मंगळवार, ३० ऑगस्ट, २०१६

वेगळ्या वाटेवरचा नागराज



वेगळ्या वाटेवरचा नागराज

नागराज मंजुळे हे सोलापूर जिल्ह्यातील राज्यभर चर्चेत असणारे नाव. त्यातही त्याला आता एक वेगळे वलय मिळाले. यश मिळवू पाहणार्‍या तरुणाईसाठी आयडॉल ठरू शकेल असे काहीतरी नागराजमध्ये नक्कीच आहे. नागराज मंजुळे लेखक, दिग्दर्शक, कवी, अभिनेता आणि ज्याच्याविषयी लिहावे, गौरवावे असे बरेच काही.
 
नागराज मंजुळे हा सोलापूर जिल्ह्यातील, करमाळा तालुक्यातील जेऊर गावचा. त्याचा जन्म गावकुसाबाहेरील वडार समाजात झाला. वडार समाजात शिक्षणाचे प्रमाण अत्यंत कमी तरीही नागराजला शिक्षणाची आतून ओढ वाटायची. गावातल्या टुरिंग टॉकिजमधला चित्रपट पाहायला त्याला आवडायचे. व्हिडिओवरही एक रूपया देऊन चित्रपट पाहायला मिळायचे. शाळा बुडवून तो चित्रपट पाहायला जात असे. त्याला अमिताभ बच्चनचे चित्रपट आवडायचे. चित्रपटाचे वेड तिथूनच सुरू झाले. खरेतर नागराज याला गोष्ट ऐकायला खूप आवडायची. त्यांची मोठी आत्या, आई गोष्टी सांगायच्या. त्या ऐकताना नागराज त्या गोष्टींच्या जगात रमून जायचा. नागराज याचे पदवीपर्यंतचे शिक्षण जेऊर येथे झाले. पुढील शिक्षणासाठी तो पुणे विद्यापीठात शिकायला आला. मराठी विषयात एम.ए. करताना केशवसुत, मर्ढेकर, अरूण कोल्हटकर, नामदेव ढसाळ नव्याने भेटत गेले, अधिक जवळचे वाटत गेले. एम.फिल. करत असताना चित्रपटाचे विचार डोक्यात घट्ट बसलेले होते.
 
इथूनच सुरु झाला नागराजचा नागराज मंजुळे या ब्रँडनेमपर्यंतचा प्रवास. आज नागराज मंजुळे हे एक नाव नाही, व्यक्ती नाही, तर मराठी चित्रपटसृष्टीतल्या वेगळेपणाचा प्रवाह झाला आहे. नागराजने काढलेला पहिला चित्रपट ‘फँड्री’ नावापासून कथेपर्यंत, चित्रपटातल्या कलाकारांपर्यंत सारे काही वेगळे. मातीतल्या माणसाने मातीत मळलेल्या माणसाचे दुःख चंदेरी दुनियेतल्या रुपेरी पडद्यावर साकारले. तेदेखील त्याच मातीतल्या माणसांना सोबत घेऊन. त्यामुळे नागराजच्या चित्रपटांना एक वेगळी ओळख मिळाली. आताच्या ‘सैराट’ चित्रपटातली अकलूजची नायिका रिंकू राजगुरू असेल किंवा ‘फँड्री’ चित्रपटातला सोमनाथ ही पोरे काही बॉलिवूडमधल्या मोठ्या स्टारची मुले नाहीत. त्यांच्या नावामागे खास असे काय तर त्यांचे गावाकडले जगणे. नागराजला तेच मांडायचे होते. मग काय गावाकडल्या या पोरांना नागराजने उचलले आणि मातीतली ही पोरं रुपेरी दुनियेतल्या नभांगणातील तारे बनले.  नागराजच्या नावावर तीन चित्रपट आहेत. त्यात एक राष्ट्रपती पुरस्कार विजेता लघुपट ‘पिस्तुल्या’, परदेशातही आपल्या कलात्मकतेने वेगळी ओळख निर्माण केलेला ‘फँड्री’ आणि प्रदर्शनापूर्वीच चर्चेत असणारा ‘सैराट’ हा मराठी चित्रपट. या चित्रपटाची बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपटमेळ्यासाठी निवड झाली आहे. त्यामुळे गावाकडली कथा थेट सातासमुद्रापार पोहोचली.  नागराज मराठी चित्रपटसृष्टीत वेगळ्या वाटेवरचा पथिक. तसा तो यशस्वी  आणि सिध्दहस्त साहित्यिकदेखील आहे. त्याला अनेक पुरस्कारदेखील मिळाले आहेत.  त्याच्या ‘उन्हाच्या कटाविरुद्ध’ या कवितासंग्रहाला दमाणी साहित्य पुरस्कार मिळाला. पुण्याच्या मुक्तांगण परिवारातर्फे देण्यात येणारा डॉ. अनिल अवचट संघर्ष पुरस्कार. साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानचा वाग्यज्ञे पुरस्कार (26-12-2015). या यशानंतर नागराजने साहित्याच्या प्रांतातून चित्रपटाच्या आपल्या आवडीच्या प्रातांत झेप घेतली. लागोपाठ यशस्वी चित्रपट दिले. एक वेगळी ओळख निर्माण केली. स्वतःचा प्रेक्षकवर्ग निर्माण केला. नायकांचा चाहतावर्ग निर्माण होणे एकवेळ मान्य पण दिग्दर्शकांचा फॉलोअर, हे वेगळेच समीकरण. पण त्यातही नागराज यशस्वी झाला.
व्हॉटस्अप अन् सोशल मीडियावर नेटिझन त्याला फॉलो करत आहेत. त्याच्या चित्रपटाचा स्वतःहून प्रचार करत आहेत. ‘सैराट’ का पहावा यासाठी पोस्ट करत आहेत. 
 
नेटिझन्सनी ‘सैराट’ बघण्याची 17 कारणे  शोधून काढली आहेत.  1) जगभर गाजलेला ‘फँड्री’ बनवणार्‍या दिग्दर्शकचा दुसरा चित्रपट. 2) अजय-अतुल या प्रतिभावंतांचे संगीत. 3) बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 2016 मधील एकमेव मराठी चित्रपट. 4) बर्लिन आतंरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आजवर निवड झालेला केवळ चौथा मराठी चित्रपट. 5) हॉलिवूडमध्ये संगीत रेकॉर्डिंग झालेला ‘सैराट’ हा केवळ मराठीच नव्हे तर भारतातील पहिला चित्रपट. 6) रिंकू राजगुरु या नववीत शिकणार्‍या अकलूजच्या (सोलापूर) मुलीने पहिल्याच चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार पटकावला. 7) ‘पिस्तुल्या’, ‘फँड्री’ आणि आता ‘सैराट’ या तीनही चित्रपटांसाठी अनुक्रमे सूरज पवार, सोमनाथ अवघडे आणि रिंकू राजगुरु यांना सलगपणे राष्ट्रीय पुरस्कार मिळवून देऊन हॅट्ट्रिक साधणारा कदाचित एकमेव भारतीय चित्रपट दिग्दर्शक नागराज पोपटराव मंजुळे. 8) नवख्या नॉनअ‍ॅक्टर मुलांना घेऊन अफलातून अविश्‍वसनीय काम करून घेणारा दिग्दर्शक. 9) आतापर्यंत रिलीज झालेले अत्यंत दर्जेदार टीजर व प्रोमो, ट्रेलर. 10) आकाश ठोसर हा मराठी चित्रपटसृष्टीला गवसलेला योग्य वयातील हँडसम हीरो. 11) खर्‍याअर्थाने सिनेमॅटिक लँग्वेजचा वापर करणारा दिग्दर्शक. 12) जातीभेदाचे, विषमतेचे चटके सोसत तळागाळातून जीवघेणा संघर्ष करीत वर आलेल्या व तरीही कोणाबद्दल द्वेष वा मनात विखार न बाळगणार्‍या माणसाची अभिव्यक्ती सैराट. 13) प्रखर सामाजिक भान असणार्‍या माणसाची कलाकृती. 14) जातीपातीला, विषमतेला मुठमाती देण्यासाठी झटणारा दिग्दर्शक. 15) आपल्या अपेक्षा खोट्या ठरवत आपल्या गुळगुळीत झालेल्या अभिरुचिला धक्का देणारा व नव्याने चित्रपटाची भाषा समजून सांगणारा दिग्दर्शक. 16) नागराज पोपटराव मंजुळे बस नाम ही काफी है फिल्म देखने के लिए. 17) कुठल्याही जातीपातीच्या चौकटीत न अडकता माणूस म्हणून उन्नत भूमिका मांडणार्‍या माणसाची कलाकृती.सोलापूर जिल्ह्यातल्या जेऊरसारख्या गावातला नागराज सोलापूरकरांसाठी अभिमानाचाच विषय ठरला आहे.



























By pudhari | Publish Date: Apr 27 2016 8:21PM | Updated Date: Apr 27 2016 8:21PM

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल