गुरुवार, २८ सप्टेंबर, २०१७

जब्याला नागराज आजही देतो महिना ७ हजार रूपये

somnath

गावोगावी हालगी वाजवणारा हा पोरगा ‘फॅन्ड्री’ प्रदर्शित झाला आणि रातोरात स्टार झाला. लोकांच्या दृष्टीने आता तो स्टार होता. अनेकांच्या मनातला ताईत होता. पण समाजव्यवस्थेमुळे आलेले दुर्देव असे की, आज देखील हा पोरगा हालगीच वाजवतो. विडिलांच्या फाटलेल्या संसाराला आपला पण हातभार लागावा हा त्यामागचा उद्देश. स्टार असल्याचा ना गर्व, ना लोकप्रियता मिळाल्याचा उन्माद. त्याचे नाव ‘जब्या’ म्हणजेच सोमनाथ लक्ष्मण अवघडे.
खरेतर बहुजन समाजाच्या जीवनाचा कला ही अविभाज्य भाग. पण जातीची उतरड आपल्या समाजव्यवस्थेचा भाग असल्यामुळे ही कला नेहमी गावकुसाबाहेरच राहिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्ररणेने गावकुसाबाहेरील बहुजनांची पोर शिकायला लागली आणि त्यांना जगण्याचे आत्मभान आले. नागराज मंजुळे हेही त्यातलेच एक उदाहरण. अशी अनेक उदाहरणे आपल्याला आजुबाजूला पहायला मिळतील. मात्र, प्रतिभा, पैसा, आणि नाव आले की, अनेकांची समाजासोबतची नाळ तुटते. हे वास्तव नाकारता येत नाही. वाचनाचा प्रभाव म्हणा किंवा मुळातच विचारांचा विस्तारलेला व्यासंग म्हणा. नागराज मंजूळेने समाजासोबतची ही नाळ कायम ठेवली आहे.
नागराजच्या चित्रपटांचे वैशिष्ट्य म्हणजे हालगी, लोककला, बोलीभाषा आणि मुळात गावचे गावपण असलेला गावगाडा हे आहेत. हे सर्वकाही पिस्तूल्या, ‘फॅन्ड्री’ आणि आता सुसाट सुटलेला ‘सैराट’ या तिनही चित्रपटात दिसून आले. त्याच्या चित्रपटातही अशीच गावकुसाबाहेरची माणसे आणि कला दोन्ही दिसतात. ‘फॅन्ड्री’तला जब्याही तसाच. गावोगावी हालगी वाजवणाऱ्या या पोराला नागराजमधल्या प्रतिभावान दिग्दर्शकाने हेरले आणि थेट ‘फॅन्ड्री’चा हिरोच करून टाकले. तेव्हा पासून ‘जब्या’शी जोडलेले नागराजचे नाते आजही कायम आहे. ‘सैराट’ने आज जोरदार घोडदौड सुरू ठेवली असली तरी, यशाची हवा नागराजच्या डोक्यात नाही. ‘फॅन्ड्री’तल्या जब्याला तो विसरला नाही. मुळातच घरची हालाकिची स्थिती असणाऱ्या आणि आजही गावोगावी हालगी वाजवण्यासाठी जाणाऱ्या जब्याला तो दरमहा ७ हजार रूपयांची मदत करतो.
देश विदेशात ‘फॅन्ड्री’ने जब्याला पोहोचवले. मात्र, त्याच्या कुटुंबाचे जीवनमान आहे तेथेच आहे. अवघडे कुटुंब आजही केमच्या गावकुसाबाहेरील पत्र्याच्या घरात राहतात. वडील लक्ष्मण यांनी पोतराजाचे काम सोडले असून ते हलगी वाजवून चार पैसे कमवतात. आई जयश्री घरकाम करते. सोमनाथ शिकावा, त्याचे व्यक्तिमत्त्व आणखी बहरावे व त्याचे कलाक्षेत्रात नाव व्हावे यासाठी नागराज त्याला आर्थिक मदत करत आहे आणि हितचिंतक मंडळीही त्याच्यासाठी पडेल ती जबाबदारी उचलायला तयार आहेत.
दरम्यान, करमाळ्यातील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्रा. प्रदीप मोहिते व त्यांच्या पत्नी कर्जतच्या दादा पाटील महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. संगीता मोहिते याही सोमनाथच्या (जब्या) जीवनाला आकार मिळावा यासाठी पालकाची भूमिका बजावत आहेत. जब्याने पुण्यातील वायसीएम संस्थेत प्रवेश घ्यावा, असा प्रा. मोहिते पतिपत्नींचा विचार आहे. मात्र, त्यात यश न आल्यास हालगी वाजवणारा आणि कलेच्या जोरावर देश विदेशात पोहोचलेला हा जब्या करमाळ्यातील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचा ‘कॉलेजकुमार’ हे नक्की






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल