शुक्रवार, २ सप्टेंबर, २०१६

यशस्वी महिला उद्योजक...

आडवळणाच्या काटेरी वाटेतील

मनात महत्त्वाकांक्षा असेल, ती पूर्ण करण्याची जिद्द असेल आणि त्याला घरातील मंडळींचे पूर्णत्वाचे पाठबळ असेल तर यश हमखास आहे. असंच एक व्यक्तिमत्त्व म्हणजे ‘महाराष्ट्र उद्योगिनी पुरस्कार २०११’ची विजेती आणि रसिका स्टिचवर्क, बुलडाण्याची प्रोप्रायटर रेखा व्यंकटेश बोरकर.

बुलडाणा शहर विदर्भातील थंड हवेचे शहर म्हणून पूर्वीपासून प्रसिद्ध आहे. रेल्वेमार्गावर नसलेले व आडवळणावरील तसेच औद्योगिकदृष्ट्या मागासलेले एक जिल्हास्थान. येथील मधुकरराव आणि नलिनी सोलापूरकर यांच्या तीन अपत्यांपैकी रेखा हे दुसरे अपत्य. लहानपणापासूनच घरी असलेल्या शिवणयंत्रावर काहीतरी शिवून बघण्याची तिला आवड. घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच. परंतु, अंथरूण पाहून पाय पसरण्याची सर्वांची वृत्ती. त्यामुळे घरात सर्वत्र समाधान. पुढे जाऊन तिने शिवणकामासोबत हलव्याचे दागिने बनवणे, ग्लास पेंटिंग, एंबॉसिंग करणे, चामड्याच्या व रेक्झीनच्या पर्सेस, पाऊचेस तयार करणे, वॅलेट्‌स, स्कूल बॅग्ज, एअर बॅग्ज तयार करून स्थानिक बाजारात पुरविण्याचे काम सुरू केले.

अर्थात हे सर्व करीत असताना शिक्षण देखील सुरू होते. शिक्षण व अभ्यास यातून उरलेला वेळ रेखा वरील छंद जोपासण्यात घालवीत असे. खेळातदेखील बॅडमिंटन व धावण्याच्या स्पर्धांत विशेष नैपुण्य प्राप्त करीत तिची राज्यस्तरावर निवड झाली. पुढे महाविद्यालयीन शिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करून बी. ए.ची पदवी प्राप्त केली.

महाविद्यालयीन शिक्षणाबरोबर रेखाने प्रथम वर्षापासून अल्पबचत एजंट म्हणून काम सुरू केले. अर्थाशी संबंध असूनही अर्थाचा अनर्थ न करता सचोटीने व्यवहार केल्यामुळे त्यास भरघोस यश मिळून आज जवळजवळ पंचवीस वर्षांहून अधिक काळ जाऊनही ते काम अद्यापही सुरू आहे. काहीतरी नवीन कल्पना व विचार, योग्य दिशेने प्रयत्न व प्रामाणिक व्यवहार यामुळे लोकसंग्रहातून तिला जिल्हा परिषदेच्या निविदेद्वारे गणवेष व नायलॉन दप्तरे तयार करण्याचे काम मिळाले. तसेच महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळांच्या आश्रमशाळांना निविदेद्वारे गणवेष शिवून पुरवठा करण्याचे कंत्राटही मिळाले. ज्या योगे एकावेळी ६०-७० कारागिरांना रोजगारही उपलब्ध झाला. उद्योगधंद्याकडे तिचा पहिलेपासूनच कल होता. त्यातच तिची कामाप्रति निष्ठा व मनमिळाऊ स्वभाव यामुळे भारतीय स्टेट बँक, बुलडाणा व जिल्हा उद्योग केंद्र, बुलडाणा येथील तत्कालीन अधिकारी व कर्मचारी यांच्या अनमोल साहाय्य व मार्गदर्शनात सुरुवातीला उल्लेखित पुरस्काराच्या कार्याचा पाया खणला गेला.

या दरम्यान, व्यंकटेश बोरकर यांच्याशी तिचा विवाह झाला. पतिदेवही हौशी व पत्नीच्या कामात मदत करणारे होते. त्यामुळे 

‘साथी हाथ बढानाएक अकेला थक जाएगा, मिलकर बोझ उठाना|’ 

यानुसार रेखाला तिच्या कामात गती मिळाली.
कुशल कारागिरांची चणचण व त्रासामुळे कामात कधीकधी अडचणी येत व त्याचा कामावर परिणाम होत होता. यातून रेखाचा मग स्वयंचलित यंत्र घेण्याचा विचार होऊ लागला. शोधाअंती सर्व विचारविनिमय करून तिने मग संगणक प्रणालीवर आधारित एम्ब्रॉयडरीचे स्वयंचलित सिंगल हेड मल्टीनिडल मशीन विकत घेतले. रेखाच्या शोधक व अभ्यासू स्वभावानुसार तिने व्यवसायासाठी आवश्यक संगणक सॉफ्टवेअरचे जुजबी ज्ञान मिळवून पंचिंगद्वारे डिझाईन्स करणे सुरू केले. यंत्रात काही बिघाड झाल्यास सतत कंपनीकडे संपर्क करावा लागत असे वा बाहेरच्या तज्ज्ञांवर अवलंबून राहावे लागत असे. यामुळे दोन-तीन दिवसतरी कामावर परिणाम व्हायचा. यामुळे ती यंत्रदुरुस्तीचेही ज्ञान शिकली.

कामाचे वाढते स्वरूप पाहता बोरकर दांपत्याने हिंमत करून १२ हेडचे मल्टीनिडल यंत्र घेण्याचे ठरवले. हे जपानी कंपनीचे यंत्र असून, याची किंमत पंचवीस लाख होती. रेखाबाईंचे आतापर्यंतचे चोख व्यवहार बघता बँकेने त्यांना तेवढे संपूर्ण अर्थसाहाय्य करण्याची तयारी दाखवली. परंतु, तिने फक्त दहा लाख रुपयांचे कर्ज घेतले व त्यात पदरचे पंधरा लाख रुपये टाकले. पुन्हा एकदा सर्वांनी तिला वेड्यात काढले. परंतु, रेखाने हिंमत न हारता नेटाने काम सुरू केले. कामाच्या व व्यवहाराच्या दृष्टीने संपर्काचे कार्यक्षेत्र अधिक विस्तारित केले. ग्राहकांच्या दृष्टीने बाहेरगावी, मोठ्या शहरांमधून कारखाने, प्रतिष्ठाने, बँका, संस्था तसेच व्यक्तिगत ग्राहकाशी सतत पाठपुरावा केला. नियमित कामे मिळू लागली. रेखाचा शारीरिक ताण वाढला होता परंतु व्यवसाय आकार घेऊ लागला. मागणीच्या पूर्ततेसाठी परप्रांतातून अनुभवी व कुशल कारागीर मोठ्या वेतनावर ठेवले. साडी व प्लेन बेडशीटवर कारागिरी आकर्षक होऊ लागली. शाळा, कॉन्व्हेंट, महाविद्यालये, बँक्स, सोसायट्या, कारखाने, प्रतिष्ठाने, हॉस्पिटल्स, हॉटेल्स इत्यादी ठिकाणाहून गणवेषावर लोगो तयार करून देण्याचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू झाले. विदर्भ, मराठवाडा व खानदेश परिसरात एम्ब्रॉयडरीचा एकमेव यशस्वी उद्योग आकाराला येत गेला.

रेखाच्या या आत्तापर्यंतच्या खटाटोप व प्रयत्यांमुळेच संपूर्ण महाराष्ट्रात साडी व बेडशीटवर एम्ब्रॉयडरीचे काम करणारा बहुधा एकमेव उद्योग म्हणून नावारूपाला आला. तिच्या कामातील गुणवत्तेमुळे मागणी वाढत जाऊन महिला ग्राहकांमध्ये लोकप्रियता वाढली. प्रशंसा होऊ लागली.

काम मनासारखे होत होते, परंतु ज्या कापडावर कलाकुसरीचे काम व्हायचे ते कापड परिसरातील व्यापारपेठांमध्ये तितके दर्जेदार मिळत नव्हते. रेखाने पुन्हा हिम्मत बांधली आणि थेट सूरत व अहमदाबाद येथे मिलमध्ये संपर्क साधून अधिक उच्च प्रतीच्या कापडाची आवक केली. प्युअर सिल्क, विविधरंगी कोसा सिल्कच्या ५०-६० छटा, साधारण तितक्याच इटालियन सिल्क छटा, गार्डन प्लेन व ब्रासो, ताश्पा इत्यादी प्रकार थेट मिलमधून उपलब्ध करून घेतले. त्याचा साठा संग्रही ठेवल्यामुळे कामाची प्रत सुधारत जाऊन ग्राहकीत वाढ झाली. महाराष्ट्रासहीत ओरिसा, छत्तीसगड, गुजरात, मध्यप्रदेश, आंध्र, कर्नाटक इत्यादी राज्यात मालाला मागणी मिळाली.

एम्ब्रॉयडरीच्या या कामासोबतच रेखा नऊवार लुगडे तयार शिवून देणे, बेबी साडी, नृत्याला लागणारे विविध ड्रेस शिवणे, पूजेचे सोवळे, अंतरपाट, तोरणे इत्यादी कामेही उत्कृष्ट करते. याबरोबरच मल्टिहेड कॉम्प्युटराईज्ड एम्ब्रॉयडरी मशीनची दुरुस्ती, हेडमधील घुटके बदलणे, निडल सेटिंग, इलेक्ट्रॉनिक पॅनेल्स बदलणे इत्यादी कामे रेखा स्वत:च करायला शिकली आहे. व्यवसायनिर्मिती, डिझायनिंग, व्यवस्थापन, प्रशासन, बँकेचे व्यवहार, अर्थव्यवहार, टॅक्सिंग, मार्केटिंग इत्यादी बाबीतही ती स्वत: लक्ष घालते.

‘‘मनुष्याच्या मनाच्या कॅमेर्‍यात प्रयत्नांचा रोल टाकल्याशिवाय यशाचे छायाचित्र हाती येत नाही’’ असा एक सुविचार आहे. रेखा बोरकरचे विचार, प्रयत्न, धावपळ, सचोटी या सर्वांचा परिपाक म्हणजे तिला मागील वर्षी ‘महाराष्ट्र उद्योगिनी पुरस्कार-२०११’ची प्राप्ती. संपूर्ण महाराष्ट्रातून तीन हजार महिला उद्योजकांमधून तिला ग्रामीण विभागातून ‘प्रथम क्रमांक व सुवर्णपदक’ मिळाले. या पुरस्काराचा मुख्य निकष वा प्रमाण ‘स्पर्धकाच्या मागे कोणतेही आर्थिक वा इतर पाठबळ नसताना त्याने शून्यातून निर्माण केेलेला व्यवसाय’ हाच होता. वयाचे अर्धशतकही न गाठलेली रेखा सांसारिक, कौटुंबिक, सामाजिक सर्वच आघाड्यांवर एक सबला म्हणून यशस्वी होऊन माहेर व सासर दोन्हीकडे सारखीच लाडकी व हवीहवीशी झाली आहे. सुरुवातीला हसणारे नंतर प्रशंसक झाले, ग्राहकी वाढली आणि मनामध्ये यशस्वी, सुखाची हळुवार जपणूक झाली.





किशोर इंगळे , यवतमाळ
by -  Tarun Bharat

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल