रविवार, २ फेब्रुवारी, २०२०

जिवा महाला यांच्या कुटुंबीयांना हक्काचे घर...


जिवा महाला यांच्या कुटुंबीयांना हक्काचे घर




म. टा. वृत्तसेवा, ठाणे

शिवाजी महाराजांच्या जीवाला जिवा देणाऱ्या जिवा महाला या शूरवीरांच्या तेराव्या वंशजांवर आर्थिक आपत्ती ओढवली असल्याची बातमी ‘महाराष्ट्र टाइम्स’ने २९ मेच्या अंकात सर्व प्रथम प्रसिद्ध केली होती. या बातमीची दखल घेत राज्यातील अनेक दानशुरांची पावले या कुटुंबाच्या मदतीसाठी सरसावली होती. यामध्ये टिटवाळ्याच्या विजय देसेकर यांच्या समवेत समाज कल्याण न्यासचे संस्थापक डॉ. सोन्या पाटील यांनी तात्पुरत्या स्वरूपात मदतीचा हात पुढे केला होता. मात्र नऊ ऑक्टोबर रोजी महाला यांच्या जयंती निमित्ताने या मंडळींनी महाला कुटुंबाला भेट देऊन त्यांच्या नवीन घराचे भूमिपूजन केल्याने महाले कुटुंबाना आता सुरक्षित हक्काचा निवारा मिळणार आहे.

ठाण्यातील शारदा एज्युकेशन सोसायटी महाला यांचे पंधरावे वंशज प्रतिक महाला याच्या शिक्षणाची पुढील जबाबदारी घेणार असल्याने आनंद विश्व गुरुकुल कॉलेजमध्ये महाला कुटुंबीय २८ मे रोजी आले होते. त्यावेळी राजश्री महाला यांनी आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याचे सांगितले होते. महाले कुटुंबीय सातारा जिल्ह्यातील कोंढवली या ठिकाणी लहानश्या झोपडीवजा मातीच्या घरात राहत होते. कुटुंबातील प्रकाश महाले यांना पाच वर्षापूर्वी अर्धांगवायूचा झटका आल्याने सध्या ते घरातच असतात. त्यामुळे या कुटुंबावर आर्थिक अंधार दाटला आहे. परिणामी कुटुंब सावरण्यासाठी हिरकणीसारख्या प्रकाश यांच्या पत्नी जयश्री सध्या कुटुंबाची जबाबदारी पेलत आहेत. दोन मुलांसह अर्धांगवायूमुळे अंथरूणाला खिळलेल्या पतीचा त्या सांभाळ करत आहेत.

समाजसेवक पाटील आणि त्यांच्या सहकार्यांनी नवीन घर बांधून देण्याची उस्फूर्तपणे जबाबदारी स्वीकारली आणि त्या दृष्टीने पावलेही उचलली आहेत. त्यामुळे या कुटुंबीयांना हक्काचा सुरक्षित निवारा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.


कायमस्वरूपी मदत केव्हा?
या कुटुंबाची परिस्थिती तेथील स्थानिक राज्यकर्ते, तसेच प्रशासकीय मंडळींना माहित आहे. मात्र तरीही या कुटुंबाकडे कानाडोळा केला जात आहे. कुटुंबाला तुटपुंजी मदत मिळत आहेच. पण कायमस्वरूपी मदत सरकारने केली तर कुटुंबाचा 'उदय' होईल, असा विश्वास जयश्री सपकाळ (महाल) यांना वाटतो.






BY - Maharashtra Times | Updated:Oct 13, 2017 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल