वॉल्ट डिस्ने – नवनिर्मितीचा प्रणेता
नवनिर्मितीच्या मुळाशी कुतूहल असते असे आपण गेल्या वेळेस पाहिले. ज्ञान, क्षमता, अन्वेषण, सृजन या सर्वांपेक्षाही कुतूहल हा गुण अशा गोष्टीत अधिक महत्त्वाची भूमिका बजावतो. उद्योजक आणि छोट्या उद्योगांमधील योजकांना आपल्या अंतर्निहित सृजनशीलतेला बांध फोडून वाट काढून देण्यात (breakthrough) आणि धडाकेबाज नवनिर्मिती (innovation) करण्यास कुतूहल हीच कळ फिरवावी लागते. कुतूहल तुमच्या अंतराग्निला चेतावते व नव्या वाटा शोधायला लावते. जेव्हा तुमच्या मनात कुतूहल जागरूत असते तेव्हा तुम्ही कधीच रिकामटेकडे नसता- सतत काही चांगले, नवे शोधत राहता.
वॉल्ट डिस्नेच्या शब्दात “when you are curious, you find lots of
interesting things to do” ते असेही म्हणाले होते की “we keep moving
forward, opening new doors & doing new things, because we’re curious &
curiosity keeps leading us down new paths.” ‘जेव्हा तुम्हाला (कुठल्याही गोष्टीबद्दल) कुतूहल वाटते तेव्हा तुम्हाला अनेक नवनवीन गोष्टी सुचायला लागतात. मग आपण नेहमी पुढे जात राहतो, आपल्यासाठी नवी दालने उघडतात, नवे प्रयोग साकारतात कारण आपल्यात कुतूहल, औत्सुक्य दडलेले असते- तेच आपल्याला (निर्मितीच्या) नव्या वाटा दाखवते.’
शेतकर्यांच्या कुटुंबातला, अनेक भावंडातला वॉल्टर लहानपणापासूनच
कलाकार होता. वयाच्या सातव्या वर्षीच चित्रे काढून शेजार्यांना विकून तो काही पैसेही तेव्हापासून मिळवत असे. एका ट्रेनच्या प्रवासात त्याला 'मिकी माऊस' गवसला असे म्हणतात. पुढे वयाच्या सोळाव्या वर्षीच सैन्यात भरती होण्यास तो गेला पण त्याला प्रवेश नाकारला गेला. मग त्याने रेडक्रॉसमध्ये
काम सुरु केले. म्हणजे निसर्गदत्त कलाकार व त्यातही व्यंगचित्र काढण्याची त्याची हातोटी असूनही सुरुवातीला त्याने अगदी विपरीत जीवनकार्य निवडण्याचा प्रयत्न केला. हे असे अनेकांच्या बाबतीत होते. ‘मी कोण’ आहे ‘कोऽहम’ हा तसा सनातन, चिरंतन प्रश्न. ‘मी ब्रह्म आहे’ असे त्याचे अंतिम व आदिम उत्तर. पण त्यामध्ये मी सध्या कोण आहे? या जन्मात माझ्या आत अशा काय क्षमता आहेत की ज्या फक्त व फक्त माझ्यातच आहेत हा शोध महत्त्वाचा आहे. आपला ‘स्व’ कळणे- ‘स्वभाव’ कळणे हे अपरिहार्य आहे. अन्यथा अर्धे आयुष्य किंवा कधीकधी पूर्ण आयुष्यही न आवडणार्या, न कळणार्या कामात अडकून पडते.
वॉल्टर रेडक्रॉसच्या कामासाठी फ्रान्सला गेला, तिथे त्याला अॅम्ब्युलन्स चालवण्याचे काम होते. पण त्याच्या आतला कलाकार गप्प बसेना. असे म्हणतात त्याची अॅम्ब्युलन्स नेहमी गच्च भरलेली असे. पण वैद्यकीय गोष्टींनी नाही तर त्याने काढलेल्या असंख्य कार्टून्सनी! वर्षभरातच वॉल्टर परत आला. त्याने कमर्शियल आर्टमध्येच करिअर करायचे ठरवले. कान्सासमधे स्थानिक व्यवसायांसाठी त्याने अॅनिमेटेड फिल्म्स बनवण्यास सुरुवात केली. ‘The Alice Comedies’ ही फिल्म त्याने बनवली. तो कफल्लक झाला. त्याची कंपनी Laugh-O-Gram कर्जबाजारी झाली. पण त्याने निराश न होता सुटकेस भरली. अॅलिसची अपूर्ण फिल्म घेऊन त्याने तडक हॉलिवूड गाठले. वॉल्टर त्यावेळेस जेमतेम २२ वर्षाचा होता. भावाचे अडीचशे डॉलर, अधिक काही ५००-६०० डॉलर्सचे कर्ज यातून एका गॅरेजमधे काम सुरू झाले. प्रचंड उत्साह व आत्मविश्वास यांच्या जोरावर ते सतत वाढतच गेले. इतके की हॉलिवूड सोसायटीच्या शिखरावर वॉल्ट डिस्ने जाऊन बसले.
पण डिस्नेचे विश्व हे त्याचे कुटुंब व त्याची पात्रे असेच होते. १९३७ सालची Snow white & the
Seven Dwarfs ही पूर्ण लांबीची, प्रचंड खर्चाची पण सदाबहार अॅनिमेटेड फिल्म त्याने केली. मग डिस्ने स्टुडीओने अनेकानेक क्लासिक्सची निर्मिती केली. विनोदनिर्मितीतून
करमणूक करतानाही निरागसता जपणारा चार्ली चॅपलीन हा लहानपणापासून त्याचा आदर्श होता. Pinocchio, Fantasa, Dumbo, Bambi, .... ते Junglebook ह्या सगळ्या फिल्म्स त्याची साक्ष देतात. टेक्नीकलरचे पेटंट त्याने घेतल्याने काही वर्षं कलर फिल्म बनवण्याचा हक्क फक्त त्यांनाच मिळाला. १९३२ च्या फ्लॉवर्स अॅण्ड ट्रीजने त्याला पहिला अॅकेडमी अॅवार्ड मिळवून दिला. वॉल्ट डिस्नेज फिल्मोग्राफी या शीर्षकाखाली निर्माता म्हणून जवळजवळ ५७६, दिग्दर्शक म्हणून जवळजवळ ११२ व अभिनेता म्हणूनही १०-१२ फिल्म्सची नावे दिसतात. ही प्रचंड क्रिएटिव्हिटी, Animation या माध्यमातही सतत केलेली नवनिर्मिती ही थक्क करणारी आहे. असंख्य मुलांचे बालपण खुलवणारा, मोठ्यांनाही छोटं करणारा, भाषा, प्रांत, संस्कृती, इतिहास या सार्या सीमारेषा पुसून आनंदाचे अपराजित साम्राज्य उभे करणार्या वॉल्ट डिस्नेच्या अफाट सृजनशीलतेला व नवनिर्मितीच्या क्षमतेला सांष्टांग दंडवत घालावा असे वाटते. मिकी, मिनी, डोनाल्ड, मोगली, गुफी, टॉम अॅण्ड जेरी, लायन किंग ही पात्रे आपल्या सर्वांच्या भावविश्वात कायमचे घर करून आहेत. जंगल बुक १९६७ साली सुपरहिट होता, २०१६ सालीही सुपरहिटच आहे. त्या कथेवर TV सिरिअल्सचे असंख्य भाग पाहूनही पुन्हा थिएटरकडे गर्दी होते. तीच गोष्ट टारझन, सिंड्रेला, रॉबिनहूड, अॅलिस यांची.
यामागे आनंद वाटण्याची अमर्याद ओढ, तंत्रज्ञानावरची हुकुमत व नवनवीन तंत्रेही सर्वात आधी आत्मसात करण्याची तत्परता या सर्व गोष्टी आहेत. अॅनिमेशनचे जग नंतर अधिक अॅडल्ट झाले, कधी अकाली मोठे झाले, त्यात हिंसा खूप आली. चित्र प्रमाणबद्ध असावे, सुबक सुंदर असावे हा प्रघातही हल्लीच्या काही यशस्वी अॅनिमेटर्सनी धुळीला मिळवला. या सार्या गदारोळातही डिस्नेची निरागसता, सुबकता व निर्भेळता आनंदाचा शिडकावा करत राहिली व करतच राहील.
१९९० साली डिस्नेचा २९ वा पूर्ण लांबीचा चित्रपट The Little Mermaid आला. त्यानंतर त्यांनी हाताने चित्र काढणे व रंगवणे ह्या अत्यंत कष्टप्राय तंत्रातून संगणकीय चित्रांच्या नव्या तंत्राकडे झेप घेतली ती आजतागायत उंच उंच जातच आहे. लहानपणी वॉल्टला प्राणी, पक्षी, निसर्गाचे खूप कुतूहल होते. त्यांचे चेहरे, लकबी, रंग यांना तो कागदावर आणी पण आपल्या खास शैलीत. त्या कुतूहलातून एक प्रतिसृष्टी निर्माण झाली आणि अजूनही होतच आहे. त्या वेलीवर आता एक सृजनाचे व नवनिर्मितीचे आभाळ वसले आहे.
– डॉ. नरेंद्र जोशी
http://www.udyogvishwa.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा