प्रगत युगातून वावरताना स्वत:चे उत्तुंग ‘करिअर’ घडविणे, ही एक गरज बनून राहिलेली आहे. मेहनतीचे सातत्य ठेवून आपल्या स्वप्नांचा मागोवा घेत राहणं हा आधुनिक युगातील मंत्र झालेला आहे. या सूत्राच्या प्रेरणेचे खरे सूत्रधार म्हणून वॉल्ट डिस्नेचे नाव सर्वप्रथम पुढे येते. असाध्य ते साध्य करण्याची ताकत कुणीही त्यांच्याकडून घ्यावी. चित्र चरित्रांमध्ये अॅनिमेशनचा आधार घेत जान आणण्याचे मोठे काम करत करिअर घडविण्यासाठी नेमकं काय करायला हवं याचं मार्गदर्शन त्यांनी जगाला दिलं. ‘उंच भरारीची स्वप्न पाहा आणि सतत कृतीचे खतपाणी घालत त्यांना साकार करा.’ असे ठामपणे सांगणारे वॉल्ट डिस्ने यांनी स्पष्ट केलेले आहे की खूप खूप आनंद देणारे यश मिळवायचे असेल तर आपले आवडीचे काम करिअरसाठी निवडायला हवे. १९०१ मध्ये शिकागो येथे जन्म झालेल्या वॉल्ट यांनी लहानपणीच ठरवले होते की आपण आपल्या क्षेत्रात यशस्वी व्हायचे. आपल्या काकांकडून ते शिकले की परिस्थिती कशीही असली तरी प्रसन्न चित्ताने काम करत राहायचे. आपल्याला मिळालेल्या चित्रकलेच्या वहीच्या भेटीचा वापर त्यांनी जंगलातले प्राणी काढण्यासाठी केला. आपल्या वडिलााना त्यांच्या
व्यवसायासाठी मदत करत आपल्या यशाचे वाक्य व ध्येय त्यांनी जागोजागी लिहून ठेवले. वेळोवेळी त्यांच्या ही गोष्ट लक्षात येत होती की अडचणी आल्यानंतर माणूस अधिक सजग होतो व त्याच्या हातून काम अधिक कुशलतेने होते. फळं कापण्यापासून ते अॅम्ब्युलन्स चालकांपर्यंत कोणतेही कार्य त्यांनी आवडीने केले. पण प्रत्येक क्षेत्रात वावरत असताना आपली आवडीची चित्रकला सोडली नाही. या प्रवाहात त्यांना एक चांगली सवय लागली. ती म्हणजे एखादी कृती ठरवली की ती करायचीच. व्यंग चित्रकार म्हणून काम शोधत असताना त्यांना केवळ, ते क्षेत्र बदलण्याचे गोड सल्ले मिळत राहिले. शेवटी आपल्या कल्पनेतल्या चित्रांना वाव देण्याकरिता त्यांनी स्वतंत्र काम करायचे ठरविले. अधनं मधनं दुसऱ्यांची छोटी मोठी व्यंगचित्रांची कामं करत एका गॅरेजमध्ये स्वत:चे काम सुरू केले. करिअर घडवताना आवडीच्या क्षेत्राबरोबरच योग्य वातावरण व सहकार्य मिळणं किंवा मिळवणं अतिशय महत्त्वाचं असतं. ते हॉलिवूडला आले आणि आपल्या भावाचे सहकार्य घेत ‘अॅलिस इन वंडरलँड’ या चलचित्रापासून काम सुरू केलं. त्यांच्या कल्पनेला ‘मिकी माऊस’ साकारल्यानंतर त्यांनी मागे वळून बघितले नाही. हॉलिवूडच्या कलाकारांपेक्षा मिकीला अधिक लोकप्रियता मिळाली. आपली व्यंगचित्रांची कला जगाला देण्यासाठी त्यांनी एक भव्य ट्रेनिंग स्कूल काढलं जिथे मोठय़ा प्रमाणावर विद्यार्थी नवे विकसित तंत्र शिकू लागले. मोठी लक्ष्यं साकारण्याकरिता त्यांनी झोकून देणं आणि अडचणींवर निर्धास्त होऊन मात करण्याचे तंत्र अवलंबले. म्हणूनच १९५५ साली कॅलिफोर्निया येथे डिस्ने लँडची निर्मिती केली. आपल्या कल्पनांवर विश्वास ठेवत सातत्याने काम करत राहणारा माणूस हवी ती उंची गाठू शकतो हे त्यांनी जागाला दाखवून दिले. करिअर घडवताना आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करणारा कोणताही माणूस जग अधिक सुंदर करण्यासाठी भरारी घेऊ शकतो.
विलास मुणगेकर
by - Loksatta
|
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा