शुक्रवार, २ सप्टेंबर, २०१६

एकही संधी सोडू नका, संकटालाही संधी माना.. डी. एस. कुलकर्णी

परमेश्‍वराने आपल्याला नोकरी वाटायला हात दिले आहेत: डी. एस. कुलकर्णी

परमेश्‍वराने तुम्हाला नोकरीची भीक मागायला दोन्ही हात दिलेले नाहीत तर नोकरी वाटायला ते दिले आहेत हे लक्षात ठेवा. शिक्षण घेतानाच एखादा छोटा व्यवसाय करा म्हणजे तुम्हाला अनेक अनुभव मिळतील. व्यवसाय करताना ग्राहकांच्या खिशाला कधीही हात घालू नका, हातच घालायचा असेल तर ग्राहकाच्या हृदयाला  घाला. एकही संधी सोडू नका. संधिसाधू व्हा, संकटालाही संधीच माना आणि संधी मिळते तेव्हा प्रत्येकाच्या हृदयात घर करा, असा सल्ला डीएसके उद्योग विश्‍वाचे प्रमुख दीपक सखाराम  उर्फ डी. एस. कुलकर्णी यांनी दिला. 

ते म्हणाले, आयुष्यात संधी केव्हाही ही संधी सोडू नका, संकटालाही संधी मानाअगदी पहाटे साखरझोपेत असतानाही ती येते. प्रत्येक संधी आपण स्वीकारली पाहिजे. त्यासाठी संधिसाधू झाले पाहिजे. त्यासाठी आपण स्वत:वर विश्‍वास ठेवायला शिकले पाहिजे. कष्ट करायची आपली तयारी असली पाहिजे. आपण नशिबावर अवलंबून राहता कामा नये. नशीब फक्त जेवणातल्या मिठाएवढे लागते. जे धाडस करतात आणि संधीचा लाभ उठवतात त्यांनाच नशीब साथ देते. जे नशिबावर अवलंबून राहात नाहीत नशीब त्यांनाच साथ देते. 


आपल्याला इंग्रजी येत नाही म्हणून आपले काहीच अडणार नाही, हेही त्यांनी काही किस्से सांगून उपस्थितांना पटवून दिले. आपण मराठी आहोत हे देखील  एक मोठे क्वॉलिफिकेशन आहे. मराठी माणूस कटकट करेल, संतापेल आणि अगदी वेळ आल्यास शिव्याही देईल. पण तो कोणाला फसवणार नाही.  मराठी माणूस हा प्रामाणिक असतो. फक्त मराठी माणसाने आपल्या डोक्यावर नेहमी बर्फ ठेवला पाहिजे आणि तोंडात साखर. आपण कितीही मोठे असलो तरी दुसर्‍यासमोर वाकायला शिकले पाहिजे. प्रत्येकाशी आपल्याला संवाद साधता आला पाहिजे. आपले सगळे गणित शिक्षणाजवळ येऊन फसते.  शिक्षणाने आपले सगळे वाटोळे केले आहे. लॉडॅ मॅकेले याने निर्माण केलेल्या शिक्षण पद्धतीमुळे आपल्या देशात गुलामाच्या फौजा तयार झाल्या आहेत. त्याच्याशिवाय जे कोणी बुद्धिवंत तयार झाले ते सगळे परदेशात गेले आहेत. ही शिक्षण पद्धतीच पूर्णपणे बदलली पाहिजे. इंजिनिअर घडवताना त्याला स्लॅब कसा घालायचा हे शिकवले जाते. पण भिंती कशा बांधायच्या, घर कसे सजवायचे आणि त्याचे मार्केटिंग कसे करायचे हे शिकवले जात नाही. अशा शिक्षण पद्धतीचा काय उपयोग, असा सवाल त्यांनी केला. 
व्यवसाय करायला भांडवल लागत नाही. इंग्रजीवर प्रभुत्व नसले तरी चालते. हवी असते ती कष्ट करायची तयारी आणि इच्छाशक्ती. पहिल्यांदा मला एका बँकेने 500 रुपये कर्ज दिले. त्यावेळी मला माझ्या शिक्षकांनी सल्ला दिला, की बँकेचे मुद्दल आणि व्याज वेळेवर फेड म्हणजे तुला हीच बँक पाच लाख रुपये कर्ज देईल. आज माझ्या पाठीमागे देशातील आणि परदेशातील बँका लागल्या आहेत. तुम्हाला हवे तेवढे कर्ज देतो, असे त्या सांगतात. माझ्या आयुष्यात मी खूप लहान लहान कामे केली. छोटे छोटे व्यवसाय केले आणि त्यातूनच मी घडत गेलो. पेपर टाकायच्या नोकरीवर असताना एक तास उशीर झाला म्हणून मला माझ्या मालकाने थोबाडीत मारली आणि कामावरून काढून टाकले. त्या दिवशी मी निर्णय घेतला आपण कधीही नोकरी करायची नाही. त्यानंतर मी व्यवसाय करत गेलो आणि आज एवढे मोठे विश्‍व उभे केले आहे.  पहिल्यापासून मी ग्राहक हा केंद्रबिंदू मानून काम केले. त्यामुळेच व्यवसायात वाढ होत गेली. व्यवसाय करताना संकटे आली, तोटा झाला पण घाबरून गेलो नाही. संकटातही संधी असते, असे मानून काम करत गेलो आणि अनेक संधी मला मिळाल्या. आपण व्यवसाय करायचा असेल तर कर्ज काढायला पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला.

आपण महिलांना सन्मान दिला पाहिजे. माझी आई आणि पत्नीने मला खूप काही शिकवले आणि साथ दिली. आई तर माझी पहिली गुरू आहे. व्यवसायानिमित्त भेटायला येणार्‍या प्रत्येकाशी मी माझ्या पत्नीची ओळख करून देत असे. त्यावेळी तिने ठरवले, की यापुढे मीही तुमची ओळख करून देत जाईन. त्यानंतर तिने व्यवसाय केला. पत्नीच्या व्यवसायातील यश-अपयशाची कथाही त्यांनी सांगितली. यावेळी त्यांनी आपल्या आयुष्यातील अनेक उदाहरणे सांगून यश कसे मिळवावे आणि व्यवसायच का करावा हे पटवून दिले. 


प्रत्येक भारतीयाने नियम, शिस्त पाळून आणि उद्दिष्ट ठेवून काम केले तर आपण अमेरिकेलाही टक्कर देवू शकतो.







by - dainik Aikya...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल