बुधवार, १० ऑगस्ट, २०१६

यशस्वी करिअरचा फण्डा

आजच्या युगात ‘करिअर’ या शब्दाला एक आगळेवेगळे महत्त्व प्राप्त झालं आहे. ‘करिअर’ ही संकल्पनाच मुळी आयुष्यातील अविभाज्य भाग झाली आहे.
बदलत्या तंत्रज्ञानाबरोबर बदलत्या काळाच्या गरजेप्रमाणे काम करण्याच्या पद्धतीतदेखील बदल झाला आहे. पूर्वी प्रामुख्याने शिक्षणाच्या तीन शाखा होत्या-विज्ञान, वाणिज्य आणि कला शाखा आणि मग त्याच्या अनेक उपशाखा होत गेल्या. इंजिनीयरिंग, मेडिकल, अ‍ॅडव्हर्टायझिंग, इव्हेंट मॅनेजमेंट, हॉटेल मॅनेजमेंट, सीए, आयसीडब्ल्यूए, फॅशन डिझायिनग असे वैविध्यपूर्ण पर्याय निर्माण झाले आहेत. आजचा जमाना हा स्पेशलायझेशनचा जमाना आहे.
आज कोणत्याही क्षेत्रात तुम्ही असाल तरी त्या क्षेत्रातील ज्ञान अवगत करून ते सतत अपडेट ठेवणे गरजेचे झाले आहे.
 

लर्निग प्रोसेस, सतत नवनवीन गोष्टी शिकत राहणे आणि त्या शिकून आत्मसात झाल्यावर आणखीन नवनवीन तंत्र येत असेल तर ते अपडेट करणे. जुने स्किल्स लक्षात ठेवून नवनवीन स्किल्स शिकणे. आज स्किल सेट बदलला आहे. कार्यपद्धतीत बदल झाला आहे आणि बदलाबरोबर बदलण्याशिवाय पर्यायच नाही.
संगणक क्रांतीने मानवी जीवनात केवढा मोठा बदल घडवून आणला. मोबाईलसारखी चैनेची वस्तू आज सर्वसामान्यांच्या हातात आहे. नवनवीन शिकणे, नवनवीन आत्मसात करणे, तंत्रज्ञानाचे अवलोकन करणे आणि बदलाबरोबर स्वत:मध्ये बदल आणणे, जुन्याबरोबर नवीन स्वीकारणे अपरिहार्य आहे.
बदलत्या युगात करिअरच्या संकल्पना बदलत चालल्या आहेत. केवळ पदवी, द्विपदवीधर होणे म्हणजे ‘करिअर’ ही संकल्पना न राहता तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये आहात त्या क्षेत्राचा सखोल अभ्यास करून, त्यामध्ये यशस्वी होणे हे महत्त्वपूर्ण झाले आहे. आजचे विद्यार्थीही करिअरच्या बाबतीत चोखंदळ झाले आहेत. डॉक्टर, इंजिनीयर, वकील एवढय़ापुरतंच ‘करिअर’चे क्षितिज मर्यादित राहिलं नसून, त्याच्या कार्यकक्षा दिवसेंदिवस रुंदावत आहेत. त्यामुळे अनेक क्षेत्रांमध्ये नवनवीन करिअरच्या संधी निर्माण झाल्या आहेत.
आज माहिती तंत्रज्ञानामुळे जबरदस्त माहितीचा साठा आपल्यासमोर उपलब्ध आहे. देशात, परदेशात असणाऱ्या कोर्सेसची माहिती इंटरनेटद्वारे क्षणार्धात मिळते. करिअरच्या संधी वाढत आहेत पण अमुक एकाने हे करिअर केले किंवा तो इंजिनीयरिंगला गेला, सध्या आय. टी.मध्ये बूम आहे किंवा कोणी सांगितले म्हणून मी हे करिअर करते/करतो असं करण्यापेक्षा विद्यार्थ्यांनी एखाद्या क्षेत्रात करिअर करायचे ठरवले तर त्यांनी तर आपली अभिरुची, क्षमता, बौद्धिक कुवत, समायोजन, व्यक्तिमत्त्व याचा परिपूर्ण विचार करावा.
बहुतेक पालक आपली स्वप्ने आपल्या पाल्याच्या करिअरमधून साकारण्याची इच्छा बाळगतात. आपणाला जे मिळवता आले नाही, जे करता आले नाही ते आपल्या पाल्याने केले पाहिजे, तेच क्षेत्र निवडले पाहिजे असा बहुतेकांचा अट्टहास असतो, आपल्या पाल्याने आपल्या म्हणण्याप्रमाणे, कल्पनेने करिअरची निवड करावी असा विचारही बहुतेक पालक करतात. आपल्या पाल्याची बुद्धिमत्ता, आकलनक्षमता, निर्णयक्षमता, बलस्थाने त्या करिअरसाठी सुयोग्य आहेत का याचा विचार पालकांनी करणे गरजेचे आहे. तुमच्या पाल्यामध्ये काय गुण आहेत, त्याची क्षमता, त्याचा कल कुणीकडे आहे हे जाणून घेण्यासाठी त्याची अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट (मानशास्त्रीय अभियोग्यता चाचणी) घेणे आवश्यक आहे, अशा प्रकारची अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट विविध संस्था घेत असतात. करिअर कोणते निवडायचे याबद्दल मुलामुलींच्या मनात नेहमीच गोंधळाची स्थिती असते. अगदी पदवीच्या शेवटच्या वर्षांलादेखील आपण यापुढे काय करायचे, कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे या बद्दल विद्यार्थ्यांनी ठाम विचार केलेला नसतो. त्यामुळे योग्य वयात करिअरचा निर्णय घेणे महत्त्वपूर्ण ठरते.
करिअरचे नियोजन करताना अचूक निर्णय घेणे खूप महत्त्वाचे असते. कारण या एका निर्णयावरून आयुष्याची दिशा ठरत असते. भविष्यातील संधी ठरवताना नियोजन महत्त्वाचे असते. नियोजन सूक्ष्म आणि योग्य असेल तर संधी सुटत नाही.
विद्यार्थ्यांना आवर्जून सांगावेसे वाटते, करिअरच्या बाबतीत यशस्वी होण्याची, काही तरी वेगळं करून दाखवण्याची मनीषा, इच्छा खूपच कमी जणांमध्ये असते. त्यामुळे प्रत्यक्षात खूप कमीजण यशस्वी होताना दिसतात. प्रत्येक व्यक्तीमध्ये यश मिळविण्यासाठी आवश्यक असणारे सुप्त गुण असतात, पण गरज असते त्या सुप्त गुणांचा विकास करण्याची. देवाने यश मिळविण्यासाठी आवश्यक असणारी मानवी ताकद आपणा सर्वाना बहाल केली आहे. दृढ निश्चय संकल्प आणि तीव्र इच्छाशक्तीच्या जोरावर कोणीही यशस्वी होऊ शकतो. निवडलेल्या क्षेत्रात झोकून देण्याची वृत्ती, अभ्यासातील नीटसपणा,आपले उद्दिष्ट योग्य वेळेत योग्यरीत्या पूर्ण करण्याची वृत्ती आणि अपयश आले तरी न डगमगता ते काम पुन्हा करणारी, आपल्या अपयशाचे खापर दुसऱ्यांवर न फोडणारी व्यक्ती यशस्वी होऊ शकते.
‘मी हे करू शकेन’, ‘मला हे शक्य आहे’, ‘माझे हे काम होणारच’ अशी सकारात्मक वृत्ती असेल आणि त्याला प्रयत्नांची जोड असेल तर नक्कीच यशोशिखर गाठता येईल. प्रत्येक ‘अशक्य’ गोष्ट ‘शक्य करणे’ हे स्वयंप्रेरणेतूनच साध्य होते. आयुष्यात यश-अपयश येतच असते. अपयशामुळे खचून न जाता अपयशातून शिकावयास मिळाले असा विचार व्हावयास हवा. करिअरच्या कक्षा रुंदावत आहेत, विविध करिअरची दालने तुमच्यासाठी खुली आहेत. स्वप्न मोठी पाहा, वास्तवादी पाहा. स्वप्नांचे वास्तवात रूपांतर करण्यासाठी प्रयत्नशील राहा. मी जिंकणारच, यशस्वी होणारच अशी वृत्ती ठेवा. कोणतेही क्षेत्र, कोणतेही काम हे लहान किंवा गौण नाही. तुम्ही जे काही कराल त्यात उत्कृष्टतेची कास धरा, एखादे अगदी सामान्य वाटणारे क्षेत्रसुद्धा तुमच्या कर्तृत्वामुळे उजळून निघेल असे प्रयत्न ठेवा.
करिअर ग्रोथचा विचार करताना या असंख्य गोष्टींचा विचार करावाच लागणार आहे. यशस्वी करिअर ग्रोथसाठी काही फण्डे ट्राय करायला काय हरकत आहे.
स्वप्न बघा. मोठ्ठं स्वप्न बघा. मोठ्ठं स्वप्न बघायला हिंमत लागते खरं.. पण बघायला काय हरकत आहे. धीरुभाई अंबानींचं उदाहरण घ्या. पेट्रोलपंपावर काम करणारा मुलगा रिलायन्स इंडस्ट्रीज उभारण्याचं भव्य-दिव्य स्वप्न पाहू शकतो मग आपण का नाही.
दिशा आणि ध्येय महत्त्वाचे : स्वप्न योग्य ट्रॅकवर असणं महत्त्वाचं. नाहीतर अंधारात भरकटायला होईल. माझं हे स्वप्न आहे, असं केवळ म्हणून होत नाही. तर त्या स्वप्नांना दिशा देण्यासाठी प्रयत्नांचे पंख लावावे लागतात. कल्पनाविलासात रमण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीवर भर द्या. यशस्वी होण्याची बहुतेकांची इच्छा असते पण ध्येयनिश्चिती अजिबात नसते. एमलेस धडपड निष्फळ ठरते हे लक्षात ठेवा. त्यामुळे तुमचं ध्येय ठरवा.
आत्मविश्वास आणि दुर्दम्य इच्छाशक्ती- दुर्दम्य इच्छाशक्ती, अचूक निर्णय आणि दूरदृष्टी यांचे मिश्रण यशासाठी आवश्यकच आहे. प्रचंड आत्मविश्वास असणारा माणूस ‘अशक्य’चं रूपांतर शक्यतेत करू शकतो. तुमच्यामध्ये आत्मविश्वास असायला हवा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सकारात्मक विचारसरणी. नाकारात्मक विचारांना अजिबात खत-पाणी घालू नका.
मानसिक स्थैर्य आणि समतोल - जीवघेण्या स्पर्धेशी टक्कर देण्यासाठी मानसिक संतुलन गरजेचे आहे. शिवाय तुमच्या विचारांमध्ये आणि कृतीमध्ये समतोल साधता आला पाहिजे.
उत्कृष्टतेचा ध्यास- करिअर करायचे, हे ठरवले आहे, हे सांगितले आहे, कोणी सुचवले आहे म्हणून करू नका. जे कराल त्यात स्वत:ला झोकून द्या. उत्कृष्टततेचा ध्यास धरा.
सृजनशीलता, कल्पकता, नवनिर्मितीचा संगम - कल्पना लढवा आणि भविष्य घडवा. नवनवीन कल्पना, नवनिर्मिती, सृजनशीलता करिअर ग्रोथसाठी आवश्यकच आहेत. जुन्याचं ज्ञान आणि नव्याचं अवलोकन. नवनिर्माण करण्याची क्षमता म्हणजे तुमच्यातील ऊर्जेचा योग्य वापर.
उत्तम गोष्टींचे सान्निध्य- सतत चांगली पुस्तके वाचा. वाचन करा, वाचनाने माणूस समृद्ध होतो. चांगल्याचे अनुकरण करा.
अपयश आणि यशाचे श्रेय - अपयश आलं तरी न डगमगता पुन्हा यशस्वी होण्यासाठीची मानसिक तयारी महत्त्वाची. आपल्या यशाचे श्रेय शेअर करायला शिका. आपल्या यशात आपल्या शिवाय इतरांचा सहभाग, पाठिंबा असतोच. कुटुंब आणि समाजाचे नेहमीच ऋणी राहा.
शुद्ध मेहनत - कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी प्रचंड मेहनत करणे आवश्यक आहे. मेहनतीला पर्याय नाही.
स्वत:ला अपडेट ठेवा- यशासाठी दृष्टिकोनाबरोबरच ज्ञानही तेवढंच महत्त्वाचं. सतत नवनवीन कौशल्य आत्मसात करा आणि स्वत:च्या ज्ञानात भर घाला.
पाच ‘डी’ ना महत्त्व द्या- डिटरमिनेशन- निर्धार, डिसीप्लिन- शिस्त, डेडिकेशन- समर्पण, डिव्होशन- एकनिष्ठपणा,
डिस्क्रीमिनेशन- विवेक. करिअरमध्ये यशस्वी होण्याची प्रक्रिया असते. ‘ग्रेट’ माणसांची करिअर ‘ग्रेट’ झाली कारण त्यांनी ‘ग्रेट एफर्टस्’ घेतले.



सारिका भोईटे-पवार
संपर्क - ९८१९५९७१३२/ २५३७९९४४.

by- Loksatta
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल