श्रीमंतांची मानसिकता, श्रीमंत लोक कशाप्रकारे विचार करतात ? त्यांच्यात काय गुण असतात ?
श्रीमंतांची मानसिकता
श्रीमंतांची मानसिकता ह्या विषयवार लेख लिहिण्याची विनंती आपल्या facebook पेज वर करण्यात आली. त्यानुसार या विषयवार लिहिण्याचा मी प्रयत्न करत आहे. यामध्ये आपण श्रीमंत कशा प्रकारे विचार करतात, हे समजण्याचा प्रयत्न करू. हा लेख वाचण्याधी गुंतवणूकदार म्हणजे कोण ? हा लेख तुम्ही वाचू शकता.
धोका
श्रीमंत लोक धोका पत्करतात आणि तुम्ही ? धोका न पत्करता श्रीमंत झालेला एकतरी माणूस दाखवा. श्रीमंतांना माहित असते, ते चुका करतील, तरी ते धोका पत्करतात, गुंतवणूक करतात. सामान्य लोक नक्की किती पैसे मिळतील हा विचार करतात. हरल्यावर श्रीमंत लोक ते काम दुसऱ्या प्रकारे कस करता येईल हा विचार करतात. ते अपयशावर थांबत नाहीत. अनेक लोक श्रीमंत होण्याआधी रस्त्यावर पण आलेत. रस्त्यावर येणं वाटत तितक सोपं नाही. विचार करा पाउस पडतोय, पावसात तुम्ही भिजून गार झाले आहात. दोन दिवस झाले काही पोटात गेले नाही. समोर चहा च्या गाडीवर चहा आणि ब्रेड मिळतेय. तुम्हाला ती खायची आहे, पण पैसा नाही. काम करण्याची अंगात शक्ती नाही. अशा वेळी पण तुम्ही चहा, ब्रेड ची भिक न मागता त्या दुकानदाराला त्या बदल्यात काम करण्याचे बोलत असाल तर समजा तुम्ही श्रीमंत बनू शकता.
विश्वास
जर तुम्हाला कोणत्या गोष्टीवर विश्वास नसेल तर तुम्ही ती गोष्ट करू शकता का ?
तुमचा बॉस तुम्हाला बोलला कि यावेळेस जो कर्मचारी चांगले काम करेल त्याला बोनस मिळेल. जर तुमचा विश्वास नसेल कि तुम्हाला बोनस मिळेल, तर तुम्ही मेहनत करणार का ?
जर तुम्हाला एखाद्या नेत्याने वचन दिले कि मी निवडून आलो कि सर्वांना कार देईल, जर तुम्हाला त्या नेत्यावर विश्वास नसेल तर तुम्ही त्याला मत देणार का ?
आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या लोकांनी आपल्या प्राणांची आहुती देली, त्यांना जर विश्वास नसता कि त्यांच्या बलिदानामुळे स्वातंत्र्य मिळण्यास मदत होईल. तर त्यांनी असे केले असते का ?
कोणतेही काम करण्यासाठी आपल्या मनात विश्वास पाहिजे, मी जे करतोय ते करून मला जे मिळवायचं आहे ते मिळवणे शक्य आहे. म्हणजे तुमच्या मनात विश्वास असेल कि मी श्रीमंत होऊ शकतो, तरच तुम्ही श्रीमंत कसे होऊ ? त्यासाठी काय करू ? हा विचार कराल. जर तुमच्या मनात विश्वास असेल, मी श्रीमंत होऊ शकतो तरच श्रीमंत होण्याच्या मार्गावर जे अडथळे येतील ते पार कराल. गरीब लोकांना श्रीमंत होताना पहिले आहे ? जर तुमचा उत्तर हो असेल, तर याचा अर्थ श्रीमंत होणे गरिबाला शक्य आहे. म्हणजे तुम्ही श्रीमंत होऊ शकता. आता राहिला प्रश्न, कसे ? त्याचे उत्तर तुम्ही तेव्हाच शोधू शकता जेव्हा तुम्हाला वाटेल कि तुम्ही श्रीमंत होऊ शकता. माणूस उडू शकतो, हा विश्वास होता. म्हणून अनेक लोकांनी कसे उडावे हा विचार केला. जर तसा विश्वास नसता तर कोणी प्रयत्न केला असता का ? प्रयत्न केले नसते तर आज मनुष्य उडू शकला असता का ?
मग तुमचा विश्वास आहे का ? गरीब व्यक्ती श्रीमंत होऊ शकते ? विश्वास असेल तरच पुढे वाचा. अन्यथा ज्यावर तुमचा विश्वास आहे तेच वाचा. जर तुमचा विश्वास असेल गरीब श्रीमंत होऊ शकतो, तर आता फक्त प्रश्न उरला कसे ? उत्तर सोप आहे. जे गरिबाचे श्रीमंत झालेत, त्यांना भेटा, त्यांच्या कथा वाचा, त्यांनी हा प्रवास कसा पूर्ण केला ते वाचा. सर्वच सांगायला तयार नसतील, पण जे सांगायला तयार आहे, त्यांना तुम्ही ऐकले आहे का ?
श्रीमंतांची मानसिकता आहे – मी श्रीमंत होऊ शकतो. मी श्रीमंत आहे.
गरीब आणि श्रीमंत लोक कोणत काम वेगळ करतात, ते पाहण्यासाठी गुंतवणूक हा लेख वाचा.
खडतर प्रवास
जगातील ८ अब्जाधीशांइतकी संपत्ती तळाच्या ५0 % लोेकांकडे आहे. ३.६ अब्ज लोकांएवढी संपत्ती ८ श्रीमंतांकडे आहे. भारतातील १ टक्का श्रीमंतांकडे देशाची ५८% संपत्ती आहे. आता यावरून पहा तुम्हाला १ % लोकसंख्येमध्ये जायचे आहे. म्हणजे श्रीमंत व्हायला ९९ % लोक जे करत आहे त्यापेक्षा वेगळा तुम्हाला काही करायचा आहे. आता समजा तुम्ही ठरवला कि तुम्हाला उच्च १० श्रीमंतांमध्ये नाही यायचं तरीसुद्धा तुम्हाला ९० % लोकांपेक्षा वेगळ काही करावे लागेल, तेव्हाच तुम्ही श्रीमंत होऊ शकता. म्हणजे हा प्रवास किती खडतर आहे. हा प्रवास तुम्हाला पूर्ण करायचा असेल, तर तुम्हाला स्वत:वर विश्वास पाहिजे कि मी श्रीमंत होऊ शकतो. तरच हा प्रवास तुम्ही पूर्ण करू शकाल.
तीव्र इच्छा
श्रीमंत व्हाव हि तुमची तीव्र इच्छा आहे ? तीव्र , ह्या शब्दाकडे लक्ष्य द्या. आता उत्तर द्या. श्रीमंत व्हाव हि तुमची तीव्र इच्छा आहे ? असेल तर पुढे वाचा. तीव्र इच्छा असेल तरच तुम्ही श्रीमंत बनू शकाल. बनलो तर बनलो, करून पाहू, असा तुमचा विचार असेल तर ते शक्य नाही.
एकदा एका युवकाने सॉक्रेटिसला यशाच रहस्य विचारलं. सॉक्रेटिसने त्या माणसाला दुसऱ्या दिवशी नदीवर बोलावल. त्याला नदीच्या पात्रात नेल आणि त्याच तोंड पाण्यात दाबल. त्या युवकाला प्राणवायू मिळत नसल्यामुळे तो धडपडू लागला. जोर लावू लागला पाण्याबाहेर येण्यासाठी. पण सॉक्रेटिसने त्याला घट्ट पकडले होते. त्याला पाण्याबाहेर तोंड काढू दिले नाही. काही वेळ असाच गेला. मग सॉक्रेटिसने त्या युवकाला सोडले. तर तो युवक जोरा-जोरात श्वास घेऊ लागला.
सॉक्रेटिसने त्याला विचारले, जेव्हा तू पाण्याबाहेर आला, तेव्हा तुला सर्वात जास्त कश्याची गरज होती ? तो युवक बोलला हवेची. सॉक्रेटिसने त्याला सांगितले. यशाच दुसर काही रहस्य नाही, जेव्हा तुला कोणती गोष्टी मिळण्याची एवढीच तीव्र इच्छा होईल, तुला त्यात यश मिळेल. तुम्ही स्वतः , तसे करून पहा. काही वेळ श्वास रोखून पहा. कसे वाटते पहा. किती तीव्र इच्छा होते श्वास मिळवण्याची ? मग किती वेळ रोखणार श्वास तुम्ही ?
त्या श्वासा एवढी तीव्र इच्छा आहे का श्रीमंत होण्याची ? बर तेवढी तीव्र नाही, मग त्या तुलनेत किती तीव्र इच्छा आहे ?
सतत शिकणे
तुमचे ग्राहक मागील ५ वर्षात किती बदलले ? मागील १० वर्षात ? १५ वर्षात ? यावरून तुम्हाला अंदाज येईल कि जग किती पटापट बदलत आहे. आता अशा पटापट बदलणाऱ्या जगात जर तुम्ही सतत शिकत नाही राहिले, तर तुम्ही मागे पडाल. तुम्ही नाही बदललात तर तुमच काम कोणी दुसरा करू लागेल.
भूलभुलैया मध्ये अडकलेला माणूस फक्त पुढे काय आहे हे पाहतो, जर त्याला भूलभूलैयाच्या बाहेर यायचे असेल तर त्याला एक वेगळा दृष्टीकोन हवा तो दृष्टीकोन मिळवण्यासाठी त्याला सतत शिकत रहाव लागत. जर तुम्ही थोडा वेळ काढून स्वत:ला सुधारण्यात नाही लावाल, तर तुम्ही तेच ते करत राहाल. ती गोष्ट नव्या प्रकारे कशी होऊ शकते, याचा विचार करायचा तुमच्याकडे वेळ नसेल. ते काम नवीन प्रकारे कस कराव हे शिकायला तुमच्याकडे वेळ नसेल. पण जग बदलत जाईल, कोणी दुसरा ते शिकेल आणि तुमची नोकरी, धंदा धोक्यात येईल. म्हणून शिकत राहा. शिक्षण फक्त पुस्तकात मिळत नाही. तुम्ही video पाहू शकता. सेमिनार ला जाऊ शकता. मार्गदर्शक शोधू शकता. मित्रांचा असा ग्रुप तयार करू शकता ज्यात तुम्हाला सारख्या गोष्टींबद्दल आवड आहे. आपल्या facebook पेज वर केल्या जाणाऱ्या चर्चेत तुम्ही भाग घेऊ शकता.
स्वतःमध्ये गुंतवणूक
वैयक्तिक वाढीकरिता लावलेले पैसे श्रीमंत लोक, गुंतवणूक म्हणून पाहतात खर्च म्हणून नाही. पुस्तक वाचणे, प्रशिक्षकाला नेमणे, तज्ञ लोकांच्या समूहात सामील होणे, स्वयं सुधारणेसाठी पैसे लावणे याला ते गुंतवणूक म्हणून पाहतात आणि तुम्ही ? ज्या लोकांच अनुकरण करायचं आहे, अशा लोकांसोबत राहण्यासाठी ते प्रसंगी पैसे पण खर्च करतात.
मोठं
जर कोणी ५००० पगारात समाधानी होत असेल, तर तो श्रीमंत कसा होईल ? मोठा विचार करा. फक्त मोठा विचार करू नका, तर मोठी योजना आखा. विचार करायला आपण काहीही विचार करू शकतो, पण योजना आखताना आपण ती अमलात कशी आणावी हा विचार पण करत असतो. त्यामुळे आपण व्यावहारिकपणे मोठा विचार करू लागतो.
नियम काय ?
प्रत्येक खेळाचे नियम असतात. कोणताही खेळ नियम न समजता तुम्ही जिंकू शकता का ? पैश्याचे नियम काय आहेत ? पैश्याचे नियम आपण लेखात वेळोवेळी समजून घेण्याचा प्रयत्न करतच असतो. अनेक लोकांना पैसा कसा काम करतो हेच माहित नसते, त्यामुळे तो कसा मिळवावा ? कसा खर्च करावा ? हे माहिती नसते. म्हणून आधी पैशाचे नियम समजून घ्या.
पैशाचे ते नियम, जे फक्त ऐकून ऐकून विश्वास ठेवला आहे, तपासून नाही, त्यांना प्रश्न विचारा. आकडे पाहणे सुरु करा. आपल्याला काय वाटत त्यापेक्षा, आकडे काय सांगत आहे, ते महत्वाच आहे. आपल्याला वाटत असेल आपला व्यवसाय नफ्यात सुरु आहे, पण तो तसा आहे का ? हे आकडे बरोबर सांगू शकतात. आपल्या भावना नाही.
माझा एक मित्र असा विचार करत होता, कि कर्ज मिळतंय तर घेऊन घ्या. पाहू पुढे कस फेडायचं ते. कोणत कर्ज फुकट मिळतं का ? प्रत्येक कर्जाची किंमत आपल्याला चुकवावी लागते, व्याज. असे कर्ज मिळाले तरी तुम्ही त्यातून अनावश्यक वस्तू घेणार तर फायदा काय ? वर वर मनात असा आनंद झाला, कि वाह, मला तर कर्ज मिळत आहे, पण आकडे सांगतात कि खुश होऊ नका.
पैसा कसा काम करतो समजून घ्या. पैसा कसा वाढतो ? पैसा कसा कमी होतो ? पैसे खर्च करण्याधी प्रश्न विचारा. खूप प्रश्न, जितके जास्त प्रश्न तुम्ही विचारलं, तेवढ तुमच ज्ञान वाढेल. balance sheet तयार करा.पैशाबद्दल शाळेत शिकवल्या जात नाही. आपण ते घरीच शिकतो आणि दुर्दैवाने ९० % पालक हे गरीबच आहे. त्यामुळे तुम्ही जे शिकलात, ते ९० % चुकीचे असण्याची शक्यता आहे.
उद्याचा विचार
खर्च करणारे फक्त आज मध्ये जगतात आणि गुंतवणूक करणारे उद्याचा विचार करतात. मुंगी आणि नाकतोद्याची हि कथा पहा.
इथे मुंग्या ह्या गुंतवणूकदार आहेत.
बचत करा हा मंत्र जुना झाला.
बचत करा हा आता जुना मंत्र झाला आहे. फक्त बचत करून कोणी श्रीमंत होत नाही. तुम्हाला गुंतवणूक करावी लागते. जर तुम्ही फक्त बचत केली तर महागाई तुमची बचत खाऊन टाकेल. तुम्हाला गुंतवणूक करावी लागेल, तेव्हाच तुमचा पैसा वाढेल. गुंतवणूक करणे हि बचत करण्याचा एक पाउल पुढे जाणे आहे. गुंतवणूक करण्याकरिता आपल्याला बचत तर करावीच लागते. पण आपण फक्त पैसे वाचवण्यावर नाही तर वाढवण्यावर भर देतो.
पैशाला दोष देणे
काही लोक पैशाला दोष देतात. सगळ्या वाईटाच मूळ त्यांना पैसा वाटत. पैसा ना चांगला आहे ना वाईट आहे. पैसा हे फक्त एक साधन आहे. जसे कि चाकू, त्या चाकूने तुम्ही लोकांना मारता वा तो चाकू शस्त्रक्रिया करायला वापरता. हे आपल्यावर आहे. पैसा मुळात चांगला किंवा वाईट नसतो. तो ज्या माणसाकडे आहे, तो चांगला किंवा वाईट असतो.
तुम्हाला जर असे वाटत असेल, समस्येच कारण पैसा आहे, मग तुम्ही कधीच पैसा जमवू शकणार नाही. कारण तुम्हाला वाटेल, मी जास्त पैसा कमावणार तर मला जास्त समस्या येतील. काही लोक इतके नकारार्थी असतात कि त्यांचा पक्का विश्वास असतो, की ते कधीच श्रीमंत होऊ शकणार नाही. वर आपण पाहिलेच आहे, कि विश्वासाचा किती फरक पडतो ते. काही लोक स्वतः च्या गरिबिबद्दल दुसऱ्यांना दोष देत राहतात, दुसऱ्या व्यक्तींना, सरकारला, नातेवाईकांना, पालकांना, साथीदारांना. ते स्वतः काही जवाबदारी घेत नाहीत. श्रीमंत व्हायला ते स्वतः काही करायला तयार नसतात, फक्त आपण श्रीमंत का नाही झालो, हेच त्यांच्याकडे बोलायला असत.
काहींना वाटत श्रीमंत होणे हे फक्त लबाडाच काम आहे. लोकांना फसवून, त्यांचा छळ करूनच श्रीमंत होता येते असा त्यांना वाटत. ते फक्त श्रीमंतांच्या बारीक चुकांकडे लक्ष्य देतात, ते करीत असलेल्या चांगल्या कामांकडे लक्ष्य देत नाहीत.
काहींना वाटत, फक्त श्रीमंत लोक अजून श्रीमंत होऊ शकतात. कोणी गरीबाचा श्रीमंत होऊ शकत नाही. आपला जन्म गरीब घरात झाला, आता आपण गरीबच मरणार, असा ते विचार करतात.
काहींना वाटत दुसरे लोक हे नशिबामुळे श्रीमंत झाले आहेत. त्यांनी काही वेगळे केल नाही फक्त नशीबच आहे, जे कोणाला श्रीमंत वा गरीब करते.
पण आपल्याकडे अनेक उदाहरण आहेत, जिथे लोक हजारो गोष्टींवर मात करून श्रीमंत झाले, ते कारण देत नाही बसले.
संगत
जर श्रीमंत बनायचं असेल तर श्रीमंत लोकांबरोबर राहा. – जेफ रोज
जर एका खोलीत ४ लोक दिवाळखोर असतील तर तुम्ही ५ वे असाल. श्रीमंत लोकांनी शोधून काढले आहे कि, इतर श्रीमंत लोकांशी संलग्न होऊन अधिक श्रीमंत होता येत. आपल्या सवयी, धोरणे हे आपल्या सभोवतालच्या वातावरणावरून ठरतात आणि श्रीमंत लोक ह्या साराखेपणाचा फायदा घेण्यात यशस्वी झाले आहेत.
तुम्हाला तुमच्या आजूबाजूला असलेल्या बहुसंख्य लोकांसारखे बनायचे नाही आहे, कारण तुमच्या आजूबाजूचे बहुसंख्य लोक श्रीमंत होणार नाहीत – मनोज अवेस
ठराविक दिनक्रम
दिवसाची सुरवात तुम्हाला महत्वाच्या असणाऱ्या गोष्टींपासून सुरु करा, म्हणजे तुम्हाला महत्वाच्या असणाऱ्या गोष्टी सुटणार नाहीत. त्या करायला तुमच्याकडे वेळ असेल. श्रीमंत लोकांचा दिनक्रम ठरलेला असतो. ते मनात येईल तसे वागत नाहीत.
उद्देश
श्रीमंत लोक उद्देश ठरवतात आणि वेळोवेळी ते योग्य मार्गावर आहे ना हे तपासतात. वेळोवेळी मिळालेल्या अभिप्रायामुळे ते स्वतः मध्ये सुधारणा करण्यात यशस्वी होतात. बहुतेक लोक आपल्या भविष्याचा विचार करत नाहीत. पण श्रीमंत लोक स्वतःला दररोज आठवण करून देतात ते कोणत्या दिशेला जात आहेत.
तुम्हाला श्रीमंत का बनायचं आहे ?
हा प्रश्न फार महत्वाचा आहे. ह्या प्रश्नच जे उत्तर असेल ते तुमच जीवन बदलून टाकेल.
मला श्रीमंत का बनायचं आहे ? काय आहे तुमच उत्तर ? ह्या प्रश्नाच जे उत्तर असेल, त्यासाठीच तुम्ही श्रीमंत व्हाल. कोणतीही गोष्ट का करायची आहे, ते आधी तपासून पाहणे आवश्यक आहे. नाहीतर ती गोष्ट मिळवून पण तुम्हाला आनंद, समाधान मिळणार नाही.
तुम्हाला श्रीमंत का व्हायचं आहे, तुम्ही खाली कमेंट मध्ये सांगू शकता. इथे मी मला का श्रीमंत बनायचं आहे ते तुमच्या सोबत शेयर करतो.
मला जीवनात दुसऱ्यांना मदत करायची आहे. पण मला असा व्यक्ती नाही व्हायचं आहे, जो दुसऱ्यांना मदत करून-करून स्वतः गरीब होऊन जातो. मला असा व्यक्ती व्हायचं आहे जो स्वतःच पोट भरेलच आणि दुसऱ्याचं भरण्यास मदत करेल. मला एक गोष्ट नक्की समजली आहे, जेवढे मजबूत आपण होऊ तेवढा मोठा बदल आपण घडवू शकतो. याचे सर्वात ताजे उदाहरण म्हणजे आमिर खान. आमिर खान गावा-गावात पानी फाउंडेशन या संघटने द्वारे काम करत आहे. आज त्याला पाहून हजारों लोक शहरातून गावाकडे काम करायला चालले आहेत. या आधी ही जात असतील, पण आमिर खानमुळे त्यांची संख्या नक्कीच वाढली आहे. आज आमिर खान कडे पैसा आहे म्हणून तो अशी संघटना उभारू शकतो. आता आमिर खान जागी समजा आपण असतो तर आपण हे काम करू शकलो असतो का ? एवढ्या लोकांसाठी फावड, कुदळ टोप्या त्यांना चहापाणी, जेवण, त्यांना ने-आण करणे. अनेक लोक आता हे काम फुकट करत असतील किंवा त्यांना दान हि देेेत असतील. पण सुरवातीला त्यांनी काही रक्कम स्वतःच्या खिश्यातून लावली आहेच ना ? काम चांगलं असलं तरीही ते करायला पैसा लागतोच ना ?
वारेन बफे, बिल गेट्स, मार्क झकरबर्ग यांनी आपली ९०% संपत्ती दान करण्याचा निर्णय घेतला आहे. या लोकांमुळे जग बदलतय फक्त त्यांच्या कामामुळे नाही तर ते करत असलेल्या दानामूळेही. आज भारतात आणि आफ्रिकेत त्यांच्यामुळे लाखो मुलांचे जीव वाचत आहेत. यांच्या कामामुळे जगात बालमृत्यू दर कमी झाला आहे.
पण आपल्या समाजात अशी धारणा आहे कि, सामाजिक कार्यकर्ता हा गरीबच असला पाहिजे. तो श्रीमंत असेल तर त्याने सर्व दान करून द्यावे. त्याने सर्व गोष्टींचा त्याग करावा, तरच तो सामाजिक कार्यकर्ता असे समजल्या जाते. कोणी आपला घर परिवार सांभाळून, स्वतःच्या इच्छा पूर्ण करून पण इतरांना मदत करू शकतो.
मला स्वत:साठी पण चांगल्या सुविधा हव्या आहेत आणि दुसऱ्यांना पण मदत करायची आहे. यासाठी मला श्रीमंत व्हायचे आहे.
श्रीमंत होण्यासाठी आवशक्यता आहे, योग्य विचार करण्याची. श्रीमंतांची मानसिकता आत्मसात करा, त्यांच्या सारखा विचार करायला लागा. कोणाला ग्लास अर्धा रिकामा दिसेल तर कोणाला अर्धा भरलेला.
http://www.guntavnuk.com/
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा