बुधवार, ९ एप्रिल, २०१४

आवळ्यातून गवसला उद्योगाचा मंत्र

जालन्याच्या सिंधी काळेगावला राहणाऱ्या सीताबाई मोहिते म्हणजे निरक्षर असूनही केवळ जिद्दीच्या जोरावर मोठा उद्योग उभारता येऊ शकतो , असा आत्मविश्वास देणाऱ्या यशस्वी उद्योजिका . घरच्या जमिनीवर जेवढं पिकतं , त्यावर कुटुंबाचं पोट भरत नाही म्हटल्यावर सीताबाई घराबाहेर पडल्या आणि अल्पावधीतच त्यांनी उद्योगाचा डोलारा उभारला .

सीताबाईंकडच्या चार एकर कोरडवाहू जमिनीवर केवळ ज्वारी , बाजरीच काय ती उगवायची . मग पती - पत्नींनी शेतमजुरी , सालदारीही केली . मात्र एके दिवशी त्यांचं आयुष्यच बदलवणारी घटना घडली . ' एके दिवशी मुलगी एक पाकीट घेऊन पळत पळतच घरी आली . ते आवळा कँडीचं पाकीट होतं . ही पाकिटं विकणारा माणूस म्हणजे शेतकरी संघटनेचे लिंबगावचे कार्यकर्ते कदम मामा होते . त्यांनी आवळा कँडीची कृती समाजावून सांगितली . नवं काही तरी करायचंच , हा निर्धार करत दुसऱ्याच दिवशी सीताबाईंनी दोन किलो आवळा घरी आणला . सांगितल्याप्रमाणे कृती केली , पण कुठेतरी चूक झाली आणि कँडी बिघडली . निराश होऊन त्यांनी कदमांशी संपर्क साधला . ते म्हणाले , लिंबेगावला जाऊन प्रत्यक्ष कृती पहा . तसं केल्यावर मात्र कँडी छान जमली . जालन्यात शेतकरी संघटनेचा मोठा कार्यक्रम होता . तिथे टेबल मांडून आवळा कँडीबरोबरच आवळा सरबतही विकलं . पाच दिवसांत तब्बल १२०० रुपयांचा गल्ला जमला .

उद्योगाचा जम बसला आणि काही वर्षांतच त्यांनी जिल्हा उद्योग केंद्राची मदत मिळवली . २००५ मध्ये केंद्रातर्फे सबसिडी मिळवून आणि बडोदा बँकेकडून १६ लाखांचे कर्ज घेऊन सध्याची जागाही खरेदी केली . कामगारांसह यंत्रसामुग्रीही वाढवली . विशेष म्हणजे या यंत्राच्या कामकाजाची आणि प्रत्येक भागाची माहितीही सीताबाईंना आहे . अशा कामांसाठी मेकॅनिकवर अवलंबून राहिलं तर कामाचा खोळंबा होतो आणि पैसाही खर्च होतो , असा त्यांचा सरळसरळ हिशेब आहे .

श्री भोलेश्वर भाजीपाला प्रक्रिया उद्योग अनुसया रोपवाटिका या नावाने त्यांच्या उद्योगाची घौडदौड चालू आहे . या दोन्हीही उद्योगातून तीनशे आवळा झाडांची लागवड करण्यात आली आहे . शेतकऱ्यांकडूनही आवळा विकत घेतला जातो . तीन महिने कच्चा माल मिळतो , उरलेले नऊ महिने प्रोसेसिंग , पॅकेजिंग आणि मार्केटिंग चालतं . या त्यांच्या व्यवसायाची वार्षिक उलाढाल आहे तब्बल सहा ते सात लाख रुपये . सीताबाईंना अजूनही लिहिता - वाचता येत नाही . त्यांना केवळ सही करता येते . त्यांनी मुलांना आवर्जून शाळेत पाठवलं असलं , तरी हे शिक्षण ज्ञानासाठी घ्यावं आणि बिझनेसमध्ये उतरावं , असं त्यांना वाटतं . एकेकाळी खरपुडीच्या ज्या संस्थेच्या फार्मवर सीताबाई - रामभाऊंनी सालदार म्हणून काम केल , त्याच कृषी विज्ञान केंद्राच्या सल्लागार समितीच्या सीताबाई सदस्या आहेत , यातच सर्व काही आलं

म.टा. च्या सौजन्याने...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल