्थाने त्यांची होती. ते क्षत्रिय असल्याने व्यापार धंदा करत नाहीत. ते कठीण प्रसंगीसुद्धा गोळया-बिस्किटे विकणार नाहीत. पण ते लोक पोलिस खात्यात पुष्कळ आहेत.
सगळ्यावर कडी केली ती संजीव मेहता या गुजरात्याने! त्याने ‘ईस्ट इंडिया कंपनी’ आठ वर्षापूर्वी विकत घेतली! सगळ्यांनाच आनंद झाला. अंगावर रोमांच उभे राहिले. ती बातमी ‘गुजरात समाचार’ वृत्तपत्रात पहिल्या पानावर झळकली. तो म्हणाला, “ज्या कंपनीने माझ्या भारत देशावर राज्य केले, ती आता भारतीयांच्या मालकीची झाली”.
एक महत्त्वाचा सांस्कृतिक फरक मराठी आणि गुजराती लोकांत आहे. मराठी घरात सरस्वतीपूजन किंवा पाटीपूजन होते. गुजरात्यांमध्ये लक्ष्मीपूजनाचे महत्त्व आहे. लक्ष्मीपूजन करणारे श्रीमंत असले तर नवल नाही. कोकण-देशावरचे लोक मुंबईला आले - कोणी गिरणी कामगार झाले. बाकीच्यांनी नोकऱ्या शोधल्या. कोणी व्यापार केला नाही. मराठी मनात शाळेपासून नक्की असते, की त्याला नोकरी करायची आहे. त्याचे पालकही तसेच वळण लावतात. मराठी तरुणाचे स्वप्न असते ते मेरिटमधे येऊन, चांगल्या महाविद्यालयात प्रवेश घेऊन, पास होऊन चांगली नोकरी मिळवायची. नंतर लग्न करायचे आणि सुखाने कालक्रमणा करायची. साहित्यसंगीतचित्रपट यांत मन गुंतवायचे हे त्यांपैकी अनेकांचे जीवनातील ध्येय असते. गुजराती जातीतील काही मुले धंद्यात कसे शिरायचे याचा विचार दहावीपासून करू लागतात, किंवा प्रोफेशनल कोर्सेस करतात.
मुंबईला माझ्या वर्गात, पन्नास वर्षांपूर्वी आफ्रिकेहून आलेला मुलगा होता. त्याचे वडील काठेवाडात दुष्काळ होता म्हणून आफ्रिकेला गेले. त्यांनी तेथे लहानसे दुकान उघडले. पाहता पाहता, ते श्रीमंत झाले. अगदी कमी भांडवलात सुरू केलेल्या लिज्जत पापडच्या उद्योगाने कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली आहेत. आणंद-खेडा जिल्ह्यांतील घराघरातील स्त्रिया दिवसभर पापड लाटत असतात.
ऑफिसमधे कधी कटारिया, सूचक, भोजाणी, कोटक किंवा ठक्कर या नावांचे लोक भेटले आहेत का? नाही ना? ते सगळे लोहाणा. ते नोकरी करत नाहीत. लोहाणा मूळचे क्षत्रिय. ते सिंधमधून आले. त्यांनी तलवारी टाकल्या आणि तराजू हाती घेतले. ते सैन्यात नाही गेले. सौराष्ट्रातील भाणवड जिल्ह्यातील वेराड या खेड्यात गेलो होतो. तेथे अनेक घरांना कुलपे होती. चौकशी करता कळले, की ते सगळे लोहाणा. ते राजकोट, जामनगर गावी स्थलांतरित झाले आहेत, पण त्यांनी घरे गावात ठेवली आहेत. बोहोरी, इस्माईली खोजा, दाऊदी बोहरा, सुन्नी बोहरा, मेमण हे लोक सहसा नोकरीत सापडत नाहीत. सोनी, लोहार, सुतार...  ते सहसा नोकरी करत नाहीत. अर्धेआधिक बनिये. पटेल नावांचे लोक शिक्षणात व नोकरीतही आढळतात. तसेच, त्यांच्या हाती कारखानदारी, आयात-निर्यात, बांधकाम क्षेत्रे आहेत. त्या सगळ्या जाती व्यापारउद्योगासाठी प्रसिद्ध आहेत. कच्छी जैनही नोकरी करत नाहीत. त्यांचीही संख्या पुष्कळ आहे. ते कोणतेही सरकार असले तरी राजे असतात. गुजरातेत अनेक जाती आहेत, ज्या नोकरी करणाऱ्या तरुणाला मुलगी देण्यात अनाकानी, म्हणजे टाळाटाळ करतात.
व्यापारात बक्कळ संपत्ती गोळा होते. सरकारी नोकरांचे, प्राध्यापकांचे, निमसरकारी लोकांचे, उत्पन्न सरकारला माहीत असते. टीडीएस कापला गेल्याने इन्कम टॅक्स खात्याला कळते. कोणतेही उत्पन्न लपवता येत नाही. तसे व्यापार धंद्याचे नसते. त्यांची झाकली मूठ सव्वा लाखाची असते. त्यामुळे ते इन्कमटॅक्समधून पळवाटा शोधू शकतात. एकशेपंचवीस कोटी लोकांपैकी फक्त दोन कोटी लोक इन्कमटॅक्स भरतात. पावती न देणारे सगळेच टॅक्स चुकवतात. एकटे गुजराती नाही पण त्यात सगळेच आले.
मुंबईच्या शेअरबाजारावर गुजराती आणि मारवाडी लोकांची घट्ट पकड आहे. तो बाजार मला वयाच्या अठराव्या वर्षी माहीत झाला. माझा गुजराती वर्गमित्र मला तेथे घेऊन गेला होता. तेव्हा हातावर रूमाल टाकून पैशांचे व्यवहार होत. कौटुंबिक संस्कारामुळे त्यात मी सामील झालो नाही. राजाबाई टॉवर बांधून देणारा प्रेमचंद रायचंद या सुरतेच्या जैन बनियाने १८७५ साली शेअर बाजाराची स्थापना केली होती हे सर्वांना माहीत आहे. ते दानवीर होते. इतर मोठ्या शहरांतही शेअर बाजार आहेत, पण मुंबईची जागा ते घेऊ शकत नाहीत. मराठी माणसे त्यात तुरळक आहेत. माझा दुसरा एक मित्र, अरविंदभाई शहा याने मला चाळीस वर्षांपूर्वी आज प्रचंड मोठ्या झालेल्या कंपनीचे शेअर्स बळजबरीने घ्यायला लावले होते. पुढे, तो अमेरिकेला स्थायिक झाला, पण जेव्हा जेव्हा तो भारतात येतो तेव्हा भेटल्याशिवाय परत जात नाही. ते शेअर्स मी माझ्या एका बनिया मित्राला मूळ भावात देऊन टाकले होते. त्यातून त्याला बक्कळ फायदा झाला.
मराठी संस्कृतीत धंदा करणे बसत नाही. मुलगा होजियरी कपड्याचे दुकान चालवत असेल तर त्याला बाप त्याची मुलगी देणार नाही. तेच गुजराती ताबडतोब मुलगी देईल आणि वरून भांडवलसुद्धा देऊ करेल.
गुजरातेतही ज्यांना आरक्षणाचा लाभ मिळतो ते आता नोकरी करू लागले आहेत. सर्व सरकारी कार्यालयांत आरक्षणामुळे नोकरी मिळण्याचे प्रमाण वाढत आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, पटेल आणि बनिये यांना आरक्षण मिळत नाही. ते सर्वसामान्य वर्गात येतात. जवळ जवळ एकोणपन्नास टक्के लोकांना आरक्षणाचा लाभ मिळतो. पण बनिये उद्योग शोधतात. नोकरीच्या फंदात पडत नाहीत. ओबीसींचे प्रमाण गुजरातच्या शिरगणतीत 1931 साली चाळीस टक्के होते. त्या नंतरच्या शिरगणतीत जातीचा उल्लेख करणे बंद केले आहे. त्यामुळे आज कळण्यास मार्ग नाही, पण टक्केवारी थोडीफार मागेपुढे झाली असेल.
पटेलांनी मोठमोठ्या प्राथमिक शाळा अनेक जिल्ह्यांत खेडोपाडी बांधलेल्या दिसतात. दान करावे तर गुजरात्यांनीच. सौराष्ट्रातील काही मंदिरे इतकी श्रीमंत आहेत, की ती दान स्वीकारत नाहीत, तरी आलेल्या प्रत्येकाला जेवणाचा पोटभर प्रसाद वाटतात. अनेक वेळा, कंजूष वाटणारा माणूस दान करताना इतका सढळ कसा असतो ते कळत नाही. माणसाचे मन मोठे विचित्र असते. या पैशांच्या गोष्टी झाल्या, पण त्याच बरोबर सर्वोदयवादी, निरिच्छ, अमरनाथ यात्रेत जाणारे गुजरातीही जास्त आहेत, पण ते नर्मदा परिक्रमा करत नाहीत. सैन्यात जाण्याचे त्यांना कधी स्वप्नही पडत नाही.
पैशांच्या या गोष्टी वाचून असे वाटेल, की सहा कोटी गुजराती व्यापारी किंवा कारखानदार आहेत. पण गुजराती अनेक क्षेत्रांत आहेत. साहित्यात ज्ञानपीठ सन्मान मिळालेले उमाशंकर जोशी, पन्नालाल पटेल, राजेंद्र शहा, रघुवीर चौधरी असे चार आहेत. उत्तम लेखकांची यादी मोठी आहे, पण ज्यांना ऐकले आहे असे तिखट लिहिणारे आणि बोचरे बोलणारे चंद्रकांत बक्षी, सुरेश जोशी, हिमांशी शेलत, विनोद भट्ट, कुंदनिका कापडिया, पुलंचे आवडते ज्योतिन्द्र दवे; तसेच, शहाबुद्दीन राठोड, सौराष्ट्रातील नामांकित गढवी यांच्या भाषणांचा मनमुराद आनंद घेतला आहे.
भारतात शांतिनिकेतन, बंगाल स्कूल ऑफ आर्टस, बॉम्बे स्कूल म्हणजे जे. जे. आणि बरोडा स्कूल ही तीन ठिकाणे प्रख्यात आहेत. बडोद्याचे ना.श्री. बेंद्रे, गुलाम शेख, भूपेन खख्खर, ज्योती भट्ट हे चित्रकार लोकांना परिचित आहेत, तर छायाचित्रकारांत होमाई व्यारावाला, ज्योती भट्ट, सुलेमान पटेल.
गुजराती असले लिखाण करण्यात कधी वेळ घालवणार नाहीत. बाकी सगळे गेले चुलीत. पण आम्हाला लक्ष्मीला प्रसन्न करता आलेली नाही, हे खरे.






- प्रकाश पेठे, prakashpethe@gmail.com
https://thinkmaharashtra.com/node/3056

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल