बुधवार, १० ऑगस्ट, २०१६

कमीत कमी गुंतवणुकीत करा पनीरनिर्मितीचा व्यवसाय


दुग्धपदार्थनिर्मिती व्यवसाय करू इच्छिणाऱ्या; परंतु या संदर्भात जुजबी माहिती असणाऱ्या वाचकांच्या प्रश्‍नांची उत्तरे आजच्या लेखात देत आहोत. या व्यवसायात येऊ इच्छिणाऱ्यांना या लेखाचा नक्कीच उपयोग होईल
डॉ. धीरज कंखरे  /   प्रा. सोमनाथ माने 
मागील अनेक लेखांतून मिळणारा प्रतिसाद पाहता दुग्धपदार्थनिर्मिती व्यवसायासाठी उत्सुक असणाऱ्या अनेकांसमोर काही समान पायाभूत प्रश्‍न उपस्थित होत होते. लहान स्तरावर व्यवसाय करता येईल का, गुंतवणूक जास्त आहे का; प्रशिक्षण, माहिती कोठे मिळेल, मार्केटिंग कसे करावे, मशिनरी उपलब्ध आहेत का, पॅकेजिंग कसे करावे इत्यादी अनेक प्रश्‍न येत होते. या सर्व प्रश्‍नांवर पुन्हा थोडीशी पण महत्त्वाची माहिती देत आहोत. येणाऱ्या पुढच्या लेखात इतर दुग्धपदार्थ, पॅकेजिंग, टिकवणे इत्यादी संबंधीची सविस्तर माहिती देऊ. दुग्धपदार्थ, प्रक्रिया या संदर्भात जुजबी माहिती असणाऱ्यांना व या व्यवसायात येऊ इच्छिणाऱ्यांना या लेखाचा उपयोग होईल.

प्रश्‍न - व्यवसायाच्या दृष्टीने कमीत कमी गुंतवणुकीत कुठला दुग्धपदार्थनिर्मितीचा व्यवसाय करावा? का?
उत्तर - पनीरनिर्मितीचा व्यवसाय कमी गुंतवणुकीत लहान स्तरावर करता येईल. पनीर उत्पादनासाठी पनीर प्रेसची (8-10 किलो एका वेळेस) किंमत साधारण 15 हजार रुपयांपर्यंत; तसेच दूध गरम करण्यासाठी (एका वेळेस 50-60 लिटर दूध) भांडी, इतर साहित्य इत्यादी दहा हजार रुपये खर्च अपेक्षित धरून अंदाजे 25 ते 30 हजार खर्चाची गुंतवणूक करावी लागेल. यात रेफ्रिजरेटरचा समावेश केलेला नाही. साधारणपणे एका प्रेसमधून एक ते दीड तासात 8-10 किलो पनीर उत्पादित होऊ शकेल. पनीर हा दुग्धपदार्थ अनेक हॉटेल्ससाठी आवश्‍यक असणारा पदार्थ आहे. रोजची विशिष्ट मागणी प्रत्येक हॉटेल्सची असते; तसेच लग्न, इतर समारंभात जेवणावळीत पनीर आवश्‍यक असते.
व्यवसायाच्या दृष्टीने खवा हा नेहमी आवश्‍यक असणारा कच्चा माल म्हणून वापरला जाणारा पदार्थ आहे. खव्यापासून गुलाब जामून, बर्फी इत्यादी अनेक प्रकारच्या मिठाई तयार करतात. लग्न समारंभादरम्यान खव्याची मागणी प्रचंड वाढते. खव्यासाठी खवा मशिन बाजारात उपलब्ध आहेत.

प्रश्‍न - दुग्धपदार्थनिर्मितीचा व्यवसाय करताना दुधातील भेसळ ओळखण्यासाठीचे सोपे तंत्र काय?
उत्तर - दुधातील भेसळ ओळखण्यासाठी एनडीडीबी या संस्थेने लहान, मध्यम, मोठे असे "किट' (पेट्या) बनवले आहेत. या किटमध्ये आवश्‍यक असणारी सर्व सामग्री पुरवण्यात येते. भेसळ शोधण्यासाठी लागणारी रसायन, टेस्ट ट्यूब, इतर काचेची भांडी, माहिती पत्रक इत्यादींचा समावेश असतो. खूप सोप्या व साध्या पद्धतीतून काही मिनिटांत भेसळ ओळखता येते. या किटची किंमत अंदाजे तीन हजार रुपयांपासून ते दहा हजार रुपयांपर्यंत आहे.

प्रश्‍न - दुग्धप्रक्रिया करताना किंवा लहान स्तरावर दुग्धपदार्थ तयार करताना दुधाच्या कोणत्या तपासण्या कराव्यात? यासाठी कमीत कमी काय आवश्‍यक आहे? खर्च किती?
उत्तर - दूध हा मुख्य कच्चा माल असल्यामुळे तयार होणाऱ्या पदार्थाची "क्वालिटी' दुधावरच अवलंबून आहे. यासाठी दूध चांगले आहे का ते तपासण्यासाठी दूध भेसळ ओळखण्याचे किट, फॅट तपासण्याची सोय, दुधाची डिग्री (Specific Gravity) तपासण्याची सोय असावी. थर्मामीटर, दुधाची आम्लता तपासण्याची सोय असल्यास चांगले. या सर्व तपासण्यांसाठीच्या सामग्रीसाठी 8 ते 10 हजार रुपये खर्च अपेक्षित आहे.

प्रश्‍न - दुग्धपदार्थनिर्मिती, दुधाची तपासणी इत्यादींसाठी प्रशिक्षण, माहिती कोठे मिळेल?
उत्तर - यासाठी आपापल्या भागात असणारी कृषी विज्ञान केंद्र, कृषी महाविद्यालयातील पशू व दुग्धशास्त्र विभाग, कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ, "ऍग्रोवन'मार्फत होणारी शिबिरे इत्यादींच्या माध्यमातून प्रशिक्षण व माहिती मिळू शकेल. वरील ठिकाणी प्रशिक्षणाचे कार्यक्रम वेळोवेळी आयोजित होत असतात. आणंद (गुजरात) येथील महाविद्यालयात, सकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर अशा ठिकाणी प्रशिक्षण आयोजित होत असतात.

प्रश्‍न - लहान स्तरावर दुग्धप्रक्रिया करून पदार्थ बनवताना कुठल्या-कुठल्या पदार्थांसाठी मशिनरी उपलब्ध आहेत?
उत्तर - लहान स्तरावर व्यवसाय सुरू करताना विविध दुग्धपदार्थ तयार करण्यासाठी लागणारी मशिनरी खालील तक्‍त्यात देत आहोत ः

मशिनरीचे नाव - उपयोग
1) खवा मशिन - खवा तयार करणे, बासुंदी तयार करणे, आइस्क्रीम मिक्‍स गरम करणे, दूध गरम करणे इ.
2) पनीर प्रेस - साकळलेल्या दुधाच्या गोळ्यावर दाब देऊन पनीर तयार करणे
3) क्रीम सेपरेटर - दुधातील साय जलदगतीने वेगळी काढणे, कमी फॅटचे दूध (स्कीम मिल्क) वेगळे करणे
4) श्रीखंड मशिन - लस्सी, ताकासाठी साखर, पाणी इत्यादी एकत्र करणे
5) न्यूमॅटिक पनीर प्रेस - जास्त प्रमाणात पनीर उत्पादनासाठी
6) पेढा मेकिंग मशिन - पेढा तयार करण्यासाठी
7) घी बॉयलर - तूप तयार करण्यासाठी

प्रश्‍न - ग्रामीण भागातून तालुका स्तरावरील उत्पादित मालाचे मार्केटिंग कसे करता येईल?
उत्तर - ग्रामीण भाग किंवा तालुका स्तरावरील उत्पादित पदार्थ उदा. खवा, पनीर हे त्या-त्या ठिकाणच्या हॉटेल्स, मोठ्या कार्यक्रमात जेवण बनवणारे आचारी यांच्यामार्फत माल विकता येईल. जवळच्या जिल्ह्याच्या ठिकाणी असणारी मोठी हॉटेल्स तेथील आचारी यांना माल विकून चांगला भाव मिळवता येईल. जिल्ह्यात असणाऱ्या लहान, मोठ्या शॉपिंग मॉलमधून उत्पादित पदार्थ चांगल्या पद्धतीने पॅक करून विक्रीस ठेवता येतील.

प्रश्‍न - वर्षभर दुग्धपदार्थांना, उत्पादित मालाला मार्केट राहील यासाठी काय करता येईल?
उत्तर - वर्षभरासाठी उत्पादित मालाला उठाव राहण्यासाठी नियोजन करणे आवश्‍यक आहे. वरील माहितीनुसार लग्न समारंभाच्या तारखांदरम्यान खवा, चक्का, पनीर पुरवता येईल. पनीरची अनेक हॉटेल्ससाठी वर्षभर मागणी असते. वर्षभरात येणाऱ्या अनेक सणांसाठीच्या तारखा लक्षात ठेवून त्या-त्या सणांकरिता विशिष्ट दुग्धपदार्थांची मागणी वाढते. दसरा, दिवाळी, ईद इत्यादी अनेक सणांकरिता नियोजन करता येईल; तसेच ऋतूनुसारदेखील मागणी वाढत असते. उन्हाळ्यात लस्सी, ताक, चॉकलेट, दूध इत्यादी मागणी व खप वाढतो. थंडीत दही, पनीर, मिठाई इत्यादींच्या मागणीत थोडी वाढ होतच असते.
याशिवाय जिल्ह्या-जिल्ह्यांत होणारी कृषीप्रदर्शने, महिला बचत गटांचे मेळावे, अन्नपदार्थांचे मेळावे इत्यादी ठिकाणी आपला स्टॉल उभारून विक्रीत भर घालता येईल.

प्रश्‍न : एक किलो दुग्धपदार्थांसाठी साधारणपणे किती दूध लागते?
उत्तर -
पनीर - 5.5 ते 6.0 लिटर म्हशीचे दूध
छन्ना - 5 ते 5.5 लिटर म्हशीचे दूध
खवा - 5.5 ते 6.0 लिटर म्हशीचे दूध
चक्का - 1.7 - 2 लिटर म्हशीचे दूध
दही - 1 लिटर गाईचे/म्हशीचे दूध
बासुंदी - 3 - 3.5 लिटर दूध (साखर वेगळी)
(दुधाचे प्रमाण दुधात असणाऱ्या फॅट व एसएनएफनुसार थोडे बदलू शकते.)

प्रश्‍न - दुग्धपदार्थनिर्मितीसाठी कुठले कायदे पाळावेत व निर्मितीसाठी कोणत्या परवानग्या आवश्‍यक आहेत?
उत्तर - दुग्धपदार्थनिर्मिती करताना पीएसएचे (प्रिव्हेन्शन ऑफ फूट अडलट्रेशन) कायदे लागू होतात. दुग्धपदार्थांच्या निर्मितीसाठी औषध व अन्न प्रशासन यांच्याकडून रीतसर परवानगी घेणे आवश्‍यक आहे. यासाठी आवश्‍यक असलेली कागदपत्रे, जमिनीचा सातबारा उतारा, निर्मिती करणार असलेल्या दुग्धपदार्थांची यादी इत्यादी व लागणारे शुल्क भरून परवानगी घेता येईल.

डॉ. धीरज कंखरे 9405794668
(लेखक कृषी महाविद्यालय, धुळे येथे कार्यरत आहेत
)


by -  Agrowon

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल