मंगळवार, ६ सप्टेंबर, २०१६

पितांबरीच्या यशाची लखलखीत पंचविशी! ....




  • ठाण्याशी बांधली जन्मगाठ
    आयुष्याची जन्मगाठच ठाण्याशी बांधली गेली आहे. १९६३ साली येथे जन्मलोे. शालेय शिक्षण महाराष्ट्र विद्यालयात झाले. लोकमान्य चाळीत राहत होतो. वडील सुरुवातीला रेल्वेत नोकरी करीत होते. त्यानंतर त्यांनी रिक्षा परमीट काढून देण्या कामाला सुरु वात केली. सुरुवातीला त्यांनी एक रिक्षा घेतली. ही रिक्षा काही काळ चालविल्यानंतर त्यांनी विक्र म ट्रान्सपोर्ट सुरू केले. विक्र म हे नाव अशासाठी की त्यात वामन, रवी, कला, मीनल अशी सगळ्यांची नावे येतील. त्यात कुटुंबांचा आपलेपणा दिसून येईल. वडिलांसोबत अनेक कंपन्यांत टेम्पो घेऊन जायचो. त्यावेळी अनेक कंपन्या पाहण्यात आल्या होत्या. कंपन्यांत जात असताना व्यवसाय करायचा, आपला स्वत:चा उद्योग सुरू करायचा अशी मनीषा मनात डोकावत होती. कामासोबत भटकंतीही खूप होती. वसईचा किल्ला असो की, खाडी किनारा पाहून झाले होते.
    संघाच्या शिस्तीतून घडत गेलो..
    वडील राष्ट्रीय स्वयंसेवक संघात होते. घरी आले की, मी शाळेत गेलो की नाही हे विचारण्यापेक्षा संघात गेला होता का, अशी विचारणा आधी केली जात होती. संघाचे शिबीर, त्यातील सहभागातून लहानपणापासून शिस्त अंगीकारली जात होती. तसेच लिडरशीपचा गुणही संघातून विकसित होण्यास मदत झाली. संघात एका मिनिटाला एकशे वीस पावले पडली पाहिजेत असा शिरस्ता होता. ही शिस्त व बारकावे लहानपणापासूनच संस्कार रूपाने आले. वडील समाजोपयोगी कसे राहावे या विचाराचे होेते. केवळ विचार करीत नव्हते. तर त्यांचा विचार ते कृतीतून करून दाखवित होते. रिक्षातून गरोदर स्त्रियांना मदत करणे अशा स्वरुपाची लहान दिसणारी पण त्यांच्या दृष्टीने मोठी असलेली कामे ते करीत होते. एकदा सेल्स टॅक्स आॅफिसमध्ये कपाट निघत नव्हते. त्यावेळी त्याठिकाणी गज नसलेल्या खिडकीतून हे निघू शकते अशी आयडिया मी त्यांना दिली होती. हे मी त्यांना निरीक्षणातून सांगितले. शाळेत मी खूप हुशार नसलो तरी मला इंजिनिअर व्हायचे होते. पण त्यासाठी प्रवेश मिळाला नाही. नोकरी करायची नाही हे मनाशी पक्के केले होते. माझे बाबा हे कडक शिस्तीचे असल्याने त्यांच्या व्यवसायाला हातभार न लावता दुसरा एखादा उद्योग सुरू करण्याचे ठरविले होते. त्यावेळी टेम्पो चालवित असताना धंदा जास्त व वाहने कमी असे व्यस्त प्रमाण होते. त्यानंतर ट्रकची संख्या वाढू लागल्याने बाबांनाही अस्थिर वाटू लागले होते.
    डोंबिवलीपासून सुरुवात...
    डोंबिवलीनजीक असलेल्या संदप गावात टाईल्स तयार करण्याचा कारखाना चालविण्यास घेतला. रिक्षा टेम्पोनंतरचे हे पहिले धाडस होते. श्री इंडस्ट्रीयल हे त्या कारखान्याचे नाव होते. दरम्यानच्या काळात पुण्यातील ए-वन कंपनीत प्रशिक्षणासाठी गेलो होतो. त्यावेळी आत्याकडे राहत होतो. दररोज सकाळी फॅक्टरीत जाऊन प्रशिक्षण घेत होतो. पण एवढे प्रशिक्षण पुरेसे नाही, असे वाटत होते आणि फार काळ आत्याच्या घरी राहणे मनाला पटत नव्हते.
    कंपनीत ग्रे व व्हाईट टाईल्स तयार करण्यास सुरुवात केली. बाजारात टाईल्सला मागणी जास्त होती. उत्पादन वाढविण्याच्या उद्देशाने काय करता येईल, यासाठी कारागिरांना बोलविले. त्यावेळी कारागिरांनी टाईल्स बनवताना आपण २०० मेषची पावडर वापरत असल्याचे सांगितले. त्यामुळे उत्पादनासाठी अधिक वेळ लागतो. त्याऐवजी थोडी जाड पावडर वापरल्यास उत्पादन निर्मितीचा वेग वाढेल. तेव्हा मॅनेजमेंटची फार माहिती नव्हती. त्यामुळे त्यांचे एक सॅम्पल स्वत:साठी काढून ठेवले नाही. या टाईल्स जेव्हा बाजारात विकल्या गेल्या त्यांच्या आठ दिवसांनी ग्राहक आरडाओरड करीत येऊ लागले. काय झाले हे जाणून घेतले असता त्या टाईल्स काळपट पडत असल्याचे समजले. त्या टाईल्सला खालील बाजूला डोळ््यांना दिसणार नाही इतक्या सूक्ष्म प्रकारची छिद्र राहिली होती. त्यामुळे उत्पादित केलेल्या टाईल्स या योग्य प्रकारे झालेल्या नव्हत्या. त्यावेळी सात ते आठ लाखाचा तोटा सहन करावा लागला. अकाऊंट व मार्केटींग पाहणारे कोणी नव्हते. त्यानंतर ठाण्यातील महाविद्यालयात मॅनेजमेंटला प्रवेश घेतला. जिल्हा उद्योग केंद्रातील विविध कोर्स, वाचन यातून उद्योजकतेचे धडे घेत होतो. बाबांनी मला सांगितले होते की, १२ हजार दर महिन्याला सुटले पाहिजेत. बाबांनी धोबी आळीत घर घेऊन ठेवले होते. कदाचित त्यांचे व्यवसायाचे नियोजन डोक्यात असावे. त्यांना ही दूरदृष्टी होती. बाबांचे एक मित्र अरविंद गोरे यांच्या सानिध्यात आलो. त्यांना अनेक फॉर्मुले माहीत होते. लिक्वीड सोप व डिटर्जंट पावडर तयार केली. ती ताज हॉटेलला पुरविण्याचे काम सुरू केले. त्यातून एक ते दोन लाखाची उलाढाल होत होती; पण पुन्हा नफा हा दोन हजार रुपयेच हाती येत होता. त्याकाळात १२ हजारांची नोकरी मिळणे कठीण होते. १२ हजार कसे कमावयचे असा पेच समोर उभा ठाकला होता.
    - शंभर कोटीची उलाढाल
    एकदा माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या कार्यक्र माला गेलो होते. त्यावेळी त्यांनी एक कोटी उलाढाल असलेल्या उद्योजकांना हात वर करा, असे म्हटले होेते. त्याठिकाणी एकाही मराठी उद्योजकाचा हात वर नव्हता. मागच्या वर्षी पितांबरीने एक कोटी रुपयांची उलाढाल पूर्ण केली. त्यावेळी मी स्वत: त्यांना भेटायला गेलो होतो. ही बातमी त्यांना सांगितली. त्यांनी त्यांच्या ‘गरूडझेप’ या पुस्तकात पितांबरीवर एक प्रकरण लिहून पितांबरीचा गौरव केला आहे. पितांबरी प्रॉडक्ट प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी आता सुरू आहे. सात-आठ लाखाचा तोटा झाला; पण बाबांनी कधी माझे खच्चीकरण केले नाही. नेहमी प्रोत्साहन दिले. त्यातून हा उद्योग उभा राहिला. उद्योजकांसाठी कोअर ग्रुप तयार केला आहे. उत्पादनाची क्वालिटी कधी ढासळू दिली नाही.
    पितांबरीच्या जाहिरातीवरुन महिलांचा मोर्चा
    पितांबरीची जाहिरात इतकी गाजली की, प्रशांत दामले यांनी ‘बायको गेली माहेरी काम करी पितांबरी’ ही जाहिरात केली. तेव्हा महिलांनी पितांबरी कार्यालयावर मोर्चा आणला होता. त्यावेळी ही जाहिरात म्हणजे महिलांचा अवमान नसून, त्यात पुरूष भांडी घासत असताना दाखिवण्यात आले, असे सांगितले. तेव्हा कुठे प्रकरण मिटले.
    आर्थिक स्वातंत्र्य महत्त्वाचे...
    आज तरुणांसाठी अनेक व्यवसायाचे पर्याय आहे. मात्र अनेकांना चित्रपट व मीडियाचे आकर्षण आहे. व्यवसायाच्या संधी त्यांनी निवडल्या पाहिजेत. व्यवसायात करिअर करणे कठीण आहे. आर्थिक स्वातंत्र्य नसेल तर वैचारिक स्वातंत्र्य अनुभवता येत नाही. घेताही येत नाही. माझे म्हणणे आहे की, व्यवसाय करा. व्यवसायात उडी घ्या. संधी खूप असल्या तरी पॅशन हवे. व्यवसायाचे पॅशनमध्ये रूपांतर करायला शिका. व्यवसायात बंधने नसतात. आपण आपले राजे असतो. कठोर परिश्रम घेण्याची मनाची तयारी झाली की यश आपोआपच आपल्याकडे चालून येते. व्यवसायात काम करून सुट्टी घेता येते. पितांबरी ४ टक्के टॅक्स भरते. नोकरी करून आपण सरकारला असा कितासा टॅक्स देणार?
    पितांबरीत ११५० कर्मचारी काम करतात.
    लाल रंगाची केळी आणि तिळाचे तेल आमचे प्रॉडक्ट जागतिक पातळीवर नेण्याचा विचार आहे. त्यानुसार आम्ही पावले टाकली आहे. इराणला तिळाचे तेल तयार करून पाठवितो. त्याठिकाणी आॅलिव्ह व राईसबेन हे तेल वापरले जाते. आता तिळाच्या तेलाला त्याठिकाणी चांगली मागणी आहे. नॅचरल सुगंध असलेली अगरबत्ती आता तयार केली आहे. हळद, तिखटाच्या व्यवसायात पदार्पण केले आहे. अग्रोमध्ये टिश्शू कल्चरल सुरू केले आहे. फ्रुट प्रोसेसिंगमध्ये जास्त मार्जिन नसते. लाल रंगाची केळी लावली आहेत. ती फेब्रुवारीपर्यंत बाजारात येतील. त्यात लोहाचे प्रमाण जास्त आहे. केळयाचे वेफर्स तयार केले जाणार आहेत.
    सामाजिक बांधिलकी कायम जपली मिळालेल्या नफ्यातून दरवर्षी आम्ही एक लाखाचा खर्च सामाजिक कार्यावर करतो. वाचनालय, करमणूक यावरही खर्च केला जातो. २५ वर्षांच्या पितांबरीच्या रौप्य महोत्सवी वाटचालीत अनेक काम करायचा मानस आहे.
    ( शब्दांकन : जान्हवी मौर्ये)
    >>> पितांबरीमुळे तांब्या-पितळेच्या भांड्यांना मिळणारा चकचकीतपणा आजही तसाच आहे. २५ वर्षांपूर्वी सुरू झालेली पितांबरीच्या निर्मितीची गोष्टही तितकीच रंजक आहे. व्यवसायाकडे मराठी माणूस वळत नाही. वळला तर तो टिकत नाही, असे आजही बोलले जाते. रवींद्र प्रभूदेसाई यांनी मात्र या दोन्ही गोष्टी शिस्त, परिश्रम आणि सतत नवे शिकण्याच्या जिद्दीतून खोट्या असल्याचे सिद्ध केले आहे. तांब्या-पितळेच्या भांड्यांना झळाळी देणाऱ्या प्रभूदेसाई यांच्या आयुष्याला नेमकी कशी काय झळाळी मिळाली, हे जाणून घेताना उलगडलेला त्यांचा प्रवास रंजक आणि थक्क करणारा आहे, तितकाच प्रेरणादायीही आहे...
    >>>ठाणे हे तलावाचे शहर आहे. तलावाची यादी जरी काढायची म्हटली तरी त्यात किमान ४० तलावांची नावे समोर येतील. हे तलाव सुशोभित करायचे म्हटले तर शहराला पर्यटनाचा एक लूक मिळेल. पर्यटन वाढू शकतो. बरीच उद्याने आहेत.
    तसेच शहरात मैदाने विकसित केल्यास आताची मुले जी संगणकावर गेम खेळण्यात गर्क झाली आहेत. त्यांना त्या वेडातून बाहेर काढता येईल. त्यांना मैदानी खेळाची आवड लावली पाहिजे. शहराला खाडी किनारा आहे. वाचनालये आहेत. रिसर्च सेंटर आहेत. या सगळ्यांचा विचार करून शहराचा विकास केल्यास शहर चांगले होऊ शकते.
    ठाणेकरांनी त्याचा विचार केला पाहिजे. रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या पाण्याच्या केवळ दहा टक्के वापर केल्यास शुद्ध पाण्याची बचत होईल. पाण्याचा गैरवापर टाळण्यास मदत होईल. स्पेन व पोर्तूगालमध्ये सायकल ट्र्क आहेत. शहरात सायकल ट्र्क तयार केल्यास प्रदूषणाला आळा बसेल.
    तसेच सायकलवरून फेरफटका मारून एक व्यायाम मिळेल. शहरात शांतता असेल तर चांगले विचार नागरिकांच्या मनात येतात. उद्योग वाढीस लागतात. शांतता नसेल तर चांगला विचार तग धरत नाही. शांतता निर्माण करणे हे यंत्रणांचे काम आहे , त्यांनी त्यात लक्ष घालावे असे मला वाटते.
    >>>
    ... आणि जन्म झाला, काम करी ‘पितांबरी’चा
    काहीतरी नावीन्य असलेला व्यवसाय सुरू करायचा होता. जिथे जात होतो तिथे तांब्या-पितळाची भांडी दिसायची. आई ही घरी कधी कधी भांडी घासयला सांगायची. तेव्हा तांब्याची भांडी घासताना खूप त्रास जाणवत होता. शिवाय चिंचेने भांडी साफ केली तरी त्यावर ओघळ राहत होती. ताजला पुरविणाऱ्या पावडरने तांब्या-पितळीची भांडी घासली तर ती अधिक चकाकतात, हे लक्षात आले. ती घरी वापरून पाहिली. तेव्हा मला अनेकांनी वेड्यात काढले. जमाना स्टिलच्या भांड्याचा आला आणि तू तांब्या-पितळेकडे चालला, असे बोलून नाउमेद करण्याचा प्रयत्न केला गेला.
    पण मनात नक्की ठरले की, ही पावडर विकायची. तेव्हा राज्याची लोकसंख्या सहा कोटींच्या घरात होती. पावडरच्या एका पाकिटाची किंमत दोन रुपये ठेवण्याचे ठरले. दहा टक्के लोकांनी ही पावडर विकत घेतली, तरी तीन कोटींपर्यंत टर्नओव्हर जाऊ शकतो. साडेबारा लाखाचे उत्पादन करावे लागेल. पावडरच्या एका पाकिटाची किंमत दोन रुपये ठेवण्याचे ठरले. हाच माल थेट ग्राहकांना विकण्याचे काम सुरू केले. त्यासाठी मदतीला होतकरू मुले घेतली. विक्र ीमागे दोन टक्के कमीशन त्यांना दिले. बाजारात माल विकत असताना ब्रॅण्ड, जाहिरात हा कन्सेप्ट महत्त्वाचा आहे, हे जाणून घेतले. त्यात नावीन्य हवे हे देखील जाणवू लागले. वाण्यांच्या दुकानात गेलो.
    तेव्हा मला मागणी जास्त येऊ लागली. इंडोकेम मार्केटिंग एजेन्सीमार्फत हे प्रॉडक्ट देशपातळीवर पोहचिवण्याचे ठरले. दहा लाख पुड्यांची मागणी आली. त्यानुसार पुड्यांची किंमत पाच रु पये करण्याचे ठरवले. नोकरी मागायला अनेक तरूण आले. त्यांना एक रुपया कमिशन देण्यात आले. असे करीत हळूहळू विस्तार वाढत होता. आज मितीस पाच लाख दुकानातून पितांबरी विकली जाते. त्यावेळी मेहुणे हे मार्केटिंग मॅनेजर होते. त्यांच्या मदतीने बार रूपेरी ही उत्पादने सुरू केली. आयुर्वेदीक हेल्थ केअरमध्ये बेबी मसाज आॅईल तयार केले आहे.












    संदर्भ स्रोत :- दैनिक लोकमत 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल