गुरुवार, १४ सप्टेंबर, २०१७

जगप्रसिद्ध 'फोर्ड' मोटर्सचे संस्थापक हेन्री फोर्ड


कल्पनेतले लक्ष्य ठरवल्यानंतर असंख्य अपयशांमधून चिकाटीचा मार्ग अवलंबत ते मिळविण्याची शिकवण मिळते ती हेन्री फोर्ड यांच्याकडून. शालेय शिक्षण अर्धवट सोडल्यामुळे अशिक्षित धनसम्राट या उपमेचा अस्वीकार करून त्यांनी ठणकावून सांगितलं की, माझ्या कार्यक्षेत्रातील इत्थंभूत माहिती माझ्याकडे पूर्णत: आहे. १८६३ साली मिशिगन येथे जन्मलेल्या हेन्री फोर्ड यांच्या नजरेसमोर एकच मोठे लक्ष्य होते. सामान्य माणसाला परवडेल या किमतीत स्वत:ची गाडी उपलब्ध करून देणे, त्या काळात गाडी असणं हे केवळ खूप खूप श्रीमंत असणाऱ्या लोकांना शक्य होतं. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या हेन्री यांच्या वडिलांची इच्छा होती की, त्याने फक्त शेती करावी, पण मशिन्सशी दोस्ती करणाऱ्या हेन्री यांना खेळण्याऐवजी दिवसरात्र अवजारांमध्ये रमण्यात आनंद वाटायचा. मित्रांची घडय़ाळं पूर्ण खोलून ते पुन्हा जोडून द्यायचे. शेतावरच बनवलेल्या त्यांच्या छोटय़ा वर्कशॉपमध्ये बसून त्यांनी भंगारातून एक छोटे इंजिन लहान वयातच बनविले. बाराव्या वर्षी घोडागाडीतून जाताना त्यांनी पहिल्यांदा इंजिनवर चालणारी गाडी बघितली आणि तिथेच त्यांच्या आयुष्याची दिशा निश्चित केली. साधारणत: याच वयात मुलांना क्रिकेटर, इंजिनीअर, डॉक्टर बनण्याची स्वप्नं दिसू लागतात. पण संपत्ती निर्माण करीत जगाचं भलं करणारा ‘उद्योगपती हो’ ही दिशा व प्रेरणा मोजक्याच कुटुंबांतून एखाद्याला मिळत असेल. केवळ स्वस्त कारच्याच निर्मितीत नव्हे तर त्याचे मोठय़ा प्रमाणावर उत्पादन करायचे हा निर्धार हेन्री यांनी केला होता. त्यांचं सांगणं असायचं की, तुमचं आवडीचं काम करताना कितीही मोठं

लक्ष्य असू द्या, ते साध्य करणं सोपं होऊन जातं. गाडी बनवण्याच्या प्रयोगांच्या अर्थप्राप्तीसाठी त्यांनी दोन नोकऱ्या स्वीकारल्या व त्यानंतर घरी येऊन ते रात्री उशिरापर्यंत आपल्या प्रयोगशाळेत काम करीत बसायचे. जेव्हा कामावरून हेन्रीवर प्रयोग करणं बंद करण्याचा दबाव वाढू लागला तेव्हा नोकरी सोडून त्यांनी काही सहकाऱ्यांना घेऊन डेट्राइट कंपनी स्थापित केली. हेन्री यांना सर्वसामान्यांसाठी चांगली गाडी बनवत राहावी ही इच्छा होती, पण त्यांचे सर्व सहकारी केवळ ऑर्डरप्रमाणे श्रीमंतांसाठीच गाडय़ा बनवायच्या या निश्चयाचे होते. त्वरित आपला राजीनामा देत त्यांनी त्यात नमूद केलं की, यापुढे कुणाचीही आज्ञा स्वीकारायची नाही हा मी निर्धार केलेला आहे. स्वत:च्या उद्योग-व्यवसायात स्वतंत्र निर्णय घेता येतात हे लक्षात येऊन त्यांनी आर्थिक सुरक्षिततेपेक्षा आर्थिक अनिश्चिततेचा मार्ग स्वीकारला.

आयुष्यात येणारं अपयश हे पुन्हा नव्या जोमाने काम सुरू करण्याची संधी घेऊन येत असतं, हा त्यांचा विश्वास होता. त्यांनी फोर्ड मोटर कंपनी सुरू केली. रेसिंग कारच्या निर्मितीतून संधी निर्माण करीत सर्वप्रथम उत्तमोत्तम दर्जाच्या गाडय़ा देण्यास प्रारंभ केला. हलका धातू असलेल्या वेनेडियम स्टीलचा शोध घेत १९०८ मध्ये मॉडेल टी कारची यशस्वी निर्मिती केली. आपल्या जिद्द व चिकाटीच्या बळावर त्यांनी आपले स्वप्न साकारले होते. शहरात जाण्याकरिता अगदी शेतकऱ्यापासून सामान्य माणसापर्यंत कुणीही ही गाडी स्वत:करिता घेत होता. मर्यादित विचार करणाऱ्या सहकाऱ्यांचे व भागधारकांचे ते ऐकत राहिले असते तर जगभरात आज सर्वसामान्यांपर्यंत कार पोहोचलीच नसती. माणूस प्रगती करतोय असं म्हणण्यापेक्षा एक माणूस आपल्या ठाम विश्वासाच्या बळावर जगात मोठी क्रांती घडवतो, हे हेन्री फोर्ड यांनी करिअर घडविणाऱ्यांना दाखवून दिले.

- विलास मुणगेकर


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल