शुक्रवार, ११ ऑगस्ट, २०१७

यंत्रवेडा हेन्री फोर्ड...

अमेरिकेतल्या डेट्राइट नावाच्या शहरापासून थोडं दूर असलेलं ग्रीनफिल्ड नावाचं एक छोटंसं गाव. तिथल्या एका शेतकरी कुटुंबात ३० जुलै १८६३ रोजी हेन्री फोर्डचा जन्म झाला होता. तो यंत्रवेडा होता. शेती करायचा त्याला प्रचंड कंटाळा. वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षीच तो डेट्राईट इथं वाफेची इंजिनं बनवायच्या एका कारखान्यात नोकरी करू लागला. पुढे तो एका मोठ्या वीज कंपनीत प्रमुख इंजिनिअर म्हणून काम करू लागला. पण त्याचं संपूर्ण लक्ष केंद्रित झालं होतं ते स्वयंचलित मोटारगाडी तयार करण्याकडे; पण त्यासाठी योग्य असं एक इंजिन बनवणं फार आवश्यक होतं. गेली दोन वर्ष तो सतत याच कामात व्यग्र होता. आपल्या घरामागे असलेल्या एका टपरीत त्यानं एक वर्कशॉप सुरू केलं होतं. तिथं तो शून्यातून विश्‍व निर्माण करण्याच्या प्रयत्नात गुंतला होता. इंजिन बनवण्याचं हे काम अत्यंत वेळखाऊ, गुंतागुंतीचं, अवघड होतं. त्या इंजिनचा प्रत्येकच छोटामोठा पार्ट हेन्रीलाच तयार करावा लागे. तयार केलेला पार्ट तपासून घ्यावा लागे. त्याच्या या वेडापायी इंजिनियरची सोन्यासारखी नोकरीसुद्धा सोडावी लागली त्याला. पण…. पण अखेरीस ‘तो’ क्षण आला! इ.स. १८९६ चा जून महिना. त्या दिवशी रात्री सतत हेन्री काम, काम आणि कामच करत होता. बाहेर धो धो पाऊस कोसळत होता; आणि आत, हेन्रीच्या वर्कशॉपमध्ये जगातली पहिली मोटारगाडी चाचणीसाठी तयार होत होती! रात्र संपण्याची आणि पाऊसही थांबण्याची वाट बघायलाही हेन्री तयार नव्हता. मध्यरात्र उलटून गेली होती. सगळी जुळवाजुळव झाली होती; आणि… हेन्री गाडीत ड्रायव्हर्स सीटवर स्वार झाला. आता तो वर्कशॉपमधून गाडी बाहेर काढणार, तोच त्याच्या लक्षात आलं की…. गाडीचा आकार मोठा आहे आणि वर्कशॉपचं दार अरुंद आहे! गाडी बाहेर काढणार कशी? आता मात्र हेन्री पुरता वैतागला. गाडीच्या चाचणीसाठी प्रचंड उत्सुक, आतुर आणि अधीर झालेल्या हेन्रीनं सरळ एक कुदळ घेतली आणि वर्कशॉपच्या समोरची भिंतच पाडली. तोपर्यंत पहाटेचे चार वाजले होते. पाऊसही थांबला होता; पण रस्ते ओले होते; जणू निसर्गानेच सडे शिंपले होते; हेन्रीच्या गाडीसाठी! जगातल्या पहिल्या गाडीसाठी. ती गाडी हेन्रीनं रस्त्यावर स्वतः चालवली आणि एका क्रांतिकारक शोधाची पहाट फटफटली. सुरूवातीच्या काळात हा हेन्री जेव्हा आपल्या या पहिल्या गाडीतून चक्कर मारत असे; तेव्हा लोक त्याला ‘वेडा हेन्री’ असं म्हणत असत; पण आज? आज जगातल्या तीस देशांमध्ये हेन्रीचे अवाढव्य, महाप्रचंड मोटारकारखाने दर मिनिटाला एक नवी कोरी गाडी रस्त्यावर आणत आहेत! वेड असावं तर असं! वेडं असावं तर असं; हेन्रीसारखं! 











by - Navshkti

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल