शुक्रवार, १६ जून, २०१७

बायोगॅस बांधकाम आणि व्यवस्थापन

बायोगॅस करण्यासाठी घराजवळील उंच, कोरडी, मोकळी व बराच वेळ सूर्यप्रकाश मिळणारी जागा निवडावी. जागा शक्‍यतो घराजवळ अगर गोठ्याजवळ असावी. जमिनीखाली पाण्याची पातळी दोन मीटरपेक्षा खाली असावी. निवडलेल्या जागेजवळ झाडे, पाण्याची विहीर, पाण्याचा हातपंप नसावा.
बायोगॅस बांधकामास मंजुरी मिळाल्यानंतर आपल्याकडे असलेली जनावरे व कुटुंबातील व्यक्तींची संख्या विचारात घेऊन क्षमतानिहाय बायोगॅस संयंत्राचे आकारमान ठरवावे व बांधकाम करावे.
केंद्र शासनाने मान्यता दिलेल्या बायोगॅस मॉडेलचेच बांधकाम करावे. बांधकामावरून तरंगती गॅस टाकी संयंत्र आणि स्थिर घुमट संयंत्र असे दोन बायोगॅसचे प्रकार पडतात. स्थानिक जमीन व हवामानाचा प्रकार विचारात घेऊन बायोगॅसच्या बांधकामाचे नियोजन करावे.
ज्या भागात मुरूम व तांबूस मातीचा प्रकार आहे, त्या ठिकाणी दीनबंधू स्थिर घुमट संयंत्र प्रकारचे बांधकाम करावे. ज्या ठिकाणी काळी माती अगर पाण्यामुळे जमीन फुगणारी आहे अशा ठिकाणी फेरोसिमेंट, प्री- फॅब्रिकेटेड फेरोसिमेंट या प्रकारचे बायोगॅस बांधावेत.
बायोगॅस संयंत्रास आयएसआय मार्क असलेली शेगडी जोडणे आवश्‍यक आहे. शेगडीची छिद्रे अधूनमधून स्वच्छ करावीत.
खताचा खड्डा मधूनमधून साफ करावा. खताचे किमान दोन खड्डे करावेत. त्यांचा आळीपाळीने वापर करावा. खड्ड्यातील शेणाची पातळी नेहमी आऊटलेटमधून शेण बाहेर पडण्याच्या सांडीपेक्षा कमी असावी म्हणजे शेणाची रबडी सहजरीत्या बाहेर पडेल.
संयंत्राच्या आऊटलेटवर फरशीचे झाकण घालणे बंधनकारक आहे, कारण संयंत्राचे आऊटलेट उघडे राहिल्यास त्यामध्ये पशू-पक्षी, माणसे वगैरे पडून धोका होण्याची शक्‍यता असते.
आपणाकडे उपलब्ध असलेली जनावरे, व्यक्ती यांचा विचार करूनच संयंत्राची क्षमता ठरविण्यात यावी.
दररोज आपणाकडे उपलब्ध असलेले शेण व तेवढेच पाणी घालून त्याचा शेणकाला करून संयंत्रामध्ये सोडावा. थंडीच्या दिवसांत शक्‍यतो कोमट पाण्याचा वापर करावा.
शेणाशिवाय स्वयंपाकघरातील खरकटे, भाजीपाल्याचे अवशेष यांचे लहान भाग करून घातले तरी चालू शकते.
गॅसवाहक पाइपमध्ये हवेचा गारवा लागल्यास पाणी होते, त्यासाठी गॅसवाहक पाइप शक्‍यतो एका बाजूने उतरता जोडावा. ज्या ठिकाणी गॅसवाहक पाइप वाकलेला (बेंड झालेला) असेल, त्या ठिकाणी पाणी काढण्याची नळी जोडावी व नळीतून मधूनमधून नियमित पाणी काढावे.
गॅस वापरण्याच्यावेळी शेगडी भडकू लागली अगर निळ्या ज्योतीऐवजी ज्योत तांबडी पेटू लागली किंवा भांडी काळी पडू लागली, तर पाइपमध्ये पाणी साठलेले आहे असे समजावे व त्वरित पाणी बाहेर काढून घ्यावे.
बायोगॅसला शौचालय जोडलेले असल्यास ते स्वच्छ करताना फिनेल, जंतुनाशके, साबण, सोडा, डिटर्जंट पावडर इत्यादी रासायनिक द्रव्यांचा वापर करू नये. राखेने शौचालय स्वच्छ करावे.
शेगडी वापरात नसेल तेव्हा किंवा रात्री संयंत्रावरील मुख्य व्हॉल्व्ह बंद करावा.
स्वयंपाक करून गॅस शिल्लक राहात असेल तर बायोगॅसवर चालणाऱ्या दिव्याचा वापर करावा. स्वयंपाकाशिवाय प्रकाश, वीजनिर्मितीकरिताही बायोगॅसचा वापर करता येतो.
बायोगॅस संयंत्रापासून मिळणारे खत हे एक उत्तम सेंद्रिय खत आहे. याशिवाय बायोगॅसमधून बाहेर पडणारे खत आपण लागलीच द्रवरूपात पिकास देऊ शकतो. हे खत पीकवाढीसाठी फायदेशीर ठरते.





























http://www.liveratnagiri.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल