बुधवार, ९ एप्रिल, २०१४

घरच्या घरी बनवा सेंद्रिय खते

रासायनिक खतांच्या वापराने उत्पादनात वाढ होत असली तरी जमिनीचा पोत सुधारून तिची उत्पादन क्षमता टिकवण्यासाठी व वाढवण्यासाठी सेंद्रिय खतांचे महत्त्व मोठे आहे. सेंद्रिय खते तयार करण्यासाठी लागणारे पदार्थ शेतक-यांना सहज उपलब्ध असल्याने या प्रकारची खते तयार करणे शेतक-यांना आर्थिकदृष्टय़ा फायद्याचे ठरत आहे.

सेंद्रिय खतांच्या वापरामुळे पिकाच्या वाढीस आवश्यक असणा-या सर्व अन्नद्रव्यांचा पुरवठा होतो. याबरोबरच मातीच्या कणांची घडण बदलून जमिनीचा पोतही सुधारतो. जमिनीत हवा खेळती राहते व जमिनीचे तापमान कमी राहते. जमिनीतील उपयुक्त जिवाणूंच्या संख्येत व कार्यक्षमतेत वाढ झाल्याने अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेतही वाढ होते. सेंद्रिय पदार्थामुळे जमिनीची जलधारण शक्ती व निचरा शक्ती सुधारते. सेंद्रिय खतांचे विघटन होऊन पिकांच्या वाढीस आवश्यक असलेली पोषणद्रव्ये उपलब्ध होत असतात. जमिनीच्या नैसर्गिक, रासायनिक व जैविक गुणधर्मामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर करणे गरजेचे आहे.

सेंद्रिय खतांमध्ये प्रामुख्याने हिरवळीची खते, शेणखत, कम्पोस्ट खत, मासळीचे खत, नारळाची पेंड, पक्ष्यांची विष्टा, भुईमूग पेंड, करंज पेंड, कडुलिंब पेंड, तिळाची पेंड, उंडीची पेंड, गोबरगॅसची मळी, गांडूळखत आदींचा समावेश होतो. सेंद्रिय खते ही घरच्या घरी तयार करता येत असल्याने त्यांचा खर्च अत्यंत कमी असतो. आपल्या घराजवळील व परिसरातील टाकाऊ पदार्थापासून सेंद्रिय खते तयार करता येतात. ताग, घेवडा, बरसीम, मूग, चवळी, गिरीपुष्प आदी पिकांपासून हिरवळीची खते तयार करता येतात. गिरीपुष्पाचा पाला शेतात हेक्टरी 10  टन घातल्यास भाताचे उत्पादन शिफारस केलेल्या रासायनिक खतांपासून मिळणाऱ्या उत्पन्नाएवढेच मिळते. हिरवळीची खते तयार करताना झाडांचा पाला शेतात कुजवणे आवश्यक आहे. पाला कुजण्याची प्रक्रिया लवकर होत असल्याने ही अन्नद्रव्ये पिकाला लगेच उपलब्ध होतात. हिरवळीच्या खतासाठी लागणारी पिके शेतक ऱ्यांना सहजरीत्या उपलब्ध होत असल्याने हिरवळीची खते खर्चाच्या दृष्टीने किफायतशीर ठरतात. 

सेंद्रिय खतांमध्ये सहजरीत्या तयार करता येणारे खत म्हणजे कंपोस्ट खत म्हणता येईल. कंपोस्ट खतासाठी झाडांचा पालापाचोळा, टाकाऊ गवत, गोठय़ातील काडीकचरा, जनावरांचे मलमूत्र, टाकाऊ मासळीचे अवशेष, शेतातील तण, पिकाची धसकटे, भुसा, पेंढा, कोंडा आदी निसर्गात सहजरीत्या उपलब्ध होणा-या पदार्थाचा वापर करता येतो. कंपोस्ट खत तयार करण्यासाठी आपल्या परसबागेत आवश्यक त्या आकाराचा खड्डा तयार करावा. हा खड्डा शक्यतो उंच जागी असावा. खड्डय़ाची खोली 3 फूट, रुंदी 6 फूट आणि लांबी आवश्यकतेनुसार ठेवावी. खड्डय़ाचा तळ व सर्व बाजू ठोकून टणक कराव्यात. कंपोस्ट खताची निर्मिती करताना खड्डय़ात प्रथम सहा त आठ इंची जाडीचा बारीक केलेल्या पदार्थाचा आणि त्यावर शेणकाल्याचा थर द्यावा. असे आलटून-पालटून थर रचून खड्डा भरावा. शेणकाल्यामध्ये प्रतिटन सेंद्रिय पदार्थास अर्धा किलो ग्रॅम या प्रमाणात कंपोस्ट जिवाणू मिसळावेत. खड्डा भरताना जनावरांचे मलमूत्र आणि पाणी यांचे मिश्रण करून शेण व कचरा यांच्या प्रत्येक थरावर शिंपडावे. त्याचप्रमाणे अर्धा किलो युरिया किंवा एक किलो अमोनियम सल्फेट, दोन किलो सुपर फॉस्फेट तसेच सेंद्रिय पदार्थाच्या सहा टक्के प्रमाणात चुना हे सर्व पदार्थ सेंद्रिय पदार्थाच्या थरावर पसरून टाकावेत. अशा प्रकारे थरावर थर देऊन जमिनीवर साधारण एक ते दीड फू ट उंची गेल्यावर खड्डा भरणे बंद करावे. नंतर तो खड्डा ओल्या मातीने सर्व बाजूने लिंपून घ्यावा. चार ते पाच महिन्यांनी या ठिकाणी चांगले कंपोस्ट खत तयार होते. खड्डय़ातील थर सोळा दिवसांनी, एक महिन्यांनी व दोन महिन्यांनी खाली-वर केल्यास कुजण्याची क्रिया जलद होते. या प्रक्रियेमध्ये दर वेळेस पाणी शिंपडून खड्डा लिपून घ्यावा. अशा खड्डय़ातून सुमारे अडीच ते तीन क्विंटल कंपोस्ट खत तयार होते. 

सेंद्रिय खतातील महत्त्वाचा घटक असलेलीगांडूळ खत निर्मिती ही आता सर्वत्र के ली जाते. टाकाऊ सेंद्रिय पदार्थ कुजवण्यासाठी गांडुळांचा उपयोग केला असता गांडूळ सेंद्रिय पदार्थाचे तुकडे गिळून त्याचे पचन करून कणीदार मातीच्या स्वरूपात शरीराबाहेर टाकतात. गांडूळ खतासाठीसुद्धा कंपोस्ट खताप्रमाणेच पिकांचे अवशेष जनावरे, पक्षी व प्राण्यांपासून मिळणारी उपउत्पादने, हिरवी पिके, घरातील केरकचरा, झाडांचा पालापाचोळा, इतर कुजणारे टाकाऊ पदार्थ यांचा वापर केला जातो. गांडूळ खतनिर्मितीसाठी साधारणत: 2.5 ते 3.0 मीटर लांबीचे व 90 सें.मी. रुंदीच्या सेंद्रिय पदार्थाचे ढीग तयार करावेत. प्रथम जमिनीवर पाणी शिंपडून जमीन ओली करावी. ढिगाच्या तळाशी नारळाचा काथ्या, गवत, भाताचे तूस यांसारखे लवकर न कुजणा-या पदार्थाचा 3 ते 5 सें.मी. जाडीचा थर रचावा. त्यावर पुरेसे पाणी शिंपडावे. या स्तरावर 3 ते 5 सें.मी. जाडीचा अर्धवट कु जलेला मातीचा थर रचावा. या थराचा उपयोग गांडुळांना तात्पुरते निवासस्थान म्हणून असो. साधारणत: 100 किलो ग्रॅम सेंद्रिय पदार्थापासून खत तयार करण्यासाठी त्यावर 7 हजार प्रौढ गांडूळ सोडणे गरजेचे आहेत.दुस-या थरावर सर्व प्रकारच्या टाकाऊ पदार्थाचा वापर करावा. संपूर्ण ढिगाची उंची 60 सें.मी.पेक्षा अधिक होणार नाही, याची दक्षता घ्यावी. कुजणा-या सेंद्रिय पदार्थामध्ये 40 ते 50 टक्के पाणी असावे. गांडूळ खत तयार करण्यासाठी निवा-याची व्यवस्था करावी. हे खत दोन ते अडीच महिन्यांत तयार होते. आयसेनिया फटीडा आणि युड्रिलस युजिनी या जातीच्या एका जोडीपासून तीन महिन्यांनंतर 60 गांडुळांची निर्मिती होते. या गांडुळांचा उपयोग सेंद्रिय खतनिर्मितीसाठी करतात. गांडूळ खत तयार झाल्यावर चाळून गांडूळ बाजूला करून खत वापरावे.

दै. प्रहार यांचे सौजन्याने ...

1 टिप्पणी:

  1. कंपोस्ट तयार काराव्यासाठी आमच्या कडे कंपोस्ट जिवाणू नाहीत ,काय करावे

    उत्तर द्याहटवा

माझ्याबद्दल