खुटबाव (ता. दौंड) येथील सौ. कमलताई शंकर परदेशी आणि त्यांच्या सहकारी महिलांनी शेतात मजुरी करताना स्वप्न पाहिले आकाशाला गवसणी घालण्याचे. त्यांनी अंबिका महिला औद्योगिक सहकारी संस्थेची स्थापन केली. त्याद्वारे आज 32 प्रकारचे घरगुती मसाले तयार होत असून, त्यांना यशस्वी बाजारपेठ मिळत आहे. मसाल्याच्या या यशाचा सुगंध सर्वत्र दरवळला आहे.
कमल परदेशी दुसऱ्यांच्या शेतात मोलमजुरी करीत होत्या. महिलांचा गट स्थापन करावा असे ठरवून त्यांनी दहा निरक्षर महिलांना एकत्र आणले.
कमल परदेशी दुसऱ्यांच्या शेतात मोलमजुरी करीत होत्या. महिलांचा गट स्थापन करावा असे ठरवून त्यांनी दहा निरक्षर महिलांना एकत्र आणले.
पंचायत समितीत 2004 मध्ये "अंबिका महिला बचत गटा'ची नोंदणी केली. प्रत्येक महिलेने महिन्याला शंभर रुपये बॅंक खात्यात जमा करण्याचे ठरले. खुरपणीच्या कामातून दररोज मिळणाऱ्या पैशातून तीन महिन्यांत तीन हजार रुपये जमा झाले.
भांडवलातून मसाला उद्योग सुरू करताना धने, मिरची पावडर आणि काळा मसाला बनविणे सुरू केले. गटविकास अधिकारी राजेंद्र पोकरे यांनी अन्य मसालेनिर्मिती प्रशिक्षण घेण्यास सुचविले.
खादी व ग्रामोद्योग विभागाकडे नववी किंवा दहावी पास विद्यार्थ्यांनाच प्रशिक्षणाची सोय होती. त्या अटीत न बसल्याने विभागाचे प्रशिक्षण घेतलेल्या एका महिलेकडून या महिलांनी प्रशिक्षण घेतले. सुरवातीला चक्क झोपडीवजा घरात मसालेनिर्मिती सुरू केली.
सुरवात खडतर प्रवासाने
कमलताई म्हणाल्या, की मसाले तर बनविले. पण विक्री कशी व कुठे करावी हे माहिती नव्हते.
आपला माल कोणीही नाकारला तर लाज वाटू द्यायची नाही. काही लोक आपली परीक्षा पाहताना ग्रामीण भागातील या महिला कशा बोलतात, माल कसा विकतात ते बघतील. तेव्हा डोक्यावर बर्फ ठेवल्याप्रमाणे त्यांना आपल्या मालाची कल्पना द्यावी. कोणी कमी किमतीत माल मागितला तर परवडत नाही असे न सांगता आपल्या मालाचे वेगळेपण पटवून द्यावे. तो माल कसा तयार केला, त्याला किती खर्च आला आहे असे सर्व मार्गदर्शन गटातील महिलांना करण्यात आले.
50 ग्रॅमच्या प्लॅस्टिक पिशवीतील माल पंचायत समिती, तहसील कार्यालयाच्या बाहेर उभे राहून विक्री सुरू केली. दुपारच्या सुट्टीत तेथील अधिकाऱ्यांना मसाले दाखविले. परंतु मोठी कॅरी बॅग, स्टिकर, लेबल नाही, पॅकिंग चांगले नाही आदी कारणांमुळे अनेकांनी नापसंती दाखविली.
पुढे सूचनेनुसार आकर्षक पॅकिंग, संपर्क क्र., बचत गटाचे स्टिकर लावले. त्यातून विक्रीत सुधारणा झाली.जिल्हा परिषदेतील महिला अधिकाऱ्यांनाही मसाल्यांचा सुगंध आवडून त्यांनी विक्रीस चांगला प्रतिसाद दिला. दरम्यान, भरतगाव, खुटबाव, यवत परिसरातील आठ बचत गटांच्या महिलांना संघटित केले. एकूण 103 महिला एकत्रित आल्या. अंबिका महिला औद्योगिक सहकारी संस्था स्थापन केली. राष्ट्रीय बॅंकेने त्यासाठी कर्ज दिले.
विक्रीची वाटचाल
कमलताई म्हणाल्या, की मुंबईत महालक्ष्मी सरस या बचत गटांच्या प्रदर्शनात पाच किलो कांदा-लसूण मसाला विकला. विक्रीचे थोडेफार कौशल्य मिळाले.
दादरला गर्दीच्या ठिकाणी उभे राहून माल विकू लागलो. दर दहा पंधरा दिवसांनी 12 ते 15 किलो मसाला मुंबईला नेऊन विकण्याचे गणित ठेवले. पॅकिंगवर संपर्क क्र. असल्याने अनेकजण मोबाईलवरून मागणी करू लागले. त्यांना कुरिअरने घरपोच डिलिव्हरी दिली. 2006 मध्ये दख्खन जत्रा प्रदर्शन, 2007 मध्ये "ऍग्रोवन'च्या प्रदर्शनात सहभागी झालो. काही दिवस दिघी, दत्तनगर येथील सोसायटीत चार-पाच किलो मसाला नेऊन विक्री करायचो. अशा प्रकारे विक्रीत वाढ होत गेली.
मसाला निर्मितीचे तंत्र
पुणे बाजार समितीतून कच्चा माल ठोक (होलसेल) दरात, तर धना शेतकऱ्यांकडून खरेदी केला जातो. प्रशिक्षणाप्रमाणे मसाले तयार करण्यासाठी जिन्नस प्रमाण व कृतीची वही आहे. मालाची गुणवत्ता टिकून राहण्यासाठी एका दिवसात एकच प्रकारचा मसाला तयार केला जातो. यासाठी चार ग्राइंडर मशिन आहेत. एकूण चाळीस ते बेचाळीस महिला मसाले बनविण्याचे काम करतात. प्रति आठ तासांच्या कामाचे 120 रुपये, तर याहून अधिक वेळेसाठी प्रति तास 20 रुपये मिळतात.
सर्वाधिक मागणी असलेले मसाले
- कांदा लसूण मसाला, बिर्याणी मसाला
- गोडा मसाला, मटण मसाला, गरम मसाला
- छोले मसाला, चहा मसाला
- पावभाजी व सांबार मसाला
पॅकिंग
- इलेक्ट्रॉनिक काट्यावर वजन करून मसालानिहाय दहा ग्रॅमपासून शंभर ग्रॅमचे पॅकिंग
- छोट्या आकाराच्या पॅकिंगमध्ये मालात भेसळ होण्याची शक्यता कमी राहते असे कमलताई म्हणतात.
- अन्नभेसळ परवाना असून जिल्हा उद्योग केंद्राकडे नोंदणी केली आहे. आता बारकोडिंगही करण्यात येते.
वैशिष्ट्यपूर्ण मालामुळे मिळाली संधी
पारंपरिक पद्धतीने मसाला बनविला जात असून, कोणतेही अन्य घटक मिसळले जात नाहीत. त्यामुळे घरच्या मसाल्याचा खमंग येतो. मुंबईत बचत गटांच्या प्रदर्शनात खासदार सुप्रिया सुळे यांनी कमलताईंच्या बचत गटाच्या मसाल्याचा नमुना बिग-बझार मॉलच्या अधिकाऱ्यांना चवीसाठी दिला. त्यानंतर आठच दिवसांत या गटाला आठ प्रकारच्या मसाल्यांची सुमारे दोन लाख साठ हजार रुपयांची मोठी ऑर्डर मिळाली. आता दर आठ दिवसांनी ऑर्डर मिळते.
महिन्याभरात त्याचे पेमेंट खात्यावर जमा होते. महिन्याला तीन ते साडेतीन लाख रुपयांचा माल मुंबईच्या मॉलला पाठवला जातो. नाशिक, रत्नागिरी, पिंपळगाव बसवंत, बदलापूर येथेही कुरिअरने माल पाठविला जातो. या मसाल्याला अनेक राष्ट्रीय, स्थानिक पुरस्कारांनी गौरविले आहे.
जागेची अडचण
सध्या उद्योगाची जागा लहान आहे. त्यामुळे जास्त मालाची ऑर्डर मिळाली तर अडचण येते. नाबार्डच्या माध्यमातून जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मर्केल यांनी कमलताईंच्या भेटीवेळी आमच्याकडून अपेक्षा काय विचारल्यावर तुमच्या देशात बाजारपेठ द्या, असे कमलताई म्हणाल्या. त्यानंतर जर्मनीची 50 टन मिरची पावडर, 24 टन सांबार मसाला, 26 टन जिरे पावडर अशी दर महिन्याची ऑर्डर मिळाली. परंतु जागेअभावी वर्षभरापासून ही मागणी पूर्ण करता आली नाही.
समस्या
- मागणीप्रमाणे पुरवठा करण्यासाठी भांडवल कमी पडते.
- मालवाहतुकीसाठी गाडी नाही.
- पॅकिंग मशिन उपलब्ध नाही.
- उपलब्ध मशिनरी कमी क्षमतेच्या आहेत
- एक क्विंटल मसाला दळता येण्यासाठी मोठे मिक्सर नाही.
उद्योगाचे अर्थशास्त्र
- महिन्याला एकूण बाराशे ते पंधराशे किलो मसालानिर्मिती, यासाठी सुमारे दोन लाख रुपये खर्च
- महिन्याला सुमारे अकरा हजार पाचशे रुपये निव्वळ नफा
- एक किलो मटण मसाला निर्मितीसाठी 450 रुपये खर्च, त्याची पाचशे रुपयांना विक्री. किलोमागे 50 रुपये मिळतात. 100 ग्रॅम पाकिटाला पस्तीस ते साठ रुपयांच्या दरम्यान दर मिळतो.
- चहा मसाल्याचे दहा ग्रॅमपासून शंभर ग्रॅमपर्यंत पॅकिंग. त्यास दहा रुपयांपासून शंभर रुपयांपर्यंत दर.
- मसाल्याचे किलोचे दर
कांदा- लसूण- 200 रुपये, मटण मसाला- 500 रुपये, चहा मसाला- 1000 रुपये, छोले मसाला- 450 रुपये, पावभाजी मसाला- 490 रुपये, सांबार मसाला - 450 रु. (होलसेल दर)
गटात प्रथमपासून कार्यरत महिला
कमल शंकर परदेशी, (अध्यक्षा), स्वाती मनोहर चव्हाण, शोभा पुंडलिक कांबळे, चंद्रकला सुरेश चव्हाण, लक्ष्मीबाई दिगंबर फणसे, रेखा राजेंद्र सकट, सिंधूबाई रामभाऊ गदादे, राणी सतीश वाघमारे, सुशीला अंकुश खरात, सिंधूबाई आनंदा जाधव.
उद्योजक होण्यासाठी स्वतःमध्ये घडविलेले बदल
- बाजारपेठेचा ट्रेंड ओळखून त्यात टिकून राहणे
- पॅकिंगविषयी अधिक माहिती मिळविली
- ग्राहकांची गरज लक्षात घेतली
- मालाची गुणवत्ता टिकविण्यावर भर दिला
- अधिकाधिक लोकांशी संपर्क साधला
- लोकांसमोर आत्मविश्वासाने अडचणी मांडल्या
संपर्क - कमलताई परदेशी, 9764558874
माहिती संदर्भ : अॅग्रोवन
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा