बुधवार, १० ऑगस्ट, २०१६

कल्पना लढवा, भविष्य घडवा


आज तुम्ही कोणताही जॉब करा, अथवा उद्योग करा. तुम्ही क्रिएटिव्ह असणं आवश्यक आहे. ‘आऊट ऑफ द बॉक्स’ विचार करण्याची ताकद ही तुमच्याकडे हवीच. तुम्ही किती क्रिएटिव्ह आहात. व्हर्सटाईल आहात यावर तुमचं करिअर निर्भर असतं. पण हे सर्व एका रात्रीत शक्य होत नाही किंवा उपजत असतंच असं नाही ते डेव्हलप करावं लागतं. कल्पनेला आयुष्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे. जगातील सर्वात श्रीमंत उद्योजक आणि यशस्वी व्यक्ती बिल गेटस् आपल्या यशाचं गुपित सांगताना म्हणतो की, असं काही तरी भन्नाट करून दाखवा जे जगात कुणाला सुचलं नसेल. कल्पना खूप ग्रेटच असायला हवी असं नाही, पण कल्पना करता येणं महत्त्वाचं. एक ‘आयडिया’
 

सबकुछ बदल सकती है। छोटय़ा छोटय़ा कल्पनांतून काही तरी भव्य दिव्य घडतं. मोबाईल ही अशीच भन्नाट कल्पना मार्टिन कुपर यांना सुचलेली. मोबाईल ही सामान्यांच्या खिशांना परवडेल की नाही अशी शंका वाटत असताना रिलायन्सने ५०० रुपयांत मोबाईल उपलब्ध करून ‘करलो दुनिया मुठ्ठीमें’ म्हणत प्रत्येकाच्या हातात मोबाईल (रिलायन्सचा) असेल अशी भन्नाट कल्पना लढवली आणि प्रत्येकाच्या हातात मोबाईल दिसू लागला.
‘रेडी टू इट’, ‘रेडी टू कुक’ सारखे फुडस् (खाद्यपदार्थ) बाजारात उपलब्ध झाले आणि त्यामुळे आज भारतीय पदार्थ परदेशातही चाखण्याची संधी उपलब्ध झाली. इंटरनेट ही अशीच भन्नाट कल्पना नाही का? कल्पनेची किती तरी उदाहरण देता येतील आणि या कल्पनेने जादू केली जादू.
कल्पनाही फक्त बुद्धिवंतांनाच सुचू शकते, असे नाही. कल्पना कोणीही करू शकतं. प्रसिद्ध लेखक रॉबिन शर्मा यांच्या मते Just keep innovating. Innovate at work, Innovate at home. There's no safety in being same person today that you were yesterday. keep challanging yourself to think better, do beter, be better.
बहुतेक वेळा उद्योगसंधी कशी शोधावी हा अनेकांसमोर प्रश्न असतो. अशा वेळेस कल्पना कामी येते. मग अशी कल्पना बहुतेकदा अशक्यही वाटेल. पण लोकांना रोज नवं हवं आहे. वेगळं हवं आहे. तोच तोचपणापेक्षा बदल हवा आहे. ब्रिटानियाच्या एका जाहिरातीत अशाच एका क्रिएटिव्ह अ‍ॅड मेकरने स्क्रिप्ट तयार केली आहे की, पैठणी गेली आणि जीन्स पँट, एकमेकांचे पाय ओढा म्हण झाली जुनी, सिनेमाने आपल्या केली ऑस्कर वारी सुरी, मग मारी जुनी का.. नव्या महाराष्ट्राची ही नवी मारी.. ‘ब्रिटानिया मारी गोल्ड.’ भरत दाभोळकर जाहिरात क्षेत्रात मोठ्ठं नाव ‘अ‍ॅटर्ली बटर्ली डिलिशियस.. अमूल’ अशा अमूलच्या किती तरी जाहिराती नेहमीच नवीन प्रकारे ते सादर करत असतात. उद्योग करायचा म्हटला की काही ना काही अडचणी असतात. प्रत्येक उत्पादन घ्या अथवा उद्योग घ्या. त्यामध्ये स्पर्धा असते, त्रुटी असतात. उदाहरण साबणाचं घ्या. लक्स, सिंथॉल, हमाम, लाईफबॉय, गोदरेज, पिअर्स, हिंदुस्थान लिव्हर्स आणि सो ऑन.. किती तरी कंपन्यांचे, किती तरी प्रकारचे साबण आहेत. पण प्रत्येकाचा चॉईस वेगळा असतो. प्रत्येक ग्राहकाची गरज, आवड, निवड वेगळी आहे. त्यामुळे ग्राहक हा साऱ्यांनाच मिळतो यात वाद नाही. पण स्पर्धा आहे. पण स्पर्धा आहे, त्यामुळे जोखीम नको, रिस्क नको असं म्हटलं तर उद्योग करताच येणार नाही. जागतिकीकरणाचे दूरगामी परिणाम संपूर्ण जगावर होत आहेत. गेल्या काही वर्षांत उद्योग क्षेत्रात भारताने प्रगती केली आहे. अनेक प्रथितयश भारतीय उद्योगांचा विस्तार जागतिक स्तरावर होत आहे. सेवा उद्योग भारतात प्रचंड मोठय़ा प्रमाणावर केले जात असल्यामुळे सव्‍‌र्हिस सेक्टरचं मोठं केंद्रस्थान आज देशात निर्माण झालं आहे. आजच्या तरुण युवा पिढीसमोर मोठय़ा प्रमाणावर व्यवसायाच्या संधी निर्माण झाल्या आहेत. आजची युवा पिढी भाग्यवान म्हणायला हवी, कारण पूर्वी कधी नव्हे इतके नानाविध अभ्यासक्रम, प्रशिक्षण आणि माहितीचे स्रोत त्यांच्यासमोर उपलब्ध आहेत.
उद्योग स्थापनेचे ध्येय पूर्ण करायचे असेल तर विचारपूर्वक ठराविक कालावधीत निर्णय घेणे खूप आवश्यक असते. चर्चा, विचारमंथन याला मर्यादा असणे गरजेचे आहे. तरुणांनी व्यवसाय करताना हे लक्षात घेतलं पाहिजे की, व्यवसाय जुनेच आहेत, पारंपरिक आहेत, पण काळानुरूप त्यात बदल आणले पाहिजेत. नावीन्यता आणली पाहिजे, त्याचं रूपडं बदललं पाहिजे. नवनवीन कल्पना लढवल्या पाहिजेत. मगच तुम्ही ग्राहकाला आकर्षित करू शकाल.
व्यवसाय सुरू करताना सध्याच्या स्पर्धकापेक्षा आगळा वेगळा विचार करून ग्राहकाला दर्जेदार उत्पादन व सेवा देणे, गुणवत्ता निर्माण करणे, वाजवी किंमत आकारणे, बचतीचा मंत्र जपणे, नफा कमी-जास्त झाला तरी न डगमगता विक्रीसाठी विविध योजना आणणे अशा अष्टपैलू उद्योजकीय गुणांच्या शिदोरीवर माझा उद्योग-व्यवसाय मी यशस्वी करीनच, असा विचार करायला हवा. उद्योगाच्या सर्वागीण विकासासाठी काळाची पावले ओळखून बदलांचा आढावा घेत बदललं पाहिजे. थोडक्यात आपली आवड, अभिरुची, उपलब्ध पर्याय, निवडीचे निकष जुळवून अजस्र माहितीतून माझ्यासाठी कोणता पर्याय निवडणं योग्य ठरेल, असा विचार करूनच उद्योगाचा शुभारंभ करावा, पण कल्पना जरूर लढवावी. कारण लक्षात ठेवा कल्पक उद्योजकच यशस्वी झाले. उद्योगात धोका पत्करण्याशिवाय गत्यंतर नसते. तरुणांनी उद्योग- व्यवसायाचा विचार करताना कमीत कमी गुंतवणुकीत व्यवसाय सुरू करण्याचा विचार करावा. व्यवसायात सातत्याने बदलत जाणाऱ्या वातावरणाशी जुळवून घेण्याची क्षमता स्वत:मध्ये असायला हवी. तसंच आपल्या व्यवसायामध्ये, उद्योगामध्ये, एकूणच आपल्या व्यावसायिक क्षेत्रामध्ये नवं काय घडतंय, काय बदल होत आहेत याची माहिती आपल्याकडे असणं आवश्यक आहे. कॉर्पोरेट क्षेत्राच्या बदलत्या मागणीनुसार स्वत:ला बदलणं आवश्यक आहे. लक्षात घ्या, कृती करणारी व्यक्तीच विकासाची उद्गाती असते. यामुळे उद्योग करणाऱ्या व्यक्तीला कष्ट, अडचणी, त्रास होणारच पण अशा उद्यमशील व्यक्तीच्या धडपडीमुळेच नवीन शोध, संशोधन आणि नवनिर्मिती होऊ शकते.
उद्योगात पदार्पण करताना पुढील गोष्ट लक्षात घ्या :
० उद्योगातच नव्हे तर इतर कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी प्रचंड मेहनत करणे आवश्यक आहे. मेहनतीला पर्याय नाही.
० यशस्वी होण्याची बहुतेकांची इच्छा असते, पण ध्येय निश्चिती अजिबात नसते. एमलेस धडपड निष्फळ ठरते हे लक्षात ठेवा. त्यामुळे तुमचं ध्येय ठरवा.
० कोणत्याही कामाची लाज बाळगू नका. हे काम माझे नाही असं म्हणूनच नका. सारं काही करायची तयारी असली पाहिजे. अहंपणाला बाजूला ठेवा. खरा उद्योजक तोच ज्याला आपल्या उद्योगातील ए टू झेड माहीत आहे.
० तुमच्यामध्ये आत्मविश्वास असायला हवा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सकारात्मक विचारसरणी. नकारात्मक विचारांना अजिबात खतपाणी घालू नका.
० वेळेचे योग्य नियोजन करणे महत्त्वाचे. (महिलांसाठी खास- घर आणि करिअर/ व्यवसाय या दोन्ही बाजू सांभाळताना दमछाक होतेच, पण ही दमछाक वेळेचे अचूक नियोजन केल्यास नक्कीच टळू शकेल.)
० दुर्दम्य इच्छाशक्ती, अचूक निर्णय आणि दूरदृष्टी यांचे संमिश्रण यशासाठी आवश्यक आहे.
० जीवघेण्या स्पर्धेशी टक्कर देण्यासाठी मानसिक संतुलन गरजेचे आहे.
० माझं हे स्वप्न आहे, असं केवळ म्हणून होत नाही तर त्या स्वप्नांना दिशा देण्यासाठी प्रयत्नांचे पंख लावावे लागतात. कल्पनाविलासात रमण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीवर भर द्या.
० सतत चांगली पुस्तकं वाचा, वाचन करा, वाचनाने माणूस समृद्ध होतो. चांगल्याचं अनुकरण करा.
० अपयश आलं तरी न डगमगता ते काम पुन्हा करण्याची मानसिक तयारी ठेवा.
० उद्योग सुरू केल्यावरच लगेचच सर्व सुरळीत होईल असं नाही. यशाची वाट ही खडतरच असते, पण यशानंतर मिळणारा आनंद अवर्णनीय असतो.
० काम करायचे म्हणून करू नका, तर कोणतेही काम अति उत्कृष्ट कसे होईल याकडे कल असू द्या.
० आपल्या यशात आपल्या शिवाय इतरांचा सहभाग, पाठिंबा असतोच. कुटुंब आणि समाजाचे नेहमीच ऋणी राहा.
शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या अनेक उद्योजकांचे अनेक आदर्श आपल्या अवती भोवती असतात. त्यांची आत्मचरित्रं, त्यांची पुस्तकं नक्कीच प्रेरणादायी ठरू शकतात. तसेच अशा यशस्वी उद्योजकांप्रमाणे आपणही एक होऊ ही वृत्तीच उद्योग-व्यवसायात यशस्वी होण्यासाठी उपयोगी ठरते. पण त्यासाठी अगोदर उद्योग-व्यवसाय सुरू करण्याचे धाडस करणे महत्त्वाचे असते. आपल्या उद्योग व्यवसायाच्या उभारणीने देशाच्या विकास प्रक्रियेत तुमचा खारीचा का होईना वाटा असेल. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असा, पण तुम्ही राहत असणाऱ्या विभागाच्या, गावाच्या, राज्याच्या, देशाच्या विकासामध्ये माझा खारीचा वाटा असला पाहिजे, अशी मानसिकता असेल तर नक्कीच राज्याच्या विकासाला, पर्यायाने देशाच्या विकासासाठी, ती उपयुक्त ठरेल.








सारिका भोईटे-पवार
फोन: ९८१९५९७१३२/ २५३७९९४४
.  
by - Loksatta

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल