शुक्रवार, १८ ऑगस्ट, २०१७

टेलिपॅथी वास्तवात?


टेलिपॅथी वास्तवात?

दोन व्यक्तींनी एकाच प्रकारे विचार केला किंवा एकाच व्यक्तीने केलेला विचार न सांगताही दुसऱ्याने प्रत्यक्षात आणला, तर त्याला टेलिपॅथी म्हणून ओळखले जाते. या संकल्पनेवर आधारित अनेक सायफाय चित्रपट आलेत, अनेक ठिकाणी त्यावर प्रयोग सुरू आहेत. आता हे तंत्र दृष्टिक्षेपात येताना दिसू लागले आहे. हजारो किलोमीटर दूरवर असलेल्या एका व्यक्तीच्या मेंदूमध्ये सुरू असलेला विचार हजारो किलोमीटर दूर बसलेल्या व्यक्तीपर्यंत पोहोचविण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे.

हार्वर्ड विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी हा प्रयोग केला आहे. यामध्ये फ्रान्समध्ये असलेल्या व्यक्तीने केलेला विचार भारतातील एका व्यक्तीपर्यंत पोहोचविण्यात आला. विशेष म्हणजे, या दोन व्यक्तींमध्ये रूढ अर्थाने कुठलाही संपर्क प्रस्थापित करण्यात आलेला नव्हता. यामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक तंत्राचा वापर करण्यात आला. यामध्ये इंटरनेटशी जोडलेला वायरलेस ईईजी (electroencephalogram) व्यक्तीच्या डोक्याला लावण्यात आला. त्या व्यक्तीने केवळ हाय, हॅलो असा विचार केला. कम्प्युटरने हा विचार ० आणि १ च्या स्वरुपात डिजिटल बायनरी कोडमध्ये रुपांतरीत केला. हा संदेश ईमेलद्वारे फ्रान्समधून भारतात पाठविला गेला आणि रोबोद्वारे दुसऱ्या व्यक्तीपर्यंत प्रकाशाच्या स्वरुपात पाठविला गेला. पेरिफेरल व्हिजनच्या माध्यमातून त्या व्यक्तीने प्रकाशाच्या स्वरुपात पाठवलेला संदेश पाहिला आणि त्याला त्या संदेशाचा अर्थ कळला. विशेष म्हणजे, हा संदेश त्याला दाखविला गेला नाही किंवा ऐकविण्यातही आला नाही. ही कुठलीही जादू नसून केवळ टेलिपॅथीच्या स्वप्नाचे तंत्रज्ञानाच्या सहाय्याने प्रत्यक्षात अवतरण असल्याचे या प्रयोगातील संशोधक गिउलिओ रुफिनी यांनी सांगितले. इलेक्ट्रोमॅग्नेटिक तंत्रज्ञानाच्या मदतीने दोन मेंदूंमध्ये संपर्क साधण्यात आल्याचे ते म्हणाले. मधल्यामध्ये या संदेशाचा अर्थ लावण्याचा कुठलाही प्रयत्न होऊ नये, यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

केवळ मेंदूतील हालचालींवरून दोन व्यक्तींना एकमेकांशी संपर्कसाधता यावा, या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यासाठी सध्याच्या तंत्रज्ञानाचा वापर करून एका व्यक्तीच्या मेंदूतील घडामोडी दूर अंतरावर असलेल्या दुसऱ्या व्यक्तीच्या मेंदूपर्यंत पोहोचविल्या जातात, असे या प्रयोगातील संशोधक आणि हार्वर्ड मेडिकल स्कूलमधील प्राध्यापक पास्कल लिओनी म्हणाले. यासाठी इंटरनेट हा एक महत्त्वाचा पर्याय आहे. मात्र इंटरनेटमधील टाइप करणे किंवा बोलण्याचा पर्याय वगळून दूरवर असलेल्या दोन व्यक्तींमध्ये थेट मेंदूपासून मेंदूपर्यंत संवाद झाला पाहिजे, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे लिओनी म्हणाले.














by - Maharashtra Times 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल