गुरुवार, २८ सप्टेंबर, २०१७

अमिताभ नावाचा जादूगार!


अमिताभ! या चार अक्षरात हिंदी सिनेसृष्टी सामावली आहे असं म्हटलं तर कदाचित अजिबात वावगं ठरणार नाही. अभिनयाच्या शहेनशहाबद्दल हा विचार येण्याचं कारण म्हणजे त्याचा नव्यानं येऊ घातलेला सिनेमा शमिताभ… या सिनेमात अमिताभसोबत धनुषही झळकणार आहे. मात्र या सिनेमाची चर्चा आहे ती फक्त आणि फक्त बीग बी अमिताभ बच्चनमुळेच… 1969 मध्ये आपल्या कारकीर्दीची सुरूवात करणाऱ्या अमिताभनं आज वयाची सत्तरी गाठलीये. कारकीर्दीला सलग 15 सिनेमा फ्लॉप देणाऱ्या हा अभिनेता एक दिवस हिंदी सिनेसृष्टीचा अनभिषिक्त सम्राट होईल असं त्यावेळी कोणाला सांगितलं असतं तर असं म्हणाणाऱ्याला लोकांनी वेड्यात काढलं असतं… मात्र हा माणूस हिंमत हरला नाही. 1972 मध्ये जंजीर सिनेमा आला आणि अमिताभ रातोरात स्टार झाला… अँग्री यंग मॅन… ही त्यानं स्वतःची इमेज बनवली आणि पुढे ती कैक वर्ष जपली देखील… गेल्या चार दशकांहून अधिक काळ अमिताभ सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवतोय.
राजेश खन्ना हा अमिताभ पूर्वीचा सुपरस्टार… पण अमिताभ आला आणि त्यानं राजेश खन्नाचं सुपरस्टारपद अक्षरशः हिरावून घेतलं. राजेश खन्नाच्या आधीच्या काळात हिरो ही संकल्पना स्टारडम या संकल्पनेपर्यंत किंवा नंबर वन आणि टू पर्यंत पोहचलेली नव्हती. तेव्हाचे कलाकार दिग्गज होते… कारण तो काळ राज कपूर, दिलीप कुमार आणि देवानंदचा होता. मात्र अमिताभएवढी दीर्घ कारकीर्द कोणाचीच झाली नाही. त्याचमुळे हिंदी सिनेसृष्टीच्या इतिहासात अमिताभचं नाव अग्रक्रमानं कायमच घेतलं जाईल. प्रकाश मेहरा यांच्या जंजीरनंतर अमिताभला सूर सापडला… अभिमान, गहरी चाल, जमीर, मिली, दिवार, दो अंजाने, हेराफेरी, अमर अकबर अँथनी या आणि अशा अनेक सिनेमांची रांगच लागली… विशेष उल्लेख करावा लागेल तो डॉन आणि शोले या दोन सिनेमांचा… शोलेतली त्याची जयची भूमिका म्हणजे कारकीर्दीतला माईलस्टोन ठरली. तर डॉन को पकडना मुश्कीलही नहीं नामुमकीन है… हा डायलॉग अगदी परवा परवा पर्यंत तरूण पिढीच्या तोंडावर होता. आलाप, चुपके चुपके, परवरीश, त्रिशूल, गंगा की सौगंध असे काही वेगळे विषय हाताळणारे सिनिमेही बच्चनसाहेबांनी केले… तो लोकांना भावला कारण तो लोकांमधला होऊन पडद्यावर वावरत होता.
70 आणि 80 च्या दशकातली पिढी आपल्या पिढीचं नेतृत्व करणारा नायक म्हणून अमिताभकडे बघत होती. अँग्री यंग मॅनची इमेज जपण्याला याचा खूप मोठा हातभार लागला. जया भादुरी, परवीन बाबी, राखी, रेखा यांच्यापासून ते अगदी जिया खानपर्यंत अमिताभनं अनेक हिरोईन्स सोबत कामं केली… मात्र खऱ्या अर्थानं अफेअर रंगलं ते रेखासोबत. अमिताभचं जया भादुरीसोबत लग्न झालं होतं. मात्र मि. नटरवरलाल, दो अंजाने, सुहाग या सिनेमांमध्ये रेखा आणि अमिताभ यांची जोडी हिट ठरली… सिलसिला हा सिनेमा या दोघांनी एकत्र केलेला शेवटचा सिनेमा… या सिनेमानंतर हे दोघे एकदाही ऑनस्क्रीन एकत्र आले नाहीत. कारण त्यांच्या अफेअरच्या चर्चा फारच रंगल्या होत्या.. परवीन बाबीचं अमिताभवर एकतर्फी प्रेम होतं…  तिनं त्याच्यावर संमोहन करण्याचे आरोपही लावले… मात्र अमिताभनं त्याकडे लक्ष दिलं नाही…ज्येष्ठ दिग्दर्शक ताराचंद बडजादत्या अमिताभला त्यांच्या उंचीवरून आणि आवाजावरून बोलले होते… या पठ्ठयानं याच दोन गोष्टी आपला युनिक सेलिंग पॉईंट बनवल्या…1981 नंतरही अमिताभनं बेमिसाल, कालिया, अंधा कानून, शराबी, शक्ती, नमकहलाल, नमकहराम, शहेंशहा सारखे सिनेमा दिले.. जादूगर, गंगा जमुना सरस्वती सारखे फ्लॉप सिनेमाही केले… त्यानंतर  अग्निपथनं त्याच्या कारकीर्दीला नवं वळण दिलं… आज का अर्जुन, हम, अजूबा यांसारके सिनेमाही केले. हममधला त्याचा टायगर आणि डॅनीचा बख्तावर खास गाजला. या सिनेमात त्याची हिरॉईन होती किमी काटकर… ती आज गायब आहे मात्र अमिताभ सगळी समीकरणं बाजूला ठेवून एका वेगळ्याच उंचीवर जाऊन बसलाय.
80 च्या दशकात अमिताभनं समाजवादी पक्षही जॉईन केला होता. मात्र राजकारण त्याला फार काही झेपलं नाही. त्याचा वक्तशीरपणा, त्याचा सहज अभिनय त्याची शिस्तबद्धता… सगळंच चर्चेत राहिलं. अमिताभ मोस्ट सक्सेसफुल अभिनेता ठरला… त्याचं कारण त्याला यशाची अनेक शिखरं गाठायची होती आणि त्यानं ती गाठून दाखवली… याचा अर्थ त्यानं अपयश पाहिलं नाही असा नाही. त्यानं एबीसीएल नावाची एक कंपनीही स्थापन केली होती. मात्र मृत्यूदाता सिनेमानंतर अमिताभच्या कारकीर्दीला उतरती कळा लागली होती… ते वर्ष होतं 1997… अमिताभवर एवढी वाईट वेळ आली होती की त्याला या कंपनीचे शेअर्स विकावे लागले होते… ही कंपनी तोट्यात चालली होती… मात्र यानंतर तीनच वर्षात अमिताभनं छोट्या पडद्यावर पदार्पण केलं कौन बनेगा करोडपती म्हणत तो आला आणि झालं अमिताभच्या करीअरनं पुन्हा एकदा फिनिक्स भरारी घेतली…. आणि पुन्हा एकदा अमिताभकडे सिनेमांची रांग लागली.

पांढरी फ्रेंच कट दाढी ठेवलेला अमिताभ लोकांना आपलासा वाटू लागला. मोहब्बते, आँखे, कभी खुशी कभी गम, अरमान, बागबान, सरकार, सरकारराज, भुतनाथ, खाकी, देव, ब्लॅक, बंटी और बबली, एकलव्य, निशब्द, चीनी कम, पा,  असे एकाहून एक सरस चित्रपट या माणसानं हिंदी सिनेसृष्टीला दिले. बूम, आग यासारखे फ्लॉपही दिले…मात्र कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे अमिताभ चर्चेत कायम राहीला… जाहिरातवाल्यांनाही तो आपलासा वाटू लागला… कारण पल्स पोलिओ अभियान असो किंवा बोरो प्लस क्रिमची जाहिरात… प्रत्येक जाहिरात कंपनीला अमिताभ आपल्या जाहिरातीत असावा असं वाटू लागलं. अमिताभनं स्वतःला ब्रँड म्हणूनही डेव्हलप केलं…तेही वाढत्या वयाकडे दुर्लक्ष करत.
भुतनाथ रिटर्न्स आणि बुढ्ढा होगा तेरा बाप यात काम करूनही अमिताभनं धमाल केली आणि आता 2015 मध्ये शमिताभ हा या सिनेमाद्वारे रूपेरी पडद्यावर धुमाकूळ घालयाला बीग बी पुन्हा सज्ज झालाय. त्याचा एकंदरीत सगळा प्रवास पाहिला तर त्यात अनेक चढ उतार आहेत..मात्र तो कशानंही डगमगून गेलेला नाही… जंजीर, दिवारनं त्याला हात दिला… अमर अकबर अँथनी… हेराफेरी…शराबीनं त्याची इमेज सेट केली…अग्नीपथ… हम.. खुदा गवाह… यांसारख्या सिनेमांनी त्याची अँग्री यंग मॅनची इमेज ठळक केली. पा… बागबानमधून त्यानं आपल्याला रडवलं… आँखे मध्ये व्हीलन साकारून धक्का दिला… बुढ्ढा होगा तेरा बाप म्हणत हसवलं आणि मस्तीही केली… आता येऊ घातलाय तो शमिताभ… या सिनेमाची उत्सुकताही अगदी जंजीर किंवा दिवार इतकीच कायम आहे. ज्या दशकात अमिताभनं काम करायला सुरूवात केली त्या दशकातनंतर चार ते पाच पिढ्या बदलल्या मात्र अमिताभ आजही आपल्या मनावर अधिराज्य गाजवतोय. हीच या नावाची जादू आहे…. तोच ही किमया साधू शकतो.





by - http://www.saamtv.com/blog/magician-called-amitabh/?print=print

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल