शुक्रवार, १५ सप्टेंबर, २०१७

गरज आहे हमखास यशस्वी होण्याची !!....

आजच्या जगात यशस्वी होण्याची व्याख्या आणि अर्थ यामध्ये व्यक्तीनुसार फरक असू शकतो. शरीराने आपण रोजच्या अत्यंत तणावग्रस्त अशा रहाटगाडग्यात अडकलेले असतो. पण व्यक्तीच्या मनात स्वत:ची अशी अनेक स्वप्नं तरळत असतात. ती स्वप्नं पूर्ण व्हावीत या आशेवर माणसं जगत असतात. पण या इच्छा पूर्ण करता आल्या नाहीत तर माणसं निराश होतात….क्वचित प्रसंगी मानसिक दृष्ट्या खचतात देखिल… ‘यशस्वी कसे व्हावे हे केवळ पुस्तकं वाचून समजत नाही’ हे सत्य आज प्रत्येकाने स्वीकारायलाच हवं. कारण केवळ ‘पोहावे कसे?’ नावाचे पुस्तक पाठ करून पोहोता येत नाही तसेच यशस्वी होण्याचे मूलमंत्र केवळ पाठ करून आयुष्यात जे हवं ते मिळवता येत नाही. त्याला प्रत्यक्ष कृतीची जोड द्यावी लागते…म्हणजेच आज जर प्रत्येकाला खरी गरज कसली असेल तर ती हमखास यशस्वी होण्याची!
जगात यशस्वी होण्यापूर्वी मुळात यशाची आपली कल्पना आपल्या मनात पक्की व सुस्पष्ट हवी. यश म्हणजे पैसा असू शकतो तर एखाद्यासाठी यश म्हणजे परीक्षेतले सर्वोच्च गुण असू शकतात. पद-प्रतिष्ठा, सन्मान हे सुद्धा एखाद्यासाठी यश ठरू शकते. तर स्वत:ला चांगली नोकरी मिळवणे, स्वत:चा चांगला व्यवसाय असणे हेही एखाद्यासाठी यश असू शकते. उत्तम स्नेहसंबंध, चांगले राहणीमान मिळवणे हे सुद्धा यश असू शकते. जागतिक सन्मान, विश्वपर्यटन हे एखाद्यासाठी यश असू शकते. म्हणजेच जगातील प्रत्येकाच्या यशाच्या कल्पना निरनिराळ्या असू शकतात हे तुमच्या लक्षात आलं असेल.
‘यश म्हणजे मग नेमकं काय?’ वरील सर्व गोष्टी एकाच व्यक्तीला एकाच आयुष्यात कदाचित मिळू शकणार नाहीत. याचा अर्थ ती व्यक्ती अयशस्वी आहे असं मुळीच नाही…म्हणून माझ्यामते यशाची व्याख्या थोडी निराळी असायला हवी.
‘आपल्याला जे काही हवं आहे ते ध्येय निश्चित केल्यावर ते ध्येय गाठण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे याची जाणीव असणे’ही यशाची पहिली पायरी आहे. ध्येय निश्चिती झाल्यावर त्या ध्येयापर्यंत पोहोचण्याचा कृती – आराखडा आपल्याला तयार करता आला पाहिजे व त्यानुसार ध्येय टप्प्या-टप्प्याने गाठता आलं पाहिजे.
यश हा काही अपघात नाही. जादूटोणा करून एका रात्रीत यशस्वी होता येत नसते. यश हे कष्टसाध्य असते व ते खेचूनच आणावे लागते. यशाला शॉर्टकट नसतो. व यश न मिळण्यामागे ज्या सबबी असतात त्या सर्व सबबींवर मात करून यश अक्षरश: खेचून आणावे लागते. मात्र यश म्हणजे प्रयत्नांची पराकाष्ठा किंवा प्रचंड मेहनत हे समीकरण आता बदलले आहे. ‘कमी वेळात, उत्तम व नियोजनबद्ध आखणीने स्मार्ट कामे करून आजच्या जगात यशस्वी होता येते’ हे अगणित व्यक्तींनी सिद्ध करून दाखवले आहे. जगात असामान्य व यशस्वी होण्यासाठी सध्याच्या प्रचलित शिक्षण पद्धतीचा फारसा उपयोग नाही. तुम्ही आतापर्यंत जे करत होता तेच पुढेही करत राहिलात, तर तुम्हाला तेच मिळेल जे आतापर्यंत मिळत होतं. मग प्रश्न हा उरतो की ‘सामान्य माणसाने कठीण परिस्थितीत नेमक करायचं तरी काय?’ या प्रश्नाचं उत्तर शोधू इच्छिणा-या प्रत्येकाकडे सर्वप्रथम आत्मविश्वास असणं खूप महत्त्वाचं आहे. कित्येक वेळा आजूबाजूची परिस्थिती व इतरांच्या प्रतिक्रिया, मतं यामुळेच माणसं स्वत:चा आत्मविश्वास गमावून बसतात. स्वत:विषयी गैरसमज करून घेतात. न्यूनगंडाच्या चक्रव्यूहात फसतात…आणि याचा दुष्परिणाम हा होतो की ते निर्णय घेण्याचा कंटाळा करतात किंवा निर्णय घेताना गांगरतात. ‘मी अमुक एक निर्णय घेतलाय तो चुकीचा तर ठरणार नाही ना?’ या काळजीत स्वत:चा प्रचंड वेळ फुकट घालवतात. म्हणून सर्वप्रथम स्वत:चा आत्मविश्वास टिकवणं व तो वाढवणं गरजेचं आहे. मोबाईल फोन दुकानातून आणल्यावर काही तासांतच त्याची बॅटरी डिस्चार्ज होते. तो फोन सतत चालू राहावा यासाठी आपण दररोज रात्री चार्जरच्या मदतीने त्या हॅन्डसेटमधली बॅटरी चार्ज करतो. अगदी त्याच प्रकारे आपल्यामधील ‘आत्मविश्वास’सतत कायम राहील याची काळजी घ्यायला हवी. आत्मविश्वास टिकवणे ही कायम चालू राहणारी प्रक्रिया आहे. लोकांच्या वाईट प्रतिक्रियांमुळे तुमचा आत्मविश्वास कमी होऊ न देणं हेही तितकंच आवश्यक आहे. यशस्वी होण्याचा दुसरा टप्पा म्हणजे उद्दिष्ट ठरवणे ज्याला इंग्रजीत ‘Goal Setting’ असे म्हणतात. आपल्याला काय हवे आहे, कधी हवे आहे, किती हवे आहे हे ठरवता येणे गरजेचे आहे. आपल्याला जे ध्येय गाठायचं आहे ते खरंच गाठता येण्याजोगं आहे का? म्हणजेच ते वास्तव आहे का? याचाही विचारं करायला हवा. स्वप्नं जरुर पहावीत पण ती अवाजवी नसावीत. ती ध्येयात रुपांतरीत होण्यासारखी हवीत. ती आपल्या ज्ञानाच्या व अनुभव विश्वाच्या व आवडीच्या जवळपास वावरणारीच असावीत. वयाच्या ७५ वर्षी जर एखाद्याने ‘हिंदी चित्रपटातील प्रेमकथांचा नायक म्हणूनच काम करीन’असं स्वप्न बाळगलं तर ते वास्तवात कधी उतरेल का? मात्र प्रयत्न केल्यास त्या व्यक्तीला चित्रपटात चरित्र नायकाची, आजोबांची भूमिका मात्र मिळू शकते. म्हणून आपल्या मर्यांदाची जाणीव ठेवूनच प्रयत्न करीत राहायला हवेत. हे करीत असताना थोडीफार जोखीम घ्यायला हवी. हा टप्पा धाडसाचा असतो. बहुतेकांना कम्फर्ट झोनमध्ये सुरक्षित वर्तुळातच जगणे आवडत असते. अती सुरक्षितता व मर्यादित उत्पन्नात समाधान मानणा-या व्यक्ती फारशा यशस्वी होताना आढळत नाहीत. आपण किती जोखीम उचलू शकतो याचा अंदाज घेऊन धाडसाने आपले ध्येय ठरवावे. एकदम फार मोठी उडी घेण्याऐवजी छोटे-छोटे टप्पे ठरवावे व यशाच्या मार्गावर वाटचाल सुरू ठेवावी.
ही वाटचाल अखंड हवी म्हणजेच तिच्यात सातत्य हवे. चिकाटीने ध्येयापर्यंत पोहोचण्याचा हा प्रवास नियमितपणे डायरीत नोंदवून ठेवावा. त्यामुळे अडचणींची कल्पना येते व मार्ग चुकत असेल तर त्यात बदल करण्याचा निर्णय घेता येतो. एकदा ठरवलेले ध्येय बदलायचे नाही हा निश्चय कायम टिकवावा. ठरवलेल्या ध्येयासोबत काळानुसार आणखी बदल घडवून आणखी नव्या ध्येयांची जोड द्यायला हरकत नाही. कृती आराखडा आखता आला तरच तुम्ही नव्या ध्येयासाठी आवश्यक असण्या-या गोष्टी त्यात जोडू शकता. आपले ध्येय सतत डोळ्यासमोर असले पाहिजे. त्यापासून विचलीत करणारी मोहमय गोष्ट जरी समोर आली तरी प्रयत्नाने तिकडे दुर्लक्ष करावे. म्हणजेच यशस्वी होण्यासाठी ध्यास घेणे आवश्यक ठरते. तुमचे ध्येय तुमच्या नसानसात इतके भिनले पाहिजे की ते ध्येय प्राप्त केल्याशिवाय मी जगूच शकणार नाही असं वारंवार स्वत:च्या मनाला बजावायला पाहिजे. तुम्ही कोणत्या घरात जन्मला, कसे दिसता, तुमच्या आईवडिलांचे रंग-रूप, जात काय आहे या गोष्टी कधीच महत्त्वाच्या नसतात. तुम्हाला काय मिळवायचे आहे व ते किती लवकर मिळवायचे आहे हे ठरवणे सर्वात अधिक महत्त्वाचे असते.
तुमच्या यशाच्या वाटचालीत अनेकांचा सल्ला, मार्गदर्शन जरूर घ्या. यशस्वी लोकांना भेटा, त्यांच्याशी ओळखी वाढवा, चर्चा करा, तुमच्या ध्येयाबाबत येणाNया अडचणी कशा दूर होतील यासाठी त्यांची मदत घ्या. यापुढचा टप्पा खूप महत्त्वाचा आहे तो म्हणजे स्वयंसूचना. `मी ठरवलेले ध्येय’ मी लवकरात लवकर गाठत आहे. माझ्या आयुष्यात सगळं चांगलंच घडत आहे’ असं मनाला वारंवार ऐकवत जा. घरात भिंतीवर आपल्या ध्येयाचं कल्पनाचित्र जरूर लावा. आपल्याला जे हवं आहे ते आताच मिळतंय असा विचार करून वागायलाही लागा. तुम्हाला हे थोडंसं हास्यास्पद वाटलं तरी त्यावर विश्वास ठेवा. यशाची इच्छा कायम धगधगती ठेवणा-या व्यक्तीच यशस्वी होतात ‘ हा यशाचा नियम आहे. फालतू गप्पा, चहाड्या, मोबाईलवरून प्रदीर्घ गप्पा, निरर्थक चित्रपट व टी.व्ही. मालिका पाहणे, कल्पनारम्य फालतू, कथा-कादंब- या वाचणे काही काळ थांबवा. यशोगाथांचे वाचन करा. तुम्हाला प्रोत्साहन देतील अशाच व्यक्तींच्या संपर्कात रहा. नवनिर्मितीचा ध्यास ठेवा. भरपूर वाचन करा., नोंदी काढा. इतरांच्या चुकांपासून शिका. उत्तम कार्य शाळांमध्ये भाग घ्या.
आज अनेक संधी तुमच्या घराचा दरवाजा ठोठावत आहेत.
दार उघडा व यशाला तुमच्या आयुष्यात शिरण्याची संधी द्या.
यश मग तुमचंच असेल!











http://yashvivek.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल