बुधवार, १० ऑगस्ट, २०१६

यशाची भूक

मोठी स्वप्नं बरेच लोके पाहात असतात, पण त्या स्वप्नांना साकारण्यासाठी योग्य मेहनत करीत राहाणं हे कृत्य फार कमी लोकांकडून होत असतं. याचं प्रमुख कारण म्हणजे एखाद्या झपाटलेल्या माणसासारखं कोणत्याही परिस्थितीत ते लक्ष्य नजरेसमोर ठेवण्याची ते काळजी घेत असतात. मोठय़ा यशाची स्वप्नं पाहात त्यांना साकारण्याचं नेमकं तंत्र जर कोणाला अवगत झालं होतं ते म्हणजे सोयशिरो होन्डा यांना. अर्थात त्याचं रहस्य त्यांना बालपणी घडलेल्या एका अनुभवातून मिळालं होतं. होन्डा तसे अंगाने काटकच होते, पण आपण काहीतरी चमत्कारिक व आगळंवेगळं जगाला करून दाखवायचं हे एकदा लहान वयात त्यांनी ठरवलं. त्यांनी नजरेसमोर लक्ष्य ठेवलं की आपल्याला चांगलं पोहता आलं पाहिजे. वर्गातल्या एक विद्यार्थीमित्राचा त्याने त्याबाबत सल्ला घेतला. थोडय़ाशा उनाड असलेल्या त्या सहकाऱ्याने सल्ला दिला की, तू नदीवर जा आणि ‘एडका’ मासा गीळ व उडी टाक. तुला सहज पोहता
 

येईल. त्यांनी ते करून पाहिलं पण ते गटांगळ्या खात कसेबसे वाचले. पुन्हा येऊन त्यांनी अपयशाचं कारण विचारलं तेव्हा उत्तर मिळालं ‘तू केवढा आणि तू मासा केवढा छोटा गिळलास. जा आता मोठा मासा गिळून प्रयत्न कर.’ पुन्हा तसा प्रयत्न झाला तरी निष्कर्ष तोच होता. तिसऱ्या दिवशी स्वत:च जाऊन मासा गिळून प्रयत्न करू लागले. अकराव्या दिवशी जेव्हा त्यांना यश मिळाले तेव्हा त्यांना वाटले की आता आपण योग्य मासा गिळला. मोठे झाल्यावर मात्र त्यांना या यशाचं रहस्य उलगडलं, जे त्यांनी आपल्या व्यवसायाच्या यशाकरिता वापरलं.
गरीब परिस्थितीत जपान या देशात सोयशिरो होंडा यांचा जन्म झाला. परिस्थिती इतकी बिकट की आपल्या नऊ भावंडांपैकी पाच जणांचे कुपोषणाने झालेले मृत्यू त्यांनी पाहिले. वडील शेत मशिनींची दुरुस्ती करत व नंतर त्यांनी सायकल रिपेअरिंगचे दुकान उघडले. सोयशिरोचं बालपण मशिनींच्या सान्निध्यातच गेलं आणि त्यामुळेच त्यांच्याविषयी कुतूहल वाढत गेलं. लहान वयातच त्यांना शाळा सोडून एका गॅरेजवर काम करावं लागलं. जवळजवळ पाच र्वष ते मेकॅनिक म्हणून वावरले. मालकाच्या आज्ञेवरून ते आपल्या राहत्या ठिकाणी गॅरेज उघडण्यास आले असता त्यांना दोन प्रतिस्पर्धी लाभले त्यामुळे त्यांनी निश्चय केला की आपल्या गॅरेजमध्ये कठीणात कठीण समस्या सोडवली जाईल व ग्राहकांना कमी वेळात समस्यांचे निवारण करून मिळेल’ ही सेवा त्वरित उपलब्ध करून दिली. ग्राहकांना खूश व समाधानी ठेवण्याचं तंत्र ज्या व्यावसायिकाला जमतं तो लवकरच मोठा धनसम्राट उद्योगपती होतो. लोकांना चांगल्या सेवा देतानादेखील सोयशिरो नवनवीन प्रयोग करायचे. तिसाव्या वर्षीच लाकडांच्या स्पोक्सच्या ठिकाणी पेटंट केलेले धातूचे स्पोक्स चाकावर लावण्यास आरंभ केला.
नोकरीत अडकून न पडता त्यांनी पिस्टन रिंग बनवण्याचा कारखाना विरोध असताना सुरू केला. कारण त्यात त्यांना मोठा फायदा दिसत होता. पण त्यांना अपयश आलं. शेवटी योग्य ज्ञान मिळवण्यासाठी त्यांनी इंजिनीयरिंगला प्रवेश मिळवला व नेमके पिस्टनबाबतच्या वर्गानाच ते उपस्थित राहायचे. डिग्रीपेक्षा त्यांना योग्य व नेमकं ज्ञान महत्त्वाचं वाटत होतं. पुन्हा नव्याने व्यवसाय सुरू होतो न होतो तोच अमेरिकेचा बॉम्बवर्षांव जपानवर झाला व त्यात होंडांची फॅक्टरी भुईसपाट झाली. लोकांची परिस्थिती खालावल्यामुळे लोक सायकलचा वापर करू लागले. सायकलला मशीन लावून मोटर सायकल बनवण्याची कल्पना सुचली. मित्रांनी जोखीम न घेण्याचा वारंवार सल्ला दिला. १९४८ साली होंडा मोटर कंपनीचा जन्म झाला. बायकोचे दागिने विकून त्यांनी स्पेअर पार्टस् विकत घेतले व उत्तमोत्तम दर्जाच्या मोटर सायकल बनवण्यास आरंभ केला. एक एक करत ग्राहक मिळत गेले आणि पाहता पाहता व्याप वाढत राहिला. प्रतिकूल बिझनेस वातावरणातही त्यांनी कर्ज घेत पाच आणखीन फॅक्टरीज काढल्या व अधिक वेगाने पळणाऱ्या व कमी आवाज करणाऱ्या मोटर सायकलींचे उत्पादन सुरू केले. ४८ व्या वर्षी आपल्या व्यवसायाच्या आधारावर ते खूप खूप श्रीमंत झाले. नवीन तंत्र विकसित करत त्यांनी आपला कारोबार विश्व व्यापून टाकला. एकामागोमाग येणाऱ्या अपयशांमधून जो खचून जात नाही व विजयश्री खेचून आणतो असा माणूस सर्वार्थाने समृद्ध होतो आणि त्याचं परिपक्व उदाहरण म्हणजे सोयशिरो होंडा.




विलास मुणगेकर
संपर्क- ९८९२०७८७१३


by - Loksatta
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल