बोधकथा – गोष्ट जिराफाच्या पिलाची
जिराफाच्या पिल्लाला जन्म घेतांना कदाचितचं कुणी बघितलं असेल. आईच्या गर्भातुन तो दहा फुट उंचीवरुन धाडकन जमिनीवर पडून जन्म घेतो. खाली पडताच तो पाय पोटाशी दुमडुन शरीराचं गाठोडं करुन राहतो. अर्भकच ते ! ना त्याच्यात पायावर उभं राहण्याची क्षमता असते ना ईच्छा. त्याची आई क्षणभर आपल्या जिभेने त्याचे नाक कान साफ करते आणि अवघ्या पाचच मिनीटांनी ती अर्भकाला कठोरतेचा धडा शिकवते.
ती प्रथम पिलाच्या चारही बाजूनी फिरते आणि मग अचानक असं काही करु लागते की बघणारा आश्चर्यचकित होऊन जातो. अचानक ती अर्भकाला इतक्या जोराने लाथ मारते की ते दोन कोलांट्या मारुन दूर जाऊन पडतं.
यावरही जेव्हा ते बाळ उभंही राहू शकत नाही, ती पुन्हा शक्तिशाली लाथ मारते. लाथा खाऊन खाऊन तो बिचारा अर्धमेला होउन जातो. तरीही त्याची आई प्रहार करत जाते. आणि एका क्षणाला ते पिल्लू आपल्या कमजोर कोवळ्या टांगांवर कसेतरी उभे राहते. आई जिराफ त्यावेळी पुन्हा विचित्र काम करु लागते, ती आपल्या बाळाचे पाय जीभेने चाटु लागते.
ती त्याला आठवण देऊ ईच्छिते की तो आपल्या पायावर कसा उभा राहिला. जंगलात आता धोक्याच्या परिस्थितीत एका उडीतच पिल्लाला सुरक्षित ठिकाणी जावे लागणार आहे. जिराफाच्या ज्या पिल्लांना आईचा लाथांचा प्रसाद मिळत नाही, ते जंगलातील हिंस्त्र श्वापदांचा बळी पडतात.
जगात असे अनेक लोकं आहेत, जे कठोर मेहनत करुनही धुत्कारल्या जातात, त्यांच्यावर नियती असेच एकामागोमाग एक प्रहार करत जाते. परंतु जितक्या वेळा त्यांच्यावर प्रहार होतो तितक्या वेळा ते खचून न जाता पुन्हा नव्या जोमाने कार्याला लागतात.
अशा लोकांना पराजित करणं वा त्यांच्या ध्येयापासून परावृत्त करणं अशक्य आहे. आणि एका क्षणी आयुष्याच्या एका सुंदर वळणावर त्यांना त्यांचं ध्येय मिळूनच जातं ज्याकरता त्यांनी इतक्या यातना सहन केल्या.
एक मांसाचा गोळा असणारं एका दिवसाचं अर्भक हे करू शकतं, आपण तर धट्टेकट्टे माणसं आहोत. चला उठूया नव्या जोमाने. नवीन क्षितीजांकडे जाण्यासाठी. एक सूर्य झाकोळला म्हणून काय झाले. अनंत सूर्य, अनंत क्षितीजे आपली वाट बघत आहेत
by
- http://marathimotivation.in
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा