सोमवार, २९ ऑगस्ट, २०१६

फिटनेसचे आयुर्वेदीय कॅलेंडर


ऋतुमानाप्रमाणे आजूबाजूचे वातावरण बदलत असते. या वातावरणबदलानुसार आपल्या दैनंदिन क्रियाकर्मात, आहारात बदल करायला हवा. तरच बदलत्या ऋतूंचा परिणाम आपल्या शरीरावर होणार नाही. भगवान धन्वंतरी यांनी पाच हजार वर्षांपूर्वी "बॉडी हेल्थ मॅनेजमेंट कोर्स' आयुर्वेदाच्या रूपाने दिला. ऋतुबदलानुसार शरीर-मनावर होणाऱ्या परिणामांचाही यात अतिशय सूक्ष्मपणे विचार केलेला दिसतो. याच ऋतुबदलांनुसार आहार-विहाराचे केलेले हे "कॅलेंडर' अधिक निरोगी राहण्यासाठी उपयुक्त ठरेल.

"फिटनेस'साठी सर्व काही, म्हणजेच आरोग्य प्रवासासाठी सर्व काही; असे व्रत काळाने संपूर्ण विश्‍वाला घ्यायला लावले आहे. "वेल्थ इज हेल्थ' ही व्याख्या काही काळ राहिली खरी; परंतु "हेल्थ इज वेल्थ' हेच शाश्‍वत सत्य आहे. भगवान धन्वंतरीच्या आयुर्वेद शास्त्राने पाच हजार वर्षांपूर्वी हाच विचार ठामपणे मांडला आणि प्रत्येक मनुष्यप्राण्याला त्याचे एक-दोन नव्हे, तर सर्वच अवयव आरोग्यसंपन्न ठेवण्यासाठी एक प्रकारचा "बॉडी हेल्थ मॅनेजमेंट कोर्सच' त्यांनी दिला. आयुर्वेदाची व्याख्याच "स्वास्थस्य स्वास्थ्य रक्षणम्‌ ।' म्हणजेच आजारी पडण्यापेक्षा, आजारी पडल्यानंतर औषधांनी उपाययोजना करण्यापेक्षा आजारीच पडू नये, यासाठीची काळजी घ्यायला हवी. याचा विचार आयुर्वेदाने केलेला आहे. हा विचार मांडताना ऋतुमानाचा सर्वांगावर होणारा परिणाम-दुष्परिणाम याचाही सूक्ष्मपणे विचार केलेला आहे. इतकेच नाही, तर बाह्य गोष्टींचा मनावर काय परिणाम होतो याचाही विचार आयुर्वेदाने केलेला आहे. कारण मनावर दुष्परिणाम झाल्यास अनेक व्याधींची वाढ होते, ही बाब अनेक संशोधकांनी मांडलेली आहे. आणि म्हणूनच संपूर्ण विश्‍व आज निश्‍चित व नेमक्‍या दिनचर्येच्या शोधात आहे.
शरीराचे व मनाचे आरोग्य राखण्यासाठी प्रत्येक देशाच्या वातावरण बदलाप्रमाणे, तसेच व्यक्तीप्रकृतीप्रमाणे आहार व विहारात योग्य बदल करायला हवा. यासाठी त्या त्या ऋतूमध्ये उपलब्ध असणाऱ्या पदार्थांची निवड करणे आवश्‍यक आहे. कोणत्या ऋतूत कोणती पालेभाजी, कोणती फळभाजी खावी, गोड पदार्थ खावा वाटल्यास कोणता खावा, उसळीचे सेवन करताना, त्यात ऋतुमानाप्रमाणे बदल करावा काय, आहार-विहार-निद्रा यात ऋतुमानानुसार कसा बदल करावा, व्यायाम किती करावा, हे सगळे बदल आपल्या प्रकृतीप्रमाणे कसे करावेत, याचे सविस्तर विवेचन पुढे दिलेले आहे.
भारतात सहा ऋतू दिसून येतात. त्या प्रत्येक ऋतूमध्ये आरोग्याला साधक व बाधक असे वातावरण असते. त्याचा परिणाम वा दुष्परिणाम एक, दोन किंवा अनेक अवयवांवर होत असतो; परंतु ऋतूप्रमाणे आहार-विहार केल्यास व त्या त्या ऋतूतील त्रासदायक गोष्टी टाळल्यास शरीर निरोगी राहण्यास मदत होते. काही ऋतूंच्या आगमनाचे बदल हे महिन्यांप्रमाणे राहिलेले नाहीत; पण ऋतूंची विशिष्ट अशी लक्षणे आहेत. ती लक्षणे समजावून घेता येऊ शकतात. त्याप्रमाणे आपल्या आहारात-विहारात बदल केल्यास, ते अधिक लाभदायक ठरेल.

1. तालबद्ध हेमंत ऋतू
मार्गशीर्ष-पौष 
नोव्हेंबर - डिसेंबर 


आहार ः गोड, किंचित आंबट, स्निग्ध पदार्थ जास्त खावेत.
पालेभाज्या-फळभाज्या ः कोबी, फ्लॉवर, शेवगा, फरसबी, मेथी, पालक, चाकवत, अंबाडी, कांदे, रताळे, कांद्याची पात.
धान्य व उसळी ः चवळी, उडीद, मूग अधिक खावेत. काळा मसाला, लवंग खावी.
बलवर्धक आहार ः गूळपोळी, तिळाचे लाडू, पनीर, तुपाचे लाडू, चीज, मेथीचे लाडू, डिंकाचे लाडू, नारळाच्या वेलची घातलेल्या वड्या, बदाम-पिस्ते खावेत, मलई, रबडी, तूप, लोणी जास्त खावे.
मांसाहार ः मटन, चिकन, जड मासे इ.
वर्ज्य ः कोरड्या भाज्या, उदा. हरभरा, कारले, गवार, भेंडी, तोंडली, पालक, शेपू, काकडी, सुके मासे, मसूर, वाल, मटार खाऊ नयेत.
मद्य ः गूळ व पिठापासून बनविलेले मद्य अधिक थंड न करता घ्यावे.
रात्री चर्चा ः स्त्री-पुरुष संबंधाचे प्रमाण ऋतूप्रमाणे कमी-जास्त असावे. समागम हा व्यायाम ठरू शकतो. घरात धूप, सुगंधित फवारा यांचा उपयोग करून शय्याकक्ष ठेवावा. स्त्री-पुरुषांनी अंगास तेल लावून शरीरात वाढणारा वात नियंत्रणात ठेवून समागमाचा आनंद घ्यावा. मेदस्वी लोकांनी मैथुन हे व्यायामाचे साधन मानून या ऋतूत उपयोग करावा.
पाणी ः थंड पाणी टाळावे. पाणी किंचित गरमच प्यावे. स्थूल, मेदस्वी कफाचा त्रास असणाऱ्यांनी, सांधेदुखी असणाऱ्यांनी पाण्यात सुंठ टाकून उकळून पाणी गरमच प्यावे.
व्यायाम ः भरपूर व्यायाम करावा. व्यायामाप्रमाणे भोजन करावे. स्थूल-मेदस्वी व्यक्तींनी या ऋतूत अधिक व्यायाम करावा. मणक्‍याचे विकार असलेल्यांनी थंड हवेत व्यायाम करू नये. सर्दीचा त्रास असलेल्यांनी पाणी पिणे टाळावे व व्यायामापूर्वी नाकात तूप टाकावे. पंचज्ञानेंद्रियाच्या स्वास्थ्यासाठी वचादी तेल किंवा तीळ तेलाचे नस्य नाकात आठवड्यातून एकदा टाकावे.
अभ्यंग ः स्थूल माणसांनी त्रिफळा, हिरडा चूर्ण, हळद, नागरमोथा, शिकेकाईच्या जाडसर चूर्णाने शरीर घासावे. मेदाचे विलयन होऊन चरबी कमी होईल. कृश माणसांनी बदाम तेल, अश्‍वगंधा तेल, नारायण तेल मेद वाढविण्यासाठी वापरावे.
स्वास्थ्यासाठी पंचकर्म ः या ऋतूत मणक्‍याचे विकार असणाऱ्यांनी वाताच्या शमनासाठी बस्ती घ्यावा. कृश व्यक्तींनी बलवर्धक बस्ती घ्यावा. स्थूल माणसांनी, रुक्ष माणसांनी रुक्ष औषधांनी युक्त औषधी स्वेदन (शेक) घ्यावा.

2. मायावी शिशिर ऋतू
माघ - फाल्गुन 
जानेवारी - फेब्रुवारी 


आहार ः 
जास्त प्रमाणात उष्ण व स्निग्ध पदार्थ खावेत.
पालेभाज्या - फळभाज्या ः चाकवत, करडई, माठ, अंबाडीसारख्या उष्ण, स्निग्ध भाज्या तसेच रताळी, कांदा, कोबी, भेंडी, गाजर, सुरण खावे.
धान्य, उसळी ः उडीद, चवळी, मुगाची उसळ. (तूप+जिरे+ जास्त प्रमाणात वापरून कराव्यात)
बलवर्धक आहार ः खव्याचे पदार्थ, श्रीखंड, विविध प्रकारच्या खिरी.
मांसाहार ः मटण, चिकन इ.चे तूप टाकलेले सूप, तसेच कोळंबी, लॉब्स्टर, मांसल मासे जास्त खावेत. कच्चे अंडे दुधात टाकून तुपाबरोबर घ्यावे.
वर्ज्य ः कोरड्या, भाज्यांचा वापर टाळावा.
मद्य ः मध्यम प्रमाणात स्निग्ध मद्य जास्त थंड न करता घ्यावे.
रात्रीचर्या ः हेमंत ऋतूप्रमाणे समागम करावा. त्यानंतर गरम पाण्यात वा दुधात तूप टाकून घ्यावे. काळी द्राक्षे, स्ट्रॉबेरी यांचा उपयोग शय्याकक्षात जाण्यापूर्वी करावा.
पाणी ः गरम केलेले, गरमच पाणी प्यावे. वृद्धांनी आवश्‍यकतेनुसार औषधी तेलांचा अभ्यंग नियमित करावा.
व्यायाम ः हेमंत ऋतूप्रमाणे करावा. शिशिरात रुक्षता वाढत असल्याने अंगाला अश्‍वगंधा तेल, अमृतादी तेल, धन्वंतरी तेल लावून रुक्षता कमी करावी. व्यायामानंतर गरम पाणी प्यावे.
स्वास्थ्यकारक औषधे ः हेमंत ऋतूत वर्णन केल्याप्रमाणे सुरू ठेवावे. आलेपाक, लसूण यांचा नित्य वापर करावा.
पंचकर्म ः हेमंत ऋतूप्रमाणे.

3. कुसुमाकर वसंत ऋतू
चैत्र - वैशाख 
मार्च - एप्रिल 


आहार ः 
या ऋतूत कफाच्या विरोधी असा कडू, तिखट, उष्ण, रुक्ष, पचायला अतिशय हलका असा आहार घ्यावा.
पालेभाज्या - फळभाज्या ः सिमला मिरची, वाल, कोबी, पडवळ, माठ, वांगी, तुरीच्या शेंगा, केळफुले, गिलके, तांदुळजा, गाजर, कांदा, यांचा प्रयोग करावा. बीट, कोथिंबीर, काळे मिरे, धणे, जिरे जास्त वापरावेत.
धान्य, उसळी ः मूग, मसूर, मटार यांच्या उसळी कराव्यात.
बलवर्धक आहार ः मध, सुंठ किंवा खैराची साल टाकलेले पाणी रोज प्यावे. लोणीयुक्त ताक, सैंधव किंचित पादेलवण, धणे जिरे टाकून घ्यावे.
मांसाहार ः भाजलेले चिकन, कबाब, बारीक मासे, सुके मासे, खेकडा यांचा आहार आले, कांदा-काळे मिरे जास्त प्रमाणात टाकून घ्यावा.
वर्ज्य ः जास्त जड, आंबट/गोड, अधिक थंड आहार टाळावा. केळी/काकडी, दही, सीताफळ, काजू, संत्री, आइस्क्रीम, पनीर, लस्सी, उडीद, बटाट्याचे पदार्थ, खव्याची मिठाई घेऊ नये. खोबरे, मसालायुक्त मटण, चिकन, मोठे मासे टाळावेत. पालक, हरभरा, रताळी, फ्लॉवर, टोमॅटो, दुधीभोपळा, मुळा, डांगर अतिशय कमी प्रमाणात घ्यावे.
मद्य ः ऊस, द्राक्षे मधापासून तयार केलेले मद्य घ्यावे.
रात्रीचर्या ः हेमंत ऋतूप्रमाणे.
पाणी ः स्थूल, मेदस्वी, कफाचा त्रास, सांधेदुखी असणाऱ्यांनी पाण्यात सुंठ टाकून पाणी गरम प्यावे.
व्यायाम ः व्यायाम हा मेदनाशन करणारा असला, तरी या ऋतूत कफ वाढविणारा ठरतो. स्थूल, मेदस्वी व्यक्तींनी या ऋतूत व्यायामाचा अधिक प्रयोग करावा. पोहण्याच्या व्यायामानंतर शरीरातील कफ न वाढू देण्यासाठी त्रिफळा, हिरडा सारीवा, मुलतानी माती यांनी अंगास उद्धर्तन करावे. व नंतर गरम पाण्याने स्नान करावे. विविध प्रकारच्या योगासनांचा उपयोग या ऋतूत करता येतो.
अभ्यंग ः त्रिफळा चूर्ण, बेसनपीठ, हळद याचा वापर स्नानाच्या वेळी साबणाऐवजी करावा. यामुळे शरीरातील निर्माण होणाऱ्या घामाचा दुर्गंध नाहीसा होईल. कांतीवर सूर्याच्या किरणांचा परिणाम होणार नाही. त्वचेचा रंग टिकून राहील.
स्वास्थ्यकारक औषधे ः सर्दी/खोकला झाल्यास सितोपलादी चूर्ण, वेखंड पावडर, सुंठ चूर्ण, पिंपळी, ज्येष्ठमध यांपैकी कशाचाही वापर करावा. गर्भिणी, वृद्धांनी शतावरी, अश्‍वगंधा, विदारीकंद याचा वापर जरुरीप्रमाणे तूप व मधातून करावा.
पंचकर्म ः वसंत ऋतूत वाढलेला, द्रवीभूत झालेला कफ अनेक व्याधी निर्माण करतो. श्‍वास, दम लागणे, सर्दी खोकला, पोट फुगणे इ. प्रकृतीप्रमाणे निर्माण होते. पंचकर्मातील वमन कर्म या ऋतूमध्ये स्वास्थ्य तसेच कफविकार असलेल्या रुग्णांनी केल्यास वर्षभरातील होणाऱ्या कफाच्या विविध व्याधी टाळता येतात.

4. ग्रीष्म ऋतू
ज्येष्ठ - आषाढ 
मे - जून 


आहार ः मधुर रसाचे, स्निग्ध गुणाचे, हलके थंड व द्रव स्वरूपाचा आहार सेवन करणे. गोड पदार्थ अधिक खावेत. कैरीच्या पन्ह्याचा उपयोग करावा. द्राक्षे, खरबूज, लिंबू यांची सरबते अतिथंड न करता घ्यावीत. आइस्क्रीम, लस्सी हे पदार्थ या ऋतूत उपयोगी पडतात.
पालेभाज्या - फळभाज्या ः पडवळ, कोबी, पालक, तांदुळजा, वाल, शेवग्याच्या शेंगा, भेंडी, सुरण, कच्ची कळी, दुधी भोपळा, फणस. संत्री, मोसंबी, आंबे, द्राक्षे, फणस मनुका यांचा वापर करावा. आमरस करताना तूप वेलची, दूध यांचा वापर करावा.
धान्य, उसळी ः मूग व मसुराच्या उसळी, काकडी, टोमॅटो, बीट, कोशिंबीर, धने, जिरे, गूळ, आवळे यांचा कोशिंबीर स्वरूपात उपयोग करावा. टोमॅटो सूप, सोलकढी या ऋतूत उत्तम.
बलवर्धक आहार ः दूध, तूप, लोणी, मलई, श्रीखंड यांचा नियमित वापर करावा. पियूष हे पेयही यात उपयुक्त ठरते. दुधी भोपळ्याचा हलवाही बलवर्धक होतो. विविध प्रकारचे मोरंबे, साटोऱ्या, चिरोटे या ऋतूत जेवणात खावेत.
वर्ज्य ः कारले, मेथीची भाजी, उष्णता वाढविणारी असल्याने पूर्णपणे टाळावी; अन्यथा शरीरातील पित्त वाढून व्याधी उत्पन्न होईल. जास्त खारट, गरम पदार्थ टाळावेत. लसूण, मका, कुळीथ, सुके मासे, लहान मासे, कोळंबी, लाल मिरची, तिळाचे पदार्थ जास्त मीठ टाकलेली लस्सी वा ताक पिऊ नये.
मद्य ः या ऋतूत मद्य पूर्ण टाळावे. अगदी त्याच्या आहारी गेलेल्या व्यक्तींनी थोड्या प्रमाणात, भरपूर पाणी टाकून मद्यपान करावे.
पाणी ः पृथ्वीवरील व शरीरातील पाणी शोषणारा हा ऋतू होय. मोगऱ्याची, गुलाबाची फुले, वाळा, खदीर रात्रभर पिण्याच्या पाण्यात ठेवून दुसऱ्या दिवशी हे पाणी वापरावे. यामुळे उष्णतेच्या व लघवीच्या सर्व तक्रारी दूर होतात. पाणी निसर्गतः थंड व औषधी आहे हे विसरू नये. पाणी पिताना एकाच वेळी भरपूर प्रमाणात न पिता थोडे थोडे अनेक वेळा प्यावे.
व्यायाम ः शक्‍यतो व्यायाम टाळावा. योगासने करण्यास हरकत नाही.
रात्रीचर्या ः स्त्री-पुरुषाचे समागम हे श्रमपरिहार करणारे असते. परंतु हा श्रमपरिहार करताना श्रम घेऊन अशक्तपणा येऊ नये ही काळजी घ्यावी. या ऋतूत कामवासना कमी असते; परंतु चित्त स्वस्थ झाले असता आठवड्यातून एकदा चंदन, वाळा, मोगरा इ. अत्तरांचा मन उल्हसित करण्यासाठी प्रयोग करून समागम करावा.
स्वास्थ्यकारक औषधे ः या काळात उन्हामुळे होणारे आजार टाळण्यासाठी गुलकंद, मोरावळा यांचे नित्य सेवन करावे. मूत्राची जळजळ या त्रासासाठी तुळशीच्या बियांची दुधात केलेली खीर खावी. धने, जिरे पाण्यात उकळून ते पाणी प्यावे. जास्त उष्णता वाढल्यास सूतशेखर रस तूप-साखरेतून घ्यावा. स्त्रियांच्या तक्रारीसाठी चंद्रकला रस वापरावा.
अभ्यंग ः वात संचयाचा काळ असल्याने चंदनाचे तेल, मलई, लोणी यांनी अभ्यंग करावा. शक्‍यतो गार पाण्याने अंघोळ करावी.

5. पुष्पमंडितवर्षा ऋतू 
श्रावण - भाद्रपद 
जुलै - ऑगस्ट 

आहार ः 
मधुर, आम्ल-लवण रसाचे स्निग्ध पदार्थ, पचायला हलके उष्ण पदार्थ घ्यावेत. भूक कमी असल्याने एक वेळा जेवावे. या ऋतूत अपचनामुळे विविध व्याधी संभवतात.
पालेभाज्या - फळभाज्या ः पडवळ, भेंडी वांगी, दुधी भोपळा, लाल भोपळा, गिलके, दोडके, कारले, सुरण यांचा उपयोग करावा.
धान्य, उसळी ः मूग, गहू, ज्वारी, कडवे वाल, जुने वाल, तांदूळ, राजगिरा वापरावे. लसूण, कांदा, आले, दूध, तूप, कोथिंबीर, पुदिना, हिंग यांचा वापर जास्त करावा. कैरी, लिंबू, चिंच, सुके खोबरे, बीट हे वापरावे.
बलवर्धक आहार ः या ऋतूत अग्नी वाढवून नंतरच दूध, तूप यांनी युक्त विविध प्रकारच्या खिरी खाव्यात. बेसनलाडू, टोमॅटोचे सूप, विविध भाज्यांचे सूप, उकडीचे मोदक, आवळ्याचा-कैरीचा मोरंबा यांचा उपयोग करावा.
वर्ज्य ः पालक, कोबी सर्व पालेभाज्या, चणे, मटार, बटाटे, काकडी, आंबा, खव्याचे पदार्थ, सरबते, मका अधिक तळलेले पदार्थ, सुके मासे, थंड पाणी टाळावे. उपवासासाठी शेंगदाणे, भगर अत्यंत कमी प्रमाणात वापरावे. अळूची भाजी व सातूचे पीठ खाऊ नये.
मद्य ः किंचित आंबट, खारट, स्निग्ध, भूक वाढविणारे, द्राक्षापासून तयार केलेले मद्य, जुने मद्य घ्यावे. विविध अरिष्टांचा उपयोग केल्यास उत्तम.
पाणी ः पाणी दूषित असल्याकारणाने उकळूनच प्यावे. 1 चमचा मध व त्यानंतर पाणी असे या ऋतूत सर्वांनी घ्यावे. शरीरातील पाणी आजारामुळे कमी झाल्यास लिंबू सरबत गरम पाण्यातून वारंवार घ्यावे.
पाचक पेय ः या ऋतूत शरीरातील शक्ती तरतरी व भूक उत्तम ठेवण्यासाठी पाचक पेयाचा प्रयोग करावा.
व्यायाम ः स्थूल व मेदरोग असलेल्यांनी घरी नियमित 20 / 30 मिनिटे बैठका इ. सारखा व्यायाम करावा, व्यायामानंतर मध व पावसाचे पाणी (साठविलेले असल्यास) घ्यावे.
रात्रीचर्या ः ऋतूमध्ये बल कमी असते व शुक्रक्षय झाल्यास अधिक अशक्तपणा येतो; परंतु ब्रह्मचर्य आजच्या युगात पाळणे कठीण असल्याने व समागमाने मन प्रसन्न होत असल्याने, या सुखोत्पादक प्रवृत्तीसाठी आपल्या शक्तीनुसार वाताचा प्रकोप होणार नाही, असे बघून समागम करावा.
स्वास्थ्यकारक औषधे ः ऋतूतील अपचनाचा त्रास टाळण्यासाठी वर्णन केलेले पाचक पेय घ्यावे. तापाच्या प्रतिबंधासाठी पारिजातकाची पाने काढ्यात टाकावीत. आमपाचकवटी भास्करलवण चूर्ण, लघुसूतशेखर यांचा प्रयोग पोटाच्या विकारांसाठी करावा. लघुमालिनी वसंत गर्भिणीने घ्यावी.
पंचकर्म ः ज्यांचे जीवन धकाधकीचे, सतत फिरतीचे, अवेळी खाण्याचे असे आहे, त्यांनी तूप, तेल, दूध यांपैकी कोणतीही बस्ती अवश्‍य घ्यावी. बस्तीपूर्वी सर्वांगाला औषधी तेलाचे स्नेहन व औषधीयुक्त काढ्याची वाफ घ्यावी. बस्ती घेतल्यास वर्षभर वातविकार टाळता येतात. तसेच वजन वाढविणे, वजन कमी करणे, मणक्‍यांना व सांध्यांना निरोगी करणे, शरीरातील वातनाड्या उत्तम ठेवणे ही कार्ये होतात.

6. शरद ऋतू 
अश्‍विन-कार्तिक 
सप्टेंबर-ऑक्‍टोबर 

आहार ः 
किंचित गोड, कडू थंड पचायला हलका असा आहार घ्यावा.
पालेभाज्या-फळभाज्या ः पालक, तांदुळजा, चाकवत, कोबी, कारले, रताळे, केळफूल, फरसबी, सिमला मिरची, कोहळा, भोपळा यांचा वापर करावा. सफरचंद, अंजीर, आवळा, डाळिंब, मनुका या फळांचा वापर करावा.
धान्य, उसळी ः ज्वारी, बाजरी, मूग, मटार, तांदूळ, यांचा वापर जास्त करावा.
बलवर्धक आहार ः दूध, तूप, लोणी रोज घ्यावे. विविध प्रकारची मिठाई आपल्या पचनशक्तीनुसार घ्यावी. कोहळा पाक विशेषतः खावा. च्यवनप्राशही पचनानुसार खावा. आवळ्याचा मोरंबा, गव्हाची खीर खावी.
वर्ज्य ः पापड, कैरीचे लोणचे, लसूण, आले, उडीद, काळी मिरी, गरम मसाला, दही, लाल मिरची, कैरी, चिंच, आंबटफळे, लिंबू, मीठ, मका, मासे, कोळंबी, कोरड्या भाज्या हे पोट भरून खाणे टाळावे. दिवसा झोपणे टाळावे.
मद्य ः पित्त प्रकोप असल्याने किंचित गार, गव्हापासून बनविलेले मद्य प्यावे. मद्य हे अग्निदीपनासाठी घेतल्यास उपयुक्त ठरते.
पाणी ः या ऋतूत गरम पाणी स्थूल व मेदस्वी व्यक्ती सोडल्यास सर्वांनी टाळावे. जांभूळ, आवळा, चिक्कू, डाळिंब, कोकम यांचा रस, खसखशीचे/द्राक्षाचे सरबत घेऊन वाढलेले पित्तशमन करून स्वास्थ्य टिकवावे.
व्यायाम ः शक्तीप्रमाणे व्यायाम करावा. अधिक स्निग्ध आहार करणाऱ्या बलवान लोकांनी आपापल्या सहनशीलतेनुसार व्यायाम करावा.
अभ्यंग ः या ऋतूत नारळ, बदाम वा चंदनबला तेलाने अभ्यंग करावा. स्थूल व्यक्तींनी त्रिफळा, हिरडा, ज्वारीच्या पीठाने उद्धर्तन करून मेदाचा नाश करावा. लहान मुले व तरुणांनी चंदन चूर्ण, मुलतानी माती, काळी माती, तांदळाच्या पिठाच्या एकत्रित दुधातून अभ्यंग करून कांती उजळावी.
रात्रीचर्या ः चंद्रप्रकाशात थंड केलेले दूध विविध पदार्थ (काजू, बदाम, खसखस) टाकून प्यावे व समागमाचा आनंद लुटावा.
स्वास्थ्यकारक औषधे ः या ऋतूतील पित्तप्रकोप नष्ट करण्यासाठी सूतशेखर रस तुपातून उत्कृष्ट कार्य करतो. अनेक उष्णतेच्या विकारांवर चंद्रकला, मधुमालिनी वसंतरस उत्तम काम करतो.
पंचकर्म ः ज्यांचे जीवन धकाधकीचे, सतत फिरतीचे, अवेळी खाण्याचे असे आहे, त्यांनी तूप, तेल, दूध यांपैकी कोणत्याही प्रकारची बस्ती अवश्‍य घ्यावी. बस्तीपूर्वी सर्वांगाला औषधी तेलाचे स्नेहन करावे व औषधी काढ्याची वाफ घ्यावी. बस्ती घेतल्यास वर्षभर होणारे वातविकार टाळता येतात. तसेच वजन वाढविणे, वजन कमी करणे, मणक्‍यांना व सांध्यांना निरोगी करणे, शरीरातील वातनाड्या उत्तम ठेवणे ही कार्ये होतात.


दोन ऋतूंमध्ये आहार-विहार कसा असावा, या गोष्टीलाही आयुर्वेदात महत्त्व दिलेले आहे. ऋतुबदलाच्या या काळाला "ऋतुसंधी' असे म्हणतात. या काळात दोन्ही ऋतूंच्या मिश्र आहार-विहार पद्धतीचा अवलंब करावा. म्हणजे अचानक येणाऱ्या ऋतूचा त्रास होत नाही. उदा. थंडीचा काळ जाऊन उन्हाळा येताना एकदम थंड पदार्थ सेवन केल्यास त्रास होतो. थंडीत केला जाणारा अधिक व्यायाम, उन्हाळ्यात केल्यास त्रास संभवतो. त्यामुळेच या ऋतुसंधीचाही विचार या "कॅलेंडर'चे अनुकरण करताना करावा.








वैद्य विक्रांत जाधव
By: सकाळ साप्ताहिक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल