गुरुवार, १० एप्रिल, २०१४

योग

Yoga योग
पतंजलींची योग विषयक केलेली व्याख्या आहे. योगश्चित्त वृत्ती निरोध: अर्थात, चित्ताच्या - मनाच्या वृत्तींचा प्रतिबंध करणे म्हणजे योग!

मन तर सारखे बाहेर धावत असते. त्याला स्थिर करणे यासाठी धावणा-या मनाला अडवायला हवे. रोखायला हवे. ते करताना वेगवेगळे मार्ग पतंजलींनी सांगितले आहेत. त्यातला एक मार्ग अष्टांग योग.

अष्टांग योगाची आठ अंगे कोणती?
  1. यम
  2. नियम
  3. आसन
  4. प्राणायाम
  5. प्रत्याहार
  6. धारणा
  7. ध्यान
  8. समाधी
अशी आठ अंगे आहेत. या आठही अंगांचा सराव करावा लागतो. किंबहुना योग ही एक जीवनपध्दती आहे.

आज जे तणाव आपल्या भोवती आहेत त्यामुळे आपण अनेकदा अस्थिर होतो. गोंधळतो. आणि ‘विवेक’ राहत नाही. खरं तर अढळ विवेकज्ञान हाच दु:खांपासून मुक्तता मिळविण्याचा उपाय आहे. विवेख्याति: अविल्पवा हानोपाय:

विवेक तर हवाच आहे. विवेक म्हणजे केवळ चांगले वाईट एवढेच मर्यादित नाही. विवेक केवळ सु-विचार नाही. सर्व परिस्थितीचा सांगोपांग अभ्यास करुन, क्षणाक्षणाच्या क्रमाचा विचार करुन, भविष्यातील उद्दीष्टांवर नजर ठेवून, आपल्या अनुभवाचा, माहितीचा, ज्ञानाचा उपयोग करुन घेतलेला व्यापक स्वहिताचा निर्णय म्हणेज विवेक. आपलं जीवन म्हणजे एक निर्णयांची/निवडींची मालिका असते. प्रत्येक निर्णय विवेकाने घेतला तर दु:ख नाहीसे होईल. आणि विवेकाने निर्णय घेण्यासाठी, मन स्थिर हवे. त्याकरता योगाभ्यास हवा. योगाभ्यास म्हणजे केवळ आसने नाही. योगाभ्यास जीवनमार्ग आहे.

यम म्हणजे काय?
अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रहमचर्य अपरिग्रहा यमा:
अहिंसा: म्हणजे कोणत्याही सजीव प्राण्यास मुद्दामून आपणहून शारीरिक/मानसिक/भावनिक इजा न पोचवणे.
प्रत्येक हिंसेची अप्रत्यक्ष प्रतिक्रिया असते. आणि ही प्रतिक्रिया माणसाच्या दु:खाला आमंत्रण देते. आज मी कुणाचा अपमान केला तर आज ना उद्या तो त्याच्या पध्दतीने प्रतिक्रिया देणार....आणि क्रिया-प्रतिक्रियांच्या साखळीत माझे मानसिक स्वास्थ्स बिघडणार!
सत्य: म्हणजे जे आहे ते. जसे घडले तसे. जे घडले ते मान्य करणे म्हणजे सत्य. वास्तवाचा स्वीकार म्हणजे सत्य. पण आपलं मन वास्तव स्वीकारायला घाबरतं, नाकारतं आणि ‘प्रत्यक्ष आहे पण मन स्वीकारत नाही’ अशी द्विधा अवस्था येते. जिथे द्वंद्व आहे तिथे शांती कशी?
अस्तेय: चोरी न करणे म्हणजे अस्तेय, आज जी समस्या आहे ती ही "माझे नाही ते माझे झालेच पाहिजे"! त्या करता कोणताही मार्ग मी घेतो/निवडतो आणि मग अतिशय त्रास होतो. ‘वरकड’ कमाई आणि ‘ह्र्दयविकार’ यांचा घनदाट संबंध दिसून येतो.
ब्रम्हचर्य: अर्थात ब्रहमाला धरुन आचरण.
आश्रम धर्माप्रमाणे स्त्री पुरुष समागम म्हणजे सुध्दा ब्रहमचर्यच. गृहस्थधर्म नीतीनियम पाळणे म्हणजे ब्रम्हचर्यच! 
 
सौजन्य - आरोग्य.कॉम 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल