MONDAY, DECEMBER 20, 2010
मारोतराव कन्नमवार (महाराष्ट्रातील माजी मुख्यमंत्री)
साहिब और साहिबान, दिल्ली यकिनन
ना-मेहरेबाने शहर है।
अशा या ‘निर्दय नगरी’ची मेहरेनजर आपल्याकडे वळावी आणि स्थिरावी, यासाठी भारतीय लोकजीवनातील सर्व घटक किती आतुर असतात, कसे दबा धरून बसतात आणि कशी ‘हिरनकूद’ मारतात, हे काय सांगावे! पण, या राजधानीला दयेचा पाझर तेव्हाच फुटतो जेव्हा तिचे कुठे काही अडले असेल! लोकमान्य टिळकांनी हे सत्य अचूक हेरले होते म्हणून ते म्हणायचे, ‘दिल्लीच्या गरजा येती आमच्या काजा.’
अशीच कुठली तरी गरज दिल्ली दरबारी निकडीची ठरली आणि महाराष्ट्र स्थापनेचा, १ मे १९६० हा मुहूर्त पक्का झाला पण, तो क्षण उगवता उगवता रक्ताचे अक्षरश: पाणी पाणी झाले होते. ऊर फाटून गेला होता. जीव अनेकदा अधांतरी टांगला गेला होता.
अशाच एका अधांतरी क्षणी तत्कालीन मुंबई राज्यातील (१९५५ च्या सुमारास) मराठी आमदार, खासदार आणि मंत्री यांनी आपल्या पदांचे राजीनामे पंतप्रधानांना, एकत्र सामूहिकरीतीने सादर करावयाचे ठरवले. त्यात एक आमदार आणि एक खासदार निरनिराळ्या कारणावरून सामील नव्हते. आमदार म्हणाले, ‘तुम्ही जेव्हा पंडितजींच्या हाती तुमचे राजीनामे द्याल, त्याचवेळी मी माझा राजीनामा त्यांच्या हाती देईन.’ ते सर्वाबरोबर पंडितजींच्या भेटीला गेले होते.
खासदार म्हणाले, ‘मी तुमच्या बरोबर येणे, नेहरूंशी माझे जे संबंध आहेत त्याशी अनुचित होईल. तुम्ही नेहरूंना भेटाल त्या क्षणी माझा राजीनामा त्यांच्या हातात राहील, अशी व्यवस्था करतो’ तशी व्यवस्था झाली होती.
पण, त्या निर्दयी दरबाराने मराठी आमदार-खासदारांचे राजीनामे स्वीकारले नाहीत. इतकेच नव्हे तर, त्याकडे ढुंकूनदेखील पाहिले नाही पण, खासदाराचा राजीनामा पंडितजींच्या हाती पोहोचला होता आणि तो त्यांनी परत घेण्याचे निश्चयाने नाकारले. आमदाराने पंडितजींचा, मोठय़ा हुशारीने एकटय़ानेच निरोप घेतला. म्हणाला, ‘पंडितजी आपण माझ्या जागी असता तर काय केले असते?’
पंडितजी त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले, ‘नेत्यावर विश्वास ठेवला असता.’
आता पहा काळाचा महिमा.
खासदाराने संसद भवनात लोकसभा सभागृहात मंत्रिपदाच्या राजीनाम्याचे कारण सांगताना ‘येथे महाराष्ट्राविषयी आकसच आहे’ असा घणाघाती घाव घातला आणि संपूर्ण भारत सरकारचे आसनच डळमळीत झाले. ते मी प्रत्यक्ष पाहिले आहे. मग काय, ‘स्वतंत्र मुंबई’ची योजना बुडाली अरबी समुद्रात-अगदी तात्काळ! विदर्भाचे वेगळे राज्य फाजल अली कमिशनच्या दप्तरातून बाहेर आलेच नाही! संयुक्त महाराष्ट्र आणि महागुजरात या दोन्ही ‘मागण्या’ बस्त्यात बांधल्या गेल्या. उलट, सर्व मराठी आणि सर्व गुजराती लोकांना एकत्र बांधणारे ‘महाद्विभाषिक राज्य’ निर्माण झाले.
भारत सरकार संसदेला शरण गेले! हे पूर्वी कधी घडले नव्हते आणि नंतर, आजवर, कधीही घडलेले नाही!
पण, काळाचा महिमा पुढे असा की, या सर्व पेचप्रसंगातून एका आमदाराचा (यशवंतराव चव्हाण यांचा) ‘भाग्योदय’ झाला आणि एका खासदाराचा ( चिंतामणराव देशमुख यांचा) ‘सत्ताऱ्हास’ झाला! त्यांची सर्व सत्ता पणाला लागली.
००००
या महाद्विभाषिकाचे राज्यपाल म्हणून श्रीश्रीप्रकाश हे १९५६ ते १९६० या कालखंडात मुंबईच्या राजभवनाचे रहिवासी होते. त्यांच्याऐवजी कोणी दुसरा महापुरुष राज्यपाल झाला असता तर काय झाले असते, हे सांगणे कठीण आहे. पण, श्रीप्रकाश असल्यामुळे काय झाले ते सांगतो.
त्याचे असे झाले.
विनोबाजींच्या भारतव्यापी पदयात्रेत त्यांचे पाय ज्या ठिकाणी मराठी भूमीवर पडणार होते, त्याच ठिकाणी त्यांना गाठून संयुक्त महाराष्ट्रासाठी त्यांचा पाठिंबा मिळवायचा, असा मनसुबा होऊन संयुक्त महाराष्ट्र समितीचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ श्रीधर महादेव यांच्या (एस.एम. जोशी यांच्या) नेतृत्वाखाली तेथे पोहोचले. आचार्य विनोबाजी हे फार दूरगामी विचार करत होते. ‘भाषिक राष्ट्रवादा’चा सिद्धांत मुळातच त्यांना अमान्य होता. म्हणून या शिष्टमंडळाला त्यांनी विचारले, ‘तुमची मागणी अखेर फेटाळली गेली तर तुम्ही काय कराल? देशातून फुटून निघाल?’ या अनपेक्षित प्रश्नाने सर्वजण सुन्नच झाले पण, क्षणात आपला हजरजबाबीपणा शाबूत ठेवीत ‘एस.एम.’ म्हणाले, ‘हो. फुटून निघू.’
झाले. बैठक संपली. विनोबाजींनी सर्वाना बसल्या जागीच निरोपाचा नमस्कार केला.
हा प्रकार नेमका काय घडला, हे जाणून घेण्यासाठी श्रीप्रकाश यांनी मला बोलावून घेतले. ( त्यांची माझी मध्यप्रदेशच्या काळातच चांगली दाट ओळख झाली होती. महिना दीड महिन्याने कधीतरी त्यांचा निरोप आला की, मी त्यांच्या भेटीस जात असे.) मी म्हणालो, ‘जे आपल्याला कळले आहे ते सर्व खरे आहे. ( मी विनोबाजी- एस.एम.भेटीच्या वेळी तेथेच होतो.)
ते म्हणाले, ‘हे घडू शकेल? तुम्हाला काय वाटते?’
मी म्हणालो, ‘आज तर तसे वाटत नाही. कारण, प्रश्नाचे अंतिम उत्तर मिळायचे आहे. ते जर अन्यायकारक असेल तर काहीही होऊ शकते. कारण, अशा फुटीरपणाचा फायदा घ्यायला जगातील अधिसत्ता उत्सुकच आहेत.’
आणि त्या दिवशी मी नि:शब्द होऊन परतलो.
पुढे त्यांची माझी अशीच दोनदा भेट झाली पण, हा विषय मी काढला नाही, पण एके दिवशी अचानक त्यांचे बोलावणे आले म्हणून गेलो. चहा होईपर्यंत इतरच गोष्टी झाल्या, पण मी निरोप घ्यायला उठलो तर मला म्हणाले, ‘इट इज नॉट अ डय़ुरेबल कमॉडिटी!’
(हे द्विभाषिक काही टिकाऊ संस्थान नाही !)
राज्यपालांनी असा निर्वाळा अचानकपणे माझ्या माथी मारल्यामुळे माझे विचारचक्र वेगाने धावू लागले. याचा अर्थ उघड उघड ‘हे द्विभाषिक मोडीत काढा’ असाच होत होता- आणि हा सल्ला ते फक्त भारत सरकारलाच देऊ शकतात! अवघ्या पाच-सात मिनिटात माझ्या अंत:करणात लख्ख प्रकाश पडला.
मी राजभवनातून पायीच ‘सह्य़ाद्री’कडे पोहोचलो पण, यशवंतराव आलेले नव्हते. म्हणून तसाच पुढे वानखेडेंच्या बंगल्यावर पोहोचलो. ते नुकतेच आले होते. म्हणाले, ‘बस, मी तोंड धुऊन येतो. मग चहा पिऊ.’
चहा पिता पिता मी सहजपणे म्हणालो, ‘मला असं कळलंय की, हे राज्य फार काळ टिकू शकणार नाही, असा राज्यपालांचा ‘रिपोर्ट’ दिल्लीला गेला आहे.’
‘तू म्हणतोस म्हणून विश्वास ठेवतो, पण त्या थेरडय़ाला काय कळते? त्याचा रिपोर्ट केराच्या टोपलीत गेला असेल,’ वानखेडे म्हणाले.
इकड-तिकडच्या गोष्टी करत तिथे अर्धा तास घालवला आणि पुन्हा सह्य़ाद्रीवर पोहोचलो.
चारपाच जणांशी बोलल्यावर यशवंतराव म्हणाले, ‘बोल आता’
मी वानखेडे यांना जेवढे सांगितले तेवढेच त्यांनाही सांगितले.
दोन चार मिनिटे स्तब्ध राहून ते मला म्हणाले, ‘मला हे खरं वाटत नाही पण, म्हातारा फार घाग आहे. तुझी बातमी कुठची?
मी म्हणालो, ‘दिल्लीची.’
त्यावर म्हणाले, ‘मी अंदाज घेतो. नंतर बोलू’
आठ दिवसांनी यशवंतरावांनी सांगितले की, ‘तुझी बातमी खरी आहे पण, ती ‘माय डिअर जवाहर’ आणि ‘युवर्स श्रीप्रकाश’ अशा खाजगी स्वरूपातली आहे! काही लक्ष देऊ नकोस. द्विभाषिक आणखी दहा वर्षे तरी चांगले चालेल.’
नंतर, दिल्लीतून वेगाने घटना घडू लागल्या. इंदिराजींचा महाराष्ट्र दौरा (पश्चिम महाराष्ट्र) ठरला आणि पार पडला यशस्वीपणे. महाराष्ट्र झाला तर काँग्रेसला पुन्हा बरे दिवस येतील, असे वातावरण दिल्लीत तयार झाले.
श्रीप्रकाश हे विनोबा-एस.एम. संवादामुळे अस्वस्थ झालेले मी पाहिले म्हणून मी सावध झालो. श्रीप्रकाश हे जर राज्यपाल नसते, तर विनोबांनी भाषिक राष्ट्रवादाचा जो धसका घेतला होता तो त्या दुसऱ्या राज्यपालाला तेवढा जिव्हारी लागला असता का? अनेकदा मला असे वाटत आले आहे की, श्रीप्रकाशांच्या अभावी मुंबई-महाराष्ट्रातील परिस्थिती विकोपाला गेली असती, चिघळली असती आणि कदाचित भारतीय उपखंडातील पहिला शेख मुजिब्बर रहमान होण्याचा मान एस.एम. जोशींच्या गळ्यात पडला असता!
हे कपोलकल्पित नाही. त्यास वास्तवाचा आधार आहे. आज तो सांगूनच टाकतो.
००००
गोवा प्रदेश काँग्रेसची पुनर्घटना करण्यासाठी, सर्वसंमतीची घडण करण्यासाठी, दिल्लीहून एआयसीसीने शिवशंकर यांना ‘प्रशासक’ म्हणून नियुक्त केले होते. मी त्यांचा अधिकृत सहाय्यक म्हणून गोव्यात जवळजवळ सहा महिने वावरत होतो. या कामात त्यांची मदत करताना साळगावकर, बांदोडकर, ढेपे आदी उद्योगपतींचे सहकार्यही मिळवावे लागले होते. अखेरीस भाऊसाहेब बांदोडकर यांनी सुचवलेल्या काटकारबाईंच्या नावावर मतैक्य झाले! या सर्व गडबडीत एके दिवशी भाऊसाहेब बांदोडकर म्हणाले, ‘उद्या आहे मंगळवार. मंगेशीला पोहोचा. दुपारी दोननंतर जेवू आणि बोलू.’
जेवण झाल्यावर भाऊसाहेब म्हणाले, ‘जरा फिरून येऊ’ चारच वाजले होते.
थोडी झाडी पाहून आडोसा बरा आहे, असे योजून एका दगडावर भाऊसाहेब बसले आणि दुसऱ्या दगडाकडे बोट करून म्हणाले, ‘बसा’ दोन दगडांमध्ये दोन फुटांचेदेखील अंतर नव्हते.
जवळजवळ अर्धा तास ते फक्त मलाच ऐकू येईल, अशा हळू आवाजात रशियन सरकारच्या गोव्यातील कूटनीतीची माहिती मला देत होते. शेवटी ते म्हणाले, ‘आठ दिवसांपूर्वी रशियन राजदूत पोपोव येथे आले होते. मी त्यांना जेवायला बोलवावे, असा सल्ला मला मोठय़ा हुशारीने, भारतीय परराष्ट्र खात्यामार्फतच देण्यात आला होता. आमचा जेवणाचा कार्यक्रम चाळीस पन्नास मिनिटे चालला. त्यात त्यांनी आश्वासन दिले. आपण होऊन की, ‘गोवा हे हिंदूराष्ट्र म्हणून जाहीर करा आणि भारतातून स्वतंत्र व्हा, आम्ही सर्व मदत तुम्हाला करू. तुम्ही पुढाकार घ्या. ‘आता हे मला फक्त इंदिराजींच्या कानावर घालायचे आहे, म्हणून तुम्हाला बोलावून घेतले. इंदिराजींना म्हणावं त्यांनी परराष्ट्र खात्यात कोणाशीही ही गोष्ट बोलू नये.’
मी हा निरोप इंदिराजींना पोहोचवला. त्यांनी तो अन्य कोणालाही सांगितला नाही आणि मी तर नाहीच नाही. आज ते गौप्य उघड केले आहे.
ही घटना आहे १९७२ च्या नोव्हेंबर-डिसेंबरमधील. इंदिराजींनी आणीबाणीचा जो कठोर निर्णय केला. त्यास जी प्रमुख कारणे होती, त्यातील एक कारण हे होते.
सारांश काय, तर महाराष्ट्राने मुंबईसह भारतातून फुटून निघावे, अशी योजना करण्यात आंतरराष्ट्रीय राजकारणाचा डाव पडलाच नसता, असे म्हणता येत नाही!
००००
मानवी जीवनाचे एक नाटय़पूर्ण, कधी विलोभनीय तर कधी शोकग्रस्त, असे एक अविभाज्य अंग म्हणजे त्याची नियती बहुधा अनपेक्षित तेच घडवीत असते. कोणाला माहीत होते चीनचा हल्ला १९६२ साली होणार आहे! पण, ते घडले आणि यशवंतरावांना संरक्षणमंत्री म्हणून दिल्लीस पाचारण करण्यात आले. त्यांच्या जागी मुख्यमंत्री म्हणून वसंतराव नाईक यांचे नाव निश्चित झाले. उद्या शपथविधीला कोणत्या रंगाचा सूट घालावा, याचा निर्णय ‘वर्षां’ बंगल्यावर होत असताना मीही त्यात सहभागी होतो. ते सर्व आटोपून तोंड गोड करून मी नऊ-साडेनऊच्या सुमारास कन्नमवारजींच्या बंगल्यावर पोहोचलो.
ते जेवणासाठी माझी वाटच पाहात होते. जेवण झाल्यावर म्हणाले, ‘मला मिळालेल्या आश्वासनाचा सर्वानाच विसर पडला आहे. तुम्हाला पण!’
मी पटकन दिल्लीला शास्त्रीजींकडे फोन लावला. मी मुंबईहून कन्नमवारजींच्या निवासस्थानावरून बोलतो आहे. ‘मला शास्त्रीजींशी ‘र्अजटली’ बोलायचे आहे’ असे सांगितले. थोडय़ा वेळाने फोन आला आणि शास्त्रीजी म्हणाले, ‘क्या बात है?’
मी- ‘कन्नमवारजी को आपने आश्वस्त किया था की, चव्हाणजी के बाद आपकोही मुख्यमंत्री बनाएंगे’
शास्त्रीजी- ‘अच्छा हुआ आप ने याद दिलाया. दस मिनिटमें फिर बोलता हूँ।’
दहा मिनिटांनी फोन खणाणला. मी उचलला. तिकडून शास्त्रीजी म्हणाले, ‘कन्नमवारजी को फोन दिजिए’
कन्नमवारजी- ‘प्रणाम शास्त्रीजी.’
शास्त्रीजी- ‘अभिनंदन! कल शपथ आप लेंगे!’
कन्नमवारजी- ‘मैं आपका बहुत ऋणी हूँ।’
शास्त्रीजी- (मला) ‘आप को धन्यवाद! याद नहीं दिलाते तो हमारे हाथ से अन्याय हो जाता!’
हे आश्वासन खुद्द पं. गोविंद वल्लभ पंत यांनी महाराष्ट्र निर्मितीच्या प्रसंगी दिले होते. त्यावेळी शास्त्रीजींच्या समवेत मीही उपस्थित होतो पण, कन्नमवार यांचे राजकीय चातुर्य हे की, त्यांचे नाव पक्के होईपर्यंत आणि मी भेटेपर्यंत त्यांनी एक चकार शब्द कुठे काढला नाही आणि अशा रीतीने ती आठवण दिल्यावर ऐनवेळी शेवटच्या क्षणी, सर्व काही बदलून गेले.
कन्नमवारजींची ही राजकीय धुरीणता महाराष्ट्राला आणि यशवंतरावांना मुळातच माहीत नव्हती. मोठय़ा द्विभाषिकात असताना कन्नमवारांना न विचारता न सांगता यशवंतरावांनी चांदा, भंडारा, वर्धा, नागपूर येथील कलेक्टर आणि डी.एस.पी.च्या बदल्या केल्या. कन्नमवार काहीच बोलले नाहीत. आठ-दहा दिवसांनी मला म्हणाले, ‘चला माझ्याबरोबर.’
सतत पाच दिवस सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्य़ांचा दौरा करून झाल्यावर साताऱ्यात थांबले. यशवंतरावांच्या मर्जीत नसलेल्या अनेक कार्यकर्त्यांना भेटले. त्यांच्याकडून माहिती घेतली आणि यशवंतरावांच्या विश्वासातील तहसील डॉक्टरांच्या बदल्या करून टाकल्या.
त्यानंतर कन्नमवारांना विचारल्याशिवाय एकही बदली यशवंतरावांनी विदर्भात केली नाही.
असाच एक गमतीचा किस्सा ते मुख्यमंत्री होते, त्यावेळचा सांगण्याजोगा आहे.
प्रश्न होता, मुंबई विद्यापीठाचा कुलगुरू नियुक्त करण्याचा. दिल्लीला येताना एका भेटीत ते ती फाईल घेऊन आले. यशवंतरावांचा सल्ला घ्यायला म्हणून. त्या फाईलवर एकच नाव होते- डॉ.आर.व्ही. साठे!
यशवंतरावांपुढे फाईल ठेवली तर ते म्हणाले, ‘डॉ. साठे फार सज्जन गृहस्थ आहेत. ते काही अशा उपद्व्यापात पडणार नाहीत. आपण दुसरे नाव शोधा.’
त्यावर कन्नमवारजी म्हणाले, ‘त्यांचे माझे बोलणे झाले आहे. ते तयार आहेत.’
यशवंतराव निरुत्तर!
राजकीय डावपेचात कन्नमवार कोणापेक्षाही कमी नव्हते. सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्यांशी ते प्राप्त परिस्थिती विषयी उपस्थित प्रश्नांविषयी, संभाव्य संकटाविषयी आदराने चर्चा करत. त्यामुळे कुठल्याही कलेक्टरपेक्षा त्या त्या जिल्ह्य़ाची अधिक माहिती त्यांना असे.
द्विभाषिक अस्तित्वात आल्यानंतर विदर्भाचे पहिले कमिशनर म्हणून लक्ष्मणराव राजवाडे (आयसीएस) यांची नेमणूक झाली. ते जवळ जवळ एक महिनाभर कन्नमवारांना मंत्री असतानाही भेटलेच नाहीत. मी त्यांना म्हणालो, ‘हे बरोबर नाही. कसेही असले तरी ते पुढारी व मंत्री आहेत.’
राजवाडे रागाने लाल झाले होते.
पुढे एके दिवशी कन्नमवारजी मुक्कामाला नागपुरात होते. बरोबर १० वाजता ते कमिशनर ऑफिसमध्ये राजवाडे यांच्या खोलीसमोर उभे झाले. चपराशी धावत आत गेला आणि सांगितले. ते म्हणाले, ‘येऊ देत.’
कन्नमवाराजी आत गेले आणि राजवाडे यांच्या टेबलापाशी जात म्हणाले, ‘महंमद येत नाही तर नाही. आता हिमालयच महंमदाच्या भेटीस आला आहे.’
लक्ष्मणराव राजवाडे तात्काळ उभे झाले आणि म्हणाले, ‘माफ करा. येणारच होतो भेटीला पण, योग जुळत नव्हता. आपण आलात चांगले झाले.’
नंतर फार तर सहाच महिने ते कमिशनर म्हणून विदर्भात होते पण, त्या अल्पावधीत त्यांच्याकडून नंतर कन्नमवारांचा उपमर्द कधीच झाला नाही.
पण, कन्नमवारांच्या राजकीय कर्तृत्वाची खूण म्हणजे त्यांनी कोल्हापूर जिल्ह्य़ात रत्नाप्पा कुंभार यांच्या पाठीशी शक्ती उभी केली. कन्नमवार एकाच वर्षांत गेले पण, रत्नाप्पांच्या पाठीशी जी शक्ती त्यांनी उभी केली ती रत्नाप्पांना पुढील तीस वर्षे बळ देत राहिली.
कन्नमवारजी गेले त्यावेळी मी दिल्लीत होतो. त्यांच्या अंत्ययात्रेला मी पोहोचू शकत नव्हतो पण, त्या दोन-तीन दिवसात ‘कन्नमवारांच्या नंतर कोण’ म्हणून तर्कवितर्क होत होते. अण्णासाहेब शिंदे तेथे राज्यमंत्री होते. ते मला म्हणाले, ‘तुम्ही पंडितजींना माझे नाव द्या. तुम्ही सपोर्ट केला तर मी मुख्यमंत्री होतो.’
मी म्हणालो, ‘निर्णय केव्हाच झाला असेल पण, तरीही गुंजाईश असेल तर मी बोलेन’ दुसरे मुख्यमंत्री पदाचे इच्छुक होते शंकररावजी मोरे. म्हणाले, ‘महेशराव आता माझे काय राहिले आहे. तुम्ही पंडितजींना सांगाल तर ते नक्की ऐकतील.’
मी हसलो आणि म्हणालो, ‘मी स्वत:ला एवढा मोठा समजत नाही.’
कन्नमवारजींच्या नंतर ‘कोण’ हा प्रश्नच नव्हता. ज्यांच्या नावाला त्यांनी ‘खो’ दिला होता, ते वसंतराव नाईक प्रथमपासूनच पंडितजींची निवड होती. कुठेही चर्चा न होता, यशवंतरावांशीही न बोलता, वसंतरावांचे मुख्यमंत्रीपद ठरून गेले होते.
००००
यशवंतराव आणि दिल्ली यांचा १९५४ ते १९७४ असा घनिष्ठ संबंधाचा काळ. त्यातील पहिली दहा वर्षे कन्नमवारांच्या सहवासाची आणि दुसरी दहा वर्षे वसंतराव नाईकांच्या सहवासाची. म्हणजे, दिल्ली-यशवंतराव-कन्नमवार असा तरी त्रिकोण होता किंवा यशवंतराव-दिल्ली-वसंतराव नाईक असा तरी त्रिकोण होता पण, हा ‘दिल्ली-पं.महाराष्ट्र-विदर्भ’ राजकीय समन्वय याच वीस वर्षांत महाराष्ट्राच्या समाजजीवनातून, कापूर उडून जावा, तसा उडून गेला. त्याची जागा जातीय समन्वयाने याच वीस वर्षांत भरून काढली. महाराष्ट्रातील प्रत्येक लहान मोठी जात आपापले महाराष्ट्रव्यापी संघटन करून मोकळी झाली. मराठा, माळी, तेली, ब्राह्मण आदी जाती विभागीय मर्यादेतून मुक्त झाल्या आणि आता तर जागतिक पातळीवर आपापले सामथ्र्य सिद्ध करत आहेत. यात दिल्लीशी कोणाचाच ‘कोण’ होऊ शकत नसल्याने जुन्या त्रिकोणाचे अघोषित विसर्जन झाले आहे.
जन्म : १० जानेवारी १९०० (चांदा, चंद्रपूर)
मृत्यू : २४ नोव्हेंबर १९६३.
भूषविलेली अन्य पदे
दळणवळण, सार्वजनिक बांधकाम आणि आरोग्य खाती (महाराष्ट्र राज्य).
आरोग्य (१९५२ ते १९६० मध्य प्रांत)
मुख्यमंत्रीपदाचा कालावधी:
२० नोव्हेंबर १९६२ ते २४ नोव्हेंबर १९६३
पक्ष : काँग्रेस
पहिल्यांदा आमदार १९५२ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील मूळसावली मतदारसंघ.
महेश जोशी,
लोकसत्ता दिवाळी अंक २०१०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा