सोमवार, ५ डिसेंबर, २०१६

जयललिता यांचा चित्रपटसृष्टी ते राजकारणापर्यंतचा प्रवास


     
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 5 - जयललिता यांचा राजकारणात येण्यापूर्वी चित्रपटसृष्टीतही नावलौकिक होता. आईच्या आग्रहाखातर जयललिता या अभिनय क्षेत्राकडे वळल्या. 'वेन्निरा अडाइ' या तमीळ चित्रपटात आघाडीची भूमिका निभावल्यानंतर जयललिता यांची चित्रपटसृष्टीत अभिनेत्री म्हणून कारकिर्दीला सुरुवात झाली. जयललिता यांनी 15 वर्षांच्या वयापासून तामिळ आणि तेलुगू मिळून जवळपास दीडशे चित्रपटांत काम केले. जयललिता यांनी हिंदी चित्रपट 'इज्जत'मध्येही काम केलं होतं. या चित्रपटात जयललितांसोबत धर्मेंद्र सहकलाकार होते.
राजकारणात सक्रिय होण्यापूर्वी जयललिता हे तमीळ चित्रपटसृष्टीत आघाडीचं नाव होतं. मरुधुर गोपालन् रामचंद्रन ( एमजीआर ) हे जयललितांचे गुरू होते. जयललिता यांनी काही चित्रपट हे तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि सुपरस्टार एम. जी. रामचंद्रन यांच्याबरोबर देखील केले आहेत. एमजीआर यांच्या निधनानंतर जयललिता 1987मध्ये पूर्णतः सक्रिय राजकारणात उतरल्या. एमजीआर यांच्या अंत्ययात्रेदरम्यान एमजीआर यांची पत्नी आणि जयललिता यांच्यात मतभेदही झाले. त्यामुळे पक्ष फुटीच्या उंबरट्यावर असल्याच्या बातम्या येऊ लागल्या. मात्र त्यानंतर जयललिता यांनी मजबूतपणे पक्षाची कमान सांभाळली.
अल्पावधीतच जयललितांकडे एमजीआर यांचे राजकीय वारसदार म्हणून पाहिलं जाऊ लागलं. जयललिता यांचं राजकारणातील महत्त्व वाढलं आणि 1991 साली जयललिता जानकी रामचंद्रन यांच्यानंतर तामिळनाडूच्या दुसऱ्या महिला मुख्यमंत्री झाल्या. 1996च्या विधानसभा निवडणुकीत जयललिता यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. तरीही त्यांचा राजकारणातला दबदबा कायम राहिला. जयललिता यांनी अनेक वर्षं तामिळनाडूच्या राजकारणात वर्चस्व गाजवलं. जयललिता यांनी 1991-96, 2001, 2002-06, 2011-14 आणि 2015ला तामिळनाडू राज्याचं मुख्यमंत्रिपद सांभाळलं आहे.
आताचे राजकीय शत्रू असलेले 92 वर्षांचे करुणानिधी हे एकेकाळी एमजीआरचे जीवलग मित्र होते. त्यांनी एमजीआर यांच्या चित्रपटासाठी कथा-संवाद लिहिले. एमजीआर ज्या प्रकारे संवादफेक करत होते, त्याला सर्वसामान्य प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद मिळत होता. एमजीआरच्या मृत्यूनंतर तामिळनाडूत आलटून पालटून जयललिता (अम्मा) आणि करुणानिधी सत्तेवर येत असतात. अण्णादुराई यांनी स्थापन केलेल्या मूळ डीएमके पक्ष विभाजीत झाला आणि एआयएडीएमके पक्षाच्या जयललिता सर्वेसर्वा झाल्या. डीएमके आणि एआयएडीएमके या दोन्ही पक्षांच्या ध्येयधोरणांत काहीच फरक नाही. तरीसुद्धा तामिळनाडूमध्ये एखादा तिसरा पक्ष या दोन्ही पक्षांपुढे तग धरू शकत नाही, हेही तितकेच खरे आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल