गुरुवार, ८ डिसेंबर, २०१६

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री - गृहमंत्री स्व.आर. आर. उर्फ आबा पाटील


महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री - गृहमंत्री आर. आर. उर्फ आबा पाटील यांचे सोमवार दि. 16 फेब्रुवारी 2015 रोजी कर्करोगाने निधन झाले. अनेक चांगले निर्णय व योजना हे आर.आर. पाटील यांचे वैशिष्टय राहिले आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा हा घेतलेला वेध...
'स्वच्छ प्रतिमेचा नेता' अशीच आबा उर्फ रावसाहेब रामराव उर्फ आर.आर. पाटील या सांगलीतील तासगाव तालुक्यातील अंजनी गावातील नेत्याची ओळख होती, अखेरपर्यंत राहिली. अतिशय हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेतलेल्या आर.आर. पाटील यांनी शिक्षण क्षेत्रातल्या प्राचार्य पी.बी. पाटील यांच्या शाळेत श्रमदान करून शिक्षण पूर्ण केले. पुढे सांगलीतल्याच शांतिनिकेतन महाविद्यालयामध्ये त्यांनी कला शाखेची पदवी घेतली आणि नंतर वकिलीचेही शिक्षण पूर्ण केले.
सांगली जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून राजकीय कारकिर्द सुरू केलेल्या आर.आर. यांनी त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री इथवर केवळ स्वकर्तृत्वावर झेप घेतली. पांढऱ्याशुभ्र कपडयातील आर.आर. उर्फ आबा यांनी आपल्या चारित्र्यावर एकही डाग उमटणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली. त्याच वेळी त्यांच्या राजकीय विरोधकांनीही त्यांच्यावर एकही शिंतोडा उडवला नाही, हाच त्यांच्या स्वच्छ चारित्र्याचा मानबिंदू ठरावा. ज्या पश्चिम महाराष्ट्रातून आबा राजकारणात सक्रिय झाले, त्या पश्चिम महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेते मंत्रिपद मिळावे म्हणून प्रयत्नशील असताना, आबा यांना ते मिळाले ते केवळ त्यांच्या कार्याच्या जोरावर. त्यांच्या मागे ना कुठले राजकीय पाठबळ होते, ना नावावर कोणता साखर कारखाना. मात्र, त्यांचा उपमुख्यमंत्रिपदापर्यंतचा प्रवास सहजसाध्य नव्हता. 1990पासून आबा विधानसभेवर निवडून येत होते. अन्य राजकारण्यांप्रमाणे केवळ आपली ताकद वाढवण्यासाठी वा संपत्तीत भर पडावी म्हणून त्यांनी राजकारण हे क्षेत्र निवडले नव्हते, तर त्यांना समाजासाठी खरोखरच काहीतरी करायचे होते. सुरुवातीच्या काळात काँग्रेसचे मुख्य प्रतोद म्हणून काम पाहणाऱ्या आबांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. आबा यांची निष्कलंक प्रतिमा पवार यांना भावणारी ठरली. राष्ट्रवादीच्या बाकीच्या नेत्यांचे कोटयवधींचे घोटाळे उघडकीस येत असतानाही म्हणूनच आबा यांच्याकडे साधे बोट दाखवण्याचे धाडस कोणाच्या अंगी नव्हते. इतकेच काय, गृहखाते सांभाळत असतानाही पोलिसांच्या बदल्या असोत वा बढत्या - आबा कोणत्याही वादात सापडले नाहीत.
आबांचा अभ्यास वाखाणण्यासारखा होता. विधानसभेत जेव्हा जेव्हा वेळ मिळेल, त्या वेळी ते टिपणे काढताना दिसून येत. त्यामुळेच त्यांनी मांडलेली लक्षवेधी सूचना सत्ताधाऱ्यांना घाम फोडणारी ठरे. 'लक्षवेधी सम्राट' असा त्यांचा आदराने उल्लेख केला जात असे. त्यामुळेच राजकीय पार्श्वभूमी नसलेले आबा आपल्या अभ्यासू वृत्तीच्या जोरावर पहिल्या फळीतले नेते बनले. राजकारणातील त्यांचे प्रस्थ, वजन वाढू लागले. त्यांच्या लक्षवेधींची दखल घेणे सरकारला भाग पडत होते. सभागृहात बोलताना त्यांच्या आवाजाला चढणारी धार संबंधितांना सोलणारीच ठरत असे.
महाराष्ट्रात आबा यांचे नाव झाले ते त्यांनी डान्सबार बंदीचा महत्त्वाचा निर्णय जेव्हा घेतला, तेव्हापासून. घरच्या हलाखीच्या परिस्थितीला काही व्यसने कारणीभूत होती, हे त्यांनी लहान वयातच अनुभवले असल्यामुळे त्यांनी डान्सबार बंदीचा निर्णय घेत, राज्यभरातील हजारो संसार उघडयावर येण्यापासून वाचवले. महिलांचा दुवा घेतला. गडचिरोलीला बदली करू का? असे धमकावत जे राजकारणी नोकरशहांवर दबाव आणून मनमानी कामे करून घेत, ते नेतेही पोलीस बंदोबस्तात गडचिरोलीला जाणे टाळत. या पार्श्वभूमीवर आबांनी गडचिरोलीचे पालकत्व स्वीकारण्याचा निर्णय सगळयांनाच आश्चर्यचकित करणारा होता. वेळ मिळाला की आबा गडचिरोली भागाचा दौरा काढत, तेथील ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेत. गडचिरोली जिल्ह्यात विविध विकासकामे करून त्यांनी हा जिल्हा नक्षलवाद्यांपासून मुक्त करण्याचा विडाच उचलला होता. दुर्दैवाने काळाने त्यांना ती संधी दिली नाही. 2012च्या मार्चमध्ये गडचिरोलीत नक्षल्यांनी केलेल्या हत्याकांडानंतर मात्र राज्याने आबांचा रुद्रावतार अनुभवला. ''आता चर्चा बंद,गोळीला उत्तर गोळीनेच'' असे म्हणत त्यांनी पोलिसांचे मनोबल वाढवण्याचे काम केले.
एका सामान्य गावात जन्म घेतलेल्या आबांना गावागावातील अस्वच्छतेची पूर्ण कल्पना होती. म्हणूनच त्यांनी ग्रामविकासमंत्री म्हणून काम पाहताना 'गाडगे महाराज स्वच्छता अभियान' महाराष्ट्रात राबवले. ज्या ग्रामविकास खात्याकडे कोणाचेही लक्ष जात नसे, त्या खात्याला त्यांनी प्रतिष्ठा मिळवून दिली. गाडगे महाराज स्वच्छता अभियानाअंतर्गत गावाला मिळणाऱ्या पारितोषिकरूपी निधीमुळे गावे स्वच्छे ठेवण्यासाठीची निकोप स्पर्धा राज्याने अनुभवली. हे स्वच्छता अभियान संपूर्ण महाराष्ट्रात राबवले जात होते. मात्र त्याची कोठेही वाच्यता होत नव्हती. आज गावाच्या बदललेल्या रूपडयातून या अभियानाचे यश दिसून येते.
आपण अत्यंत साधे राहतो, असा डांगोरा काही जणांकडून पिटला जातो. आबा तसे साधे जीवन प्रत्यक्षात जगत होते. मात्र त्यांनी त्याचा कधीही बाऊ केला नाही. त्यामुळे तथाकथित साध्या माणसांपेक्षा स्वत:बद्दल फारसे काहीही न बोलणारे आबा सर्वसामान्य जनतेला जास्त भावत. जिल्हा परिषद सदस्य असताना ते ज्या आपुलकीने सामान्यांशी संवाद साधत असत, तोच साधेपणा ते उपमुख्यमंत्री झाल्यावरही कायम राहिला. विरोधाला विरोधाचे राजकारण न करता आबांनी विकासकामांसाठी अभ्यासपूर्ण विरोध केला. म्हणूनच अंजनी गावात जेव्हा आबा पंचत्वात विलीन होत होते, त्या वेळी तेथील उपस्थितांच्या डोळयांतून अश्रू वाहत होतेच, त्याच वेळी राज्यभरातील जनतेलाही अश्रू अनावर झाले होते. स्वत:बद्दल बोलताना आबा म्हणाले होते, ''मी स्वत:बद्दल बोलायला फार संकोची माणूस आहे. मी माझ्याबद्दल जे तुम्हाला सांगतो आहे,ते सांगतानासुध्दा मला फार संकोच वाटतो. माझ्या आयुष्यावर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, महाराष्ट्राचे महान लोकनेते वसंतदादा पाटील आणि माझे आदरणीय नेते आणि प्रेरणास्थान शरदचंद्र पवारसाहेब यांचा खूप मोठा प्रभाव आहे. त्यांनी आखून दिलेल्या वाटेवरून भयमुक्तता आणि विश्वासार्हता या दोन्ही गोष्टी महाराष्ट्रातल्या जनतेत पोलिसांमार्फत निर्माण करण्याचा मी सातत्याने प्रयत्न करतो आहे.''
महाराष्ट्राच्या राजकारणातील स्वच्छ चारित्र्याच्या आबांचे अकाली निधन झाले. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, बाळासाहेब ठाकरे, विलासराव देशमुख असे दिग्गज नेते गेल्या काही काळात आपल्यातून अकस्मात निघून गेले. या प्रत्येकाच्या जाण्याने राज्याच्या राजकारणात कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे. नियतीचा काय योगायोग आहे, याची कल्पना नाही. मात्र आबा यांची जन्मतारीख 16 होती आणि त्यांचे निधनही 16 तारखेलाच झाले. अवघ्या 57व्या वर्षी जगाचा निरोप घेणाऱ्या आबांचे जन्मवर्षही 57च होते. 'सामान्यांचा असामान्य माणूस' ही आपली ओळख निर्माण करून आबांनी आपला कायमचा निरोप घेतला आहे. त्यांना आदरांजली
****संजीव ओक***

 




















हजरजबाबी, उत्कृष्ट वक्ता आणि संसदपटू आबाअर्थात आर.आर.पाटील आणि महाराष्ट्राचे लाडके आबाआज आपल्यात नाहीये. आबांनी चटका लावणारी एक्झिट घेतल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झालीये. आबांच्या निधनामुळे महाराष्ट्र स्तब्ध झाला. डान्सबार बंदीचा निर्णय असो अथवा गडचिरोली सारख्या नक्षलग्रस्त भागाचं पालकतत्व असो अशी अनेक धाडसी भूमिका आबांनी पार पडली.
आर.आर.पाटील यांची राजकीय कारकीर्द
पूर्ण नाव- रावसाहेब रामराव पाटील
जन्म – 16 ऑगस्ट 1957
मूळगावअंजनी, ता. तासगाव, जि. सांगली
1979 – सर्वप्रथम जि.. सदस्य म्हणून निवड
1990 – तासगावचे आमदार म्हणून निवड
1990, 1995, 1999, 2004, 2009, 2014 असे सलग 6 वेळा तासगावचे आमदार
1996 – काँग्रेसचे विधानसभा प्रतोद म्हणून नियुक्ती
1998 – विधानसभा लोकलेखा समितीचे अध्यक्ष
1999 – ग्रामविकास मंत्री
2004 – गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री
2008 – मुंबई हल्ल्यावेळी वादग्रस्त विधानामुळे मंत्रिपद गमावलं
2009 – दुसर्यांदा गृहमंत्रिपदी नियुक्ती
2004, 2009 – राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्षपद सांभाळलं

धडाकेबाज निर्णय
- संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान यशस्वीपणे राबवलं
महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान राबवलं
डान्सबार बंदीचा धाडसी निर्णय घेतला आणि अंमलबजावणी केली
डान्सबार बंदीच्या निर्णयावर टीका होऊनही आबा ठाम राहिले
नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारलं
आदिवासींच्या मुलांना दत्तक घेऊन मुख्य प्रवाहात आणलं
गडचिरोलीच्या विकासकामांना चालना दिली
आबांचं वेगळेपण
- राजकीय पार्श्वभूमी नसूनही उपमुख्यमंत्रिपदापर्यंत मजल
पश्चिम महाराष्ट्रातले नेते असूनही एकही सहकारी संस्था नावावर नाही
एक संवेदनशील राजकीय नेता अशी ओळख
शरद पवारांचा विश्वासू पाठीराखे
जि.. सदस्य ते उपमुख्यमंत्री असा खडतर प्रवास
राष्ट्रवादीचा स्वच्छ, सोज्ज्वळ चेहरा
मोठ्या राजकीय कारकिर्दीत भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही
उत्कृष्ट वक्ता आणि संसदपटू
++++++++++++++++++++++












कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल