एकदा एक राजा त्याच्या प्रधान, सेनापती आणि सैनिकांसह शिकारीला निघाला वाटेत अरण्यात पुढे त्यांची ताटातूट झाली. मग प्रधानाने राजाच्या शोधार्थ सैनिकाला पाठवले अरण्याच्या मध्यभागी एका साधूची झोपडी होती. साधू झोपडीच्या बाहेर झाडाखाली बसलेला असतो. पण तो साधू आंधळा असतो. सैनिक साधूच्या जवळ येतो आणि घोड्यावरूनच विचारतो, काय रे गोसावड्या आमच्या महाराजांना हिथून जाताना पाहिलेस काय? त्यावर तो साधू त्याला सांगतो, बाबा रे मी दोन्ही डोळ्यांनी आंधळा आहे, मला कस काय दिसणार. सैनिक म्हणला अरे आंधळा आहेस म्हणून काय झालं पण बहिरा तर नाहीस ना? घोड्याच्या टापाचा काही आवाज वगैरे ऐकला असशील. साधू म्हणतो नाही तस काही मी ऐकल नाही. सैनिक तिथून कोणाला तरी शिव्या देत निघून जातो.
.
मग थोड्या वेळाने तिथे सैनिकांचा नाईक तिथे पोहचला तो म्हणाला, काय हो साधूबुवा ईथून आमचे महाराज गेलेत काय? साधू म्हणतो, नाही रे बाबा तुमचे महाराज नाही आले इकडे, पण एक शिपाई मात्र राजेसाहेबांचा शोध करीत आला होता तो उत्तरेच्या दिशेने गेलाय.
थोड्या वेळाने तिथे सेनापती आला तो म्हणाला. साधू महाराज इथून आमचे राजेसाहेब गेले असल्याचे आपणांस काही कळले काय. साधूने त्यालाही वरील प्रमाणे उत्तर दिले. थोड्या वेळाने तिथे स्वतः प्रधान आला, आणि तो म्हणाला सूरदासजी महाराज आम्ही शिकारीला आलेल्या आमच्या राजेसाहेबांच्या शोधात आहोत. ते इकडे आल्याचे आपणाला काही कळाले का? साधूने प्रधानालाही नकारार्थी उत्तर दिले.
.
आणखी थोड्या वेळाने तिथे स्वतः राजाच आला. त्याने त्या साधूबुवांना प्रणाम केला आणि विचारले, महाराज आपल्या चरणी माझे प्रणाम असावेत. मी तहानेने व्याकुळ झालोय, भगवन् आपली अनुमती असेल तर आपल्या आश्रमातील थोडेसे पाणी मी पिऊ इच्छितो. त्यावर साधू म्हणाला राजा तुझे स्वागत असो पण तू थकून-भागून आला आहेस, त्यामुळे तू एकदम पाणी पिऊ नकोस, मी तुला काही फळ खायला देतो ती खा आणि मग पाणी पी. राजा म्हणाला, प्रज्ञाचक्षु भगवान् मी राजा आहे हे आपण कसे ओळखले? माझ्या शोधार्थ इथे कोणी आले होते काय? साधू म्हणाला होय महाराज, तुझा शोध करीत प्रथम एक शिपाई आला होता, मग शिपायांचा नाईक आला, त्यानंतर सेनापती, मग प्रधानजी आले होते.
.
राजा म्हणाला महाराज आपण त्यांचे अधिकार कसे काय ओळखलेत? साधू म्हणाला त्यांच्या बोलण्याच्या शैलीवरून. जो जितका श्रेष्ठ असेल तितकी त्याची भाषा नम्र आणि मृदू असते. शिपायाने मला गोसावड्या असे म्हटले. तर नाईकाने साधूबुवा असा माझा उल्लेख केला. त्यानंतर सेनापती आला त्याने मला साधू महाराज असा आवाज दिला. प्रधानाने मला सूरदासजी महाराज असे संबोधले. आणि तू जेव्हा माझा भगवन् म्हणून माझा गौरव केलास, तेव्हाच मी ओळखले हा राजाच असला पाहिजे. कारण राजा नम्र, मृदू आणि शिलाने श्रेष्ठ असतो. या उलट हीन लोक नेहमी कठोर आणि कर्कश बोलतात. दुसऱ्याला दुखावतात. उदार आणि परोपकारी मनाचे लोक नम्र असतात त्यांचे बोलणे आणि वागणे मृदू आणि मनोहर असते. चंद्र किरणात स्नान करावे, केशर-कस्तुरी मिश्रीत जलाचे सिंचन व्हावे, पुष्पपरागांचा वर्षाव व्हावा. अथवा मलयनिलांच्या मंद मंद लहरी याव्यात, असे उदार मनाच्या माणसाचे बोलणे आणि वागणे असते. ज्यांच्या अंतःकरणात सर्वांच्या विषयी परमेश्वराचा भाव असतो त्यांची वागणूक देखील नम्र असते.
.
“नम्र झाला भूता | तेणे कोंडिले अनंता ||” अस संत तुकोबाराय सांगतात, आम्हीही विनम्र व्हावं आणि त्यापद्धतीने आमचं जगणं बोलणं व्हावं. जे आमच जगणं प्रतिबिंबित करेल. समृध्दीच्या काळात विनम्रता आणि संकटाच्या काळात सहनशिलता असावी. मानवाचा सर्वश्रेष्ठ गुण म्हणजे कृतज्ञता.
कार्यात दक्षता, वृत्तीत आत्मीयता आणि स्वभावात नम्रता असावी. लीनता आणि विनयशीलता ह्या धार्मिकतेच्या दोन शाखा आहेत.
.
संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात,
.
जाणोनि नेणतें करीं माझें मन |
तुझी प्रेमखूण देऊनियां ||१||
मग मी व्यवहारीं असेन वर्तत |
जेवीं जळा आंत पद्मपत्र ||२||
ऐकूनि नाइकें निंदास्तुति कानीं |
जैसा का उन्मनी योगीराज ||३||
तुका म्हणें ऐसें झालिया वांचून |
करणें तें तें शीण वाटतसे ||४||
.
संसार करीत असतांना आपल्याला अनेक प्रकारच्या व्यवहारात निमग्न रहावे लागते. आणि हे व्यवहार करीत असताना आपली स्तुती ऐकण्याचे प्रसंग प्रत्येकास येतात. निंदेचेही प्रसंग येतात, परंतु आपले हातून सदव्यवहार घडो, किंवा अविचाराची कृत्ये न होवोत. आपली कोणी ना कोणी केव्हा तरी स्तुती करणारे आढळतेच. बाहेरचे कोणी नसले तरी आपले आप्त, आपली बहीण, पत्नी असे कोणी तरी आपली स्तुती करतेच. केकावली मधील अखेरीस दिलेल्या केकांतील पुढील केका विशेष रीतीने इथे लागू पडतो,
.
गमो मधुर हें विष स्तवन सेवितां माजवी |
कर मलिन सद्यशोमुख हलाहला लाजवी ||
हरापरिस तूं बरा प्रभुवरा सदा जो पिशी |
असा रस समर्पि त्या अमृत आपुलें ओपिशी ||
.
ह्या केकेमध्ये पंतांनी हरीला हरापेक्षा म्हणजे शंकरापेक्षा श्रेष्ठ ठरविले आहे. शंकराने हलाहल नामक अत्यंत जहाल विष एकदा प्राशन केले. आणि त्याने ते पचविलेही. परंतु त्याचा शेष राहिला म्हणून म्हणा किंवा दुसऱ्या काही कारणामुळे असो त्याला नीलकंठ असे म्हणतात. तथापि परमेश्वराची स्थिती ह्यापेक्षा फार निराळी आहे. अत्यंत जहाल जे हलाहल विष त्याच्याही पेक्षा जहाल विष ह्या जगात आहे. त्याचे परमेश्वर सेवन करतो, ते घटाघटा पितो एवढेच नव्हे तर, ‘असा रस समर्पि त्या अमृत आपुले ओपिशी’ इतके जहालातले जहाल विष कोणते? तर ते ‘स्तुती’ होय.
.
स्तुती हे विष आहे असे सामान्य जीवाला, किंबहुना साधकाला देखील वाटत नाही, आणि म्हणून आम्ही ते पचवितो, घटाघटा त्याचे प्राशन करतो, पण त्याचा अत्यंत अनिष्ट परिणाम झाल्यावाचून राहत नाही. आम्हांला आमची कोणी स्तुती केली म्हणजे जरा बरे वाटते. काम करण्यास उत्साह येतो असे वाटते व काम करण्यास उत्साह यावा, उत्तेजन मिळावे म्हणून स्तुतीची आवश्यकता आहे असे वाटू लागते. विडी ओढण्याचे व्यसन ज्यास अद्याप लागलेले नाही अशा मनुष्याने विडीचा एक झुरका मारला की, त्यास मोठी हुषारी आली असे वाटते, पण पुढे ते उत्तेजन वगैरे बाजूस राहून धूम्रपान हे त्यास व्यसनच जडते व त्यावाचून त्याचे चालत नाहीसे होते. स्तुतिरूपी हे विष त्याहून वाईट आहे. व्यसनाचे अनिष्ट परिणाम आपल्याला दिसतात, व्यसन वाईट म्हणून टाळण्याचा आपल्याला प्रयत्न करता येतो. पण मनुष्य एकदा स्तुतिप्रिय झाला की मग त्याच्या अधोगतीस सीमा नाहीशी होते हे आपण नित्य लक्षात ठेविले पाहिजे. आपल्या ठिकाणी पात्रता नसता आपली जी स्तुती होते त्याच्यायोगे जडता प्राप्त होतेच, परंतु हा पात्रापात्रतेचा विचार तूर्त दूर ठेविला तरी स्तुती आमच्या अधोगतीसच कारण होते असे दिसून येईल.
.
मी एकादे उपयुक्त कार्य करीत आहे असे वाटून लोक माझी स्तुती करू लागतात. लोक बरे म्हणू लागताच ते कार्य प्रथम अधिक उत्साहाने करावयास लागतो, पण हा उत्साहच माझ्या घातास कारण होतो. नंतर लोकांनी माझी स्तुती केलीच पाहिजे अशी भावना माझ्या ठिकाणी उत्पन्न होते, मी त्या स्तुतूची वाट बघत असतो. (मी एखादी पोस्ट केली आणि त्याला लाईक मिळाले नाही, किंवा कॉमेंट्स मिळाल्या नाही वगैरे या सर्व गोष्टी आपोआप होतात. ही हीनता आहे याचा लवलेशही आपल्याला नसतो.) स्तुतीला मी पात्रच आहे, इतरांपेक्षा मी थोर आहे, माझ्या ठिकाणी इतरांपेक्षा परोपकारबुद्धी अधिक वास करीत आहे, देशहिताची आस्था मलाच आहे असे वाटून मी अधोगतीस जात असतो आणि ह्या माझ्या अवनतीस, हलाहलापेक्षाही जहाल जे स्तुतिरूपी विष तेच कारण झालेले असते.
.
आता आपण निंदेविषयी थोडा विचार करू. आणि तो करीत असता निर्भर्त्सने संबंधाने असे दोन शब्द सांगणे जरूर आहे की, कोणाच्याही हातून घडलेल्या वाईट कृत्याबद्दल जी निर्भर्त्सना होते ती व निंदा एक नव्हेत. निर्भर्त्सना होणे हे ठीक आहे. नीच कृत्य होत नसूनही आपणास दोष देण्यात येत असतो, आपल्याविषयी भलभलते ग्रह आपल्या सभोवार होत असतात, चर्चा चालू असते, ती निंदा. निर्भर्त्सना व सत्कृत्य ही एके ठिकाणी असू शकत नाहीत. धडधडीत सत्कृत्य करणाऱ्याची जर कोणी निर्भर्त्सना करू लागला तर त्यास आपण वेडापीर म्हणू.
.
पण, निंदेचे तसे नाही. स्तुती ज्याप्रमाणे आम्हांला जहाल विषाहून विष वाटू लागली पाहिजे त्याप्रमाणे निंदा हे एक अमृतच आहे असे आम्हांस वाटू लागले पाहिजे. कोणी आमची निंदा केली की, आम्ही प्रथम अगदी निरूत्साह होतो, आमची आस्था डळमळू लागते, आमच्या ठिकाणी एक प्रकारची उद्विग्नता नांदू लागते व निंदा करणार्याचा अनादर, हेवा इ. आमच्या ठिकाणी जागृत होतात. पण असे न होता निंदा ही आम्हांला अमृताप्रमाणे वाटू लागली पाहिजे. निंदेच्याद्वारे आपले दोष आपल्याला कळू लागतात, त्यांच्याविषयी आपल्या ठिकाणी जागृती होते, आपले दोष आपणच शोधून काढावे अशी मनाची प्रवृत्ती होऊ लागते. आपण सत्कृत्यामध्ये निमग्न असूनही निंदा होते असा अनुभव आला म्हणजेही ‘जेवी जळा आत पद्मपत्र’ अशी आपली वृत्ती झाली पाहिजे. ‘निंदकाचे घर असावे शेजारी’ असे जे तुकोबांनी आपल्या एका अभंगामध्ये म्हटले आहे ते ह्याचसाठी की निंदेच्याद्वारे आपले दोष आपल्याला सहज कळतात. परंतु विनाकारण निंदा होत असली, तरी तिजकडे आपण दुर्लक्ष करून, ही अशी निंदाच माझ्या शुद्धीस कारण होईल असे मानून आपण आपल्या भगवत समर्पित कार्यामध्ये, नामामध्ये, साधनेमध्ये रत असले पाहिजे, निंदा अमृततुल्य मानावयास लागले पाहिजे.
.
व्यवहारामध्ये आपण नांदत असताना स्तुति-निदां ऐकण्याचे प्रसंग आपल्यावर वारंवार येत असतात. आम्ही निंदेला भीत असतो. पण खरे पाहता स्तुतीला आम्ही अधिक भ्यावयास पाहिजे. कारण स्तुती आमच्या घातास कारण होते. स्तुतीचे व्यसन जडले म्हणजे इतरांनी आपली स्तुती केलीच पाहिजे असे आपणांस वाटू लागते. पण, निंदा ही आमची मैत्रीण होऊ शकते. निंदा आम्हांस कर्तव्यनिष्ठा करणारी, विनम्रवृत्ती अंगामध्ये भिनवणारी, इतरांविषयी मनामध्ये उदारभाव उदित करणारी, स्वत:च्या दोषांविषयी चित्तामध्ये जागृत ज्योत पेटविणारी अमृतवल्ली आहे.
.
आणि म्हणून परत एकदा सांगावेसे वाटते,
.
स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे |
मना सर्व लोकांसी रे नीववावे ||
.
काम, क्रोध, लोभ, मद, मोह आणि मत्सर अशा सहा शत्रूंपासून मनाला खूप लांब ठेवावे लागते. त्यासाठी सतत मनाची मशागत करावयाची असते. सतत जागृत राहावे लागते. पवित्र मनात चांगले विचार उगम पावतात. नदी जशी उगमापाशी पवित्र असते तसे आपल्या मनातील विचारही त्यांच्या उगमापाशी ठेवावे म्हणजे ते पवित्र राहतात. याची सवय करून घ्यावी लागते. वृत्तीने माणसाने अत्यंत नम्र असावे. नम्रताच माणसाला विचारांची व आचारांची सुंदर बैठक देते.
.
आणि म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘नम्र झाला भूतां | तेणे कोंडिले अनंता ||’ म्हणजेच जो सर्वांच्या ठाई नम्र असतो तो प्रत्यक्ष परमेश्वराला आपल्या हृदयात कोडून ठेऊ शकतो.
.
स्वतः भगवंत म्हणतात,
सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रता: |
नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते ||
.
यावर भाष्य करताना आद्य आचार्य म्हणतात,
सततं सर्वदा भगवन्तं ब्रह्मस्वरूपं मां कीर्तयन्तः?
यतन्तश्च इन्द्रियोपसंहारशमदमदयाहिंसादिलक्षणैः धर्मैः प्रयतन्तश्च?
दृढव्रताः दृढं स्थिरम् अचाल्यं व्रतं येषां ते दृढव्रताः
नमस्यन्तश्च मां हृदयेशम् आत्मानं भक्त्या नित्ययुक्ताः सन्तः उपासते सेवन्ते ||
ते केन केन प्रकारेण उपासते इत्युच्यते
अर्थात, कशा प्रकारे भजतात ते दृढ़व्रती भक्त (ज्यांचा निश्चय दृढ़-स्थिर-अचल आहे असे भक्तजन). ते सदा निरन्तर ब्रह्मस्वरूप भगवंतांचे कीर्तन करतात तथा अंतरायामध्ये इन्द्रियनिग्रह, शम, दम, दया आणी अहिंसा आदि धर्मांनी युक्त होण्याचा प्रयत्न करताना हृदयामध्ये वास असणाऱ्या मला (परमात्म्याला) भक्तिपूर्वक नमस्कार करून सदा-सर्वदा माझे चिन्तन करण्यात मग्न राहून माझी आंतरिक उपासना, सेवा करतात.
.
यावर अतिशय सुंदर विवेचन करताना माउली म्हणतात,
.
मद्गुण गाती नित्य रंगती
मुखें गर्जती नाम
सुखें साधिती सहज-जपातें
स्मरुनी आत्माराम ||
पुन्हां डोलती पुन्हां बोलती
राम कृष्ण गोविंद
भक्ति प्रेमें किती नाचती
घेती एक चि छंद ||
कीर्तन-रंगीं अशी लागतां
ब्रह्मानंदीं टाळी
तृषा संपली भूक भागली
कोण देह सांभाळी ||
आणिक कोणी मन आवरुनी
योग-साधना करिती
यम-नियमादि व्रतें पाळुनी
वज्रासन ते रचिती ||
प्राणायामें कुंडलिनीतें
जागृत करुनी जाण
प्रत्याहारें धारणा-बळें
अखंड धरुनी ध्यान ||
पिंडें पिंडा ग्रासुनि नेती
ब्रह्मांडातें प्राण
अशी समाधी साधुनि होती
पर-तत्त्वीं रममाण ||
आणि पांडवा, करिती सेवा
कोणी वंदन करुनी
त्यजुनि अहंता एक चि जगतीं
आत्म-रूप अनुभवुनी ||
न देखती ते उच्चनीचते
जगीं मी चि लक्षून
सर्वां भूतीं विनम्र होती
मजमाजीं मिसळून ||
.
हे विनम्रतेचे फळ साक्षात भगवंतांनी सांगितले आहे.
.
.
अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त.
श्रीगुरुचरणरजानंदसेवक
श्रीकृष्ण वसंत पुराणिक
(२२ फेब्रुवारी २०१७)
https://purentrue.wordpress.com