गुरुवार, १० एप्रिल, २०१४

अध्यात्म आणि आहार

अध्यात्म तत्वान्वये ‘निरोगी शरीर’ ही सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे. निरोगी शरीरात निरोगी मन राहाते. आहाराचा मानसिक आरोग्याशी संबंध असतो संयमित आणि संतुलित आहारामुळे निरोगी शरीरातील मन आनंदी व निर्भय रहाते.

काय खावं आणि काय खाऊ नये?
शरीराच्या समग्र प्रक्रिया अत्यंत रासायनिक आहेत. माणसाच्या शरीरात जर दारू गेली तर तो त्या रसायनानुसार वागेल, ते नशेनं व्यापून जाईल. विष प्यायला दिल्यानं सॉक्रेटिसचा मृत्यू घडला. विष हे बघत नाही. की हा माणूस सॉक्रेटिस आहे की सामान्य माणूस, अन्‌ भोजनही हे पाहात नाही.

जेवण मादक असेल तर मनुष्याच्या चेतनेमध्ये बाधा आणेल, उत्तेजकता आणेल, सुप्रसिध्द डॉ. केनेथ वॉकर म्हणतात ‘लोक जे भोजन घेतात त्यातल्या अर्ध्या भोजनानं त्याचं पोट भरतं आणि अर्ध्या भोजनानं डॉक्टरांची पोटं भरतात. जगामध्ये जेवून मरणारांची संख्या भुकेमुळे मरणार्‍यांच्या संख्येपेक्षा नेहमीच जास्त राहिली आहे. एखादा माणूस तीन महिनेपर्यंत उपाशी राहू शकतो परंतु एखादा तीन महिनेपर्यंत भरमसाठ जेवण करत राहिला तर तो कोणत्याही परिस्थितीत जिवंत राहू शकणार नाही.

प्राचीन काळापासून ‘आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य’ हे ध्येय वैद्यक शास्त्राने पुढे ठेवलेले आहे.‘ तुमच्या रक्तवाहिन्या जितक्या कार्यक्षम असतील तितके तुम्ही तरूण असाल असे म्हणतात. त्यासाठी उत्तम आहार. हवा, उत्तम म्हणजे महाग नव्हे, तर शरीराचे पोषण करणारा, झीज भरून काढणारा व मानवणारा असावा. अशा अध्यात्मपूर्ण आहारापासून आरोग्यसंपन्न दिर्घायुष्याच्या प्राप्तीचा विचार करता येईल.

माणूस ज्याप्रकारे भोजन करतो, तसे त्याचे भाव, विचार, बुध्दि नि स्फुरणं घडतात. जे लोक मद्य. मांस वगैरे तामसी पदार्थ सेवन करतात. त्यामध्ये निष्ठूरता, क्रूरता आणि निर्दयता अधिक आढळतो. तामस, राजस आहाराने काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, मत्सर वगैरे दोष होऊन साधकाचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य बिघडतात.

नियमितपणे मांसाशन करणार्‍या मंडळींना पावसाळ्यात ते अगदी कटाक्षाने टाळावे असे जे धर्म शास्त्राचा आधार देऊन सातत्याने सांगितले जाते. त्याला मात्र तितकाच शास्त्रीय आधार आहे. कारण ते तसे प्रकृतीला अपायकारकच असते.

काहीजण उपवास करतात. तेव्हा साबुदाणा, खिचडी, शाबुवडे, वरीतांदूळ, शेंगदाणे, वापरतात. हे सात्विक आहारात बसत नाहीत. नेहमीच्या आहारात आम्लप्रमाण (acids) जास्त असते म्हणून उपवासावेळी अल्कीप्रमाण अधिक अन्नपदार्थात असावेत, उपवासात बटाटा, रताळी व सुरण वापरतात. त्यात जास्त पिष्टमय घटक (carbohydrates) आहेत.

उपवासाचे खरे कार्य म्हणजे शरीरातील घाम बाहेर टाकण्यास मदत करणे, शरीर स्वच्छ करणे, पचनेंद्रियांना जरूर ती विश्रांती देणे व नवीन उत्साह- आरोग्य संपादणे, उपवासास आहाराची निवड योग्य अशी करावी की शरीराला जास्त क्षार व जीवनसत्वे मिळतील.

एकंदर अध्यात्मानुसारच्या आहार- प्रणालीने आरोग्य संपदा मिळवणे आज काळाची गरज आहे ज्या आहारामुळे शारीरिक ताकद मिळते. मानसिक तत्परता रहाते. रोगप्रतिबंधक शक्ती निर्माण होते, सौंदर्य वाढते आणि दीर्घायुषी जीवन मिळते. अशा समतोल आहाराला परतत्वाचे अधिष्ठान दिले तर माणसात आरोग्यसवे दैव संपत्तीचे संरक्षण अन्‌ संवर्धन घडू लागेल असे वाटते.


सौजन्य - आरोग्य.कॉम 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल