शुक्रवार, १६ जून, २०१७

एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणजे काय?...

वातावरणाची सुरक्षितता अबाधित राखून सेंद्रीय, रासायनिक, जैविक खते तसेच हिरवळीचे पीक, पीक फेरपालट, आंतर पिक पद्धती, पीक अवशेष आदींचा एकत्रित वापर करून जमिनीची आणि पिकांची उत्पादकता वाढविण्याच्या पध्दतीस एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणतात.

एकात्मिक अन्नद्रव्ये पुरवठा पद्धतीमध्ये रासायनिक खतांच्या वापराबरोबरच सेंद्रीय खते, हिरवळीची खते, जिवाणू खते, नत्रयुक्त अझोलासारखी हरित खते, वनस्पतींची पाने, शेतावरील धसकटे, मुळे, पालापाचोळा, काडीकचरा, इतर टाकाऊ पदार्थांच्या चक्रीकरणातून पीक अन्नद्रव्य पुरवठ्याचा समतोल साधला जातो. या पद्धतीत द्विदल धान्य पिकांचा फेरपालटीत तसेच आंतरपीक पद्धतीत समावेश करून जमिनीची सुपिकता टिकविण्याचा प्रयत्न केला जातो.एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाची संकल्पना ही जमिनीची उत्पादन क्षमता वाढवून पिकांची उत्पादकता कायमस्वरुपी टिकविणे ही आहे. एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापनामध्ये पर्यावरणाचा विचार करून जमिनीची सुपीकता व पिकांची उत्पादकता वाढवून ती शाश्‍वत करण्याचा प्रयत्न केलेला असतो. त्यासाठी उपलब्ध सर्व स्रोतांचा एकात्मिक पद्धतीने वापर करणे गरजेचे आहे. या पध्दतीत अन्नद्रव्यांचे नियोजन विविध स्रोतांतून करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे अन्नद्रव्यांची कार्यक्षता वाढविली जाऊन उत्पादनात वाढ होते. तसेच जमिनीचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. त्याकरिता सर्वसाधारणपणे सेंद्रिय स्वरूपातून पुरविणाऱ्या अन्नद्रव्यांचा सहभाग 25 ते 30 टक्के असावा, जैविक स्वरूपातील 20 ते 25 टक्के आणि रासायनिक स्वरूपातील सहभाग 50 टक्के असावा.

एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाची गरज

सध्या देशातील खतांचे उत्पादन गरजेपेक्षा फारच कमी आहे. स्फुरद, पालाशसारखी रासायनिक खते परदेशातून आयात करावी लागतात. त्यावर सरकारला अनुदान द्यावे लागते. अनुदानाचा भार वाढत चाललेला आहे. त्यामुळे भविष्यात अनुदान कमी होऊन रासायनिक खते महाग होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे रासायनिक खतांचा वापर करमी करून त्यांची कार्यक्षमता वाढविली पाहिजे.

जमिनीची सुपिकता आणि पिकांची उत्पादकता केवळ रासायनिक, सेंद्रिय व जैविक खतांचे एकत्रित वापरानेच वाढवून ती टिकविता येईल. देशात विविध ठिकाणी 25 ते 30 वर्षे सतत चाललेल्या प्रयोगांती हे सिद्ध झाले आहे.

हरितक्रांतीत पीक उत्पादकता वाढविताना जमिनीच्या सुपिकतेकडे/ आरोग्याकडे विशेष लक्ष दिले गेले नाही. ते आता देणे अत्यंत गरजेचे आहे हे डॉ. स्वामीनाथन यांच्या अहवालाने प्रकर्षाने लक्षात आणून दिले आहे.

-संतुलित अन्नद्रव्यांचा पुरवठा करण्यासाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन आवश्‍यक आहे.
-जमिनीच्या जैविक, रासायनिक व भौतिक गुणधर्मात सुधारणा करण्यासाठी याची गरज आहे.
-जमिनीतील व पिकांमधील जैव रासायनिक प्रक्रियांचा समतोल यामुळे राखला जातो.
-अविद्राव्य अन्नद्रव्यांचे विद्राव्य स्वरूपात रुपांतर करता येते.
-रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढविता येते.
-तसेच जमिनीतील सर्व पीक अन्नद्रव्यांची कार्यक्षमता एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनामुळे वाढविता येते.






















Ref - Govt.of Maharahtra
Rani
Bsc Agri.
9665223385

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल