बरेच वेळेस गुंतवणूकदाराकडून एक शंका नेहमीच विचारली जाते. ‘सध्या बाजाराचे निर्देशांक वरच्या पातळीवर असताना आम्ही गुंतविलेल्या म्युच्युअल फंडाची किंमत म्हणजेच मूल्यांकन वाढलेले आहे. अशा परिस्थितीत आम्ही बाहेर पडून बाजार निर्देशांक पुन्हा खाली जाईपर्यंत काहीकाळ गुंतवणूक करणे थांबवावे किंवा कसे?’
हा प्रश्न खरंच चांगला आहे. दोन/तीन वर्षांतून एकदा किंवा बाजाराच्या उच्चतम/निम्नतम स्तरानुसार आपला पोर्ट फोलिओ रिबॅलसिंग करणे गरजेचे आहे. बाजार खाली गेल्यावर गुंतवणूक करण्याची संधी सोडू नका, पैसे अधिक गुंतवणूक करण्यास ही अतिशय योग्य वेळ असते. बाजार वरती असेल तर प्रॉफिट बुकिंग करावे. जर तुम्ही 10-15 वर्षांच्या कालावधीसाठी गुंतवणूक करण्याचे निश्चित केले असल्यास अल्प कालावधीसाठी बाजारपेठेत येणार्या तेजी-मंदीवर विसंबून आपल्या वित्तीय ध्येयांपासून विचलित होण्याचे कारणही नाही. खरेतर आपण गुंतविलेल्या योजनेचा फंड मॅनेजर आपल्या वतीने कोणत्या कंपनीचे व्हॅल्युएशन किती आहे, हे काम करीत असतात? ती कंपनी स्वस्थ आहे की महाग आहे? त्या कंपनीचे व्यवस्थापन, ग्रोथरेट व मार्केटमधील मागणी व पुरवठा या अशा अनेक निकषांवर रिसर्च करून गुंतवणुकीचे निर्णय घेत असतात. म्हणून अशा प्रकारे अकस्मात वारंवार येणार्या तेजी-मंदीतील केलेल्या व्यवहारानुसार तुम्हाला गुंतवणुकीवर दीर्घ कालात अधिक लाभ मिळण्याची निश्चित शक्यता असते.
कित्येक जणांना पैसा का गुंतवावा? किती पिरीयडसाठी गुंतवावे? मुख्य म्हणजे गुंतवणूक व बचत यातील फरक माहीत नसल्याने, त्यांच्या मनात कोणत्या गोष्टीसाठी काय करावे? असा प्रश्न निर्माण होऊन गुंतवणुकीबाबत चुकीचे निर्णय घेतले जातात व नुकसानीला सामोरे जातात. अत्यंत महत्त्वाचे आहे की, गुंतवणूक आणि बचत यामध्ये फरक काय आहे, हे समजावून घेणे. गुंतवणूक आणि बचत यात लोक नेहमीच गल्लत करतात. कित्येक लोक या दोन्ही शब्दांचा समानार्थी शब्द म्हणून वापर करतात. परंतु हे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे की ‘गुंतवणूक’ आणि ‘बचत’ हे शब्द परस्पर संलग्न असले तरीही पूर्णपणे वेगळे आहेत.
बचत म्हणजे दरमहा येणार्या उत्पन्नातून होणारा खर्च वजा करून उत्पन्नाचा असा एक भाग जो ग्राहक आपल्या आवश्यकतांवर खर्च न करता भविष्यातील गरजेसाठी साठवून ठेवतात. सर्वसामान्य माणसाच्या भाषेत सांगायचे झाल्यास वेगवेगळे खर्च केल्यानंतर जे अतिरिक्त धन आपल्याकडे राहते त्याला बचत म्हणतात. याचे समीकरण मांडायचे झाल्यास; उत्पन्न वजा खर्च म्हणजे बचत. गुंतवणूक एक अशी प्रक्रिया आहे, ज्यामध्ये आपण फायदा मिळविण्यासाठी पैसे गुंतवतो. बचत आणि गुंतवणूक या शब्दांच्या उपरोक्त व्याख्यांचा परामर्श घेता आपण असे म्हणून शकतो की, बचत हा परिणाम असून गुंतवणूक ही एक क्रिया/कृती आहे. बचत आणि गुंतवणूक हे प्रकार अधिक स्पष्टपणे समजावून घेण्यासाठी आपण त्यांच्या वैशिष्ट्यांचा आता सखोल अभ्यास करूया.
बचत ही अशी एक मानसिक स्वभाव जी नियमितपणे केली जाते, जिथे आपण पैसे सुरक्षित ठिकाणी ठेवतो. सदरचा पैसा नजीकच्या काळात तो कधीही आपण वापरू शकतो. गुंतवणुकीमध्ये आपण अशा आशेने पैशाची गुंतवणूक करतो की जिथे आपल्या मूळ भांडवलामध्ये वाढ व्हावी की ज्यामुळे भविष्यात त्यापासून आपल्याला मोठा आर्थिक लाभ होऊ शकेल. मात्र ही दीर्घकाळासाठी प्रक्रिया असेल.
बचत ही सर्वसामान्यपणे अल्पकालीन प्रक्रिया असून गुंतवणूक ही नेहमीच दीर्घकालीन कृती असते.
बचत ही सर्वसामान्यपणे अल्पकालीन प्रक्रिया असून गुंतवणूक ही नेहमीच दीर्घकालीन कृती असते.
बचतीमध्ये जोखीम साधरणत: नसतेच, पण त्यापासून मिळणारा मोबदला अतिशय अल्प असतो. परंतु गुंतवणुकीमध्ये जोखीम असते आणि मिळणारा मोबदलाही अधिक असतो. मात्र इन्कमटॅक्सच्या भाषेत समजायचे झाल्यास बचतीवर व्याज मिळते, जे किती मिळणार आहे हे निश्चितच असते अन् हे आपल्या मूळ उत्पन्नामध्ये इतर उत्पन्न म्हणून गृहीत धरून त्याचेवर आयकराची आकारणी होते. गुंवणुकीच्या माध्यमातून किती रक्कम मिळणार हे माहीत नसते व मूळ भांडवलामध्ये वाढ होते त्याला कॅपीटल गेन म्हणतात. जर शेअर मार्केटमधून भांडवलात वृद्धी झाली असेल तर एक वर्षानंतर येणारा पैसा करमुक्त असतो. बचत ही सवय असून गुंतवणूक ही नियमित प्रक्रिया आहे.
बचतीचा परामर्श घ्यावा लागत नाही परंतु गुंतवणुकीमध्ये जोखीम असल्यामुळे ठरावीक कालावधीनंतर गुंतवणुकीचा परामर्श घ्यावा लागतो. बचत करताना आपण पैसे सुरक्षित ठेवतो, ज्याचा आपल्याला अडचणीच्या काळात उपयोग करता येतो. परंतु गुंतवणुकीमध्ये दीर्घकाळासाठी संपत्ती निर्माण करता यावी म्हणून आपण नियमित पैसे वाढविण्याचा प्रयत्न करतो. बचतीचे पैसे कधीही परत मिळत असल्यामुळे त्वरित उपलब्ध होतात आणि लागेल तेव्हा खर्च करता येतात. परंतु गुंतवणूक विकायचे ठरवल्यास ती विकून तिची किंमत तुमच्या बचत खात्यात जमा होण्यासाठी काही अवधी जावा लागतो.
बचत आयुष्यात कधीही करता येते किंबहुना आयुष्याच्या प्रत्येक टप्यात बचत करणे आवश्यक आहे. गुंतवणुकीचा प्रारंभ सर्वसामान्यपणे तरुण वयात उत्पन्न सुरू झालेबरोबर करावी.
बचत नेहमी बचत खाते, परावर्तीत ठेव, बँकेतील मुदत ठेव, पारंपरिक विमा, पोस्टाच्या योजना, पीपीएफ, अल्पमुदतीचे रोखे, बाँड्स कंपनी ठेवी ज्याचे व्याजदर निश्चित असतो अशा प्रकारच्या साधनांत केली जाते. परंतु गुंतवणूक ही मालमत्ता, समभाग, इक्विटी मुच्युअल फंड, सोने-चांदी वस्तू, इतर बाजारपेठेतील साधनांमध्ये करण्यात येते.
बचत नेहमी बचत खाते, परावर्तीत ठेव, बँकेतील मुदत ठेव, पारंपरिक विमा, पोस्टाच्या योजना, पीपीएफ, अल्पमुदतीचे रोखे, बाँड्स कंपनी ठेवी ज्याचे व्याजदर निश्चित असतो अशा प्रकारच्या साधनांत केली जाते. परंतु गुंतवणूक ही मालमत्ता, समभाग, इक्विटी मुच्युअल फंड, सोने-चांदी वस्तू, इतर बाजारपेठेतील साधनांमध्ये करण्यात येते.
बचत का करावी? दैनदिन जीवनात रोजचा वरखर्च व आकस्मात येणारा खर्च, सण-सणावळी, कुटुंबातील कार्यक्रम किंवा अनपेक्षित घटनांमुळे आजारपणं, अपघात वगैरे प्रसंगांसाठी लागणारी रक्कम नेहमीच आपण जवळ बाळगत असतो. मात्र ही रक्कम किती असावी?हे एखाद्या फायनान्सियल प्लानरला विचारल्यास तो सांगेल की, किमान सहा महिने पुरेल इतका खर्च जवळ असावा. मात्र ती घरी ठेवणे अयोग्य आहे कारण त्यावरील उत्पन्न शून्य येणार. बचत खातेवर तीन टक्के व्याज मिळेल मात्र म्युच्युअल फंडाच्या लिक्विड योजनेत ठेवल्यास सहा ते सात टक्के व्याज मिळेल. ही बाब किरकोळ वाटते पण काटेकोरपणे नियोजन करणे गरजेचे ठरते कारण छोट्या गोष्टी फार काही देऊन जातात. पुढील उदाहरणावरून स्पष्टता येईल. अनेकांकडे वरील बाबींसाठी वर्षानुवर्षे किमान पन्नास हजार वर्षभर ठेवल्यास तीन टक्केप्रमाणे एक हजार पाचशे व्याजाचे स्वरुपात मिळकत होईल. लिक्विड फंडातून तीन ते साडेतीन हजार प्रतिवर्षी मिळकत मिळू शकते. वीस वर्षांत सत्तर हजार उत्पन्न मिळेल. यासाठी जागरुकतेनेे नियोजन करणे गरजेचे आहे.
गुंतवणुकीच्या माध्यमातून आपल्याला मोठा फायदा मिळत असला तरीही आपली अल्प, मध्यम आणि दीर्घ मुदतीची ध्येय प्राप्त करण्यासाठी ‘बचत’ आणि ‘गुंतवणूक’ दोघांचीही आपल्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका आहे; याचा विसर पडता कामा नये. ‘दीर्घ काळासाठी गुंतवणूक, अल्पकाळासाठी बचत’ ही बाब कटाक्षाने लक्षात घेऊन नियोजन केले पाहिजे. बरेचजण सुरक्षिततेच्या प्रभावखाली या निर्णयकडे गांभीर्याने पाहत नाहीत. माहितीअभावी निर्णय चुकला तर ही भीती मनात असतेच. पण सुरक्षिततेच्या बाजूने निर्णय घेतला तर दीर्घकाळासाठी किती फरक पडतो. त्याचा अभ्यास जरूर करण्यासारखे आहे. आपल्या देशात शेअर मार्केटचा इडेन्क्स सन 1979 साली 100/- चालू झाला. आज सेन्सेक्स 31,500/- इतका आहे म्हणजे शेअर मार्केट सेन्सेक्सने 16% रिटर्न दिला आहे अन् 1979 पासून सर्व बँकांनी सरासरी व्याज 8.7% दिले आहे. दुसरे उदाहरण पहायचे झाल्यास, दहा वर्षांपूर्वी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बँक एफ डी चा व्याज दर 9.5% होता. दहा वर्षांपूर्वी एक लाख रु. ठेवलेल्या ठेवीचे आजचे मुख्य 2,47,822/- इतके होते मात्र गुंतवणूक म्हणून एसबीआय शेअरमध्ये एक लाख गुंतवणूक केली असती तर 95/- रु. प्रति शेअर कितीने 1052 शेअर्स मिळले असते? सदर शेअर स्ल्पीट होऊन 10520 शेअर झाले. आज 280/- प्रमाणे आजचे मूल्य 29,45,600 इतके होते. परतावा 40% मिळाला ही खरी ताकद गुंतवणुकीमध्ये आहे. कित्येक म्युचुअल फंड योजनांनी दहा वर्षांपासून 15% ते 20% परतावा दिला आहे.
थोडक्यात, आपल्या वित्तीय ध्येयानुसार प्रत्येकाचे बचत आणि गुंतवणुकीचे महत्त्व जाणून घेऊन त्यानुसार कृती करायला हवी. आपल्या उत्पन्नाच्या किती प्रमाणात बचत किंवा गुंतवणूक करावी हे जाणून घेऊन त्यानंतर कृती करावी. बचतीसाठी तज्ज्ञांच्या सल्ल्याची आवश्यकता नसते. गुंतवणुकीसाठी तज्ज्ञ गुंतवणूक सल्लागाराचीही मदत घेणे आवश्यक आहे.
- अनिल पाटील (श्री पार्श्व वेल्थ मॅनेजमेंट्स, कोल्हापूर)
by - http://www.pudhari.news
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा