गुरुवार, २८ सप्टेंबर, २०१७

होतं ते चांगल्यासाठीच…..

होतं ते चांगल्यासाठीच…..

असं म्हणतात की अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. परंतु बोलायला सहजशक्‍य वाटणारे अपयश पचवायला तितके सोपे नसते. अपयशाच्या भीतीने आपण अनेक संधींना हातचे गमावून बसत असतो. परीक्षेत पास व्हायची भीती, व्यवसायात लॉस व्हायची भीती आणि अजूनही बऱ्याच क्षणी अपयशाची भीती आपल्या मनात दाटत असते. खरं तर जे होत ते चांगल्यासाठीच होतं, असा ठाम विश्‍वास मनात भिनवून आपण पुढच्या संधीचे सोने करायला नेहमी सतर्क असायला हवे.

आयुष्यात आव्हानांचे आणि निराशेचे डोंगर आपल्याला नेहमीच वाटेत भेटणार आहेत परंतु थकून किंवा थांबून चालणार नाही. कारण डोंगराआड गेलेला आशेचा सूर्य पुन्हा एका नव्या आशेने सूर्योदयाच्या रूपाने परत येणार आहे.

माझ्या वाचनात आलेली एक सुंदर जपानी बोधकथा मला इथे आवर्जून सांगावीशी वाटते.
एकदा जपानच्या टोकियो शहरात राहणार एक गरीब मुलगा नोकरीच्या शोधात टोयोटा कंपनीत कारकूनच्या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी गेला. त्यावेळी तेथील मॅनेजरने त्याला रुजू करण्यासाठी त्याचा ईमेल आयडी विचारला. तेव्हा त्या मुलाने मी गरीब असल्याने माझ्याकडे लॅपटॉप नाही, त्यामुळे माझ्याकडे ईमेल आयडी पण नाही. असे सांगितले.

तेव्हा त्या मॅनेजरने त्याला तुझ्याकडे ईमेल आयडीच नाही, तर मग तू ह्या कंपनीसाठी अजिबात लायक नाहीस असे म्हणून अपमानास्पद वागणुकीने त्यास बाहेर काढले. त्या मुलाच्या हातात फक्त 5 येन (जपानी चलन) होते. परंतु तो निराश झाला नाही. तो पुढे चालू लागला. रस्त्यात त्याला मोठे खेळण्यांचे मार्केट लागले. त्याने त्या मार्केटमध्ये जाऊन अतिशय रास्त भावात 5 येनची खेळणी खरेदी केली. आणि तीच खेळणी एका शाळेसमोर जाऊन विकली आणि त्यातून त्याने 15 येन कमावले.

पुढे त्या 15 येनची खेळणी खरेदी करून त्याचे 45 येन कमावले.
असे करता करता त्याने हळूहळू अनेक शाळांसमोर जाऊन अनेक प्रकारच्या खेळण्यांची विक्री करायला सुरूवात केली.

त्यातूनच त्याने पुढे एक दुकान खरेदी केले. काही वर्षांतच अनेक दुकाने केली. असे करता करता तो त्या टोकियो शहरातील सर्वात श्रीमंत व्यक्ती झाला.

एके दिवशी त्या व्यक्तीने परदेशात फिरायला जाण्याचा निर्णय घेतला. मग त्याने एका ट्‍रॅव्हल एजंटाला बोलावले. एजंटने फॉर्म भरले व त्याला ईमेल आयडी विचारला. तेव्हा तो म्हणाला माझ्याकडे ईमेल आयडी नाही कारण माझ्याकडे लॅपटॉप नाही.

तेव्हा तो एजंट आश्‍चर्याने म्हणाला सर तुम्ही माझी चेष्टा करत आहात का? आज तुम्ही शहरातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती आहात आणि तुमच्याकडे इमेल आयडी नाही? हे कसं शक्‍य आहे ?

तो व्यक्ती म्हणाला, ‘खरंच माझ्याकडे इमेल आयडी नाही’.
तो एजन्ट म्हणाला,’ सर आज तुमच्याकडे इमेल आयडी असता, तर तुम्ही काय होऊ शकला असता?

त्यावर ती श्रीमंत व्यक्ती हसून म्हणाली हो.! बरोबर आहे आज माझ्याकडे ईमेल आयडी असता, तर मी आज टोयोटा कंपनीचा ऑफिस बॉय असतो !

ही गोष्ट इथेच संपते परंतु ती आपल्याला अतिशय अर्थपूर्ण असा बोध देऊन जाते. कधी कधी एखाद्या छोट्या गोष्टीमुळे आपली संधी नाकारली गेली किंवा आपल्याला अपयश आले, तर नाराज होऊन चालणार नाही.

कारण काय माहीत, कदाचित यापेक्षा चांगली संधी आपली वाट पाहत असेल.
कोणत्याही अपयशाने किंवा नाकारले जाण्याने नाउमेद न होता जे होतं ते चांगल्यासाठीच होतं, हा मंत्र उराशी बाळगून पुढे मार्गक्रमणा केली पाहिजे.
यश आणि अपयश या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात.

आपण मात्र उगाचच त्याची कारणं आणि परिणाम, शोधण्यामागे गुरफटत बसतो आणि आपल्या पुढील संधीला ताटकळत ठेवतो. आपण जितके अपयश,नकार, निराशा, नाउमेद यांत अडकून राहणार, तितके यश आपल्यापासून दूर जाणार.
चला तर मग, जे होतं ते चांगल्यासाठीच असा दृढनिश्‍चय करून अपयशावर मात करूया. कारण उद्याचा आशेचा सूर्योदय आपली वाट पाहतोय.
















सागर ननावरे
by - http://www.dainikprabhat.com/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल