मंगळवार, ६ डिसेंबर, २०१६

वसंतदादा पाटील (महाराष्ट्रातील माजी मुख्यमंत्री)


वसंतदादा पाटील (महाराष्ट्रातील माजी मुख्यमंत्री)



‘दादा, जुंधळं पार संपल्यात, गहू-तांदळांचा कणबी घरात न्हाय, राशन भरायला पैसे पायजे होतं’, ‘दादा लई दिसापासून दाढ दुखतीया, चांगल्या डागदरला फुकटात इलाज कर म्हणून चिठ्ठी द्या,’ ‘गावाकडं जायचंय, उताऱ्याला पैसे पायजेत’, ‘पोरीला नीट नांदवत नाहीत, सासरच्यांना तुमच्या भाषेत हिसका द्या!’ अशा एक ना अनेक अडचणी घेऊन बायाबापडय़ांची गर्दी नेहमीच वसंतदादांच्या भोवती असायची. आपल्या प्रत्येक अडचणीचं उत्तर वसंतदादा या एकाच माणसाकडे आहे याबद्दल गर्दीतल्या प्रत्येकाला खात्री असायची.

‘वर्षां’ बंगल्याच्या हिरवळीवरील खुर्चीवर दंडकं घातलेले आणि लुंगी नेसलेले दादा बसलेत आणि प्रत्येकाला आपल्या परीने मदत करताहेत हे दृश्य नेहमीचेच आणि अनेकांनी पाहिलेले. दंडक्याच्या खिशात हात घालून आतल्या आतच नोटा मोजून समोरच्याच्या हातात ठेवत कुणाच्या रेशनची, तर कुणाच्या गाडीभाडय़ाची व्यवस्था करणारे दादा पाहिले की मन गहिवरून जायचे.
एप्रिल १९७७ ते मार्च १९७८, त्यानंतर मार्च १९७८ ते जुलै १९७८ आणि फेब्रुवारी १९८३ असे तीन वेळा वसंतदादांनी मुख्यमंत्रीपद भूषविले पण तिन्ही वेळा मुख्यमंत्रीपद मिळविताना, ते भूषविताना आणि ते सोडतानाही दादांना संघर्षच करावा लागला. १९७७ साली शंकरराव चव्हाणांना मुख्यमंत्रीपदावरून दूर करून ते पद मिळविताना ज्या घडामोडी दादांनी केल्या ते एक रंगतदार राजकीय नाटय़च होते. तब्बल ११ वर्षे इतका प्रदीर्घ काळ मुख्यमंत्रीपद भूषविणाऱ्या वसंतराव नाईक यांनी १९७४ साली त्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री झाले. शंकरराव आणि वसंतदादांचे फारसे सख्य कधीच नव्हते. सिंचन आणि पाटबंधारे या दोन क्षेत्रांत महाराष्ट्रातील अन्य कुठल्याच राजकीय नेत्याला आपल्याइतके ज्ञान नाही (दादा ज्ञानाला अक्कल म्हणायचे) असे वसंतदादांचे ठाम मत होते, पण त्यांचा हा दावा शंकरराव चव्हाण यांना अजिबात मान्य नव्हता. धरण आणि पाटबंधारे यातील आपले ज्ञान दादांपेक्षा कांकणभर अधिकच सरस आहे, असे शंकरराव म्हणायचे. खरे तर त्यात थोडेफार तथ्यही होते. तत्कालीन पंतप्रधानांच्या उपस्थितीत दिल्लीत झालेल्या एका परिषदेत मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनीच शंकररावांच्या पाटबंधारे क्षेत्रातील ज्ञानावर शिक्कामोर्तब केले होते. या परिषदेतील आपल्या भाषणात ‘शंकरराव चव्हाण पुट महाराष्ट्रा ऑन दि इरिगेशन मॅप ऑफ इंडिया’ अशा शब्दांत वसंतराव नाईक यांनी शंकररावांचे पाटबंधारे क्षेत्रातील मोठे योगदान जाहीरपणे मान्य केले होते. वसंतरावांनंतर शंकरराव मुख्यमंत्री झाले तेव्हा वसंतदादांबद्दल फारसे ममत्व नसतानाही वसंतराव आणि यशवंतराव चव्हाण यांच्या आग्रहाखातर त्यांनी आपल्या मंत्रिमंडळात दादांचा समावेश केला होता. पण तरीही या दोन नेत्यांत कधीच कुणाला सख्य पाहायला मिळाले नाही. मंत्रिमंडळ बैठकीत चर्चेला येणाऱ्या विविध प्रस्तावांवर अनेक वेळा दोघांची तोंडे दोन दिशेला असायची. हे संबंध पुढे पुढे इतके विकोपाला गेले की दोघांत सातत्याने वाद होऊ लागले. अशाच एका वादानंतर दादांना मंत्रिमंडळातून दूर करण्याचा निर्णय घेऊन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास सांगितले. त्याबाबतचे पत्र वसंतदादांच्या हातात पडले तेव्हा ते परिचितांच्या एका लग्नसोहळ्यासाठी पुण्यास गेले होते. तेथूनच त्यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे धाडला. त्यानंतर दादा सांगलीकडे रवाना झाले ते शंकररावांना मुख्यमंत्रीपदावरून दूर करण्याची प्रतिज्ञा करूनच. सांगलीत जाऊन त्यांनी राजकारणसंन्यासाची घोषणा केली.
पुढे काही काळातच झालेल्या लोकसभा निवडणुकीत साऱ्या देशभर जनता पक्षाकडून काँग्रेसचा पूर्णपणे पाडाव झाला. महाराष्ट्रही त्याला अपवाद नव्हता. महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ जागांपैकी २८ जागा जनता पक्षाने जिंकल्या तर उरलेल्या २० जागा काँग्रेसच्या वाटय़ाला आल्या. महाराष्ट्र हा नेहमीच काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. लोकसभेच्या ४० हून अधिक जागा नेहमीच काँग्रेस पक्ष जिंकायचा आणि पाच किंवा सहा जागा विरोधी पक्षांना मिळायच्या. १९७७ च्या निवडणुकीत याच्या नेमकी उलट परिस्थिती झाल्याने राज्यभरातील काँग्रेसजनांची मती गुंग झाली. राज्यातील या दारुण पराभवास मुख्यमंत्री शंकरराव चव्हाणच जबाबदार आहेत. त्यांना मुख्यमंत्रीपदावरून दूर करायला ही नामी संधी आहे हे हेरून वसंतदादा मुंबईत दाखल झाले आणि ‘काँग्रेसच्या घराला आग लागली असताना मी स्वस्थ बसू शकत नाही,’ अशी गर्जना त्यांनी केली. आपल्या अंगावरील राजकीय संन्यासाची वस्त्रे त्यांनी सांगलीहून मुंबईला येतानाच आयर्विन पुलावरून कृष्णेच्या पात्रात भिरकावून दिली होती. शंकरराव चव्हाणांना मुख्यमंत्रीपदावरून दूर करण्याचा विडा उचलूनच दादा मुंबईत आले आहेत हे कळल्यावर काँग्रेसमधील असंतुष्ट आमदार त्यांच्याभोवती गोळा होण्यास सुरुवात झाली. मुख्यमंत्र्यांना हटविण्याएवढे आमदार आपल्या तंबूत दाखल झाल्याचा अंदाज येताच दादांनी शंकररावांवर तोफा डागून राजीनाम्यासाठी त्यांच्यावर दबाव आणण्यास सुरुवात केली. या परिस्थितीत शंकररावांची पाठराखण करण्यासाठी इंदिरा गांधींसह कुणी श्रेष्ठीच शिल्लक राहिले नव्हते, कारण त्या सगळ्यांचाच पराभव झाला होता. कुठल्याच बाजूने परिस्थिती आपल्याला अनुकूल नाही हे लक्षात आल्याने आणि राज्यातही वसंतदादांनी पूर्णपणे कोंडी करून टाकल्याने अखेर शंकरराव चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.
शंकररावांच्या राजीनाम्याने वसंतदादांचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग प्रशस्त झाल्याचे सर्वानाच वाटू लागले होते पण तेवढय़ाने दादांपुढच्या अडचणी संपल्या नव्हत्या. विधिमंडळ काँग्रेस पक्षाच्या बैठकीत नेतानिवडीच्या वेळी आपण वसंतदादांना आव्हान देऊ आणि विधिमंडळ नेतेपदासाठी त्यांच्याविरुद्ध निवडणूक लढवू असा बॉम्बगोळा ज्येष्ठ नेते यशवंतराव मोहिते यांनी टाकल्याने राज्यातील काँग्रेस पक्ष पूर्णपणे हादरून गेला. प्रत्यक्षातही काँग्रेस नेता निवडीच्या वेळी वसंतदादा आणि यशवंतराव मोहिते यांच्यात थेट लढत झाली. ही लढाई दादांनी जिंकली आणि ते मुख्यमंत्री होणार यावर शिक्कामोर्तब झाले. पण तेवढय़ानेही प्रश्न संपले नव्हते. वसंतदादांचा मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी पार पडला आणि त्याच वेळी शंकरराव चव्हाण यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन स्वत:चा महाराष्ट्र समाजवादी काँग्रेस हा नवा पक्ष स्थापन केला. खासदारकीला निवडून येण्याचा विक्रम करणारे नगर जिल्ह्य़ाचे नेते बाळासाहेब विखे-पाटील हे त्या वेळी शंकररावांसमवेत होते. बहुधा या दोघांपुरताच हा पक्ष मर्यादित होता. आणखी एक सिंधी की पंजाबी गृहस्थ या पक्षात शंकररावांच्या दिमतीला होते. त्यांचा काँग्रेसशी काय संबंध, असा प्रश्न कोणी विचारला असता तर शंकररावांनाही त्याचे उत्तर देता आले नसते. काँग्रेसमधील आणखी एक वजनदार नेते राजारामबापू पाटील यांनीही दादा मुख्यमंत्री झाल्याच्या निषेधार्थ काँग्रेसचा राजीनामा देऊन थेट जनता पक्षातच प्रवेश केला, तर दुसरे मातब्बर नेते डी. वाय. पाटील यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन टाकला. तेही दादांचे विरोधक म्हणूनच ओळखले जायचे. त्यानंतर डी. वाय. कधीच निवडणुकांच्या भानगडीत पडले नाहीत. त्यांनी स्वत:ला शैक्षणिक क्षेत्रात वाहून घेतले. सध्या ते त्रिपुराचे राज्यपाल आहेत.
वसंतदादा पाटील यांचा मुख्यमंत्रीपदाचा दुसरा कार्यकाळ मार्च १९७८ ते जुलै १९७८ असा जेमतेम चार महिन्यांचाच होता. पण एवढय़ा कमी काळासाठीचे मुख्यमंत्रीपद मिळविताना दादांना पहिल्या मुख्यमंत्रीपदापेक्षा अधिक यातायात करावी लागली. त्यांचे हे मुख्यमंत्रीपद इंदिरा काँग्रेस व रेड्डी काँग्रेसच्या आघाडीचे प्रमुख या नात्याने होते. १९७७ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत तेव्हा नव्यानेच स्थापन झालेल्या जनता पक्षाकडून काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वावर नाराज झालेल्या काँग्रेसमधील काही नेत्यांनी ब्रह्मानंद रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली रेड्डी काँग्रेसची स्थापना करून इंदिरा गांधींशी उभा दावा मांडला. इंदिरा गांधी यांच्या सर्वाधिक राजकीय अडचणीच्या काळात आपणच त्यांच्याशी एकनिष्ठ असणारे पहिले मराठी नेते होतो असे स्वत:चे ढोल वाजवून एकापेक्षा एक सरस राजकीय पदे मिळविणारे शिवराज पाटील हेही त्या वेळी रेड्डी काँग्रेसच्या कळपात होते. रेड्डी काँग्रेसच्या स्थापनेनिमित्त शिवाजी पार्कवर झालेल्या प्रचंड सभेत (या सभेला झालेल्या गर्दीत माथाडी कामगारांचीच संख्या मोठी होती) पक्षाध्यक्ष ब्रह्मानंद रेड्डी यांनी अस्सल इंग्रजीत जे भाषण ठोकले त्याचा मराठी अनुवाद या शिवराज पाटलांनीच जनसमुदायाला ऐकविला होता. असो. सांगायचा मुद्दा हा की, रेड्डी काँग्रेसच्या स्थापनेनंतर काही दिवसांतच दिल्लीत इंदिरा काँग्रेसचीही स्थापना झाली. त्या स्थापना सोहळ्यासाठी तेव्हा महाराष्ट्रात मंत्री असलेले नाशिकराव तिरपुडे दिल्लीस गेले होते. त्यांनी तेथूनच आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्याकडे पाठवून दिला. त्यानंतर तिरपुडे दिल्लीहून मुंबईला परतले ते इंदिरा काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष म्हणूनच. त्याच दरम्यान महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या होत्या. या निवडणुकीत रेड्डी काँग्रेस, इंदिरा काँग्रेस आणि जनता पक्ष यांच्यात धमासान लढाई झाली. जनता पक्षाने सर्वाधिक ९९ जागा जिंकल्या. इंदिरा काँग्रेसला ६९ जागांवर तर रेड्डी काँग्रेसला ६२ जागांवर विजय मिळाला. त्यानंतर सुरू झाली ती सत्तासंपादनाची स्पर्धा. यानिमित्ताने वसंतदादा पाटील यांचे यशस्वी राजकीय डावपेचही राज्यातील जनतेला पाहायला मिळाले. संयुक्त आघाडी सरकारसाठी दादांनी त्या वेळी जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या एस. एम. जोशी यांच्याशी आपण चर्चा करीत असल्याचे भासवत दुसरीकडे इंदिरा काँग्रेसचे प्रमुख नाशिकराव तिरपुडे यांच्याशीही चर्चेचे नाटक सुरू ठेवले आणि अगदी मोक्याच्या क्षणी जनता पक्षाच्या नेत्यांना तोंडघशी पाडून इंदिरा काँग्रेसबरोबर आघाडी करून राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावाही केला. दादांनी हा दावा करताच आवाक् झालेल्या जनता पक्षाच्या नेत्यांनी आकांडतांडव केले आणि सर्वाधिक जागा जनता पक्षानेच जिंकल्यामुळे सरकार स्थापनेची संधी आम्हालाच मिळायला हवी, अशी मागणी राज्यपालांकडे केली, पण ती फेटाळण्यात आली आणि राज्यपालांनी इंदिरा काँग्रेस-रेड्डी काँग्रेस यांना संयुक्त सरकार स्थापण्यास परवानगी दिली. मग वसंतदादा मुख्यमंत्री, तिरपुडे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री अशी पदांची वाटणी झाली आणि दादा-तिरपुडे यांचा शपथविधीही पार पडला. शरद पवार या सरकारमध्ये उद्योगमंत्री होते. दोन काँग्रेसची ही ढकलगाडी फार काळ धावणार नाही हे राज्यातील सर्वच पक्षांनी ओळखले होते. सरकार दादांनी चालवावे, मी माझ्या पद्धतीने चालणार अशा थाटात तिरपुडे मात्र दादागिरी करत होते. त्यांनी राज्यभर दौरे काढून इंदिरा काँग्रेसला मजबूत करण्याच्या नावाखाली यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील आणि शरद पवार यांच्यावर टिकेची झोड उठविण्यास सुरुवात केली. चव्हाणांना पुढे करून दादा-पवार गुळाला मुंगळे चिकटावेत तसे सत्तेला चिकटून बसले आहेत, असे तिरपुडे सातत्याने सर्वत्र सांगत फिरत होते. त्यांच्या टीकेने यशवंतराव कमालीचे व्यथित झाले होते तर वसंतदादांना संताप अनावर होत होता. अशा संतापाच्या भरातच एकदा त्यांनी शरद पवार यांना बोलावून घेऊन ‘‘शरद, या नाशिकरावचे बघा काय तरी, नाही तर मीच राज्यपालांकडे राजीनामा देऊन आपल्या सगळ्यांचीच नाशिकरावच्या जाचातून सुटका करून घेतो,’’ असे सांगितले. पण पवारांनी, ‘‘आपण लवकरच यावर तोडगा काढू, सध्या तुम्ही शांत राहा,’’ असे सांगत दादांची समजूत काढली.
पुढे काही दिवसांतच शरद पवार यांनी सुंदरराव सोळंके, सुशीलकुमार शिंदे आणि दत्ता मेघे या अन्य तीन मंत्र्यांसह, विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन चालू असतानाच मंत्रिपदाचा राजीनामा देत असल्याची नाटय़मय घोषणा करून ऐन अधिवेशनातच दादांचे सरकार पाडून टाकले. वसंतदादांसारख्या डोंगराएवढय़ा नेत्याचे सरकार पवारांनी पाडल्याच्या घटनेची राजकीय वर्तुळात जोरदार प्रतिक्रिया उमटली. शरद पवारांनी दादांच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप अनेकांनी केला. खरे तर पवारांच्या मागे यशवंतराव चव्हाणांनी अत्यंत छुपेपणाने आपली ताकद उभी केली होती. पवारही सर्व हालचाली करून स्वत: नामानिराळे राहण्याचा प्रयत्न करीत होते. दादांसारख्या ज्येष्ठ नेत्याच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रमाद आपल्याकडून घडणे शक्यच नाही असे स्पष्ट करून त्यांनी तेव्हा त्यांच्यावर झालेल्या आरोपांचा इन्कारही केला होता, पण यशवंतरावांच्या सल्ल्यानेच त्यांनी मंत्रिमंडळ पाडले होते. अर्थात येथे एक गोष्ट नमूद करायला हवी. ती म्हणजे पवारांनी दादांच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप अन्य अनेकांनी केला तरी स्वत: दादांनी मात्र तसा थेट आरोप कधीही केला नव्हता. शरदने आपल्याला फसविले, ही भावना तेव्हा दादांनी काही खास जिव्हाळ्याच्या माणसांकडे मात्र व्यक्त केली होती. ‘‘पवार सतत यशवंतरावांच्या संपर्कात होते आणि त्यांच्या भेटीही होत होत्या, हे काय मला माहीत नाही काय?’’ असे वैतागलेले उद्गार दादांनी, ते काळजीवाहू मुख्यमंत्री असताना वर्षां बंगल्यावरील एका बैठकीत काढले होते. एका ज्येष्ठ नेत्याने त्याच्याहीपेक्षा ज्येष्ठ असलेल्या नेत्याचे सरकार पाडणे ही महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील एकमेव घटना कशी घडली याची माहिती स्वत: पवारांनीच अलीकडे एका मुलाखतीत कथन केली होती. नरिमन पॉइंटवरील एअर इंडिया इमारतीच्या बरोबर समोरच असलेल्या ‘रिव्हिएरा’ इमारतीत यशवंतरावांचा फ्लॅट होता. नाशिकराव तिरपुडेंचा पोरकटपणा असह्य़ झाल्यानंतर आता काय करायचे यावर विचार करण्यासाठी एका सायंकाळी त्यांनी या फ्लॅटमध्येच एक गुप्त बैठक घेतली. शरद पवार, आबासाहेब खेडकर, भाऊसाहेब नेवाळकर आणि ज्येष्ठ पत्रकार गोविंद तळवलकर या मोजक्याच आणि चव्हाणांच्या खास विश्वासू व्यक्ती या बैठकीस उपस्थित होत्या. या बैठकीतच सरकार पाडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या आधी राज्यातील आघाडी सरकार सत्तेवरून जाणे कसे आवश्यक आहे याची मीमांसा करणारा लेख गोविंद तळवलकर यांनी लिहावा असेही बैठकीत ठरविण्यात आले. त्यानुसार ‘हे सरकार पडावे ही तो श्रींची इच्छा’ हा तळवलकरांचा लेख महाराष्ट्र टाइम्समध्ये प्रसिद्ध झाला. पवारांसाठी हा ग्रीन सिग्नल होता. त्यांनी लगेचच सरकार पाडण्याच्या दिशेने पावले टाकण्यास प्रारंभ केला आणि ते अवघड राजकीय ऑपरेशन यशस्वीरीत्या पूर्णही केले.
पवारांनी त्यानंतर जनता पक्षाच्या सहकार्याने पुरोगामी लोकशाही दल (पुलोद) स्थापन करून मुख्यमंत्रीपद बळकावले आणि दादांच्या नशिबी पुढे काही काळ राजकीय वनवास आला.
१९८० साली जनता पक्षाचा पूर्ण पाडाव करून इंदिरा गांधी केंद्रात पुन्हा सत्तेवर आल्या. त्यानंतर काही महिन्यांतच काही राज्यातील बिगर काँग्रेसी सरकारे त्यांनी बरखास्त केली. हरियाणाचे तत्कालीन मुख्यमंत्री भजनलाल तेव्हा इंदिराजींच्या चरणी इतके लीन झाले की त्यांनी हरियाणातील आपला सत्ताधारी पक्ष पूर्णपणे काँग्रेसमध्ये विलीन करून आपली सत्ता टिकविण्यात कसेबसे यश मिळविले. महाराष्ट्रात शरद पवारही असेच पाऊल उचलतील असे राज्यातील बहुतांशी राजकीय नेत्यांना आणि राजकीय विश्लेषकांनाही वाटत होते. तसा सल्लाही त्यांना अनेकांनी दिला होता. पण महाराष्ट्रात आपल्या नेतृत्वाखालील पुलोदला अजूनही मोठे राजकीय यश मिळेल या स्वप्नरंजनात शरद पवार मश्गूल होते. पुढे राज्यात थेट विधानसभेच्याच निवडणुका जाहीर झाल्याने पवारांसमोर या निवडणुकांना सामोरे जाण्याखेरीज पर्याय राहिला नाही. त्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात इंदिरा गांधींच्या झंझावातापुढे पुलोदचा अक्षरश: पालापाचोळा झाला आणि काँग्रेस पक्षच पूर्ण बहुमताने सत्तेवर येणार हे स्पष्ट झाले. तेव्हा नवे मुख्यमंत्री म्हणून ए. आर. अंतुले यांचे नाव मोठय़ा वेगाने पुढे आले. विधानसभा निवडणुकीत अंतुले यांच्याच पसंतीच्या अनेक कार्यकर्त्यांना उमेदवारीही देण्यात आली होती. त्यामुळे निवडून आलेल्यांमध्येही अंतुले यांचाच जोर दिसत होता. पण सगळे चित्र इतके स्पष्ट दिसत असतानाही मलाच मुख्यमंत्री करा असा आग्रह वसंतदादांनी पक्षश्रेष्ठींकडे धरला होता. शरद पवारांनी विश्वासघाताने माझे सरकार पाडले होते, त्यामुळे किमान काही महिने तरी मला मुख्यमंत्री करून माझ्यावर झालेल्या अन्यायाची भरपाई करा, अशी विनंती वसंतदादा इंदिरा गांधींसह अनेक ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांना त्यावेळी वारंवार करीत होते. पण अंतुले यांचे नाव जवळपास नक्की झाले आहे आणि आपल्याला संधी नाही हे लक्षात येताच दादांनी थेट संघर्षांचाच पवित्रा घेतला आणि चर्चगेटच्या रिट्झ हॉटेलला आपल्या राजकीय हालचालींचे केंद्र बनविले. अंतुले यांच्यापेक्षा आपल्यामागे आमदारांचे संख्याबळ अधिक आहे असे दादा तेव्हा ठामपणे सांगायचे. पण शेवटी राज्यातील काँग्रेसमध्ये संघर्षांची कोणतीही ठिणगी पडणार नाही याची काळजी घेत इंदिराजी आणि अन्य काँग्रेस नेत्यांसह राज्यात निवडून आलेल्या काँग्रेसच्या सर्वच आमदारांनी अंतुलेना मुख्यमंत्रीपदाच्या सिंहासनावर विराजमान केले. आणि दादांनी आपल्या संघर्षांच्या दुसऱ्या अंकास प्रारंभ केला. काहीही करून आणि कितीही वेळ लागला तरी अंतुलेंना पदावरून हटवायचेच असा निर्धार त्यांनी केला होता आणि त्यादृष्टीने त्यांची पावलेही पडत होती. यथावकाश अंतुले मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी आपले मंत्रिमंडळही बनविले. ते बनविताना त्यांनी पहिला दणका वसंतदादांनाच दिला होता. त्यावेळी दादांच्या पत्नी शालिनीताई पाटील सांगली मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आल्या होत्या. आपल्या मंत्रिमंडळातील दुसऱ्या क्रमांकाचे महसूल खाते शालिनीताईंनाच देऊन अतुलेंनी थेट दादांनाच शह दिला होता. या नियुक्तीमुळे दादांच्या आपल्या विरुद्धच्या कारवाया थांबतील अशी अंतुलेंची अपेक्षा होती, पण असल्या आमिषांनी भुलण्याएवढे दादा कच्चे राजकीय खिलाडी नव्हते. त्यांनी अंतुलेविरुद्ध अख्खी मराठा लॉबी आणि सगळ्या नाडय़ा आपल्याच हातात असलेली शुगर लॉबी उभी करून अंतुलेंची राजकीय कोंडी करण्याचा जोरदार प्रयत्न सुरू केला. अर्थात, दादांच्या या कारवायांना मंत्रालयात बसून शालिनीताईही पूर्ण साथ देत होत्या. अंतुले यांनी स्थापन केलेले ‘इंदिरा प्रतिभा प्रतिष्ठान’ कमालीचे वादग्रस्त ठरले. अंतुलेंनी इंदिरा गांधींचा रोष ओढवून घेतल्याने त्यांची मुख्यमंत्रीपदाची घटका भरत आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. अंतुले मुख्यमंत्रीपदावरून गेले की ते पद आपल्याला देण्याखेरीज इंदिरा गांधींसमोर पर्यायच नाही अशा स्वप्नरंजनात वसंतदादा होते. पण भल्याभल्यांची स्वप्ने मोडीत काढणाऱ्या इंदिराजींनी दादांच्या स्वप्नाचाही चक्काचूर करून टाकला. त्यांनी अंतुले यांना मुख्यमंत्रीपदावरून एका फटक्यात हलवून श्रीवर्धनला पाठवून दिले, पण वसंतदादांनाही मुख्यमंत्री केले नाही. मुख्यमंत्रीपदासाठी ज्यांच्या नावाची अपेक्षा कधी कुणीच केली नव्हती अशा बाबासाहेब भोसले यांना मोठय़ा ऐटीत मुख्यमंत्रीपदावर बसवून इंदिराजींनी त्यांच्या राजकीय जीवनातील बहुधा पहिला विनोद केला. अर्थात पुढे वर्षभरातच त्यांनी बाबासाहेबांनाही हटवून मगच दादांच्या हाती मुख्यमंत्रीपदाची सूत्रे दिली आणि काँग्रेसच्या राजकारणात आपण घेऊ तेच निर्णय अमलात येतात याची चुणूक दादांना दाखविली.
पुढे वर्षभरातच इंदिरा गांधी यांची अतिरेक्यांनी निर्घृण हत्या केली आणि भारतीय राजकारणावर प्रचंड आघात झाला. काँग्रेस पक्षाची अवस्था तर कुणी वाली नाही अशी झाली.
अल्पावधीतच राजीव गांधी यांनी पंतप्रधान या नात्याने देशाची सूत्रे हाती घेतली आणि त्यांच्यामुळे वसंतदादांना काही काळ अभय मिळाले. दरम्यान १९८४ च्या नोव्हेंबर महिन्यात लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि या निवडणुकांत सर्व देशातच काँग्रेसला देदीप्यमान यश मिळाले. महाराष्ट्रही त्याला अपवाद नव्हता. त्यानंतर १९८५ च्या मार्चमध्येच महाराष्ट्रात झालेल्या विधानसभेच्या निवडणुका काँग्रेसने वसंतदादांच्याच नेतृत्वाखाली लढविल्या.
मात्र या निवडणुकीचे तिकीट वाटप करताना त्यांनी अत्यंत खबरदारी घेतली होती. अंतुलेंच्या काळात मंत्रालयात टर्रेबाजी करीत मिरवणाऱ्यांना त्यांनी उमेदवारीच दिली नव्हती.
चंद्रकांत पाटील, सतीश पेडणेकर, डॉ. ललिता राव आणि डॉ. बळीराम हिरे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनाही त्यांनी तिकीट नाकारले होते. तिकीट मिळविण्यासाठी लॉबिंग करायला दिल्लीला गेलेले बळीराम हिरे परतीच्या प्रवासात वसंतदादांच्या बरोबरच विमानात होते. ते मुद्दाम दादांच्या जवळ जाऊन ‘गांधी फॅमिलीला हिऱ्यांची पारख आहे’ असे टोचून बोलत होते. दादांनी थोडा वेळ काढला आणि विमानाने आकाशात झेप घेताच डॉ. हिऱ्यांना जवळ बोलावून ते म्हणाले, ‘बळीरामजी, यावेळी राजीवजींनी हिऱ्यांची पारख करायला मला सांगितले होते. आणि माझ्या परीक्षेत तुम्ही नापास झाल्याने तुम्हाला उमेदवारी दिलेली नाही.’ दादांचे हे उद्गार ऐकून डॉ. हिरे यांना क्षणभर स्वत:चाच इतका राग आला की दादांच्या खांद्यावर हात ठेवून ‘काका, मला वाचवा’च्या स्टाइलवर ‘दादा, मला वाचवा’चा आग्रह धरला. त्यावर ‘आता मी काहीच करू शकत नाही आणि विमान हवेत असल्यामुळे तुम्हीही काही करू शकणार नाही. तेव्हा मुंबईत उतरल्यावर दिल्लीत श्रेष्ठींशी संपर्क साधून ‘तिकिटाचे काही होतेय का ते पाहा’, असा सल्ला दादांनी हिरे यांना दिला. मुंबईत उतरल्यावर हिरे यांनी खूप धावपळ केली, पण शेवटपर्यंत त्यांना फारशी कुणी दाद दिली नाही. शेवटी दाभाडी मतदारसंघात त्यांनी कसेबसे पत्नी इंदिराताई यांना उमेदवारी मिळेल असे प्रयत्न केले. पण निवडणुकीत इंदिराताईंचा पराभव होईल याची ‘व्यवस्था’ पुन्हा दादांनीच केली. इंदिराताईंच्या जाऊबाई पुष्पाताई हिरे यांना शरद पवारांच्या एस. काँग्रेसकडून तिकीट घ्यायला लावून त्यांना विजयी करण्याचा यशस्वी डाव दादा खेळले, पण डॉ. हिरे यांचा काटा त्यांनी काढलाच. १९८५ च्या त्या निवडणुकीत काँग्रेसला पूर्ण बहुमताने विजय मिळाला आणि मुख्यमंत्रीपदाची माळ साहजिकच दादांच्या गळ्यात पडली आणि दादांचे मुख्यंमत्रीपदाचे चौथे पर्व सुरू झाले, पण ते अगदीच अल्पजीवी ठरले. हे मुख्यमंत्रीपद मिळाल्यानंतर त्याच दरम्यान पक्षश्रेष्ठींनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ काँग्रेस नेत्या प्रभा राव यांची नियुक्ती केली. ‘राव यांची नियुक्ती आपणास अजिबात मान्य नाही. त्यांना हे पद देताना आपल्याला साधा सल्लाही विचारण्यात आलेला नाही. त्यामुळे त्यांना पदावरून दूर न केल्यास आपण मुख्यमंत्रीपदाचाच राजीनामा देऊ, मी मुख्यमंत्रीपदी राहावं असं वाटत असेल तर प्रदेशाध्यक्षही माझ्या मर्जीनेच नियुक्त करावा, अन्यथा मला माझ्या जबाबदारीतून मुक्त करा’, असे साकडे दादांनी थेट पंतप्रधान आणि पक्षाचे अ. भा. अध्यक्ष राजीव गांधी यांनाच घातले आणि प्रभा राव यांना हटविण्यासाठी आपली सारी प्रतिष्ठा पणाला लावली. अखेर राजीव गांधी यांनी दादांना मुख्यमंत्रीपदाच्या जबाबदारीतून मुक्त केले आणि त्यांना योग्य वाटल्यास स्वीकारण्यासाठी राजस्थानच्या राज्यपालपदाचा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवला. राज्यपाल म्हणून राजस्थानच्या वाळवंटात जाऊन राहायचे की पुन्हा एकदा राजकीय निवृत्ती स्वीकारून सांगलीला जाऊन राहायचे अशा कोंडीत दादा सापडले. अखेर नाइलाज म्हणून राजस्थानला जाण्यास त्यांनी मान्यता दिली.
प्रभा राव यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करताना दादांना काहीही न विचारणाऱ्या पक्षश्रेष्ठींनी नवे मुख्यमंत्री नियुक्त करताना मात्र दादांचा शब्द अंतिम राहील असे जाहीर केले आणि स्वत: राजीव गांधींनीच त्याबाबत दादांकडे विचारणा केली. त्यावर ‘मराठवाडय़ातील नेते आणि आपले कट्टर समर्थक शिवाजीराव पाटील- निलंगेकर यांची मुख्यमंत्रीपदी निवड केल्यास आपली कसलीही हरकत राहणार नाही, उलट त्यांना लागेल ते सर्व सहकार्यही आपण देऊ’, असे राजीव गांधी यांच्याकडे स्पष्ट केले आणि राजीवजींनीही दादांचा शब्द प्रमाण मानून निलंगेकर यांना मुख्यमंत्रीपदावर विराजमान केले.
निलंगेकर मुख्यमंत्री झाले पण ते साधे आमदारही नव्हते, त्यामुळे त्यांची नियुक्ती वादात सापडली. अखेर निलंगा मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आलेले त्यांचे चिरंजीव दिलीप पाटील यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि तेथून निवडणूक लढवून शिवाजीराव विधानसभेवर निवडून यावे असा उपाय दादांनीच काढला आणि निलंगेकरांना मुख्यमंत्री बनवून मगच त्यांनी राजस्थानला प्रयाण केले. लौकिकार्थाने वसंतदादांचे महाराष्ट्रातील सत्तेचे राजकारण इथेच संपले. त्यानंतरही ते अधूनमधून आपण शेतकरी संघटनेची स्थापना करणार असल्याच्या घोषणा करायचे पण त्याला फारसा अर्थ नव्हता. दादामध्ये ती ताकदच उरली नव्हती, हे खेदाने नमूद करावे लागेल.
सत्तेच्या राजकारणाची दादांना फारशी हौस कधीच नव्हती. काँग्रेसच्या संघटनाबांधणीवरच प्रारंभीच्या काळात त्यांनी आपले सारे लक्ष केंद्रित केले होते. त्यामुळे दादांच्या संपर्कात येणारी व्यक्ती त्यांच्यामुळे त्यांची आणि काँग्रेसची होऊन जात असे. राजकारणात कुणाला कधी अंगावर घ्यायचे आणि कुणाला पाठ दाखवायची याचे आडाखे दादांच्या डोक्यात तयार असत. यशवंतराव चव्हाण यांनी सातत्याने बेरजेचे राजकारण केले तर संघटनकौशल्य हा दादांचा सर्वात मोठा गुण होता. राजकारणाला अनेक पदर असतात. त्यात किंचितसे मतभेदही असतात, त्यामुळे प्रतिष्ठा पणाला लावण्याचे काही प्रसंगही दादांवर आले. १९७८ च्या विधानसभा निवडणुकीत वाळवा मतदारसंघात (सध्याचा इस्लामपूर) जनता पक्षातर्फे मातब्बर नेते राजारामबापू पाटील मैदानात उतरले तेव्हा तत्कालिन रेड्डी काँग्रेसतर्फे अनेक वर्षे बापूंचे पट्टशिष्य असलेल्या विलासराव शिंदे यांना बापूंच्या विरोधात रिंगणात उतरविण्याची खेळी दादा खेळले. त्या निवडणुकीत विलासरावांचे डिपॉझिटही जप्त होईल अशी भविष्यवाणी अनेक राजकीय पंडितांनी वर्तविली असताना दादांनी इस्लामपुरात जाऊन फक्त कार्यकर्त्यांचा एक मेळावा घेतला आणि ‘काहीही करा पण बापू विधानसभेत दिसता कामा नयेत हे लक्षात ठेवा’, असा आदेशच वाळवा तालुक्यातील काँग्रेसजनांना दिला. तालुक्यातील नेत्यांनीही मग बापूंच्या पराभवासाठी जंग जंग पछाडले, आपल्या इस्टेटीही पणाला लावल्या आणि बापूंचा पराभव घडवून आणून विलासरावांच्या विजयाची भेट दादांना दिली. दुसरा प्रसंग सांगता येईल तो १९८० सालच्या लोकसभा निवडणुकीचा. त्या निवडणुकीत सातारा लोकसभा मतदारसंघात यशवंतराव चव्हाणांच्या विरुद्ध आपली पत्नी शालिनीताई पाटील यांना लढवून त्यांच्या विजयासाठी दादांनी आपली सारी प्रतिष्ठा पणाला लावली. अर्थात यशवंतरावांचे आव्हान स्वीकारणे अवघड आहे याची कल्पना स्वत: दादांनाही होती आणि घडलेही तसेच. शालिनीताईंचा पराभव करून यशवंतराव निवडून आले, पण त्यांना नेहमी मिळणारे मताधिक्य विचार करायला लावण्याइतपत खाली आणण्यात दादा यशस्वी झाले. त्यामुळेच असेल पण, ‘हा माझा पराभवच आहे’ अशी कबुली खुद्द यशवंतरावांनाही द्यावी लागील होती. दादांचे संघटनकौशल्य असे वादातीत होते. सहकार क्षेत्रात तर दादांचा प्रत्येक शब्द अंतिम मानला जात असे. भारतातील सर्वात मोठा सहकारी साखर कारखाना त्यांनी सांगली जिल्ह्य़ात माधवनगर परिसरात उभारला. या कारखान्याच्या उभारणीसाठी या नेत्याने अक्षरश: मैलोन्मैल भटकंती केली. शेताच्या वावरातील बांधावर उभे राहून उसाच्या लागवडीपासून कापणीपर्यंत शेतकऱ्यांना सातत्याने मार्गदर्शन केले. केवळ साखर कारखाने उभारून थांबू नका तर त्या जोडीने पूरक उद्योगांचीही स्थापना करा हा दादांचा आग्रह असे. त्यामुळे साखर कारखान्यांच्या आजूबाजूलाच सहकारी बँका, पतसंस्था, छोटे-मोठे दूधसंघ यांची उभारणी झाल्याचे अनेक ठिकाणी हमखास पाहायला मिळायचे. त्यातून शेतकऱ्यांना कर्जपुरवठा व्हायचा. या कर्जातून मोठमोठय़ा जर्सी गायी- म्हशी शेतकऱ्यांच्या दारात झुलताना दिसू लागल्या. त्यातून झालेली दूधनिर्मिती सहकारी दूध संघाकडून खरेदी केली जायची. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात रोख पैसा खेळू लागला आणि ग्रामीण महाराष्ट्रात स्वत:ची अशी एक स्वतंत्र अर्थव्यवस्थाच निर्माण झाली. दादांनी स्थापन केलेल्या शेतकरी सहकारी साखर कारखान्याकडून प्रोत्साहन घेऊन मग महाराष्ट्रात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या नेत्यांनी सहकारी साखर कारखान्यांची स्थापना केली. पूर्वी कोणत्याही कार्यक्रमासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसला मुंबई प्रदेश काँग्रेसकडे हात पसरावे लागत. सहकाराच्या जोरावर दादांनी महाराष्ट्र काँग्रेसलाही आर्थिकदृष्टय़ा सक्षम बनवून टाकले.
दादा स्वत: फारसे शिकलेले नव्हते, पण १९८३ साली मुख्यमंत्री या नात्याने त्यांनी विनाअनुदान तत्त्वावर अभियांत्रिकी आणि वैद्यकीय महाविद्यालयांना परवानगी देऊन महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात एक वेगळ्या पद्धतीची आमूलाग्र क्रांती घडवून आणली. महाराष्ट्रातील मुलांना अन्य कोणत्याही राज्यात जाऊन उच्च शिक्षणासाठी हात पसरावे लागू नयेत यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला होता. आज कर्नाटक, तामिळनाडूपासून पंजाबपर्यंत अनेक राज्यांतील विद्यार्थी महाराष्ट्रातील ग्रामीण भागात उभारण्यात आलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयांत शिकताना पाहिले की वसंतदादा हे नाव अभिमानाने मिरवावे असेच प्रत्येक मराठी माणसाला वाटेल.
नेते आणि कार्यकर्ते, सहकार आणि शिक्षण क्षेत्रात समर्पित भावनेने काम करणारी मंडळी आणि सर्वसामान्य जनता यांच्या मनात वंसतदादांबद्दल घरातील ज्येष्ठ कर्त्यां पुरुषाइतकीच श्रद्धा होती. ‘दादा’ नावाचे हे प्रेमळ पर्व १ मार्च १९८९ रोजी काळाच्या पडद्याआड गेले आणि उभ्या महाराष्ट्राचा खंदा आधारच हरपला.

जन्म : १३ नोव्हेंबर १९१७
(पदमाळे, तासगाव जि. सांगली)
मृत्यू : १ मार्च १९८९.
भूषविलेली अन्य पदे
१९५२ ते १९८० सहा वेळा आमदार ’ १९७२ मध्ये पहिल्यांदा मंत्री. पाटबंधारे आणि ऊर्जा खाती.
राज्य सहकारी बँकेचे अध्यक्षपद ’ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष.
अ.भा.काँग्रेसचे सरचिटणीस ’ राजस्थानचे राज्यपाल.
राजकीय वारसदार
पत्नी शालीनीताई पाटील या माजी मंत्री, खासदार तसेच आमदार.
पूत्र प्रकाशबापू पाटील हे माजी खासदार ’ पुतणे विष्णूअण्णा पाटील हे माजी मंत्री ’ नातू मदन पाटील हे माजी मंत्री.
नातू प्रतिक पाटील हे सध्या केंद्रात क्रीडा व युवक कल्याण या खात्याचे राज्यमंत्री.
मुख्यमंत्रीपदाचा कालावधी:
१७ एप्रिल १९७७ ते ६ मार्च १९७८
७ मार्च १९७८ ते १८ जुलै १९७८
२ फेब्रुवारी १९८३ ते २ जून १९८५
पक्ष : काँग्रेस
पहिल्यांदा आमदार १९५२ मध्ये तासगाव मतदारसंघ.
सुरेंद्र हसमनीस,
लोकसत्ता दिवाळी अंक २०१०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल