बाबासाहेब भोसले (महाराष्ट्रातील माजी मुख्यमंत्री)
‘महाराष्ट्र’ बाबासाहेबांना समजला होता. महाराष्ट्राला मात्र बाबासाहेब भोसले ही काय चीज आहे, हे कधी समजले नाही. ‘आता काय, बाबासाहेब भोसलेदेखील मुख्यमंत्री होऊ शकतात. मग उद्या कोणीही सोम्यागोम्या झाला तर आश्चर्य वाटायला नको.’ असे पूर्वग्रहाने म्हणणाऱ्या लोकांना प्रत्येक निर्णय राजकीय डावपेचाचा एक भाग म्हणून विचारपूर्वक करणाऱ्या इंदिरा गांधींनी त्यांना मुख्यमंत्री का केले असेल, हे लक्षात घ्यावेसे वाटले नाही.
बाबासाहेबांना २१ जानेवारी १९८२ ते १ फेब्रुवारी १९८३ असा जेमतेम एक वर्ष दहा दिवसांचा काळ मुख्यमंत्री म्हणून मिळाला. तो जर थोडा अधिक मिळाला असता तर लालूप्रसाद यादवांप्रमाणे ‘विदूषक ते महागुरू’ असा प्रतिमा परिवर्तनाचा प्रवास बाबासाहेबही करू शकले असते. त्यांचे बंधू प्राचार्य शिवाजीराव भोसले हे विद्वान, विचारवंत, चतुरस्त्र लेखक, वक्ते म्हणून कीर्तिमान झाले. बाबासाहेब भोसलेही शिवाजीरावांइतकेच बुद्धिमान होते. शिवाय तल्लख राजकीय बुद्धी, समोरच्या माणसाला हेतूसकट ओळखून, त्याची जागा दाखवून देण्याचे धैर्य आणि कौशल्य बाबासाहेबांपाशी होते.
जयवंत दळवींच्या ‘ठणठणपाळ’चे अजरामर व्यक्तिचित्र, वसंत सरवटय़ांनी त्यांच्या हातोडय़ासकट काढलेले आहे. बाबासाहेब हे महाराष्ट्राच्या राजकारणातले मिस्कील विनोदबुद्धी असलेले ‘ठणठणपाळ’ होते. वसंत सरवटय़ांचे ‘ठणठणपाळ’चे व्यक्तिचित्र झुबकेदार मिशा बाजूला काढून ठेवल्या असत्या तर थेट बाबासाहेब भोल्यांचे व्यंगचित्र म्हणून सहज चालले असते. वाक्प्रचार, म्हणी, दाखले, चुटके, कोटय़ा यांचा विपूल वापर करीत संभाषण केल्यासारखे डोळे विस्फारून मोठे करीत मिचकावत गाल फुगवून हसत, श्रोत्यांना मनमुराद हसवत, मुक्त मनसोक्त भाषण करणारा दुसरा मुख्यमंत्री महाराष्ट्रात झाला नाही.
बाबासाहेबांच्या आधी आणि नंतर जे नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले ते सर्वजण एक ना एक दिवस मुख्यमंत्री होणार हे सर्वानीच गृहित धरले होते. त्यामुळे त्यांच्या निवडीचे कधी कुणाला आश्चर्य वाटले नाही, पण बाबासाहेब मुख्यमंत्री झाल्यामुळे सर्व प्रस्थापित नेत्यांना, इच्छुकांना अक्षरश: धक्का बसला. कारण बाबासाहेब भोसले हे नाव मुख्यमंत्रीपदासाठी कुणाच्या ध्यानीमनीही नव्हते.
बाबासाहेब मुख्यमंत्री कसे झाले, याबद्दल नाना कथा, किस्से, दंतकथा- वदंता पसरल्या. कुणी म्हणत शिवाजी महाराजांच्या वंशातील अभयसिंह भोसल्यांऐवजी चुकून सातारचेच असलेल्या बाबासाहेबांचे नाव इंदिराजींनी गैरसमजातून दिले. कुणी सांगितलं की ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक तुळशीदास जाधवांचे, नेहरू-गांधी कुटुंबांशी, प्रदीर्घ काळाचे निकट सबंध असल्याने त्यांनी आपले जावई असलेल्या बाबासाहेबांचे नाव इंदिराजींकडे चालवले. कुणी दावा केला की बॅ. अंतुल्यांना मुख्यमंत्री पद सोडावे लागल्यावर त्यांना सांगकाम्या आज्ञाधारक मुख्यमंत्री हवा होता म्हणून त्यांनी पक्षात, लोकांत वैयक्तिक- राजकीय पाया, लोकप्रियता, अनुयायी नसलेल्या बाबासाहेबांचे नाव सुचविले.
खुद्द बाबासाहेबांचे म्हणणे असे होते की, ‘काँग्रेसला बॅ. अंतुल्यांमुळे झालेल्या बदनामीच्या पाश्र्वभूमीवर महाराष्ट्रातील अब्रू राखण्यासाठी चांगल्या माणसाची गरज होती. मंत्री म्हणून मी केलेला सचोटीचा कारभार दिल्लीच्या दरबारी रुजू होताच. माझ्या नावाचा विचार चालू आहे. याची मला कल्पना होती, पण मी दिल्लीला गेलो नाही. कुणाला कपभर चहाही पाजला नाही. अंतुलेंच्या हातसफाईमुळे इंदिराजी अडचणीत आल्या होत्या. अंतुल्यांच्या अगदी विरुद्ध प्रतिमा असलेला, पण आपल्या आज्ञेत राहणारा माणूस इंदिराजींना हवा होता. अंतुल्यांचाही माझ्या नावाला विरोध नव्हता. मला मुख्यमंत्रीपद कुशल नेतृत्वाबद्दल किंवा संघटनात्मक कार्याबद्दल मिळालेलं नाही, याची जाणीव होती. १७ जानेवारी १९८२ ला दुपारी साडेतीन वाजता खुद्द इंदिराजींनी फोन करून मला मुख्यमंत्री करीत असल्याचे सांगितले.’
२१ जानेवारी १९८२ रोजी महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल ओ. पी. मेहरा यांनी बाबासाहेबांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. लहानपणापासून थोरामोठय़ांच्या स्वाक्षऱ्या गोळा करण्याचा छंद असलेल्या बाबासाहेबांनी मुख्यमंत्रीपदाच्या शपथपत्रावर सही केली. त्यांची कारकीर्द सुरू झाली. बाबासाहेबांनी नव्या तरुण मंत्र्यांचा मंत्रिमंडळात मोठय़ा प्रमाणावर समावेश केला. विलासराव देशमुख प्रथमच राज्यमंत्री म्हणून मंत्रिमंडळात प्रवेशले. रजनी सातव उपमंत्री, श्रीकांत जिचकार राज्यमंत्री झाले, पण बाबासाहेबांचे स्वागत जसे मनापासून कुणी केले नाही, तसेच त्यांच्या तरुण मंत्रिमंडळाकडेही पूर्वग्रहदूषित दृष्टिकोनातून पाहिले गेले. एका अग्रगण्य दैनिकाने बाबासाहेबांच्या मंत्रिमंडळाचे वर्णन ‘पालापाचोळ्याचे मंत्रिमंडळ’ असे केले. या पालापाचोळ्यांतील विलासराव पुढे मुख्यमंत्री झाले. डॉ. श्रीकांत जिचकार विद्वान संसदपटू म्हणून गाजले. रजनी सातव राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष झाल्या. यावरून बाबासाहेब नव्हे तर त्यांचे मूल्यमापन पूर्वग्रहातून करणारे चुकले असेच म्हणावे लागेल.
बाबासाहेबांची मिस्कील विनोदबुद्धी मुख्यमंत्री झाल्याक्षणापासून लोकांच्या विशेष लक्षात येऊ लागली. त्यामागचा रोखठोक स्पष्टवक्तेपणाही. साधारणत: मुख्यमंत्री शपथ घेण्यापूर्वी इंदिराजींची भेट घेत, बाबासाहेबांनी आधी शपथ घेतली, मग ते दिल्लीला गेले. त्यावर विचारले असता ते शपथविधी समारंभानंतर बोलताना म्हणाले, ‘बाबांनो वेळीच शपथ घेऊन टाकलेली बरी. ही काँग्रेस आहे. इथे शपथ घेतल्यानंतर राज्यपालांसमोरच्या रजिस्टरमध्ये मुख्यमंत्री म्हणून सही करण्याचा मधला वेळ असतो, त्यावेळेतही मागच्या मागे कोट ओढून माघारी बोलावले जाऊ शकते,’ शपथ घेतल्यावर विलासराव देशमुखांनी बाबासाहेबांना नमस्कार केला. म्हणाले, ‘तुम्ही मला प्रथम संधी दिलीत. आभारी आहे.’ त्यावर बाबासाहेब त्यांच्या गडगडाटी आचार्य अत्रे स्टाइल आवाजात म्हणाले, ‘माझे आभार मानू नका. इंदिरा गांधींनी तुमचे नाव दिले. श्रेय त्यांचे आहे! पण एवढे बोलून थांबले तर ते बाबासाहेब कसे? ते पुढे म्हणाले, ‘माझ्या यादीत तुमचे नाव बिलकूल नव्हते.’
बॅ. अंतुल्यांच्या भ्रष्टाचार प्रकरणांच्या पाश्र्वभूमीवर बाबासाहेबांना एका पत्रकाराने विचारले की, तुमच्या चोहीकडे भ्रष्टाचार पसरलाय. मग तुमची भूमिका काय असणार? त्यावर बाबासाहेब म्हणाले, ‘नाव पाण्यात असते, पण आपण पाणी नावेत येणार नाही एवढी काळजी घेतली म्हणजे पुरे आहे.’
‘बाबासाहेब १९८० साली प्रथम आमदार, लगेच अंतुल्यांच्या मंत्रिमंडळात कायदा, कामगार, परिवहन मंत्री, १९८२ ला मुख्यमंत्री झाले. त्यांना अनुभव नाही, त्यांचे कर्तृत्व सिद्ध झालेले नाही,’ असे एका पत्रकाने म्हटले. त्यावर बाबासाहेबांनी दिलेले उत्तर मार्मिक होते. ते म्हणाले, ‘सिद्ध म्हणजे उकडलेला तांदूळ जर पेरला तर तो उगवत नाही पण असिद्ध म्हणजे न उकडलेला तांदूळ मात्र अंकुरित होतो.’
बाबासाहेब १९७८ साली इंदिरा काँग्रेसच्या तिकिटावर मुंबईच्या नेहरूनगर विधानसभा मतदारसंघातून पडले, पण १९८० साली निवडून आले. शिवसेनेने मुंबईत काँग्रेसला पाठिंबा दिला होता. मुंबईतल्या १२/१५ जागा केवळ शिवसेनेमुळे काँग्रेसला मिळाल्या. बाबासाहेबांच्या निवडणूक प्रचाराला तर स्वत: दस्तुरखुद्द बाळासाहेब ठाकरे आले होते. बाबासाहेब नुसते आमदार नव्हे मंत्री होणार, अशी भविष्यवाणीही त्यांनी केली होती.
यामुळे मुख्यमंत्री झाल्यावर बाबासाहेबांची शिवसेनेबाबत भूमिका सद्भावनेची राहिली. बाबासाहेबांचे नाव दिल्लीहून जाहीर होण्याआधी अर्धा तास बाळासाहेबांनी फोन करून त्यांचे अभिनंदन करून आपलेही दिल्लीत सोर्स असल्याचे दाखवून चकित केले होते.
बॅ. अ. र. अंतुले बाळासाहेबांची आपली मैत्री प्रदर्शित करीत त्यामागे मुसलमान म्हणून आपल्याला विरोध करू नये आणि मराठी माणूस आपला समर्थक आहे हे सिद्ध करण्याचा डाव होता. बाबासाहेबांचे पारदर्शक आणि ‘पोटात तेच ओठात’ व्यक्तिमत्त्व असल्याने बॅ. अंतुल्यांपेक्षा शिवसेनेला त्यांनी आणि शिवसेनेने त्यांना अधिकाधिक सांभाळून घेतले. (फार पुढे बाबासाहेब थेट शिवसेनेत गेल्यावर मात्र दोघे एकमेकांना सांभाळून घेऊ शकले नाहीत.)
मुख्यमंत्री होण्याआधी कामगार परिवहन, कायदा खात्याचे मंत्री म्हणून बाबासाहेबांनी त्या खात्यांवर स्वत:ची छाप पाडली होती. पूर्वी ‘कोर्टाची पायरी’ नावाच्या दूरदर्शनच्या एका कार्यक्रमाचे सूत्रसंचालक यापलीकडे बाबासाहेबांची अन्य कुठलीच ओळख नव्हती. पण या तीन खात्यांचे मंत्री म्हणून त्यांनी शासन, प्रशासन यात आपली वेगळी ओळख आयडेंटिटी प्रस्थापित केली. नवीन वकिलांच्या सुरक्षेसाठी अॅडव्होकेटस् वेल्फेअर फंड, बडव्यांच्या शोषणापासून वारकऱ्यांना मुक्ती देणारा पंढरपूर देवस्थान कायदा, सिद्धीविनायक मंदिरावरील प्रशासकाच्या जागी विश्वस्त मंडळ, औरंगाबाद खंडपीठाची स्थापना, कामगारमंत्री म्हणून ‘प्रिमियर’चा बंद पडलेला कारखाना पुन्हा सुरू करणे असे अनेक निर्णय घेतले.
परिवहन मंडळाचे अध्यक्ष बॅ. अंतुल्यांचे ‘खास माणूस’ होते. एस. टी.मध्ये मनमानी करीत होते. त्यांच्या मनमानीला रोखताना बाबासाहेबांनी परिवहन मंत्री या नात्याने थेट बॅ. अंतुल्यांशी पंगा घेतला. बॅ. अंतुल्यांनी एस. टी. महामंडळाच्या अध्यक्षाला वाचविण्याकरिता बाबासाहेबांचे परिवहन खाते काढून घेत त्यांना ग्रामविकास दिले.
खरेतर बाबासाहेब अनैतिक, बेकायदेशीर कृत्यात मंत्री म्हणून आपली साथ देत नाहीत, हे मुख्यमंत्री असलेल्या काळात बॅ. अंतुल्यांना आधीही वेळोवेळी कळून चुकले होते, पण तरी त्यांनी आपल्यानंतर बाबासाहेबांना मुख्यमंत्री करण्यास संमती दिली, याचे कारण इंदिराजींनी स्वत:च निवड केल्यावर बॅ. अंतुल्यांना होकार देण्यावाचून पर्याय उरला नसावा. शिवाय इतर मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार थेट त्यांच्या विरोधातच आधीपासून असल्यामुळे आणि दुसरा मराठा उमेदवार अंतुल्यांकडे सुचवायला नसल्यामुळे वसंतदादा मुख्यमंत्री होण्यापेक्षा भोसले परवडले, असा विचार अंतुल्यांनी केला असावा.
बॅ. अंतुल्यांशी बाबासाहेबांचा खटका उडणे अटळ, अपरिहार्य होते. बाळासाहेब ठाकरे यांनी १९८५ साली म्‘उठ म्हटले की उठणारा आणि बस म्हटले की बसणारा मुख्यमंत्री मला हवा’ असे जाहीरपणे म्हटले. बॅ. अंतुल्यांना ‘असाच’ त्यांच्या रिमोट कंट्रोलने चालणारा मुख्यमंत्री हवा होता, पण इतरांप्रमाणेच अंतुलेही बाबासाहेबांना ओळखू शकले नव्हते. आपल्या आदेश-संदेश-उपदेशावर ‘उठाबशा’काढणारे बाबासाहेब नव्हेत, हे बॅ. अंतुल्यांच्या लक्षात यायला फार दिवस जावे लागले नाहीत. किंबहूना बाबासाहेबांच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकीर्दीतले पहिले आव्हान ‘हमी से मुहबत, हमी से लडाई’ करणारे बॅ. अंतुलेच ठरले!
बॅ. अंतुल्यांनी जागोजाग राजकारणात प्रशासनात अनेक भस्मासूर निर्माण करून लाडावून ठेवले होते. यातला प्रत्येक जण स्वत:ला प्रति किंवा पर्यायी बॅ. अंतुलेच समजत होता. खुद्द अंतुले स्वत:ला महाराष्ट्राच्या राजकारणाचे ‘गॉडफादर’ मुख्यमंत्रीपद जाऊनही समजत होते. शुगर-मराठा लॉबी आणि अंतुले लॉबीच्या राजकारणाला टोळीयुद्धांचे स्वरूप आले होते. अशावेळी बाबासाहेबांना बॅ. अंतुल्यांना आवरायचे आणि मराठा लॉबीला सावरायचे अशी तारेवरची कसरत करायची होती. बाबासाहेबांनी बॅ. अंतुल आणि वसंतदादा या दोन्ही गटांपासून समान जवळीक आणि दुरावा ठेवावा आणि इंदिरा निष्ठांची लॉबी बांधावी, अशी इंदिरा गांधींची अपेक्षा होती.
बाबासाहेबांनी सांगितलेल्या आठवणीनुसार बाबासाहेबांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यावर १५ दिवसांनंतर त्यांच्या हातात बॅ. अंतुल्यांकडून चार रेडीमेड फाइल्स आल्या. नोटींग पूर्ण झालेले होते. फक्त मुख्यमंत्र्यांची सही होणे तेवढे बाकी होते. बॅ. अंतुले म्हणाले की, ‘मी त्यात सगळं पाहिलं आहे. तुम्ही फक्त सही करा. प्रत्येक फाईलीमागे तुम्हाला एक कोटी रुपये मिळतील.’ यावर बाबासाहेबांनी एका ठिकाणी लिहिले आहे की, ‘काल परवापर्यंत घर-प्रपंचाचीच चिंता बाळगणाऱ्या मला हे केवळ अनपेक्षितच नव्हे तर थरकाप उडविणारे होते. मी हे प्रकरण इंदिरांजींकडे घेऊन गेलो. त्या म्हणाल्या, ‘आपण यावर कायदेशीर सल्ला घ्या’ आम्ही कायदेशीर सल्ला घेतला. फायली परत धाडल्या. तेव्हापासून बॅ. अंतुले दुखावले. अंतुले सत्तेवर नसले तरी आमदार त्यांचेच होते. त्यामुळे मला राजकीय त्रास द्यायला सुरुवात झाली.’
बाबासाहेबांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारले त्याआधीपासूनच काही प्रश्नांची ‘गळवे’ ठुसठुसत होती. ती लगेच फुटली. बाबासाहेब मुख्यमंत्री होण्याआधीच एक आठवडा डॉ. दत्ता सामंतांनी गिरणी कामगारांचा संप सुरू केला होता. दहशतवाद, हिंसाचार या माध्यमातून गिरणी कामगारांना कामावर जाऊ दिले जात नव्हते. कामगारही अल्पकाळात यश मिळेल, या अपेक्षेने कामावर जात नव्हते. शिक्षक संघटनांनी एस. एस. सी. परीक्षांवर बहिष्काराची घोषणा केली होती. तोंडावर परीक्षा आल्याने विद्यार्थी-पालक अस्वस्थ होते. बॅ. अंतुल्यांनी निर्माण केलेल्या भस्मासुरातला एक भयावह भस्मासूर पोलिसांच्या ट्रेड युनियन पद्धतीच्या संघटनेचा होता. अंतुल्यांनी पोलिसांच्या युनियनला मान्यताच नव्हे, फंडदेखील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा विरोध डावलून दिला होता. त्यांच्या बेशिस्तीमुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना काम करणे अशक्य झाले होते. अगदी याचवेळी विद्युत मंडळाचे कनिष्ठ अभियंते आणि गटसचिवांचे संप सुरू झाले. दरम्यान दुष्काळी परिस्थितीनेही उग्र रूप धारण केले. नव्याने शपथग्रहण केलेल्या मुख्यमंत्र्यांचा ‘अभिमन्यू’ व्हायला हा चक्रव्यूह पुरेसा होता. याचवेळी सर्व भाषिक प्रसार माध्यमेही बाबासाहेबांवर प्रतिकूल पूर्वग्रह दूषित भावनेने कडक, कडवट टीका करीत होती.
बाबासाहेबांच्या पहिल्या कॅबिनेट मिटिंगमध्ये त्यांनी स्वातंत्र्य सैनिकांच्या पेन्शनमध्ये वाढ करण्याचा आणि दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन मंत्र्यांचे पगार कमी करण्याचा असे दोन निर्णय घेऊन कारकीर्दीचा श्रीगणेशा केला. त्यानंतर शिक्षकांचा बहिष्कार असतानाही महसूल आणि पोलीस खात्याच्या कर्मचाऱ्यांकडून विद्यार्थ्यांचे फॉर्म भरून घेण्यापासून परीक्षा पार पाडून निकाल जाहीर करण्यापर्यंत सर्व प्रक्रिया पार पाडली. यामुळे शिक्षक नाराज झाले, पण विद्यार्थी पालक खूश झाले. आता आव्हान होते, पोलिसांमधील बेशिस्त मोडून काढण्याचे. संघटनेच्या नेत्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना धाब्यावर बसवून, जणू समांतर प्रशासनच स्थापन केले होते. बाबासाहेबांनी सचिव, पोलीस अधिकारी, दिल्लीतील वरिष्ठांना विश्वासात घेऊन, एक ‘अॅक्शन प्लॅन’ बनवला. बेशिस्त मंडळींची यादी करून, त्यांना बडतर्फ आणि अटक करून, पोलिसांची युनियनवजा संघटना, बरखास्त करायची असे ठरले. रातोरात सशस्त्र पोलिसांना निशस्त्र करून, दारूगोळा, हत्यारे ताब्यात घेण्यात आली. नेत्यांना अटक केल्याचे वृत्त पसरताच, पोलीस संपावर गेले. पोलिसांचे महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिले बंड झाले. काही तास मुंबईत अराजकसदृश्य स्थिती निर्माण झाली.
पण बाबासाहेबांनी पर्यायी प्रभावी बंदोबस्त करून ठेवला होता. त्यामुळे २/३ दिवसात हे बंड पूर्णपणे शमले. या बंडाचा मानसिक धक्का लोकांना आणि राज्यकर्त्यांनाही मोठा बसला. बॅ. अंतुल्यांच्या काळात पोलीस संघटनेच्या नेत्यांना राजाश्रय मिळाल्यामुळे, हे बंड मोडण्यासाठी व्यूहरचनेइतकेच मनोधैर्य महत्त्वाचे होते. ते बाबासाहेबांनी निर्विवादपणे दाखवून, एक मोठा विजय संपादन केला.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची, संधीही समोरून बाबासाहेबांकडे चालत आली. १९७० च्या भिवंडी दंगलीपासून भिवंडीत शिवजयंतीच्या मिरवणुकीवर, महाराष्ट्र शासनाने बंदी घातली होती. बाळासाहेबांनी ‘ही बंदी उठवावी’, अशी मागणी करण्यात आली. मुस्लीम संघटनांकडून प्रचंड विरोध आणि दिल्लीतील पक्षश्रेष्ठी साशंक असतानाही, बाबासाहेबांनी भिवंडीत शिवजयंतीच्या मिरवणुकीला परवानगी दिली. पुढे ती दरवर्षी होऊ लागली. पण अन्य कुणा मुख्यमंत्र्याने, अल्पसंख्य समाजाची अशी नाराजी पत्करली असती, असे वाटत नाही.
नवीन विधानभवन तयार झाल्यावर, जुने विधानभवन पोलीस मुख्यालयाला देऊन, त्याचा ‘हेरीटेज’ दर्जा राखण्याचा निर्णय असाच, अनेक दबाव झुगारून बाबासाहेबांनी घेतला. बॅ. अंतुले यांच्या ‘प्रतिभा प्रतिष्ठान’च्या व्यवहाराशी, राज्याच्या मुख्य सचिवांचा अप्रत्यक्ष संबंध आहे, असे दिसताच बॅ. अंतुल्यांच्या नाराजीची पर्वा न करता, त्यांची बदली बाबासाहेबांनी केली. स्वित्र्झलडमधून ‘युनो’कडे निघालेल्या राम प्रधानांना, माघारी बोलवून राज्याचे मुख्य सचिव केले. लता मंगेशकर यांच्या कोल्हापूरमधील जागेची कागदपत्रे, अनेक वर्षे मंत्रालयात लोंबकळत पडली होती. लतादीदींनी विनंती करताच बाबासाहेबांनी ती निरपेक्षपणे मंजूर करून, त्यांच्या हाती सन्मानाने दिली.
‘कुली’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान अमिताभ बच्चनला अपघात झाला. इंदिराजी, राजीवपासून व्ही.आय.पीं.ची रांग मुंबईला हॉस्पिटलकडे लागली. या अनुभवाबद्दल बाबासाहेब म्हणतात, ‘अमिताभच्या आजारापेक्षा वरिष्ठांच्या मर्जीचेच टेन्शन, मुख्यमंत्री म्हणून जास्त होते, कारण एरवी घरात कुणी आजारी असले तरी, एवढी धावपळ केल्याचे आठवत नाही.’
इंदिराजी बाबासाहेबांच्या कारभारावर एकूण खूश असाव्यात. कारण बॅ. अंतुल्यांनाही मंत्रिमंडळ विस्ताराची परवानगी न देणाऱ्या इंदिराजींनी, बाबासाहेबांना मंत्रिमंडळाचा विस्तार करू दिला. पण या विस्तारामुळे, ज्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही ते बिथरले आणि बाबासाहेबांविरुद्ध बंडाला सुरुवात झाली. यावर बाबासाहेबांची पहिली जाहीर प्रतिक्रिया होती- ‘भाषा बंडाची! वृत्ती गुंडाची! कृती षंढाची!’ पुढे दिल्लीवरून आलेल्या सूचनांमुळे हे बंड शमले. त्यावरही बाबासाहेबांची प्रतिक्रिया एखाद्या वाक्प्रचारासारखी ठरली- ‘बंडोबांचे आता थंडोबा झाले!’
बाबासाहेब मुख्यमंत्री असताना नव्या विधानभवनासमोर, महात्मा फुले यांचा भव्य पुतळा उभा राहिला. उपराष्ट्रपती हिदायतुल्ला यांच्यासमोर यावेळी झालेले बाबासाहेबांचे महात्मा फुल्यांवरील भाषण, केवळ अविस्मरणीय होते. ओघवत्या भाषेत म. फुल्यांचे विचार, प्रसंगाचे औचित्य, विधानभवनापुढे पुतळा उभा करण्याचे कारण, यावर खडय़ा आवाजात बोलून बाबासाहेबांनी सभा जिंकली. हिदायतुल्लाही गहिवरून गेले होते.
‘डॉ. दत्ता सामंतांनी पुकारलेला गिरणी संप मोडून, बाबासाहेबांनी बळाचा वापर करून चिरडून टाकावा’ असे मानणारी नेत्यांची आणि उद्योगपतींची मोठी लॉबी दिल्लीत आणि मुंबईत होती. पण मराठी गिरणी कामगार लाखोंच्या संख्येने, उत्स्फूर्तपणे या संपात सहभागी आहेत, याची जाणीव बाबासाहेबांना होती. गिरणी कामगारांना न्याय मिळाला पाहिजे; फक्त त्यांनी निवडलेला मार्ग आणि नेता चुकीचा आहे, असे ते म्हणत. डॉ. दत्ता सामंतांशी राज्य सरकारने बोलणी करायला इंदिरा गांधींचा तीव्र विरोध होता. सरकार आपल्याशी बोलणी करीत नाही आणि हळूहळू नीतीधैर्य खचणारे गिरणी कामगार, संपातून माघार घेण्याच्या मन:स्थितीत जात आहेत, हे जाणवल्यामुळे अस्वस्थ झालेल्या डॉ. दत्ता सामंतांनी राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या कार्यकर्त्यांवर, हिंसक हल्ले करायला सुरुवात केली. डॉ. दत्ता सामंतांना गिरणी कामगार माघार घेण्याचा सल्ला देऊ लागले. वैफल्यग्रस्त डॉ. सामंत अधिकच आडमुठेपणा करू लागले. गिरणी कामगार बरबाद आणि गिरण्यांचे दिवाळे निघण्याची वेळ आली तरी ते हट्ट सोडेनात.
बाबासाहेबांनी पुढाकार घेऊन, डॉ. दत्ता सामंतांची गुप्त भेट घेतली. ‘इंदिराजी संप मागे घेण्याचे आवाहन तुम्हाला करतील, मी भेट घडवून आणतो’ असे आश्वासन दिले. निर्मला देशपांडे आणि प्रभा राव या इंदिराजींच्या दोन मैत्रिणींना, मध्यस्थी करायला लावली. डॉ. दत्ता सामंत दिल्लीला गेले. पण दरम्यान इंदिराजींना त्यांच्या दरबाऱ्यांनी वेगळाच सल्ला दिला. त्यामुळे भेटीची वेळ ठरलेली असूनही, इंदिराजींनी भेटीस नकार दिला. ‘आधी संप मागे घेतल्याची घोषणा करा, मग भेटायला या’ असा फायनल निरोप डॉ. दत्ता सामंतांना दिला.
डॉक्टर सामंत भडकले. इंदिराजींना न भेटताच मुंबईला परतले. गिरणी कामगारांचा संप मिटविण्याचे बाबासाहेबांचे सारे प्रयत्न कायमचे निष्फळ ठरले. पुढे संप कधी मिटलाच नाही. गिरण्याही फारशा सुरू झाल्या नाहीत. मुंबईचे अर्थकारण, समाजकारण, राजकारण आणि मराठीकरण याला धक्का देणारा हा संप, बाबासाहेबांसाठी कायम हृदयातील शल्य म्हणून टोचत राहिला.
बाबासाहेबांना पुरोगामी विशाल हिंदुत्वाचे विशेष आकर्षण होते. दादरच्या सावरकर स्मारकाला कबूल केलेले दोन लाख रुपये त्यांनी राजीनामा देण्याचे निश्चित होताच चेक काढून दिले. ‘सातारा, सांगलीकडे हिंदू एकतावाल्यांचा प्रभाव वाढतोय’ अशी कुणीतरी तक्रार केली. तर ते म्हणाले, ‘काय बिघडलं? आपण काँग्रेसवाले हिंदू धर्मासंदर्भात ज्या गोष्टी उघडपणे करू शकत नाही, त्या जर दुसरा कुणी करीत असेल तर पाठिंबा हवे तर नका देऊ, पण विरोध कशाला करायचा?’
बाबासाहेबांचा स्वत: राजकारणी असूनही, एकूण राजकारणी मंडळींवर अविश्वास होता. प्रशासनात राजकीय हस्तक्षेप कमीत कमी व्हावा, असा त्यांचा प्रयत्न असे. म्हणूनच राजकारण्यांचे कुरण झालेला पोलीस आयोग रद्द करून, त्यांनी पोलीस उरपनिरीक्षकांची परीक्षा आणि मुलाखत घेऊन निवडण्याचे काम, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे बॅ. अंतुल्यांचा निर्णय रद्द करून सोपविले.
विदर्भात बाबासाहेबांचे नाव लोक कृतज्ञतेने काढतात. २० वर्षे अमरावती विद्यापीठाची मागणी होत होती ती बाबासाहेबांनी मान्य केली. चंद्रपूरमधून गडचिरोली हा आदिवासी जिल्हा, स्वतंत्रपणे स्थापन केला तो बाबासाहेबांनी!
दुष्काळावर मात करण्यात बाबासाहेबांनी खूप मेहनत घेतली. जिल्हाजिल्हात दौरे केले. भारत सरकारकडून निधी आणला. पिण्याच्या पाण्याचे टँकर गावोगावी पाठविले. जनावरांसाठी शिबीरे लावली. मच्छिमारांसाठी विमा योजना लागू झाली ती बाबासाहेबांच्या कारकीर्दीतच. असंघटित श्रमिकांना अपघातानंतर आर्थिक संरक्षण, मदत देणारी ‘श्रमजीवी कुटुंबाश्रय योजना’ ही कल्पना राज्यंत्री डॉ. श्रीकांत जिचकरांनी ती उचलून धरली तरी बाबासाहेबांनीच.
बाबासाहेब कष्टाळू होते. रात्र रात्र जागून ते फायली हातावेगळ्या करत. त्यासाठी ते वर्षां शेजारच्या ‘तोरणा’ बंगल्यात दडी मारून बसत. विधानसभेत ते स्वत: सदस्यांच्या भाषणांच्या नोंदी काढून उत्तरात त्याचा खुलासा करताना नेहमी दिसत. बाबासाहेबांची टिंगलटवाळी, खिल्ली अनेक नेत्यांनी, पत्रकारांनी उडविली. पण त्यापैकी कुणीही बाबासाहेबांवर भ्रष्टाचाराचा आरोप कधी केला नाही ही मोठी जमेची बाजू मानावी लागेल. जे. एफ. रिबेरोंसारख्या निस्पृह अधिकाऱ्याला बाबासाहेबांनी मुंबईचे पोलीस आयुक्त केले. पण रिबेरोंना ‘पोलीस संप चिरडण्याचा नव्हे तर, मिटवण्याचा प्रयत्न ठेवा, कारण ती सर्व आमच्या गावची माणसे आहेत’ असेही सांगण्यास बाबासाहेब चुकले नाहीत.
मुख्यमंत्री म्हणून बाबासाहेबांनी मंत्रिमंडळासाठी एक चार सूत्री आचारसंहिता ठेवली होती. १) धोरण मंत्रिमंडळ ठरवील. मंत्रिमंडळाच्या बैठकीत मी माझे विचार व्यक्त करणार. तुम्ही देखील विचार व्यक्त करावेत, पण कोणीही स्वत:च्या विचारांचा आग्रह धरू नये. २) धोरण ठरले की, मंत्रिमंडळाची सामूहिक जबाबदारी पूर्ण झाली. ३) त्यानुसार अंमलबजावणीची जबाबदारी, बिनदिक्कत खात्याच्या सचिवाकडे सोपवा. ४) मंत्र्यांनी दौऱ्यातून तपासणी करीत रहावे की, धोरणाची अंमलबजावणी होते आहे किंवा नाही. अंमलबजावणी होत नाही असे वाटल्यास मुख्यमंत्र्यांना कळवावे. पण थेट सचिवांशी वाद घालू नयेत. सनदी अधिकाऱ्यांचे अधिकार क्षेत्र वेगळे आणि लोकप्रतिनिधी व मंत्री यांचे अधिकार क्षेत्र वेगळे, याची जाणीव ठेवली की, राज्यकारभार सुरळीत चालतो.
बाबासाहेबांवर नोकरशाहीने विश्वास दाखविला आणि बाबासाहेबांचाही नोकरशाहीवर भरवसा होता. राजकारण्यांपेक्षा अधिक! बाबासाहेबांच्या काळात काही ठिकाणी हिंदू-मुस्लीम दंगली उफाळून आल्या, याची खंत त्यांना कायम वाटत राहिली. भिवंडीत शिवजयंतीची मिरवणूक त्यांच्या कारकीर्दीत १२ वर्षांनी प्रथम निघाली हा ‘प्लस’ तर जातीय दंगली हा मायनस पॉइंट ठरला. गिरणी संप, पोलिसांचे बंड, शिक्षकांचा बहिष्कार हे प्रश्न कटूता निर्माण करणारे ठरले. नागपूर अधिवेशनात खुद्द काँग्रेसच्या आ. नानाभाऊ एंबडवार आणि आ. सुशिलकुमार शिंदे यांनी मुख्यमंत्री बाबासाहेबांविरुद्ध हक्कभंग ठराव मांडून केलेला उठाव, पक्षात त्यांना कुणी नेता मानायला तयार नाही, हा ‘मेसेज’ देणारा ठरला. अंतुले आणि वसंतदादांचे आपसात भांडणारे गट ‘बाबासाहेब नको’ या मुद्यावर एक झाले. दिल्लीतील पक्षश्रेष्ठींचाही काही आर्थिक व अन्य हितसंबंधांवरून अपेक्षाभंग झाला.
बाबासाहेबांच्या एका वर्षांच्या कारकिर्दीत ‘जमा’ बाजूला, भ्रष्टाचार विरहीत कार्यक्षम प्रशासन हा मुद्दा आला. पण ‘खर्चा’च्या रकान्यात, राज्यातील कायदा सुव्यवस्थेला वारंवार मिळणारे आव्हान, पक्ष नेत्या-कार्यकर्त्यांचा असंतोष, नोकरशाहीवर लोकप्रतिनिधींना डावलून भरवसा, विनोदाच्या भरात अंगलट येणारा पदाचे-निर्णयांचे गांभीर्य घालवणारी वक्तव्ये आणि पक्ष निधीसाठी सरकारी पद-अधिकार यांचा वापर करण्यात आलेले अपयश अशा अनेक कारणांनी ‘बाबासाहेबांना महाराष्ट्र आणि काँग्रेसपक्ष सांभाळता येत नाही’ असे इंदिरा गांधींचे मत झाले. इंदिराजींनी ‘शुगर लॉबी’वर ठपका ठेवत, त्यांना राजीनामा द्यायला सांगितले. २ फेब्रुवारी १९८३ ला बाबासाहेबांनी मुख्य मंत्रीपदाचा राजीनामा दिला. बाबासाहेबांना इंदिराजींनी काढले नाही तर, पक्षात अविश्वास ठराव आणायची तयारी, पक्षांतर्गत विरोधकांनी केली होती.
मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतरही बाबासाहेब भोसले हे ‘बाबासाहेब’ राहिले. त्यांनी पत्रकारांना सांगितले की, ‘माझीच फक्त नव्हे तर, काँग्रेसच्या सर्वच मुख्यमंत्र्यांची स्थिती ही, माकडीणीच्या पिल्लासारखी असते. माकडीण नाका-तोंडात पाणी जायला लागलं की, खांद्यावरचं पोर पायाखाली घेते.’ शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू बॅ. पी. जी. पाटील हे बाबासाहेबांचे मित्र. ते राजीनामा दिलेल्या बाबासाहेबांना भेटायला आले. तर बाबासाहेब त्यांना म्हणाले, ‘मी मागेच तुम्हाला म्हणालो होतो की, मी म्हणजे दीड दिवसाचा गणपती आहे.’ मुख्यमंत्रीपद गेल्याचा जराही विषाद न झालेले बाबासाहेब पत्रकारांना म्हणाले ‘माझे मुख्यमंत्रीपद काढून घेतले. पण आता माझ्या नावामागे, ‘माजी मुख्यमंत्री’ हे बिरुद कायमचे लागले. हे माझे ‘माजी मुख्यमंत्रीपद’ कोण काढू शकतो?’
बाबासाहेब भोसले आता मुख्यमंत्री नाहीत आणि हयातही नाहीत. पण जयवंत दळवींच्या पुस्तकावरील वसंत सरवटय़ांनी काढलेल्या ‘ठणठणपाळ’ या ‘कॅरीकेचर’ व्यक्तिचित्रासारखे ते स्मरण पटलावर कायम राहतील!
जन्म : १५ जानेवारी १९२१
(तारळे, पाटण, जि.सातारा)
मृत्यू : ६ ऑक्टोबर २००७
भूषविलेली अन्य पदे
विधी व न्याय, परिवहन आणि कामगार ही खाती
शिवसेनेत प्रवेश.
मुख्यमंत्रीपदाचा कालावधी:
२१ जानेवारी १९८२ ते १ फेब्रुवारी १९८३
पक्ष : काँग्रेस
पहिल्यांदा आमदार १९८० मध्ये मुंबईतील नेहरू नगर मतदारसंघ.
अनिल थत्ते,
लोकसत्ता दिवाळी अंक २०१०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा