हर्षद जहागीरदार.
वय - 32 वर्षे.
शिक्षण - डिप्लोमा (मेकॅनिकल इंजिनिअरिंग)
क्षेत्र - कंपन्यांचे ब्रॅंडिंग.
कौटुंबिक पार्श्वभूमी
वय - 32 वर्षे.
शिक्षण - डिप्लोमा (मेकॅनिकल इंजिनिअरिंग)
क्षेत्र - कंपन्यांचे ब्रॅंडिंग.
कौटुंबिक पार्श्वभूमी
उद्योगांची कोणतीही पार्श्वभूमी घरात नाही. घरातील वातावरण नोकरदाराचेच. घरची परिस्थितीही खूप श्रीमंतीची नव्हती. मात्र, मुलांची तळमळ समजून घेणारे पालक असल्याने हर्षदला उद्योजक बनता आले. नोकरीच कर आणि अमुक रक्कमच घरात आण, असा हेका त्यांनी लावला असता, तर व्हर्च्युऑसिटी ही कंपनी प्रत्यक्षात आलीच नसती.
यशाकडे वाटचाल कशी झाली
यशाकडे वाटचाल कशी झाली
नोकरी करताकरताच स्वतःचा उद्योग सुरू करायचे मनात ठरवत होतो. लहानपणापासून फटाके विकत असल्याने उद्यमशीलतेची आवड निर्माण झाली होतीच. कंपन्यांमध्ये सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत असल्याने बाहेरच्या जगात काय चालले आहे आणि कशाची गरज आहे याचाही अंदाज आला होता. त्यामुळेच एके दिवशी निर्णय घेतला आणि स्वतःची व्हर्च्युऑसिटी ही कंपनी स्थापन केली. आई-वडिलांनी माझी तळमळ समजून घेतली. मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पार्श्वभूमी, ग्राफिक्स डिझायनिंग, फोटोग्राफीची आवड या सर्वांमुळे कल्पक गोष्टी आणि व्यवसाय यांची सांगड घालण्याचा प्रयत्न कंपनीतर्फे केला. ग्राफिक्स, वेबसाइट करून देणे, ब्रोशर्स करून देणे अशी कामे करताकरता कंपन्यांना संपूर्णपणे नवीन ओळख निर्माण करून देण्याची कल्पना सुचली. त्यातूनच अनेक कल्पना आकाराला येत आता कंपन्यांना ब्रॅंड अधिक ठळक करून देणारी कंपनी अशी व्हर्च्युऑसिटीची ओळख तयार झाली, असे हर्षद सांगतो.
संघर्ष काय करावा लागला
संघर्ष काय करावा लागला
उद्योगाची कोणतीही पार्श्वभूमी नसल्याने सुरवातीच्या काळात खूप अडचणी आल्या. कंपनी सुरू केली, स्वतःचा कॉम्प्युटरही नव्हता. मित्राच्या घरी कॉम्प्युटरवर बसून सुरवातीला कामे केली. हळूहळू एकेक काम मिळत गेले. त्यातून स्वतःचा कॉम्प्युटर घेतला- तोही सेकंड हॅंड. नंतर मग योग्य सेटअप, चांगले ऑफिस या गोष्टी होत गेल्या. कंपन्यांना नवीन ओळख तयार करून देण्याचे ठरवले असले, तरी असे ग्राहक मिळणार कसे? मुळात अशी गरज असलेल्या कंपन्यांचा शोध घेणे किंवा आपल्याकडे आलेल्या कंपनीला ओळख बदलण्याची गरज पटवून देणे हे काम फार अवघड होते. शिवाय हे काम व्हर्च्युअल असल्याने कंपन्यांना भविष्यातील वाटचाल अमुक प्रकारे होईल, हे पटवून देण्याचेही आव्हान होते. शिवाय इतके कमी वय असल्याने दिग्गज कंपन्यांनी ती जबाबदारी टाकणे हेही अवघड होते. एकदम नवीन व्यक्तीवर कंपनीच्या ब्रॅंडशी खेळायला कोणती कंपनी धजावेल? पण भरपूर तयारी, अनेक नवीन कल्पना, बाजारपेठेचे उत्तम ज्ञान यांमुळे कंपन्यांचा कल बदलवणे हर्षदला सोपे गेले. कंपन्यांची मानसिकता बदलण्यासाठी स्वतःची मानसिकता बदलणे हेही सुरवातीच्या काळात कठीण होते.
यशाची कथा काय आहे
यशाची कथा काय आहे
सध्या कंपन्यांना वेगवेगळ्या प्रकारे सेवा देणाऱ्या अनेक कंपन्या असल्या, तरी संपूर्णपणे नवीन ओळख तयार करून देणारी आणि ती ओळख दृढ करण्यासाठी सतत त्या कंपनीच्या सोबत असणारी व्हर्च्युऑसिटी ही एकमेव कंपनी आहे. आर्मस्ट्रॉंग कन्व्हेअर्स, वेल्थकेअर कॉर्पोरेशन, इंडियन वाइल्डलाइफ हॉलिडेज, इन्फिनिटी सोल्युशन्स अशा कंपन्यांना व्हर्च्युऑसिटीने ओळख मिळवून दिली आहे. तिच्या या वाटचालीला या कंपनीकडून शाबासकीची थाप मिळाली आहे. दिल्लीतील ब्रॅंड्स ऍकॅडमी या कंपनीने उत्कृष्ट ब्रॅंडिंग सेवांसाठी सेवा गुणवत्ता पुरस्कार देऊन पावती दिली आहे. प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांच्या हस्ते नुकताच हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सुमारे पन्नास कंपन्यांसोबत हर्षदच्या कंपनीने काम केले असून, अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, इजिप्त, इटली आदी देशांतील कंपन्यांनाही व्हर्च्युऑसिटीने सेवा दिली आहे. हर्षदच्या कंपनीने सेवा दिल्यानंतर त्या त्या कंपन्यांचा नफा वाढला, त्यांच्याकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलला आणि त्यांना नवीन ओळखीची दृश्य फायदे मिळाले, ही हर्षदच्या कामाची पावती आहे.
वेगळेपण काय आहे
वेगळेपण काय आहे
एखाद्या कंपनीचे "ब्रॅंडिंग' करणे ही काही सोपी गोष्ट नसते- कारण ब्रॅंड हा खरे तर काहीच सांगत नसतो, तो उत्पादनाच्या गुणवत्तेशी निगडित नसतो. पण उत्पादनाची गुणवत्ता हा काही हर्षदच्या कंपनीचा विषय नव्हे. त्यामुळे ब्रॅंडची आभासी ओळख लक्षात घेऊन कंपनीला नवीन ओळख तयार करून देणे हे आव्हानाचे असते. त्याला त्यासाठी त्या कंपनीचा पूर्ण अभ्यास करावा लागतो. तिची उत्पादने कोणती, तिच्या स्पर्धकांची उत्पादने कोणती, या क्षेत्रात कोणते वेगळेपण उपयोगी ठरेल, उत्पादनांचा परिणाम कसा होतो, त्यांचे पॅकेजिंग कसे असते या सर्व गोष्टींचा अभ्यास करावा लागतो. त्यातून कंपनीच्या लोगोपासून उत्पादनांच्या पॅकेजिंगपर्यंत अनेक गोष्टींचे पर्याय हर्षदची कंपनी देते. हे सल्ले केवळ एकदा देऊन भागत नाही, तर कंपनीच्या संपूर्ण वाटचालीत हर्षद आणि त्याची टीम त्या कंपनीसोबत असते. हे सगळे हर्षदला कोणी शिकवले नाही. तो अनुभवातून हे शिकत गेला आणि त्याची स्वतःची आणि त्याच्या टीमची कल्पकता तर मदतीला होतीच.
पुढील दिशा, नियोजन काय आहे
पुढील दिशा, नियोजन काय आहे
ब्रॅंडिंगशी संबंधित सर्व सेवा एकाच छत्राखाली देणारी कंपनी ही ओळख हर्षदला दृढ करायची आहे. त्यासाठी गुंतवणूकदारांबरोबरच त्याची बोलणीही सुरू आहेत. कंपनीची दहा मजली इमारत असावी, प्रत्येक मजल्यावर एकेक सेवांची पूर्ण युनिट्स असावीत, असे त्याचे स्वप्न आहे. त्या दृष्टीने तो झटतो आहे आणि लक्ष्य साध्य करण्यासाठी दृढ निश्चय, निर्धार आणि कष्टांची तयारी असल्यामुळे त्याला हे नक्कीच साध्य होईल.
तरुणांना काय सांगाल
तरुणांना काय सांगाल
आपल्याकडे भरपूर संधी आहेत. आपल्याकडे मॅक्डोनल्डही खपतो आणि वडापावही खपतो. त्यामुळे संधीच नाहीत, असे म्हणत रडत बसू नका. तुम्ही तुम्हाला ज्या गोष्टीची पॅशन आहे, कल्पकता आहे, त्यात मनापासून काम करा, तुम्हाला त्याची चांगली फळे नक्कीच मिळतील.
-मंदार कुलकर्णी
Tags: साप्ताहिक सकाळ
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा