नवरात्र आलं की , "सरडासुद्धा जितक्या झटपट रंग बदलणार नाही, तितक्या झटपट या बायका येत्या नऊ दिवसांत रंग बदलतील" हा बायकांच्या रोज वेगवेगळ्या रंगांच्या साड्या नेसण्यावर कमेंट करणारा जोक येतोच येतो. पण बायका आपल्या महाधीट. असल्या फालतू जोकला मुळीच भीक न घालता तेवढ्यात उत्साहाने ठेवणीतल्या साड्या नेसून ऑफीसला जायला निघतात. काहीजणी आणि काहीजणसुद्धा, हा रंग म्हणजे अगदी जीवापाड पाळतात. कधी त्या निमित्तानं नव्या खरेद्यासुद्धा होतात. काही लोकांची ,"नाहीतरी एवीतेवी कपडे घालायचे असतातच ना, मग घालू आजचा रंग" अशी भावना असते. तात्पर्य काय, मनापासून किंवा गंमत म्हणून महाराष्ट्रात बरीचशी जनता हे रंगांचं फॅड एंजॉय करते.
पण तुम्हाला कधी प्रश्न पडलाय, की कोण ठरवतं हे रंग म्हणून? किंवा याच दिवशी हाच रंग घालायचा ही परंपरा कितीशे वर्षांपासून चालत आली आहे म्हणून? हो. आम्हाला पडला हा प्रश्न. आणि आम्ही त्याचं उत्तरही शोधून काढलं. गंमत म्हणजे आमच्या उत्तराला क्विंटचं अनुमोदनही मिळालं. उत्तर आणि त्यामागची कथा मोठी रंजक आहे हो. वाचाच मग आता..
तर , आमच्या आठवणीप्रमाणे साधारण २००३च्या सुमारास आपल्या महाराष्ट्र टाईम्सने श्रावणक्वीन आणि नवरात्रीचे नऊ रंग हा प्रकार चालू केला. पहिले दोन-तीन दिवस मटा पुरवणीमध्ये त्या दिवसाच्या रंगाच्या सुंदरशा साडीमधल्या मॉडेलचे फोटो हे आकर्षण होतं. मग आलं तुमचेही असे ऑफिसमध्ये सगळ्यांनी एकाच रंगाचे कपडे घातल्याचे फोटो पाठवा म्हणून आवाहन. मग काय, बॅंका, शाळा , ऑफिसेस मधल्या ग्रुप फोटोजनी मटा पुरवणीची मधली दोन आणि कधी कधी शेवटचं पानही खाऊन टाकलं.
२००३-०४साली फक्त जाहिरातींतूनच नाही, तर अशा फोटोजमधूनही बातम्या हुडकून हुडकून वाचाव्या लागत होत्या. बघा, केवढं दिव्य होतं ते!!
Image Source
तर मटाच्या म्हणण्याप्रमाणं त्यांनी केलं काय? तर प्रत्येक दिवस एका देवीचा असे नऊ देव्यांमध्ये नऊ दिवस वाटून टाकले. आणि मग प्रत्येक देवीला एक रंग दिला. म्हणजे असं पाहा, दुर्गेची दुर्गाष्टमी, म्हणून तिचा एक रंग. असा रंगोत्सवाला मस्त धार्मिकतेचा रंग चढत गेला. खरं असो वा नसो, उत्सवप्रिय भगिनींनी आणि काही बंधुरायांनीही हा सण नवरंगात साजरा करायला सुरूवात केली. हळूहळू दरवर्षी लोक मटाने रंग जाहिर करण्याची वाट पाहू लागले. आता तर काय, रोजचं शेड्यूल व्हॉटसॅप केलं जातं.
Image Source
पण प्रश्न असा होता, की मटाला असा आचरटपणा का करावासा वाटला? आणि यावर्षी आमच्या हाती आला क्विंंटचा लेख. त्यात त्यांनी २००३साली मटाचे संपादक असलेल्या भरतकुमार राऊतांनाच या प्रश्नाचं उत्तर द्यायला साद घातली आणि उत्तर जाम खडबडायला लावणारं होतं. ते म्हणाले, यात धार्मिकता वगैरे काही नाही, तर लोकसत्तेच्या तुलनेनं घसरत चाललेला मटाचा खप वाढवण्यासाठी त्यांनी केलेली ही मार्केटिंग स्ट्रॅटेजी होती. राऊतांनी हेरला रोज ऑफिसला जाणार्या मध्यमवयीन बायकांचा वाचकवर्ग. आणि त्यांना आकर्षित करण्यासाठी मग फोटोज, छान छान साडीतल्या मॉडेल्स हे सगळं रोजच्या मटाच्या पुरवणीत येऊ लागलं..
Image Source
ही त्यांची ट्रिक मात्र कमालीची यशस्वी ठरली. आजच्या घडीला ऑफिसमध्ये जाणार्या मध्यमवयीन बायकाच काय, घरी येणारी कामवाली आणि कॉलेजला जाणारी मुलं-मुली देखील हे कलर कोड्स पाळतात. सहज म्हणून सुचलेला हा मार्केटिंगचा उपाय आज १३ वर्षांनंतरही तितक्याच यशस्वीपणे चालू राहिलाय.
आजच्या घडीला गणेशोत्सवात मुंबईचे गणपती नाही पाहिले तरी चालतील, पण नवरात्रात मुंबईच्या लोकल्सचे प्लॅटफॉर्म मात्र नक्कीच पाहाण्यासारखे झालेयत. हे सगळं लीलया साधून आणणार्या भरतकुमार राऊतांच्या डोकॅलिटीला टीम बोभाटाचा कडक सलाम!
BY - https://www.bobhata.com/lifestyle/secret-behind-navratri-colors-551
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा