विविध प्रकारचे मसाले हा भारतीय पाककलेमधला महत्त्वाचा घटक. हे मसाले खाद्यपदार्थाची लज्जत तर वाढवतातच पण स्वतंत्रपणे पाहिलं तर ते आरोग्याच्या दृष्टीनेही बहुगुणी आहेत.
कारळे
खुरासानी, कारळे, काळे तीळ, रामतीळ या विविध नावांनी जिऱ्यासारखे पण आकाराने मोठे तीळ बहुधा सर्वाना अतिशय रुचकर चटणीकरिता माहीत आहेत. कारळ्याची चटणी आणि ज्वारीची भाकरी ज्यांच्या आहारात आहे, त्यांना मलावरोध, मूळव्याध, मूतखडा, मूत्रकृच्छ किंवा लघवीची आग या विकारांत पथ्यपाण्याची फिकीर करावयास नको.
कारळे नुसते स्निग्ध नसून पौष्टिक व त्याचबरोबर वातशमन करणारे आहेत. पक्वाशयात अपानवायूचे कार्यक्षेत्र. त्या क्षेत्रात लघवी, मलप्रवृत्ती, आर्तवप्रवृत्ती यांचे योग्य वेळी, योग्य प्रमाणात अनुमोलन कारळ्याची चटणी करील. कारळ्याची चटणी खूप तिखट करू नये. सोबत कुटलेले तीळ दिल्यास पौष्टिक अंश वाढतो. कारळे व तीळ यांची एकत्र चटणी बाळंतिणीचे दूध वाढवायला मदत करते. कारळ्याचे तेल तीळ तेलाच्या अपेक्षेत अधिक कृमीनाशक व उष्ण आहे.
जवस
आजकालच्या पुणे-मुंबईसारख्या शहरी जीवनात नवीन पिढीला ‘जवस’ या मसाल्याच्या पदार्थाची क्वचितच ओळख आहे. एक काळ खेडोपाडी ज्वारीच्या भाकरीबरोबर जवसाची चटणी व कच्चा कांदा यामुळे कष्टकऱ्यांच्या, भरपूर श्रम करणाऱ्या कामकऱ्यांच्या जेवणाला वेगळीच रंगत येत असे. जवसाबरोबर कमी-अधिक प्रमाणात तीळ, शेंगदाणे कूट, किसलेले कोरडे खोबरे, अल्प प्रमाणात लसूण, चवीपुरते तिखट, मीठ अशी भन्नाट चटणी एकदा करून बघाच. एक भाकरी जास्त जाणार.
जिरे
जिथे स्त्री-पुरुषांच्या आर्तव, शुक्र व मूत्रसंबंधी विकारात तसेच जीभ, आमाशय, लहान आतडय़ाच्या विकारात उत्तम काम देते. रुची उत्पन्न करणाऱ्या पदार्थात जिरेचूर्ण श्रेष्ठ आहे. असे असूनही ते उष्णता वाढवत नाही. उलट पित्त कमी करते. सर्व प्रकारच्या गॅसवरच्या औषधात जिरे प्रमुख घटक आहे. जिरेचूर्ण ताजेच असावे. ताकाबरोबर घ्यावे.
स्त्रियांच्या पांढरे जाणे, धुपणी या तक्रारीत रात्री एक चमचा जिरे एक कप पाण्यात भिजत टाकावे. सकाळी ते चावून खावे, वर तेच पाणी प्यावे. पांढरे जाणे आठ-पंधरा दिवसांत कमी होते. जीरकाद्यारिष्ट हे तयार औषधही श्वेतप्रदरावर मात करते. पुरुषांच्या लैंगिक दुर्बलता, वारंवार स्वप्नदोष होणे, स्त्री-पुरुषांच्या मूत्रेंद्रियाची आग होणे, कंड सुटणे या विकारात याच प्रकारे जिरे-पाणी घ्यावे. जिरेपाक पौष्टिक आहे.
तीळ
सर्वेभ्यस्त्विह तैलेभ्यस्तिलतैलं विशिष्यते।
उष्ण प्रकृतीच्या व्यक्ती सोडल्या तर तीळ व तिळाचे तेल यासारखी; निरोगी, निकोप व दीर्घ आयुष्य जगू इच्छिणाऱ्यांकरिता रोज वापरू शकू अशी साधी, सोपी चीज नाही. आयुर्वेदात तेल म्हटले की फक्त तीळ तेलच अशीच प्रथा आहे. स्थूल माणसाला वजन कमी करायला तसेच कृश व्यक्तीचे वजन वाढवायला तीळ उपयुक्त आहेत. दर क्षणाला शरीराची झीज होत असेल. शरीरयंत्र चालवायला काहीतरी वंगणाची गरज आहे. असे वंगण तेल, तूप, मांस, चरबी यात असते. पण ते पचायला खायला सोपे आहे, परवडणारे आहे असे तिळाचे तेल आहे. शरीरात जिथे जिथे लहान सांध्यांची झीज होते तेथे बाहेरून मसाज करून व पेटात अल्पमात्रेत घेऊन सांधेदुखी कमी होते.
आधुनिक औषधीशास्त्राप्रमाणे तिळामध्ये लोह, कॅल्शिअम व फॉस्फरस आहे. ज्या मुलामुलींची पुरेशी वाढ होत नाही, सांधे, स्नायू थोडय़ाशाही श्रमाने थकतात त्यांनी नियमितपणे ‘तिळगूळ’ माफक प्रमाणात खावा. त्यामुळे कुपोषण टळेल. आजकाल खेडोपाडी सरकार गरीब मुलांकरिता दूध किंवा पौष्टिक आहाराचा विचार करताना दिसत आहे. नियमित तिळगुळाची वडी अधिक चांगली. फक्त वडी खाल्ल्यानंतर खळखळून चुळा भरणे दातांच्या आरोग्याकरिता आवश्यक आहे. ज्यांना कृमी आहेत त्यांच्या तिळगुळात थोडे वावडिंग किंवा मिरपूड मिसळावी. केसांच्या चांगल्या वाढीकरिता चमचाभर तीळ रोज चावून खावे.
जी लहान मुले अंथरुणात शू करतात त्यांच्याकरिता तीळ, हळद, आवळकाठी व ओवा असे चूर्ण नियमितपणे जेवणानंतर द्यावे. ज्यांचे दात हालतात, मजबूत नाहीत त्यांनी एक चमचाभर तीळ नियमितपणे सावकाश चावून खावे. ज्यांना तीळ चावून खाण्याचा कंटाळा आहे त्यांनी चमचा-दोन चमचे तेल रोज प्यावे. तीळ तेल प्यायल्याने कृश व्यक्तीचे वजन वाढते. तीळ तेल जंतावरही उपयुक्त औषध आहे. ज्या स्त्रियांना बाळंतपणानंतर पुरेसे दूध येत नाही त्यांनी दोन चमचे तिळाचे तेल रोज सकाळी प्यावे. स्त्रियांना अंगावर विटाळ कमी जात असेल त्यांनी तीळ नियमित खावेत किंवा तेल प्यावे. दुर्बल पुरुषांचं वीर्य बलवान होण्याकरिता तिळाचे लाडू खावे. ज्या स्त्रियांना अंगावर खूप जाते त्यांनी लोणी किंवा गाईच्या तुपाबरोबर तीळ सेवन केले तर फाजील आर्तव कमी होते.
अभ्यंगमाचरेत् नित्यं स जराश्रमवातहा!
असे आयुर्वेद सांगतो. त्याचा आधार तीळ तेलाचे गुण आहेत. तीळ तेलाचे नित्य मसाज सर्वागाला सकाळ-सायंकाळ केल्यास निकोप, निरोगी दीर्घायुष्य नक्कीच प्राप्त होणार. म्हातारपण लांब राहील. मसाज नियमित केला तर भूक चांगली लागते. शरीराचे थकलेले स्नायू पूर्ववत काम देऊ लागतात. कोणतेच श्रम जाणवत नाहीत. कोणीही माणूस सत्तर वर्षांपर्यंत तरुणासारखे काम करू शकतो.
ज्यांचा शुक्र धातू क्षीण आहे, मधुमेह नाही पण लघवीला वारंवार जावे लागते, हस्तमैथुनासारख्या खराब सवयीमुळे किंवा फाजील वीर्यस्खलनाने कमजोरी आली आहे त्यांनी नियमित तिळकूट खावे. चवीला खोबरे वापरावे. ‘एड्स’ या विकारात ओजक्षय होतो. या महाभयंकर शोष विकारात याचा उपयोग करून पाहायला हवा.
कोणी खाऊ नये : उष्ण प्रकृती, डोळ्यांची आग होणारे, हातापायांची आग होणाऱ्यांनी, लघवील तिडीक मारणे किंवा संडासवाटे, लघवीवाटे रक्त पडत असेल तर तीळ खाऊ नयेत. त्वचाविकार, इसब, गजकर्ण, नायटा, सोरायसिस, कंड व मधुमेह या विकारात तीळ खाऊ नयेत.
दालचिनी
दालचिनी मसाल्याच्या पदार्थात अत्यावश्यक आहे. यात सिनॅमम नावाचे तेल असते. पाण्यापेक्षा वजनाने हे तेल जड असते. दालचिनी गुणाने तीक्ष्ण, उष्ण, रूक्ष, पित्तकर, वजन घटविणारी, चवीने मधुर व कडवट आहे. भारतात वापरल्या जाणाऱ्या दालचिनीत तेलाचे प्रमाण फार कमी असते. परदेशांत यापेक्षा चांगल्या दर्जाची गुणवान दालचिनी वापरतात. कोकाकोला या प्रसिद्ध पेयात दालचिनी तेल असते.
दालचिनी ही अपचन, अजीर्ण, मुरडा, आतडय़ाची सूज, पोटदुखी, ग्रहणी, आचके, आर्तवशूल, पित्ताच्या उलटय़ा, मलावरोध, शोष पडणे, वजन घटणे इत्यादी विकारात उपयुक्त आहे. त्वचेला वर्ण सुधारण्याकरिता दालचिनीचा विशेष उपयोग होतो. सर्दी दूर करण्याकरिता दालचिनीचा अर्क कानशिलाला चोळून लावतात.
अनेक प्रकारच्या वातविकारांत दालचिनीचे तेल बाह्येपचारार्थ उपयुक्त आहे. दालचिनीच्या तेलात बुडवलेला कापूस योनीमध्ये ठवून योनिभ्रंश कमी करता येतो. अंग गार पडत असल्यास दालचिनीचे तेल चोळावे, ऊब येते, दालचिनीचे चूर्ण व कात एकत्र करून घेतल्यास आमांशाची खोड मोडते. वरचेवर संडास होणे थांबते. दालचिनी व किंचित सुंठ चूर्ण जेवणानंतर घेतल्यास पोटात वायू धरणे थांबते. पडसे, फ्ल्यू, थंडीताप, खोकला या नेहमीच्या तक्रारींकरिता दालचिनी, व किंचित सुंठचूर्ण जेवणानंतर घेतल्यास पोटात वायू धरणे थांबते. पडसे, फ्ल्यू, थंडीताप, खोकला या नेहमीच्या तक्रारींकरिता दालचिनी, लवंग, सुंठ असा काढा सांज-सकाळ घ्यावा.
सुका खोकला, आवज बसणे, तोंडाला रुची नसणे, कफ सहजपणे न सुटणे, गायक व वृद्ध यांच्याकरिता दालचिनी चूर्ण व खडीसाखर हा उत्तम योग आहे. कडकी, जुनाट ताप, अग्निमांद्य, हाडी मुरलेला ताप याकरिता दालचिनी व वेलची व खडीसाखर चूर्ण असे मिश्रण लहानथोरांनी वापरून पाहावे. कोणत्याही साखरेपासून बनणाऱ्या मिठाईत स्वाद व पाचनाकरिता दालचिनी चूर्ण अवश्य वापरावे. सीतोपलादि या प्रसिद्ध चूर्णातील एक घटकद्रव्य दालचिनी आहे. आयुर्वेदातील अनेकानेक प्राश, अवलेह, विविध टॉनिक औषधांमध्ये दालचिनीचा मुक्त वापर, वेलदोडा, लवंग, तमालपत्र, नागकेशर अशांबरोबर केला जातो. दालचिनीच्या काढय़ांचा उपयोग विविध औषधांचा खल करताना ‘भावनाद्रव्य’ म्हणून केला जातो. दालचिनीमातेला अनेकानेक प्रणाम!
धने
ताज्या कोथिंबिरीच्या अभावी धने वापरावे. मात्र ते किडके नसावेत. धने अतिथंड आहेत. पण रुची उत्पन्न करतात. लघवीची आग, खूप घाम येणे, लघवी कमी होणे, खूप तहान लागणे, विषारी पदार्थाची अॅलर्जी, अंगाला खाज सुटणे, डोळ्यांची व हातापायांची आग अशा नाना विकारांत धनेचूर्ण पोटात घ्यावे. जेथे आवश्यक तेथे धने वाटून लेप लावावा किंवा डोळ्यासारख्या नाजूक अवयवावर चूर्णाची पुरचुंडी ठेवावी. गोवर, कांजिण्या, तीव्र ताप, कडकी या विकारांत धने ठेचून पाण्यात कुसकरून त्याचे पाणी गाळून घ्यावे. डोळे येण्याच्या साथीत धन्याचे पाणी गाळून डोळ्यात टाकावे. लाली, चिकटा, स्राव कमी होतो.
तापामध्ये खूप स्ट्राँग औषधे घेऊन, खूप घाम आला असेल तर धनेपाणी प्यावे. म्हणजे थकवा कमी होतो. मूतखडा विकारग्रस्त रुग्णांनी एक चमचा धने रात्रौ ठेचून एक कप पाण्यात भिजत टाकावेत. सकाळी ते धने चावून खावे व वर तेच पाणी द्यावे. लघवीचे प्रमाण तात्काळ वाढते.
बडीशेप
बडीशेप हे एक उत्तम औषध आहे हे फारच थोडय़ांना माहीत आहे. बडीशेपेचे बरेच प्रकार आहेत. नेहमी बाजारात मिळणाऱ्या जाड बडीशेपेपेक्षा मध्य प्रदेशातील इंदोरकडची बारीक बडीशेप गोड चवीची असते. बडीशेप रुचकर आहे. तोंडाला स्वाद आणते. जेवणानंतर नुसती चिमूटभर बडीशेप खाल्लेले अन्न पचवू लागते. कितीही जडान्न खाल्ले असले तरी ते पचविण्याचे सामथ्र्य बडीशेपेत आहे. बडीशेप दोन प्रकारे काम करते. पोटात वायू धरू देत नाही. तसेच आमांश किंवा चिकटपणा दूर करते. जेवणानंतर विडय़ाबरोबर किंवा नुसती बडीशेप खाण्याचा प्रघात हा अतिशय चांगला आहे. कॉलरा, जुलाब, हगवण, आमांश, अजीर्ण, पोटदुखी, पोट फुगणे, वारंवार संडासची भावना होणे, पोटात खुटखुटणे यांसारख्या अपचनाच्या सर्व तक्रारींत बडीशेप, बडीशेपेचा काढा किंवा अर्क उत्तम काम करतो.
काहींना सोनामुखी, एरंडेल किंवा जुलाबाची स्ट्राँग औषधे घेण्याची सवय असते. ही औषधे घेतली की पोटात कळ येऊन पोट दुखू लागते. अशा वेळी बडीशेप व चिमूटभर सुंठ घेतले की लगेच आराम पडतो. थोडक्यात, जिभेपासून पक्वाशयापर्यंतच्या अन्नवह महास्रोतसांचे आरोग्य राखण्याचे कार्य बडीशेपेसारखी लहान वस्तू करू शकते. पोट दुखून जुलाब होत असल्यास बडीशेप व खसखशीचा काढा प्यावा. जुलाब थांबतात.
लहान बालकांना दात येताना जुलाबाचा त्रास होतो. त्याकरिता त्यांना चुन्याच्या निवळीबरोबर बडीशेप चूर्ण द्यावे.
मानसविकारात, बुद्धिमांद्य, फिट्स येणे, उन्माद या तक्रारींकरिता बडीशेप काही प्रमाणात उपयोगी पडते. बडीशेप ही वीर्यवृद्धी करते, जिभेचा चिकटा दूर करते. त्यामुळे बुद्धी ज्यांना नेहमी तरतरीत ठेवायची आहे त्यांनी बडीशेप खावी. फिट्स विकारात गार्डिनाल, डिलान्टिन, मेझाटोल अशा नाना औषधांची जन्मभर सवय लागून माणसाचा मेंदू काम करेनासा होतो तेव्हा बडीशेप चूर्ण तुपाबरोबर घ्यावे. स्मरणशक्ती सुधारते.
तापामध्ये शोष पडतो. अंगाची लाही लाही होते. आग आग होते. अशा वेळेस बडीशेपेचे उकळलेले पाणी खडीसाखर घालून थोडे थोडे प्यावे. उन्हाळय़ातील उलटय़ा, तोंडाला पाणी सुटणे, मळमळणे, छातीतील जळजळ या तक्रारींकरिता बडीशेपेचा काढा थोडा थोडा घ्यावा. पोटात अन्न कुजत असेल तर निरनिराळे क्षार, पादेलोण, शिरका, व्हिनेगर अशा औषधांची सवय लागलेल्यांनी थोडी बडीशेप खावी. आतडय़ांची हानी टळते.
मिरची : खावी न खावी
मीठ-मिरची या जोडशब्दांनी आपल्याला रोजच्या व्यवहारात इतकी सवय झाली आहे की, स्वयंपाकघरात त्याशिवाय आपले काहीच चालत नाही. क्वचित काही प्रांतांत किंवा काही प्रदेशांत स्वयंपाकात मिरचीऐवजी मिरी वापरतात. पण मिरची नाही असा स्वयंपाक सहसा होत नाही. दक्षिण भारतात विशेषत: आंध्र प्रदेशात मिरचीचा वापर फार. मिरचीमुळे भोजनास चव येते, स्वादिष्ट होते, तोंड स्वच्छ राहते, भूक राहते, लागते. मिरची आपल्या तीक्ष्ण, उष्ण व पित्तवर्धक गुणांमुळे रक्तवर्धक आहे. काही प्रमाणात कफ, आमांश, कृमी आमांशाची पोटदुखी, उदरवात या विकारांत उपयोग होतो. कॉलरा विकारात माफक प्रमाणातच खाल्ल्यास उपयोग होतो. सुकलेली मिरची वातनाशक आहे. ज्याचे शरीर गार पडते, ज्यांना उष्णतेचा किंवा रक्त पडण्याचा काही त्रास नाही त्यांना सर्दी झाली असल्यास मिरचीच्या बियांच्या चूर्णाचा उपयोग होईल. सर्दी, कफ यामुळे ज्यांना पोटाचा त्रास आहे, पोट दुखते, त्यांनी मिरचीच्या बियांचे उकळलेले गरम पाणी किंवा मिरच्यांचा अर्क घ्यावा. ज्यांना उष्ण पदार्थ चालत नाहीत त्यांनी हा प्रयोग करू नये. भाजलेल्या जागेवर तिखटाचे चूर्ण व गोडेतेल असे मिश्रण लावावे. त्वचा लवकर भरून येते. त्वचेत जखम होत नाही.
काहींना खूप मिरच्या खायची सवय असते. ती सवय सोडण्याकरिता मिरच्यांचा वापर चढउतार पद्धतीने म्हणजे तीन, चार, दोन, अडीच, दीड, दोन, एक, दीड, अर्धी अशा पद्धतीने करावा. पंधरा दिवसांत मिरची जास्त खाण्याची सवय सुटते.
मिरच्यांमधील बी हे शरीराचा दाह करणारे आहे. मिरच्यांचे बी काढून टाकावे. नुसत्या टरफलांचे चूर्ण करावे. हे चूर्ण कॉलरा, हगवण, आमांश या पोटाच्या तक्रारींत विविध अनुपानाबरोबर वापरावे. कांदा रस, हिंग, कापूर, डाळिंबाचे दाणे, चिंच, गूळ, आले, जिरे, पुदिना, लिंबू अशा विविध पदार्थाबरोबर आवडीनुसार मिरची चूर्ण वापरता येते. पूर्णपणे बंद झालेला अग्नी मिरचीच्या माफक वापराने पूर्ववत कामात आणता येतो. मिरच्यांमध्ये काही जीवनसत्त्वे आहेत. त्यामुळे त्वचेत किडा-मुंगी किंवा कुत्रा, कोळी यांची विषबाधा झाली तर जखमेत मिरची बी चूर्ण भरून लावावे. विषबाधा होत नाही. दारुडय़ा माणसाला भूक लागत नसल्यास मिरचीच्या तिखटाचा उपयोग होतो. मिरचीने पोटात आग पडत असल्यास मिरचीच्या तिखटाबरोबर थोडा चुना मिसळावा.
मिरचीने जेवढे रोग बरे होऊ शकतील त्यापेक्षा अनेकपट रोग मिरचीच्या कमी-अधिक वापराने होतात. असलेले रोग वाढतात. वाढलेले रोग बळावतात. मिरची तीक्ष्ण, उष्ण व अतिशय रूक्ष आहे. रक्तातील दाहकता मिरचीच्या वापराने वाढते. त्यामुळे रसधातूंतील स्निग्धपणा, सौम्यपणा, मिरचीच्या अधिक वापराने नाहीसा होतो. शरीरातील मृदू, कोमल, सौम्य अवयवांचा नाश मिरचीमुळे होतो. केस, डोळे, नाक, ओठ, जीभ, घसा, गळा, सर्व आशय उदाहरणार्थ अमाशय, ग्रहणी, लहान व मोठे आतडे, गर्भाशय, स्तन, किडनी, मूत्रेंद्रिय, त्वचा, गुद इत्यादी अवयवांचे स्वास्थ्य मिरचीच्या कमी-अधिक वापराने बिघडते.
अजीर्ण, आम्लपित्त, अल्सर, अॅलर्जी, डोळे, त्वचा, मूत्रेंद्रिय, गुद यांची आग होते. पोटात आग पडणे, आमांश, अंग बाहेर येणे, रक्तप्रदर, अत्यार्तव, उलटय़ा, कंडू, सांधेदुखी, कंबर, गुडघे व पाठदुखी, कान वाहणे, कावीळ, केस गळणे, पिकणे, कृशता, गरमी, परमा, गोवर, कांजिण्या, गांधी उठणे, डोळय़ांची लाली, तोंड येणे, त्वचाविकार, दंतविकार, नागीण, अनिद्रा, पांडू, भगंदर, मूळव्याध, पोटदुखी, फिटस् येणे, रक्तक्षय, मुखरोग, हाडांचे विकार इत्यादी विकारांत मिरची चूर्ण वज्र्य करावे. तिखटपणा व पचनाकरिता आले किंवा मिरी यांचा वापर करावा. ज्यांना जेवणात तिखट हवे पण मिरचीचे दोष नकोत त्यांनी ढोबळी मिरची वापरून पाहावी. ‘ढोबळय़ा मिरचीचे पंचामृत’ ही वैद्य खडीवाल्यांची खास खास रेसिपी प्रसिद्धच आहे. त्याकरिता ‘नैवेद्यम’ पुस्तकाची मदत जरूर घ्यावी.
मिरी
त्रिकटू या संज्ञेने आयुर्वेदात ओळखल्या जाणाऱ्या सुंठ, मिरी व पिंपळी यांच्यातील भूक वाढविण्याच्या गुणात मिरी श्रेष्ठ आहे. आयुर्वेदशास्त्राप्रमाणे सर्व रोगांचे मूळ कारण बहुधा अग्निमांद्य हे असते. अग्नीचे बळ वाढविण्याकरिता शेकडो पदार्थ, औषधे वा उपाय आहेत, पण एक-दोन मिरे चावून खाल्ल्याने जे काम लगेच होते ते इतर पदार्थाकडून होत नाही.
पित्तप्रकोपी तीक्ष्णोष्णं रूक्षं दीपनरोचनम्।
रसे पाके च कटुकं कफघ्नं
मरिचं लघु॥
मिरीच्या व्यावहारिक तपशिलात जाण्याअगोदर मिरीचा एक गमतीदार इतिहास व त्याची भारताच्या शोधाकरिता झालेल्या अनमोल मदतीची कथा खूपच वाचनीय, रोचक आहे. प्राचीन काळापासून युरोपात बहुसंख्य जनता मांसाहार करीत आलेली आहे. या मांसाहारात त्यांना मिरी ही ‘मस्ट’ असते. सतराव्या शतकात मध्य आशियात ख्रिश्चन-मुस्लीम धर्मयुद्ध झाले. त्या काळात भारताचा युरोपशी व्यापार ‘खुष्की’च्या मार्गानेच होत असे. हा मार्ग अचानक बंद झाला. ‘आपणास मिरी पुरवणारा हिंदुस्थान हा देश कुठे आहे, हे शोधण्याकरिता कोलंबस समुद्रमार्गाने निघाला. पण तो चुकून अमेरिकेकडे गेला. त्यानंतर इतरांनी ही चूक सुधारून भारत शोधला. असो. अशी ही ‘मिरी शोधार्थ समुद्रसफर’ कथा आहे.
मिरी ही शरीरात खोलवर पोहोचून शरीरातील सर्व वहनसंस्थांना, सर्व धातूच्या प्रमुख अवयवांना उष्णता पुरवते. त्या त्या भागात फाजील कफ साठू देत नाही. शरीरात सार्वदेहिक ऊब देण्याचे काम मिरी करते. त्यामुळे सर्व प्रकारच्या तापात मिरी चूर्ण, पाणी, उकळून काढा, मध किंवा तुळशीच्या रसाबरोबर चाटण, मिरी व तूप अशा विविध प्रकारे मिऱ्याचा वापर होतो. ज्या तापात अरुची, मंद भूक कफ अशी लक्षणे आहेत, तेथे एकमेव मिरी उत्तम काम देईल. आजकाल वाढत चाललेल्या हिवतापावर, थंडी भरून येणाऱ्या तापावर मिरी तुळशीच्या रसाबरोबर दिल्यास तापाला उतार पडतो. भूक सुधारते. रुची येते. आयुर्वेदीय औषधी महासागरात अनेकानेक बल्य औषधे, टॉनिक आहेत. त्यातील वसंत कल्पात लघुमालिनी, मधुमालिनी, सुवर्णमालिनीमध्ये मिरी हे प्रमुख घटकद्रव्य आहे.
अरुची, तोंडाला चिकटा, घशात कफ या विकारांत ओली मिरी व लिंबूरस असे लोणचे वरदान आहे. एक-दोन मिरी लिंबूरसात कुस्करून ते चाटण खाल्ल्याबरोबर दोन घास अन्न जास्त जाते. अंगी लागते. आमाशयांत डब्बपणा होत नाही. ज्यांना एवढय़ा-तेवढय़ा जास्त जेवणाने अजीर्ण होते त्यांनी भोजनानंतर ताकाबरोबर किंचित मिरी चूर्ण घ्यावे. मलप्रवृत्तीला वेळ लागत असल्यास, घाण वास मारत असल्यास, जंत व कृमी यांची खोड मोडण्याकरिता जेवणात नियमाने मिरपूड वापरावी.
कृश व लहान बालकांकरिता विशेषत: वय तीन ते सात वर्षेपर्यंत मुलांची प्राकृत वा निकोप वाढ होण्याकरिता मिरी व मध असे चाटण नियमित द्यावे. खाल्लेले अंगी लागते. वेळच्या वेळी वजन वाढण्यास सुरुवात होते. सुतासारखे बारीक कृमी, संडासच्या जागेची सूज व त्यामुळे संडासवाटे रक्त पडणे याकरिता मिरी चूर्ण गरम पाणी व तुपाबरोबर द्यावे.
शीतपित्त, अंगावर गांधी उठणे, चकंदळे, खाज या विकारांत बाहेरून लावण्याकरिता तूप व मिरेपूड असे मिश्रण घासून लावावे. तसेच औषध पोटात घ्यावे. सर्दी, कफ, दमा या विकारांत नेमाने मधाबरोबर मिरी चूर्णाचे चाटण घ्यावे. मासिक पाळी साफ होत नसेल, फाजील चरबी वाढली असेल तर मिरीचा काढा किंवा चूर्ण सकाळी रिकाम्यापोटी घ्यावे. दाढदुखी किंवा दातातून पू येणे, घाण वास मारणे या तक्रारींत मिरी उकळून त्या पाण्याच्या गुळण्या कराव्यात.
रांजणवाडी या विकारात मिरी उगाळून त्याचे गंध बाहेरून पापणीला लावावे. रांजणवाडीची सूज कमी होते. जुनाट सर्दी, डोकेदुखी, नाक चोंदणे या विकारात प्रथम नाकात तूप सोडावे व त्यानंतर मिरी उकळलेले पाणी सोडावे. नाकाला इजा न होता नाक मोकळे होते.
मिरी ही योगवाही आहेत. मिरी ज्या ज्या पदार्थाबरोबर आपण वापरू त्या त्या पदार्थाचे व स्वत:चे असे दोन्ही प्रकारचे गुण शरीरात खोलवर पोहोचवते. मिरी भेदनाचे, शरीरातील फाजील दोषांचा संचय नाहीसा करण्याचे उत्तम काम करते. स्थूलपणा, फाजील चरबी कमी होण्याकरिता रोजच्या आहारात दोन-तीन मिरी हवीत. उष्ण प्रकृतीच्या व्यक्तींनी मिरी तारतम्याने वापरावी..
घरोघरी सहज उपलब्ध असणारे मसाल्याचे पदार्थ एकत्र करून त्यांचे मसाले तयार केले जातात तेव्हा ते जेवणाची लज्जत तर वाढवतातच, पण त्यांचे सुटे सुटे घटक आपल्या आरोग्यासाठीही गुणकारी आहेत.
मेथी
मेथी, पालेभाजी व मसाल्याचा पदार्थ म्हणून सर्वाच्या वापरात सर्रास आहेच. मेथीची भाजी पथ्थ्यकर भाजी आहे. पाने थंड गुणाची, सारक, पाचक, वातानुलोमक, पित्तनाशक व सूज कमी करणारी आहेत. मेथीच्या बिया वातहारक, पौष्टिक, रक्तसंग्राहक व गर्भाशय संकोचक आहेत. बिया रक्त व पित्तवर्धक आहेत.
पित्तप्रधान मलावरोधात पालेभाजीचा उपयोग पोट साफ करण्याकरिता आहे. पित्तप्रधान ज्वरात मेथीच्या पानांचा रस घ्यावा. जखम व सूज या दोन्ही लक्षणांत मेथीची पाने वाटून लेप लावावा. रक्त पडणाऱ्या आवेत कोवळय़ा पानांची भाजी उपयुक्त आहे. मेथीची पालेभाजी, हृद्रोग, भगंदर, कृमी, खोकला, कफ, वातरक्त, महारोग, उलटी, अरुची, ताप या विकारांत पथ्यकर म्हणून जरूर वापरावी.
बाळंतपणात मेथीच्या बियांचे सुगंधी पदार्थाबरोबर लाडू करून देतात. त्यामुळे बाळंतिणीस चांगली भूक लागते. खाल्लेले अन्न पचते, अजीर्ण होत नाही. शौचास साफ होते. रक्तस्राव कमी होतो. गर्भाशय लवकर पूर्ववत होतो. स्थूलपणा वाढत नाही. कंबरेचा घेर कमी होतो.
मेथी वात व पित्तप्रकृती रुग्णांकरिता उत्तम आहे. मेथी बियांचे विशेष कार्य पचनसंस्थांवर आहे. मेथी चावून खायला लागल्यापासून लाळास्राव उत्तम सुरू होतो. आधुनिक विज्ञानाचे अभ्यासक मधुमेह या व्याधीकरिता जी एकमेव वनस्पती मानतात, ती म्हणजे मेथी होय. मेथी बियांचा प्रत्येक कण तोंडातील, आमाशय, पच्यमानाशय, स्वादुपिंड या आतडय़ातील गोडपणावर, कफावर कार्य दरक्षणी करीत असतो. त्यामुळे नुसत्या मेथ्या चावून खाणे, सकाळी मेथीपूड पाण्याबरोबर घेणे, मेथ्या उकळून त्याचे पाणी पिणे, मेथीकूट खाणे, मेथी पालेभाजी खाणे, मेथी पालेभाजीचा रस पिणे असे अनेक उपाय जगभर मधुमेही माणसे यशस्वीपणे करीत आहेत. सर्वात सोपा उपाय म्हणजे एक चमचा मेथीपूड एक पोळीला लागणाऱ्या कणकेत मिसळून अशा हिशोबात पोळय़ा खाणे. यामुळे रक्तातील साखर कमी होते. नियंत्रित राहते. शरीराचा बोजडपणा कमी होतो.
मेथीच्या बियांमुळे आमाशयातील कफाचे विलयन व यकृताचे स्राव निर्माण करणे, वाढवणे, आहार रसांचे शोषण ही कार्ये होतात. आमवातात रसादि धातू क्षीण व दुर्बल होतात. हृदय दुर्बल होते. त्याकरिता मेथी व सुंठ चूर्ण मिसळून भोजनोत्तर घ्यावे. शरीर निरोगी व सबल होते. मेथीच्या फाजील वापराने शुक्रनाश होण्याची शक्यता असते. गरगरणे, चक्कर, अंधेरी ही लक्षणे दिसल्यास मेथीचा वापर करू नये.
मोहरी
स्वयंपाकात रोज वापरात असणाऱ्या मसाल्याच्या पदार्थात मोहरी सर्वात उष्ण आहे, तीक्ष्ण आहे. त्याकरिता सर्व पदार्थात चव आणण्याकरिता, झटका आणण्याकरिता मोहरी वापरली जाते. उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब, राजस्थान या भागत थंडीच्या मोसमात मोहरीच्या तेलाने मसाज करून घ्यायचा प्रघात आहे. समस्त वातविकारात थंड, कफ प्रकृतीच्या रुग्णांकरिता मोहरीच्या तेलाचे मसाज फार फायदेशीर आहे. ज्यांना हे तेल फार उष्ण वाटते त्यांनी त्यात तीळ तेल, खोबरेल किंवा एरंडेल मिसळावे. मोहरीच्या तेलाच्या मसाजामुळे काहींना पुरळ येते. त्याकरिता काळजी घ्यावी. दुखऱ्या गुडघ्यावर किंवा लहान-मोठय़ा सांध्यांवर मोहरीचा वाटून लेप लावावा, बांधून ठेवावे, रात्रीत गुडघ्यातील दुखावा कमी होतो.
अर्धागवायू, संधिवात, आमवात, सायटिका, खांदा जखडणे, मान गुडघ्याचे विकार या सगळय़ा वातविकारांत थंड ऋतूत मोहरी तेल किंवा मोहऱ्या वाटून त्याचा लेप यांचा वापर जरूर करावा. तीळ तेल, एरंडेल तेल, लिंबोणी तेल, करंजेल तेल यांच्या जोडीला मोहरी तेलाच्या मदतीमुळे, अभ्यंगार्थ महानारायण तेल तयार केले जाते. एक वेळ संबंधितांनी जरूर वापरून पाहावे. कोणत्याही सर्दीला इतर उपचार दाद देत नसतील तर मोहरीची चिमूटभर पूड मधाबरोबर खावी. कोणत्याही विषावर उलटी करण्याकरिता मोहरीचे पाणी प्यावे. उलटी होऊन बरे वाटते. छातीत खूप कप झाल्यास मोहरी व मीठ यांचा काढा प्यावा. उलटी करवून कफ निघून गेला की दमेकऱ्यास बरे वाटते. तरुण माणसांवरच हा प्रयोग करावा. जंत व कृमी सहजपणे पडत नसल्यास मोहरीची चिमूटभर पूड तीन दिवस घ्यावी. जंत नाहीसे होतात. पोटदुखी, डोकेदुखी याकरिता मोहरी वाटून त्या त्या अवयवांवर लेप लावावा. लघवी साफ होण्यासाठी ओटीपोटावर लेप लावावा. पोटफुगी, अपचन, अजीर्ण याकरिता मोहरी चूर्ण आल्याच्या रसाबरोबर घ्यावे. मोहरी खूप उष्ण आहे, याचे भान नेहमी ठेवावे.
उचकी, कफ, दमा, खोकला, विशेषत: लहान बालकांच्या तक्रारींवर एक-दोन मोहऱ्या उकळून त्यांचे पाणी किंवा मोहरी चूर्ण मधाबरोबर चाटवावे. खूप लस व खाज असलेल्या इसब, गजकर्ण, नायटा या विकारांत मोहरीचे तेल बाहेरून लावावे. कंड लगेच थांबते, गाठ, सूज फार दडस असल्यास मोहरीचा लेप लावावा.
लवंग
लवंगेचा एक काळ सर्दी, पडसे किंवा खोकल्याकरिता घरगुती औषध म्हणून मोठा वापर होता. विडय़ाच्या पानाबरोबर मसाल्यात वापर म्हणून लवंग असे. अतिमहागाईमुळे किंवा ज्याच्या बहुऔषधी उपयुक्ततेची तितकी माहिती नसल्याने लवंग कोणाच्याच घरात नसते. आजच्या महाग औषधांच्या राज्यात तुलनेने स्वस्त लवंग पुन्हा घरोघर वापरात यावयास हवी.
लवंगेचे संस्कृत नाव देवकुसुम आहे. दाबल्यानंतर ज्यातून तेल निघते ती लवंग चांगली. लवंगेचे तेल पाण्यापेक्षा जड असते. लवंग तिखट, कडू रसाची असून लघु गुणांची म्हणून डोळय़ांना हितकारक आहे. पाचक व रुची उत्पन्न करणारी प्रामुख्याने कफ विकारावर व काही प्रमाणात पित्त व कफ विकारावर काम करते.
ग्रंथाप्रमाणे लवंग अग्निप्रदीपक, पोटदुखी, तहान, खोकला, कफ, दमा, उचकी, क्षय, मुखदरुगधी, उलटी, पोटदुखी, रक्तविकार इत्यादींवर काम करते.
लवंगेचा फाजील वापर केल्यास डोळे, मूत्राशय व हृदयावर परिणाम वाईट होतो. तोंड येते, जिभेला जखम होते. आयुर्वेद शास्त्राप्रमाणे प्राणवह स्त्रोतसाच्या सर्व विकारात लवंग उत्तम काम करते.
सर्दीने सतत नाक वाहत असेल तर एकएक करून तीन-चार लवंग लागोपाठ चघळाव्या. सर्दी लगेच थांबते. लवंगेत तेल आहे. त्याचा विशद गुण आहे. त्यामुळे घसा, गळा, गाल, जीभ सर्व स्वच्छ राहते.
लवंगेचे तेल सर्दीकरिता अत्यंत उपयुक्त आहे. रुमालावर दोन थेंब तेल टाकले की, त्याच्या हुंगण्याने नाक मोकळे होते. सवय लागत नाही. कपाळावर लवंग, सुंठ व वेखंड असा उगाळून गरम गरम लेप लावावा. जुनाट सर्दी बरी होते. तोंडात घाण वास येत असल्यास लवंग तेल व पाणी अशा गुळण्या कराव्या. दुखऱ्या दातांकरिता लवंग तेल, कापूस व किंचित तूप असा बोळा ठेवावा. तेल फार वापरू नये.
बाजारात दाताच्या आरोग्याकरिता लवंग असलेली टूथपेस्टची जाहिरात असते. या जाहिरातीच आहेत हे लक्षात ठेवावे. दाताच्या आरोग्याकरिता त्याऐवजी गेरू, कात व किंचित लवंग चूर्ण हे उत्तम दंतमंजन दातांच्या पायोरिया या विकारात उपयोगी पडते.
वृद्धांच्या ठसका, खोकला, आवाज बसणे, गाणारे गायक किंवा वक्ते, अध्यापक यांच्याकरिता लवंग नेहमी जवळ असावी अशी उपयुक्त आहे. गाणे, भजन म्हणावयाचे असेल, व्याख्यान द्यावयाचे असेल तर लवंग तोंडात धरावी एक मिनिटाने कार्यक्रम सुरू करावा. स्पष्ट मोकळा आवाज होतो.
लवंग उष्ण आहे. पण शरीर क्षीण करीत नाही. उलट लवंग ओज, शुक्र, वीर्यवर्धक आहे. ज्या माणसाला भरपूर काम करावयाचे आहे. दिवसाचे २४ तास काम आहे त्याने जरूर लवंग खावी. लवंग बुद्धी तल्लख ठेवते. विचारशक्ती दगा देत नाही. समोरचा माणूस बोलावयाला लागला की त्याला उत्तर देण्याकरिता बुद्धी सदैव जागरूक ठेवणारी लवंग आहे. मंदबुद्धी मुलांकरिता लहान प्रमाणात नियमित लवंग द्यावी.
मूच्र्छा आली असताना लवंग उगाळून त्यांच्यात थोडे पाणी मिसळून डोळय़ात टाकावे. मूच्र्छा ओसरते. मोटारच्या प्रवासात लवंग उलटी थांबवते. तसेच जड जेवणामुळे जर अन्न वर येत असेल तर एक-दोन लवंगा चावून खाव्यात. क्षयाचा खोकला, स्वरभंग याकरिता नियमित लवंग ऋतुमान बघून खावी. माझ्या वापरातील अनेक औषधी गुणवान कल्पात लवंग हे एक घटकद्रव्य आहेच. उदा. लवंगादी गुग्गुळ, दमा गोळी, जखमेकरिता एलादी तेल. येथे एक वैयक्तिक अनुभव सांगण्याचा मोह आवरत नाही. एक काळ बीड जिल्ह्यत सव्वाशे गावात मी विविध आरोग्य निदान चिकित्सा शिबिरे घेतली. वेळी-अवेळी भरपूर धूळ असणाऱ्या या मागास भागात दिवसभर मी अधूनमधून लवंग चावून खात असे. काही वेळेस ही संख्या १५-२० इतकी असायची. त्यामुळे माझे आरोग्य उत्तम राहिले. ही लवंग भगिनीची, देवकुसुमची कृपा!
वेलची
वेलचीमध्ये दोन प्रकार आहेत. दोन्हींचे गुणधर्म सारखे आहेत. वेलदोडा जुनाट व किडका नसावा. गरज तेव्हाच ताजा वेलदोडा आणावा. वेलची गुणाने रूक्ष, कफ, पित्त दोन्हींवर काम करणारी, शरीराला हलकेपणा आणणारी आहे. वेलची थंड का उष्ण हा वादाचा भाग आहे. रक्तविकार, तहान, मळमळ, उचकी, कोरडा खोकला, मूत्रविकार, डोळय़ांचे विकार, केसांचे व डोक्याचे विकार, शरीराचा दाह, हृद्रोग, आर्तवविकार, मुखविकार इत्यादी विविध विकारांत वेलचीचा उपयोग आहे.
वेलचीचे दाणे भाजून त्याचे चूर्ण घेतल्यास उचकी व उलटी थांबते. लघवीतून व योनीतून रक्तस्राव होत असल्यास वेलची चूर्णाचा लगेच उपयोग होतो. दरुगधी जखमांवर वेलची चूर्ण व तूप किंवा खोबरेल तेलाची पट्टी ठेवावी. जखम लवकर भरून येते. पोटफुगी या विकारात वेलची दाणे हिंगाबरोबर मिसळून खावे. ज्या पुरुषांचा लैंगिक दुबळेपणा आला असेल त्यांनी, वारंवार स्वप्नदोष होणाऱ्यांनी तुपाबरोबर नियमितपणे वेलची चूर्ण घ्यावे. शुक्रधातूचे कार्य सुधारते. वेलची मूत्रप्रवृत्ती साफ करते. त्याकरिता डाळिंब किंवा दह्याबरोबर वेलची चूर्ण खावे.
वेलची अत्यंत पाचक आहे. जडान्न, तुपाचे अजीर्ण, खूप ढेकरा याकरिता तीन-चार वेलदोडे दोन कप पाण्यात उकळून अष्टमांश काढा करून प्यावा. कोणत्याही पदार्थात सुगंधी म्हणून वेलचीचा जसा वापर आहे तसेच शरीरात थंडावा आणण्याकरिता वेलची सर्वत्र वापरावी. गर्भवती स्त्रीने वेलची फार खाऊ नये. रात्री वेलची खाणे टाळावे. सीतोपलादि चूर्णातील एक घटकद्रव्य वेलची हे आहे. दुर्धर गँगरिनसारख्या विकारात मधुमेही विकारात वापरल्या जाणाऱ्या एलादी तेलात, तसेच कोरडा खोकला, आवाज बसणे याकरिता प्रसिद्ध असलेल्या एलादी वटी या औषधात वेलची दाणे हे प्रमुख घटकद्रव्ये आहेत. लहान प्रमाणात वेलची खाल्ल्यास उलटी थांबते. खूप प्रमाणात खाल्ल्यास उलटी होते. हे लक्षात असावे.
आले, सुंठ
नुकताच रामनवमीचा उत्सव अनेकानेक राममंदिरांत संपन्न झाला. उत्सवानंतर समस्त भाविकांना सुंठवडा देण्यात आला. त्यानिमित्त सुंठेचे व श्री प्रभू रामचंद्राचे स्मरण करू या.
‘नागरं दीपनं वृष्यं ग्राही हृद्यं विबंधनुत्।
रूच्यं लघु स्वादुपाकं स्निग्धोष्णं कफवातजित्॥’
शुण्ठय़ामवातं शमयेद् गुडुची।’
जिभेच्या टोकापासून ते गुदापर्यंत अन्न वाहून नेणाऱ्या महास्रोतसांत दीपन, पाचन व अनुलोमन अशी तीनही कामे आले किंवा सुंठ करते. ही कामे करताना आतडय़ाची यत्किंचित हानी होत नाही. उलट आतडय़ांना नवा जोम प्राप्त होतो. आले, सुंठ चवीने उष्ण असूनही शरीराचे वजन किंवा बल घटवत नाही. आले रुची उत्पन्न करते, फाजील चरबी वाढू देत नाही. त्याचबरोबर शरीर फार रूक्षही होऊ देत नाही. आल्याचा तुकडा किंवा सुंठचूर्ण जिभेचा चिकटा दूर करते, उलटीची भावना थांबवते. आमाशयात आमपचनाचे काम करते. लहान आतडय़ात पित्त वाढू देत नाही. मोठय़ा आतडय़ात मळ सुटा करते. त्यामुळे मळ चिकटून राहात नाही. सर्व आतडय़ांतील वायूचे अनुलोमन व खाल्लेले अन्न ठरावीक वेळात पुढे नेणे, त्यावर पचनाचे संस्कार करणे हे काम आले एकटे करू शकते म्हणून जेवणात सर्व पदार्थात आले हवे. सुंठ आल्यापेक्षा जास्त तीक्ष्ण आहे. संधिवात, आमवातातील वेदना आल्याचा रस किंवा सुंठेचे चूर्ण घेतल्यास लगेच थांबतात. उलटी, वारंवार संडासची भावना, अजीर्ण, पोटफुगी, करपट ढेकरा, आम्लपित्त, पोटदुखी या तक्रारींत आल्याचा तुकडा, रस किंवा सुंठचूर्ण काम करते. आले, लिंबाचे पाचक प्रसिद्ध आहे. प्रत्येक घरात असे हुकमी औषध ‘इमर्जन्सी’ तातडीचे औषध म्हणून हवेच. जुनाट सर्दी, दमा, कफ, खोकला या विकारांत न कंटाळता आले तुकडा चघळावा, रस प्यावा. सुंठ कधीही उकळू नये.
आले हृदयाला हितकारक आहे. पोटात चरबी साठू देत नाही. अर्धशिशी विकारात सुंठ व गूळ उपयुक्त आहे. तसेच आल्याचा रस दोनच थेंब नाकात टाकावा. तीव्र पोटदुखीत आल्याचा रस बेंबीत जिरवावा. आमवातातील तीव्र वेदनांत सांध्यांना आल्याचा रस चोळावा. थंडी, ताप, न्यूमोनिया, कफविकार यात पाठीला व छातीला आलेस्वरस चोळावा. पोटात घ्यावा. आल्याच्या जोडीला पुदिना, तुळस, विडय़ाची पाने वापरावीत. ताज्या आल्याच्या अभावी ताज्या सुंठीचे चूर्ण वापरावे.
हळद
‘पी हळद अन् हो गोरी’ या वचनाचा साक्षात प्रत्यय ज्यांना घ्यावयाचा आहे त्यांना हळदीचा नेटाने पाठपुरावा करावा लागतो. मात्र आज स्वयंपाकात आपण वापरतो ती हळद औषधी गुण देणारी नाही. ज्यांना हळदीचे उत्तमोत्तम गुण आरोग्य राखण्याकरिता वा रोगनिवारणाकरिता हवे त्यांनी ओली हळद किंवा आल्यासारखे जे कंद मिळतात त्यांचा वापर करावा. ओल्या हळदीचे सावलीत वाळवून चूर्ण करावे किंवा ओल्या कंदांचा रस काढावा. ताज्या हळदीचे गुण, रोजच्या वापरातील हळदीच्या पावडरमध्ये येत नाहीत. ओली हळद मिळाली नाही, तर नेहमीची हळद वापरावी.
हळद फार औषधी आहे, पण ती अत्यंत उष्ण व रूक्ष गुणाची आहे. या दोन गुणांमुळे हळद ही वारंवार लघवी होणाऱ्या मधुमेह किंवा प्रमेह या विकारांत अतिशय उपयुक्त आहे. शीत प्रकृतीच्या माणसाला ओली हळद नियमित रूपाने घेतल्यास मधुमेह नियंत्रणात आणता येतो. वारंवार सर्दी, पडसे, दमा, कफाचा खोकला, नाक वाहणे, शेंबूड होणे, सतत कफ होणे, या कफप्रधान विकारांत हळद चूर्ण सकाळी व सायंकाळी पाव चमचा प्यावे. ज्यांना थोडय़ाशा दुधानेही कफ होतो त्यांना दूध, हळद फार उपयुक्त आहे. मात्र रात्रौ दूध हळद घेणे योग्य नव्हे. टॉन्सिल वाढल्या असल्यास तसेच कफ, सर्दी या विकारांत मीठ, हळद व गरम पाण्याच्या गुळण्या नियमित कराव्या. त्यामुळे घसा सुधारतो. घशातील कफाच्या जागा स्वच्छ होतात. कानाकडे घशातील कफाचा प्रसार होण्याला प्रतिबंध बसतो. ज्यांना टॉन्सिल्स वाढल्याने कानावर परिणाम होईल अशी धास्ती वाटते त्यांनी हळकुंड उगाळून खराब टॉन्सिल्सवर त्याच्या गंधाचा लेप लावावा. सेप्टिक किंवा विषार पसरविणारा कफ कमी होतो. हळद ही रक्तशुद्धी करते अशी सार्वत्रिक समजूत आहे. हळद ही रक्त वाहणे थांबविण्याची क्रिया सत्वर करते, ती रक्तस्तंभक आहे. त्यामुळे जखमेवर हळद दाबली की रक्त वाहणे थांबते असा सार्वत्रिक गोड समज आहे. खरी वस्तुस्थिती वेगळी आहे. हळद ही रक्तामध्ये जंतूचा प्रवेश करू देत नाही. म्हणून वाहणाऱ्या जखमेवर हळद चेपायची असते. वाहणारे रक्त आपोआपच थांबत असते. कोणत्याही विषबाधेत हळद चूर्ण तुपाबरोबर प्यावे.
ज्याला आपला आवाज सुधारावासा वाटतो, त्यांनी चिमूटभर हळद नियमितपणे खावी. ज्या स्त्रियांना आपली संतती गोरीपान व्हावी असे वाटते त्यांनी गर्भारपणी हळद चूर्ण किंवा ओल्या हळदीचे दोन चमचे रस प्यावा. अंगावर खरूज, वाहते इसब, गजकर्ण, नायटा असे त्वचाविकार उठले तर पोटात हळद चूर्ण घ्यावे. बाहेरून हळदीच्या चूर्णाचा लेप लावावा. लहानथोरांना जंताची खोड असल्यास हळद व गूळ यांच्या गोळय़ा घ्याव्या. डोळे येण्याच्या साथीत हळद चूर्ण पाण्यात उकळून पाणी गाळून घ्यावे व त्या पाण्याने डोळे धुवावे. डोळे लवकर बरे होतात.
रक्त न पडणाऱ्या मूळव्याधीत हळदीचा लेप मूळव्याधीच्या मोडाला लावावा. मोड कमी होतो. तारुण्यपीटिका किंवा तरुण मुलामुलींच्या मुरुमांवर हळदीचा लेप फार उपयुक्त आहे. चेहऱ्याच्या त्वचेवरील काळे डाग घालविणे, तेलकटपणा कमी करणे व मुरुमांतील पू कमी करावयास हळकुंड लेप उपयुक्त आहे. बाळंतिणीच्या अनेक तक्रारींकरिता हळद उपयुक्त आहे. हळद व तेल यांच्या मसाजाने कांती सुधारते. चरबी हटते. पोटात नियमित हळद घेणाऱ्या स्त्रियांना बाळंतरोग होत नाही. हळदीला अनेक नावे आहेत. निशा, रजनी अशा नावांप्रमाणेच वज्रदेही हे नाव आहे. हळदीचा नियमित वापर करणाऱ्याचे शरीर खरोखरच निरोगी होते व कोणत्याही रोगावर प्रतिकारशक्ती वाढवून मात करते. कफप्रधान कावीळ, पांथरी व यकृतवृद्धीत हळदीचा काढा उपयुक्त आहे. श्वेत प्रदर विकारात स्थूल स्त्रियांनी हळदीचे चूर्ण नियमित घ्यावे. वजन कमी होते. हृद्रोगी विशेषत: मधुमेही व स्थूल व्यक्तींनी आपल्या खाण्यापिण्यात ओली हळद जरूर ठेवावी, कारण ती रक्तवर्धक आहे. शरीरातील रक्ताचा जोम वाढवते. रक्तवाहिन्यांत फाजील चरबीच्या गाठी होऊ देत नाही. अशा गुणवान ओल्या हळदीला अनेक-अनेक प्रणाम!
हिंग
स्वयंपाकाकरिता आवश्यक असणारा हिंग बाजारात कमी-अधिक तिखटपणा, वासाचा मिळतो. व्यापारी आपापल्या फॉम्र्युलाप्रमाणे मूळ हिराहिंगात भेसळ करून विकतात. मूळ हिराहिंग खूपच कडू असतो. तो नेहमीच्या स्वयंपाकात वापरताच येणार नाही. मात्र पोटदुखी, सांधेदुखी, गुडघेदुखी याकरिता हिराहिंग किंवा नेहमीच्या हिंगाचा गरम गरम दाट लेप उत्तम काम करतो. चांगल्या दर्जाचा हिंग हा उत्तम वातनाशक आहे. हिंगाचा कणभर खडा मिठाबरोबर घेतला की कसलेही अजीर्ण दूर होते.
हिंग वातानुलोमक आहे. आमाशयात वा पक्काशयात वायू अडला असो, हिंग लगेच वायू मोकळा करतो. हिंग भाजून त्याची कढी किंवा ताक हे सर्वानाच माहीत असलेले औषध आहे. हर्निया, पोटदुखी, पोटफुगी, आमांश, जंत, अन्न कुजणे या तक्रारींत हिंग, मीठ, लसूण व गरम पाणी असे मिश्रण नियमित घ्यावे. सर्दी, पडसे, अर्धशिशी या विकारांत हिंगाचे पाणी तारतम्याने नाकात टाकावे. वायुगोळा किंवा पोटातील वातज गुल्म या विकारांत हिंग आल्याच्या रसाबरोबर घ्यावा. लगेच आराम पडतो. प्रसिद्ध हिंगाष्टक चूर्णातील प्रमुख घटकद्रव्य हिंग आहे. पुरुषांच्या हर्निया/ अंडवृद्धी या विकारांत हिंग-लसुणादी तेल मोठेच योगदान देते. एक भाग हिंग, तीन भाग सैंधव, नऊ भाग एरंडेल तेल व सत्तावीस भाग लसणीचा रस असे एकत्र मिश्रणाचे आटवून सिद्ध केलेले तेल हर्नियाकरिता एकदम अफलातून औषध आहे.
औषधाविना उपचार : तेलाबद्दल बोलू काही!
आपल्या शरीरातील विविध अवयवांच्या आरोग्य-अनारोग्य समस्यांचा विविध तेलांच्या साहाय्याने सामना करता येतो
आपल्या शरीरातील विविध अवयवांच्या आरोग्य-अनारोग्य समस्यांचा विविध तेलांच्या साहाय्याने सामना करता येतो. प्रत्येक तेलाचे स्वत:चे विशिष्ट असे काही गुण असतात. विविध तेलांचा विविध समस्यांसाठी कसा फायदा होऊ शकतो; याविषयी.
आयुर्वेदात तेलाला वातविकारात एक नंबरचे स्थान आहे. तेल ज्या बियांपासून निघते त्या पदार्थाचे गुण त्यात असतातच. शिवाय प्रत्येक तेलाचे स्वत:चे गुण आहेत. जेव्हा शरीरभर व्यापणाऱ्या विकारांकरिता, सर्व शरीरात औषध पोचायला हवे त्या वेळेस तेल अंतर्बाह्य़ द्यावे. तेल त्वचेत लवकर जिरते, त्वचेची रुक्षता घालवते. फाजील कफ उत्पन्न होऊ देत नाही.
आयुर्वेदात तीळ तेलाची मोठी महती आहे. तेल युक्तीने दिले तर मलमूत्रांच्या वेगांचे नियमन करते. तेलाचे विशेष कार्य अपान वायूवर आहे. त्यामुळे मलमूत्र, गर्भनिष्क्रमण, आर्तव व शुक्रस्थान यांचे कार्य बिघडल्यास योजनापूर्वक तेलाचा वापर करावा. मळाचा खडा होत असल्यास पहाटे किंवा सायंकाळी पाच वाजता तीन चमचे तेल आपल्या आवडीप्रमाणे गरम पाण्याबरोबर घ्यावे. त्यासोबत किंचित लिंबू किंवा चिंचेचे पाणी व मीठ चवीपुरते मिसळावे.
लघवीला वारंवार होत असल्यास झोपण्यापूर्वी दोन चमचे तेल प्यावे. लघवीचे दोन वेग तरी कमी होतात. सुखाने बाळंतपण पार पाडण्याकरिता सातव्या महिन्यापासून नियमितपणे दोन चमचे तेल प्यावे. टाके पडत नाहीत. वारंवार स्वप्नदोषाने दुर्बळ असल्यास सकाळी तीळतेल दोन चमचे घ्यावे.
लहान बालकांना कृमी, मलावरोध, पोट फुगणे, पोटाचा नगारा या तक्रारी असल्यास चमचाभर तीळतेल किंचित मिरेपूड व गरम पाण्याबरोबर द्यावे. स्त्रियांची मासिक पाळी कष्टाने येत असल्यास, पाळीत अंगावर कमी जात असल्यास, पोट दुखत असल्यास तीळतेल नियमित सकाळी, सायंकाळी दोन चमचे घ्यावे, वर कोमट पाणी प्यावे.
स्थूल व्यक्तीच्या रक्तात चरबीचे फाजील प्रमाण (सेरेम कोलेस्ट्रॉल) नसल्यास तसेच त्यांना रुक्ष मळ, त्यामुळे संडासला खडा होत असल्यास नियमितपणे आठ-पंधरा दिवस तेल प्यावे. तक्रारी दूर होतात. स्थूल व्यक्तींचा स्नायूंचा बेढबपणा, फाजील चरबी माफक प्रमाणात तेल घेतल्यास कमी होते.
अग्निमांद्य विकारात पहाटे दोन चमचे तेल व त्याचबरोबर चिमूटभर सुंठचूर्ण व सोबत गरम पाणी घेतले तर दुपारी चांगली भूक लागते. मात्र भूक लागेपर्यंत मध्ये काहीही खाऊ नये. अंग बाहेर येणे, योनिभ्रंश, गुदभ्रंश विकारांत सायंकाळी सहा वाजता दोन-तीन चमचे तेल कोमट पाण्याबरोबर घ्यावे. वायूवर नियंत्रण होते. अंग बाहेर येण्याकरिता चेक बसतो. हर्निया, अंडवृद्धी या विकारांत गोडेतेल, लसूण रस, कणभर हिंग व चवीपुरते मीठ असे मिश्रण कोमट पाण्याबरोबर पहाटे घ्यावे.
कंबरदुखी, गुडघेदुखी, खांदेदुखी, पाठदुखी, सांधेदुखी यांसारख्या मणके व हाडांच्या दुखण्यात कृश व्यक्तींनी खोबरेल तेल माफक प्रमाणात नियमितपणे घ्यावे. स्थूल व्यक्तींनी तीळ तेल घ्यावे. मलावरोध, आमवात, सायटिका, खांदा जखडणे या विकारांत एरंडेल तेल प्यावे व सुंठपाणी घ्यावे.
बाह्य़ोपचार : संधिवात, आमवात, संधिशूल, अर्धागवात अशा नाना तऱ्हेच्या वातविकारात तेलाचे मसाज उपयुक्त आहे. हातापायांना खालून वर, पाठ, पोट, खांदा, गुडघा, मान यांना गोल पद्धतीने रात्रौ झोपताना व सकाळी आंघोळीच्या अगोदर हलक्या हाताने मसाज करावा. तेल जिरवायचे असते. म्हैस रगडल्यासारखी पैलवानकी येथे उपयोगी पडत नाही. म्हातारपण लांब ठेवणे, श्रम सहन व्हावे व समस्त वातविकार बरे व्हावेत म्हणून आयुर्वेदाने तेल मसाज ही मानवाला मोठी देणगी दिली आहे. अनेक औषधे खाण्यापेक्षा थोडा वेळ काढून वातविकार रुग्णांनी नित्य मसाज करावा.
तेलाचे कुपथ्य
कावीळ, जलोदर, पोटात पाणी होणे, यकृत व पांथरीची सूज, रक्तदाब खूप वाढणे, रक्तात चरबी वाढणे, अंगाला मुंग्या येणे, स्थौल्य, शौचाला घाण वास येणे, चिकट आमांश असे परसाकडला होणे, आमवात, अजीर्ण, आव, हृद्रोग या विकारांत पोटात तेल घेऊन नये. ज्या आमवातात तेल चोळण्याने दु:ख कमी होण्याऐवजी वाढते, तसेच जे शरीर अगोदरच खूप स्निग्ध, तसेच घाम खूप येत असताना तेलाचा मसाज करू नये.
आतापर्यंत आपण तेलाचे पोटात घेण्याकरिता वापरत असलेल्या प्रकाराबद्दलची माहिती घेतली. स्वयंपाकाकरिता किंवा पोटात घेण्याकरिता देशकालपरत्वे वेगवेगळय़ा प्रकारची तेले जगात विशेषत: भारताच्या विविध भागांत वापरात आहेत. गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, आंध्र, कर्नाटक, तामिळनाडू, राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश, पंजाब, बंगाल या बहुसंख्येच्या भारत देशात शेंगदाणा तेलाचा वापर प्रामुख्याने आहे. उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांच्या काही अति थंड हवामानाच्या प्रदेशात स्वयंपाकाकरिता मोहरीच्या, नाकात जाणाऱ्या स्ट्राँग वासाच्या तेलाचा वापर फोडणीकरिता केला जातो. ज्यांना झणझणीत तोंडीलावणी आवडतात अशा खवय्यांकरिता मायभगिनी मोठय़ा कौतुकाने मोहरीच्या तेलाची फोडणी असलेली लोणची बनवितात. केरळात, गोमंतक व कोकणाच्या काही भागांत स्वयंपाकाकरिता खोबरेल तेलाचा वापर असतो.
बाह्येपचारार्थ जेव्हा तेलाचा वापर केला जातो तेव्हा त्या त्या तेलांच्या बियांच्या मूळ गुणधर्माबरोबरच, ज्या वनस्पतींच्या साहाय्याने तेल सिद्ध होते त्या वनस्पतींचे गुणधर्म त्यात उतरत असतात. उदा. घरात नवीन बाळ जन्माला आले की माय-लेकरांकरिता चंदनबलालाक्षादी तेलाचा वापर दोघांनाही अभ्यंग-मसाज- तेल जिरवण्याकरिता केला जातो. त्या तेलात चंदन, बला, चिकणा, लाख अशा वनस्पतींचे गुणधर्म प्रामुख्याने असतात. शरीरातील सर्व स्नायूंना लवचीकता यावी, रोजच्या रोज सहजपणे मसाजाकरिता तेल वापरता यावे व ज्या तेलाच्या निर्मितीकरिता एकच घटकद्रव्य पुरेसे आहे अशा शतावरी सिद्ध तेलात, शतावरीचे- शतवीर्या सहस्रवीर्या वनस्पतीचे गुण असतात. त्यामुळे असे तेलाचे मर्दन करून घेऊन आपले स्नायू कोणत्याही कठीण कामाला सक्षम होतात. हेच तेल पोटात घेतल्यास आमाशयापासून ते पक्वाशयापर्यंत रुक्षता आलेली आतडी स्निग्ध होतात. ही रुक्षता यायला कुपोषण, जागरण, विविध व्यसने, अनिद्रा, चिंता, परान्न, कदन्न अशी अनेकविध कारणे असतात. महाराष्ट्रात गेली पासष्ट वर्षे खूप लोकप्रिय असणाऱ्या बलदायी महानारायण तेलात पाच प्रकारची तेले घटकद्रव्ये म्हणून वापरात आहेत. ‘अधिकस्य अधिकं फलम्।’ या न्यायाने तीळतेल, करंजेल तेल, लिंबोणी तेल, एरंडेल तेल व मोहरी तेल अशी विविध प्रकारची पाच तेले एका थोर वैद्यांनी निवडली. त्याचबरोबर त्यात शतावरी, आस्कंद, भुईकोहळा, लाख, वाकेरी, चिकणा, देवदार, एरंडमूळ, त्रिफळा, दशमुळे अशी विविध औषधी द्रव्ये वापरली. त्यामुळे या सगळय़ांचा एकत्रित गुणसमुच्चय- Cumulative effect अभ्यंगार्थ तेल वापरणाऱ्यांना लगेचच मिळतो. पण क्वचितच शंभरात एखाद्या व्यक्तीला मोहरीच्या तेलामुळे अंगाला खाज सुटते, असो. दुर्धर संधिवात, आमवात, ग्रधृसी (सायटिका), अवबाहुक (फ्रोजन शोल्डर), गुडघेदुखी, कंबरदुखी अशा विकारांच्या असाध्य अवस्थेत महाविषगर्भ तेलाचा आग्रहाने वापर केला जातो. त्यात तीळतेल व अनेक तीक्ष्णोक्ष्ण वनस्पतींबरोबर बचनाग या विषद्रव्याचा ‘बाह्य़ोपचारार्थ’ समावेश केलेला आहे. असे हे तेल शीतकाळी, थंड प्रकृतीच्या व बलदंड व्यक्तींकरिताच वापरावे, हे येथे आवर्जून सांगावयास हवे. ज्यांना काही द्रव्यांची अॅलर्जी आहे, अशांनी या तेलाचा बाह्य़ोपचारार्थ वापर कटाक्षाने टाळावा.
कानात तेल टाकू नका
‘लास्ट बट नॉट लिस्ट इंपॉर्टन्ट’ वचन असे आहे, की ‘कानात तेल टाकणे हा गुन्हा आहे. आपल्या शरीरात कान हे आकाश तत्त्वाचे, पोकळीचे मोठे प्रतीक आहे. कानात तेल टाकण्याने कानातील खाज, पू, बहिरेपणा वाढणार, कमी होणार नाही. हे सुज्ञ वाचकांनी लक्षात घ्यावे.
जगभर बघणेबल चेहरा-तारुण्यपीटिका, मुरुम याकरिता तसेच केस गळणे, केस पिकणे, केसांत कोंडा होणे अशा समस्यांकरिता तरुण मुले-मुली व वृद्ध माणसेही फार चिंताग्रस्त असतात. त्याकरिता जगभर स्थानकालपरत्वे विविध वनस्पतींपासून खूप प्रकारची तेले शेकडो कंपन्या बनवत आहेत व ती मोठय़ा संख्येने खपत आहेत. सुमारे पंचवीस-तीस वर्षांपूर्वी ‘जबाकुसुम तेल’- बंगालमध्ये तयार होणारे केसांकरिता मोठय़ा संख्येने लोक विकत घेत व वापरत. त्यामध्ये जास्वंद फुले ही प्रमुख वनस्पती वापरलेली असे. याशिवाय माक्याच्या पानांपासून महाभृंगराज तेल, आवळय़ापासून आमला किंवा आमलक्यादी तेल, वडाच्या पारंब्यांपासून वटजटादी तेल, कोरफडीच्या गरापासून कोरफड तेल अशी खूप खूप तेले व सौम्य प्रकृतीकरिता जास्वंद, त्रिफळा, गुलाबकळी, नागरमोथा, शतावरी, चंदन अशा वनस्पतींपासून बनविले जाणारे जपाकुसुमादी तेल अशी तेले आपल्या विविध गुणांनी केसांच्या आरोग्याची काळजी उत्तम प्रकारे घेत आहेत. ज्यांना परसाकडला त्रास होतो, तीव्र मलावरोध आहे, त्यांच्याकरिता चिंचेचा कोळ, कणभर मीठ व गोडेतेलापासून ‘चिंचालवण तेल’ घरच्या घरी ताजे बनवता येते. ज्यांच्या गुडघ्यावरील वंगण कमी झाले आहे, गुडघ्यातून कट्कट आवाज येतो, जिना उतरताना त्रास होतो, त्यांच्याकरिता घरच्या घरी ओल्या नारळापासून ‘नारिकेल तेल’ तयार करता येते. वीस रुपये किमतीचा मोठा नारळ आणावा. तो किसणीने खवावा, त्याच्या खोबऱ्यात थोडे पाणी मिसळून ते दूध रात्रभर फ्रिजमध्ये ठेवावे. सकाळी वर आलेला तो नारळाच्या लोण्यासारखा पदार्थ मंदाग्रीवर गरम करावा. तुपासारखे उत्तम तेल तयार होते. असे तेल सकाळ-संध्याकाळ १५ मिली. प्रमाणात पोटात घेतल्यास, गुडघेबदल, खुबेबदल यांच्याकरिता लाखो रुपये खर्च करावे लागत नाहीत.
ज्यांना सर्दी, नाक चोंदणे, सायनोसायटिस, नाकातील हाड वा मास वाढले आहे त्यांच्याकरिता शास्त्रकारांनी अणुतेल, नस्यतेल, पाठादी तेल अशी विविध प्रकारची नाकात टाकायची तेले सांगितली आहेत. विविध प्रकारच्या जखमा, मधुमेही जखमा, महारोग्यांच्या जखमा, इसब, गजकर्ण, सोरायसिस, गँगरीन याकरिता ‘एलादी तेलाचा’ बाह्य़ोपचार तात्काळ परिणामकारक गुण देतो. तोंड येणे, मुखपाक, चहा, जागरण, तंबाखू, खूप तिखट खाणे यामुळे गालात, तोंडात, जिभेवर फोड आलेले असता व तोंडाच्या प्राथमिक अवस्थेतील कॅन्सरसाठी इरिमेदादीतेल लावल्यास लगेच बरे वाटते. केसांत उवा, लिखा, कोंडा असल्यास करंजेल तेल व थोडासा कापूर असे मिश्रण केसांना रात्रौ लावल्यास व सकाळी शिकेकाईने केस धुतल्यास केसातील घाण पूर्णपणे नष्ट होते.
आपल्या शरीरातील विविध अवयवांच्या आरोग्य-अनारोग्य समस्यांचा विविध तेलांच्या साहाय्याने सामना कसा करावा, हे सांगणाऱ्या श्रीधन्वंतरीला सहस्र तैल प्रणाम!
औषधाविना उपचार : मद्य न पेयं, पेयं ना स्वल्पं, सुबहुवारिद्यंवा।
आयुर्वेदात दारूमुळे होणाऱ्या विकारांचे विस्तृत वर्णन आहे. कुठेच दारू प्यावी, आपलीशी करावी असा सांगावा
आयुर्वेदात दारूमुळे होणाऱ्या विकारांचे विस्तृत वर्णन आहे. कुठेच दारू प्यावी, आपलीशी करावी असा सांगावा नाही. आयुर्वेदात सांगितलेले मद्य व आताची दारू यात महद्अंतर आहे. तरी शास्त्रकारांनी वरीलप्रमाणे मद्य पिऊ नये, प्यायचे झाले तर अल्प प्रमाणात, अत्यल्प प्रमाणात तेसुद्धा भरपूर पाणी मिसळून घ्यावे असे सांगितले आहे. उन्हाळा, शरद ऋतू या काळात त्याचा तीव्र निषेध केला आहे. दारूचे दुर्गुण सर्वानाच माहीत आहेत. पण यकृताचे कार्य दारू कसे बिघडवते हे पाहावयाचे असल्यास जलोदर, कावीळ, यकृत किंवा पांथरीची सूज असणाऱ्या आपल्या आसपासच्या रोग्यांचा तपास करावा. मग दारूचे व्यसन करून औषध मागावयास येणाऱ्या रोग्यांना, दारूऐवजी ‘घोडय़ाचे मूत्र प्या’! असे खडीवाले कडाडून का सांगतात हे कळेल.
दारू हे प्रथम पचन व्हावे, भूक लागावी, पोटातील गॅस दूर व्हावा, झोप लागावी, आपले दु:ख विसरावे म्हणून लोक घेतात. सुरुवातीचे आठ-पंधरा दिवस त्याचा थोडाफार वरवर उपयोग होतो असे दिसते. नंतर दारू जी माणसांचा ताबा घेते ती कायमची, त्याला संपवेपर्यंत. दारू यकृताचा नाश करते. ती सरळ रक्तात पोचते. शरीरातील स्निग्ध, ओजस्वरूपी जीवनाचा दर क्षणाला नाश करते.
शास्त्रात दारूचे मधुर, कडू, तुरट, तिखट इत्यादी रस सांगितले असून ती सारक, रोचक, दीपक, तीक्ष्ण, उष्ण, लघू, आल्हाददायक, पौष्टिक, स्वर, स्मृती व वर्ण याकरिता हितावह तसेच निद्रानाश व अतिनिद्रा या दोन्हींकरिता उपयुक्त सांगितली आहे. विधिपूर्वक घेतल्यास शरीरातील विविध स्रोतसांचे मार्ग खुले करते.
पण मद्य घेणाऱ्याचा आपल्या तोंडावर कधीच ताबा राहात नाही. त्यामुळे गुण राहातात बाजूला, न शरीरात विषाचा झपाटय़ाने प्रसार करण्यास गुण दारू तात्काळ दाखवते. अल्सर, तोंड येणे, जळवात, मूळव्याध, भगंदर, मूतखडा, कावीळ, जलोदर, यकृत विकार, गरमी, परमा, एड्स, गांधी उठणे, जखमा, त्वचा विकार, पोटदुखी, मलावरोध, हाडांचे विकार, हृद्रोग व क्षय या विकारांत दारू पिणे म्हणजे ‘आपले थडगे आपणच खणणे आहे.’
आयुर्वेदीय प्राचीन ग्रंथात पाणी, दूध, तेल, तूप या द्रव द्रव्यांबरोबर मद्याबद्दलही विस्ताराने वर्णन केलेले आहे. त्या काळातील मद्य कल्पना आजच्या दारूपेक्षा फारच वेगळी होती. आयुर्वेदीय ग्रंथात नवीन मद्य व जुने मद्य, तांदळाच्या पिठापासूनची दारू-सुरा; ताडी; माडी किंवा शिंदी, बेहडय़ाची साल व तांदळाच्या पिठापासून केलेली दारू तसेच विविध आसवारिष्टे, द्राक्षासव, खर्जुरासव, साखर, गूळ, ऊसाचा रस, ऊसाचा शिजवलेला रस, मधापासून केलेली दारू अशा विविध प्रकारच्या दारूंची निर्मिती व कमी-अधिक गुणदोष सांगितले आहेत.
तंबाखू, विडी, सिगरेट, गुटका, मशेरी, तपकीर, तंबाखू, टूथपेस्ट, दारू, ब्रॅन्डी, वाइन, रम अशा विविध निकोटिन व अल्कोहोलच्या उत्पादनाच्या दुष्परिणामाबद्दल मी आपणा सर्वाशी सुसंवाद साधण्याचे कारण नाही. कारण या व्यसनांमुळे काय बरे-वाईट होते हे या व्यसनाचा कमी-अधिक वापर करणाऱ्या, घरच्या नातेवाईकांना व व्यसन न करणाऱ्या तसेच वैद्यकीय क्षेत्रांतील लहानथोरांना माहिती आहेच. माझ्या वैद्यकीय व्यवसायामुळे माझ्याकडे प्रतिदिन मंडळी येत असतात. त्यांच्या तक्रारी, लक्षणे, रोग, अडचणी हे ऐकल्यानंतर मी तरुणांपासून वृद्धांकरिता माझा पथ्यापथ्याचा लाल कागद हातात घेतो. रुग्णांच्या तक्रारींचा मागोवा घेताना; मलावरोध, हाडांचे विकार, प्राणवह स्रोतसांचे विकार, रक्तक्षय, पांडुता, कावीळ, डोळय़ांचे विकार, जलोदर, संधिवात, मुंग्या येणे, हृद्रोग, मूत्रपिंड विकार, सी.आर.एफ., नपुंसकता अशा रुग्णांना ‘तुम्हाला काही व्यसन आहे का’, असे विचारायला लागते. हे व्यसन बंद करणार असाल तर तुम्हाला मी औषधोपचार सुचवू शकतो अशी माझी भूमिका असते. बहुधा अशी ठाम भूमिका घेतली तर रुग्ण व त्यांचे नातेवाईक जरूर ऐकतात. व्यसनमुक्तीचा प्रामाणिक प्रयत्न करतात.
ज्यांना मनापासून दारू सोडायची इच्छा आहे त्यांनी दारू प्यावीशी वाटते त्या वेळेस दोन-तीन कागदी लिंबाचा केवळ रस, साखर, पाणी किंवा मीठ न मिसळता प्यावा. मग खुशाल दारू प्यावयास घ्यावी. बहुधा दारू घशाखाली उतरत नाही. कारण दारू व आंबट लिंबू रस यांचा परस्परविरोध आहे. ज्यांना असे करावयाचे नाही त्यांच्या घरातील स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तींनी या दारुडय़ा माणसाच्या जेवणात कोशिंबीर, चटणी, रायते, भाज्यांत सायट्रिक अॅसिड किंवा लिंबूक्षार नावाचे साखरेच्या कणासारखे केमिकल मिसळतात, ते चार-पाच कण टाकावेत. ते फार आंबट असतात. त्याची किंमत नाममात्र असते. कोणत्याही केमिस्टकडे किंवा आयुर्वेदीय औषधी उत्पादकांकडे मिळतात. मी विनामूल्य देतो.
भूक लागत नाही, पचन होत नाही म्हणून सबब सांगून जे मद्यपान करू इच्छितात त्यांना कुमारीआसव, द्राक्षारिष्ट, पिप्ललादि काढा, पंचकोलासव असे काढे करून पहावे. फायदा निश्चित होतो.
जी मंडळी झोपेकरिता किंवा चिंता दूर व्हावी म्हणून किंवा दु:ख विसरण्याकरिता मद्यप्राशन करू इच्छितात त्यांनी शतधौत घृत झोपण्यापूर्वी कानशिले, कपाळ, तळहात, तळपाय यांना जिरवावे; नाकात दोन थेंब टाकावेत. स्वत:च्या प्रश्नाव्यतिरिक्त कोणताही विषय किंवा वर्तमानपत्रातील बातमी डोळय़ांसमोर आणावी, चटकन झोप लागते. गरज पडली तर निद्राकर वटी सहा गोळय़ा झोपताना घ्याव्यात. शांत झोपेकरिता आणखी दोन उपाय म्हणजे सायंकाळी लवकर व कमी जेवण घ्यावे. जेवणानंतर किमान वीस ते तीस मिनिटे फिरून यावे.
‘एकच प्याला’ नाटक लिहिणारे महान मराठी साहित्यिक श्रीराम गणेश गडकरी, महात्मा गांधी, संत विनोबा, संत गाडगेमहाराज यांना प्रणाम!
औषधाविना उपचार : चहा, चहाच चहा, चहाची चाह
आपल्या देशात दक्षिणेतील चार राज्ये सोडली तर बाकी सगळीकडे अगदी अब्जाधीशापासून ते थेट मोलमजुरीवर
आपल्या देशात दक्षिणेतील चार राज्ये सोडली तर बाकी सगळीकडे अगदी अब्जाधीशापासून ते थेट मोलमजुरीवर जगणाऱ्या सामान्य माणसापर्यंत सगळ्यांच्याच दिनक्रमाची सुरुवात चहाने होते.
लोकमान्य टिळकांना चहा व सुपारी, जास्तकरून सुपारीचे व्यसन होते. आपल्या थोर नेत्याचे अकाली निधन महाराष्ट्रातील हजारो टिळक भक्तांना चटका लावून गेले. त्यामुळे त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्याकरिता महाराष्ट्रातील शेकडो कुटुंबप्रमुखांनी चहा सोडला. माझे वडील अशाच कडव्या टिळक भक्तांपैकी एक होते. त्यामुळे साहजिकच वैद्य खडीवाले घराण्यात चहाबंदी आली, ती आजतागायत तरी माझ्यापुरतीच चालू आहे. अजूनपर्यंत माझ्या राहत्या घरात मी एक थेंबही चहाचा प्यायलो नाही. घरची कॉफीसुद्धा बोटांवर मोजण्याइतक्या वेळा प्यायलो असेन. आमच्या घरी सगळय़ांना जरी चहाबंदी असली तरी वडिलांनी आईच्या चहावर बंदी घातली नव्हती. ते म्हणायचे, ‘‘आई दुसऱ्याच्या घरची मुलगी. त्यामुळे तिला चहा प्यायला पूर्ण परवानगी.’’ माझ्या वयाच्या पाच-सहाव्या वर्षांची पहिला चहा करण्याची आठवण अजूनही ताजी आहे. एक दिवस आईने मला चूल पेटवून चहा करावयास सांगून चहा तयार करण्याचा पहिला ‘ओनामा’ दिला. त्या काळात गॅस, रॉकेल, स्टोव्ह, इलेक्ट्रिक शेगडी या गोष्टी नव्हत्याच. बहुधा ओलसर असणाऱ्या लाकडांची चूल खटाटोप करून पेटवावी लागे. कपभर चहाची सामग्री तयार झाली. आईचे शब्द अजूनही आठवतात. ‘‘एक कप पाण्याला उकळी फुटेपर्यंत, बुडबुडे येईपर्यंत चहापत्ती टाकू नको.’’ अशी कडक सूचना होती. त्याकरिता त्या पद्धतीच्या चहाला ‘बुडबुडेवाला चहा’ असे म्हणतो. मला वाटते, जगभर सर्वानाच मान्य होईल व चहाच्या सर्व घटकद्रव्यांना न्याय देईल असा हा चहाचा लोकमान्य फॉम्र्युला आहे.
प्रथम कपभर चहाकरिता पाव कप दूध तापवून तयार ठेवावे. तसेच एक कपभर चहाकरिता लागणारी (चवीप्रमाणे) साखर कपभर पाण्यात विरघळवावी. दुसरीकडे चहाची पत्ती आवडीनुसार सपाट चमचाभर तयार असावी. चहाकरिता घेतलेल्या साखरपाण्याला उकळी फुटली की लगेच चहाची पत्ती त्या भांडय़ात टाकून पाव मिनिट उकळू द्यावे, लगेच झाकण ठेवावे व गॅस बंद करावा. त्या वेळेस चहाचा उत्तम स्वाद आला पाहिजे. पातेले खाली उतरवून अध्र्या मिनिटाने चहा गाळावा, चवीपुरते साय नसलेले दूध मिसळावे. अपेक्षेप्रमाणे चहाला केशरी लाल रंग आलेला असला पाहिजे. असा चहा, चहा अजिबात न पिणारा मी आईला नेहमीच करून देत असे.
काही मंडळी या चहात आले, वेलदोडे, तुळस पाने, मिरी, दालचिनी, बडीशोप असे कमी-अधिक सुगंधी पदार्थ टाकून चहाची लज्जत घालवितात. मला प्रामाणिकपणे असे वाटते, चहा पिणाऱ्याला हवा असतो, ‘‘चहाचा फ्लेवर, चहाचा रंग, ताजेपणा, चहाची गरमाई.’’ थोडक्यात, चहाची लज्जत घालविण्याचा अधिकार कोणालाच नाही. असा लज्जतदार बुडबुडेवाला चहा मी आग्रहाने आठवडय़ातील एक दिवस माझ्या कामातील बत्तीस वर्षांतील सहकारी वैद्य वीणा मानकामे यांना भल्या प्रात:काळी करून पाजतो. त्यांची माझ्याबद्दल अनेकदा नाराजी असते. पण या चहाबद्दल एकही वावगा शब्द आलेला नाही.
आमच्या घरात पैसा-अडका फार नसला तरी सकाळी व्यायाम व दूध पिण्यावर वडिलांचा खास कटाक्ष असे. वडिलांचा धाक व एकूण साध्या राहणीचे वळण. ज्यामुळे चहाचे व्यसनच काय, पण चवही माहीत असावयाचे कारण नव्हते. चहा ही परदेशी वस्तू आहे असे मनावर बिंबवले जायचे. प्रत्यक्षात भूगोलाच्या पुस्तकात आसामच्या मळय़ात चहा होतो हे वाचूनही आम्ही घरच्या विचारसरणीवर डोळे मिटून खुशाल विश्वासून होतो. असो.
जेव्हा विविध रुग्ण आपल्या आरोग्य-अनारोग्य समस्यांकरिता वैद्यांकडे जातात, तेव्हा त्यांना काय खावे, न खावे याकरिता वैद्य मंडळींकडून साहजिकच सल्लामसलतीची अपेक्षा असते. चहात टॅनिन हे द्रव्य मोठय़ा प्रमाणात असते. त्यामुळे चहा प्यायल्याने जशी ऊर्जा, कामाला तरतरी मिळते तसे काही मंडळींना टॅनिनच्या उष्ण गुणामुळे त्रासही होतो. तोंड येणे, मुखपाक, रांजणवाडी, हातापायाची आग, जळवात, नागीण, रक्ती मूळव्याध, फिशर (परिकर्तिका), फिस्तुला (भगंदर), मलावरोध, अंग बाहेर येणे, शीतपित्त, अंगावर गांधी उठणे, आम्लपित्त, अॅसिडिटी, जळजळ, पोटफुगी, ढेकरा, उचकी, अनिद्रा, खंडित निद्रा, इसब, गजकर्ण, नायटा, सोरायसिस, मूतखडा, मूत्राघात, लघवी कमी होणे इत्यादी विविध विकारांत चहा टाळावा. अलीकडे जगभर चहावर तऱ्हेतऱ्हेचे संशोधन चालू आहे. काही शास्त्रज्ञांच्या मते चहा पिण्याने रक्त पातळ होते, त्यामुळे उच्च रक्तदाब, हृद्रोग, हृदयावर प्रेशर येणे अशा विकारांत चहा प्यायल्याने फायदा होतो.
शेवटी मला चहाबद्दल एवढेच म्हणायचे आहे की, आल्या-गेलेल्यांना आपण चहा जरूर ऑफर करावा. त्यामुळे नवीन मैत्री जुळते, जुनी मैत्री वाढते. ‘चहाच्या कपातील वादळ’ हा शब्दप्रयोग सर्वानाच माहिती आहे. मित्रहो, आपले क्षुल्लक मतभेद एकमेकांसंगे चहा पिऊन मिटवू या, मैत्री वाढवू या! चहाचा शोध लावणाऱ्या पहिल्या चिनी बांधवाला सहस्र चहा प्रणाम!
औषधाविना उपचार : रोजच्या आहारातली धान्यं
आपल्या रोजच्या आहारात असणारे वेगवेगळे अन्नघटक आपल्या रोजच्या पोषणात महत्त्वाची भूमिका बजावत असतात. त्याबद्दल
आपल्या रोजच्या आहारात असणारे वेगवेगळे अन्नघटक आपल्या रोजच्या पोषणात महत्त्वाची भूमिका बजावत असतात. त्याबद्दल आपण बारकाईने माहिती करून घेणे गरजेचे आहे.
ज्वारी
गहू हे प्रमुख अन्न म्हणून जगभर वापरले जाते. त्या तुलनेत ज्वारीचा वापर कमी आहे. दक्षिण भारतात विशेषत: आपल्या महाराष्ट्रात त्याचे पीक व वापर मोठय़ा प्रमाणावर आहे. उत्तर हिंदुस्थानातील लोक तुलनेने धिप्पाड, उंच व मांसमेद जास्त असलेले. त्याचे कारण त्यांच्या आहारात गहू भरपूर. गव्हामध्ये ज्वारीच्या-बाजरीच्या तुलनेत मांसवर्धक पदार्थ जास्त आहेत. गव्हाच्या तुलनेत ज्वारी-बाजरीत पाण्याचे प्रमाण कमी आहे. जोंधळा किंवा ज्वारीमध्ये मेंदूला उपयुक्त असा एक भाग आहे. त्यामुळेच ज्यांना बुद्धीचे काम जास्त आहे त्यांनी आपल्या आहारात ज्वारी ठेवावी. ज्यांना श्रमाचे, दणदाकट काम करायचे आहे त्यांनी गहू वापरावा.
ज्वारी तुलनेने शीत गुणाची आहे. त्यामुळे ती पित्तप्रकृतीच्या रुग्णाला मानवते. कफप्रधान विकारात ज्वारी वापरू नये. विशेषत:ज्यांचे पोट नेहमी खुटखुटते, पोटात वायू धरतो, संडासला जास्त वेळ लागतो, वारंवार जावे लागते, त्यांनी ज्वारी वज्र्य करावी. मात्र ज्यांना गहू मानवत नाही, संडासला चिकट होते, मळाला घाण वास मारतो त्यांनी जेवणात ज्वारीचा वापर करावा, सोबत ताक घ्यावे. ज्वारी गव्हाच्या तुलनेत रूक्ष आहे. चवीने मधुर व काही प्रमाणात तुरट रसाची आहे.
काविळीमध्ये अग्निमांद्य असताना, ज्वारी वापरावी. ज्वारीमध्ये काही प्रमाणात साखर आहे, पण त्याचा उपद्रव स्थूल किंवा मधुमेही व्यक्तींना होत नाही. उलट शरीरात कॅलरी किंवा उष्मांक न वाढवता ताकद देणारे व पोटभरू अन्न म्हणून ज्वारी व शूकधान्याकडे मधुमेहींनी अधिक लक्ष द्यावे. मधुमेही, स्थूल व्यक्ती, मूळव्याध, भगंदर या विकारांनी ग्रस्त व्यक्तींकरिता ज्वारी हेच प्रमुख अन्न असावे.
ओट्स
ओट्स या धान्याचे मूळ उत्पत्तीस्थान ब्रिटन व अमेरिकेत आहे. ‘सुजलां सुफलां’ भारतात याची उत्तम लागवड होऊ शकत नाही. तरीपण ज्यांना धष्टपुष्ट शरीर मिळवायचे आहे, ज्यांना आपली मुलेमुली ताकदवान, वीर्यवान व्हावीशी वाटतात व ज्यांच्याजवळ खर्च करण्याकरिता पैसे आहेत त्यांनी आपल्या आहारात निदरेष खाद्यान्न म्हणून याचा वापर जरूर करावा. मात्र हा वापर सातत्याने न करता थोडा खंड ठेवून करावा. ओट्स धान्याची लापशी किंवा पॉरिज मेंदूला तरतरी देते. रात्री थोडे धान्य भिजत टाकून सकाळी त्याचे कढण करून प्यावे. त्याने पोट साफ होते. रात्री या धान्याचा काढा घेतल्यास खोकला थंबतो. उत्तम झोप लागते. ओट्स धान्याचा अतिरेकी वापर केल्यास शरीरावर फोड, पुरळ येते. रक्त व पित्तातील तीक्ष्ण गुण अधिक वाढवणे हे ओट्स धान्याचे प्रमुख कार्य आहे. कृश व शीत प्रकृती असणाऱ्या व मेंदूचे काम जास्त असणाऱ्या कारकून मंडळींकरिता ओट्स हे उत्तम बौद्धिक टॉनिक आहे. ओट्समध्ये वसा किंवा चरबी भरपूर प्रमाणात असते. कृश व्यक्तींकरिता त्यामुळे ओट्सचा वापर सुचवावासा वाटतो.
बाजरी
बाजरीचे सर्व गुणधर्म ज्वारीसारखेच आहेत. बाजरी खूप उष्ण आहे. ज्यांना ज्वारीची भाकरी खाऊन थंडीसारखी संडासाची बाधा होते त्यांनी बाजरीची भाकरी किंवा ज्वारी-बाजरी मिसळून खावी. जलोदर किंवा उदर विकारात बाजरी अवश्य वापरावी. सर्व धान्यांत बाजरी तुलनेने खूप हलकी, रूक्ष आहे. त्यामुळे कफविकार, सर्दी, खोकला, दमाग्रस्त रुग्णांनी व स्थूल व्यक्ती यांनी आहारात बाजरीचाच वापर करावा. रक्ती मूळव्याधीच्या रुग्णांनी आहारात बाजरी वापरू नये.
वरई
‘वरी, नाचणी, भात पिकवतो कोकणचा प्रांत!’
वऱ्याचे तांदूळ पिष्टमय पदार्थातील सर्वात उष्ण पदार्थ आहे. त्वचाविकार, फोड, अंगाची आग, इसब, गजकर्ण, नायटा, सोरायसिस, डोळय़ांचे विकार, रक्ती मूळव्याध, शीतपित्त, गांधी, मधुमेह, जखमा, अल्सर, आम्लपित्त या विकारात वऱ्याचे तांदूळ वज्र्य करावे. त्याऐवजी राजगिरा उपासाकरता वापरावा. कफ प्रवृत्तीच्या रुग्णांना वऱ्याचे तांदूळ चालतात.
नाचणी
दर आठवडय़ाला एखादा तरी रुग्ण असा भेटतो की जो मी ‘नाचणी खाऊ का’ असे विचारतो. रोगी माणसाकरिता नाचणी चांगली ही सर्वाना माहीत असणारी माहिती आहे. पण नाचणी ही सर्वानाच पौष्टिक आहे, अशी एक चुकीची समजूत आहे. पिष्टमय पदार्थ किंवा स्टार्च असणाऱ्या पदर्थात भात, वऱ्याचे तांदूळ या वर्गात नाचनीचा क्रमांक शेवटचा आहे. नाचणी ही आजारातून उठणाऱ्या रुग्णांकरिता ‘पचावयास हलके’ म्हणून उत्कृष्ट अन्न आहे. नाचणी खाऊन अपचन, अजीर्ण, पोटात वायू धरणे, पोटदुखी, आमांश या तक्रारी कधी होत नाहीत. त्याचबरोबर नाचणीचा नियमित वापर करून वजनही वाढत नाही. नाचणी ही आमाशय, पच्यमानाशय व पक्वाशय या ठिकाणी कोणताही बोजा न टाकता पोटभरू काम करते. चणा, हरभरा, उडीद, पोहे, शेंगदाणे, बटाटा हे पदार्थ शरीर बृंहण करण्याचे कार्य करतात. ते काम नाचणी करणार नाही. नाचणी पोटाला त्रास न देता जीवनरक्षणापुरते पिष्टमय पदार्थ शरीराला पुरवते.
नाचणीचा विशेष उपयोग आमांश, अजीर्ण, उदरवात, जुनाट ताप या पुन:पुन्हा त्रास देणाऱ्या रोगांत होतो. नाचणीचे पेज किंवा भात खाऊन उत्तम ‘क्षुद्बोध’ होतो. नेमकी भूक उत्पन्न होते.
नाचणीचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे नाचणीला कधीही कीड लागत नाही. दोन-तीन वर्षांचे नाचणीचे धान्य स्वादासकट चांगले टिकते. नाचणीचे सत्त्व पूर्वी घरोघर लहान बालकांना देण्याचा प्रघात होता. नाचणी पित्तशामक, थंड, तृप्तीकारक व रक्तातील तीक्ष्ण, उष्ण हे फाजील दोष कमी करते. कंबर खूप दुखत असेल तर नाचणीची पेज घ्यावी. मंड म्हणजे खूप पातळ पेज त्यामुळेच हिंदी भाषेत ‘मंडुआ’ असे नाव आहे.
स्थूल व्यक्तींनी शक्यतो भाताऐवजी नाचणी वापरावी. चरबी वाढणार नाही. वजन कमी होत राहील. गोवर व कांजिण्या तसेच नागीण विकारात पथ्यकर म्हणून नाचणीच्या पिठाची भाकरी खावी. लवकर ताकद भरून येते. फोड फोडण्याकरिता नाचणीच्या पिठाचे पोटीस उपयुक्त आहे. नाचणीच्या तुसाच्या राखेचा उपयोग केस धुण्याकरिता साबणाऐवजी करावा.
अतिस्थूल व्यक्तींनी वजन कमी करावयाचे ठरविल्यास नाचणीची भाकरी किंवा भात व लोणी काढलेले ताक यासारखा आहार नाही. निश्चयाने वजन कमी होते. मात्र मनावर ताबा हवा. जोडीला खात्रीचा मध असला तरी एनर्जी राहून वजन नक्की कमी होते. मधुमेही व्यक्तींनी नाचणी खाऊ नये. त्यामुळे रक्तशर्करा वाढतेच. क्षमस्व!
मधुमेयींसाठी ज्वारी
माझ्या प्रदीर्घ वैद्यकीय सल्लामसलतीचा अनुभव असा आहे की, मधुमेही माणसांना गहू व भात वज्र्य करून, ‘सकाळी ज्वारी, दुपारी जोंधळा व रात्रौ शाळू’ असाच प्रमुख अन्नाचा आग्रह केला तर मधुमेह लगेच नियंत्रणात येतो, औषधी कमी लागतात, वैद्य-डॉक्टरांना दूर ठेवता येते. मधुमेही व्यक्तींनी नाष्टय़ाकरिता ज्वारीच्या लाह्य, ज्वारीची उकड खावी. उकड करताना पाणी चांगले उकळावे, मोठे बुडबुडे आले की थोडे थोडे ज्वारीचे पीठ टाकावे, शिजले की त्यात चवीकरिता किसलेले आले, ताक व कढीलिंबाची पाने टाकावी. उप्पिटापेक्षा अशी उकड मस्त होते. जय जय ज्वारी माता!
औषधाविना उपचार : पालेभाज्या खा, पण…!
पालेभाज्या खा असे मुलांच्या कानीकपाळी ओरडून सांगितले जात असते. पण आपण हे लक्षात घेतले
पालेभाज्या खा असे मुलांच्या कानीकपाळी ओरडून सांगितले जात असते. पण आपण हे लक्षात घेतले पाहिजे की आहारात पालेभाज्यांचे स्थान मर्यादित आहे. म्हणूनच पालेभाज्या खाताना विशेष काळजीही घ्यायला हवी.
सर्व खाद्यपदार्थात पाने, फुले, फळे, कांड, कंद हे क्रमाक्रमाने अधिक बलवान आहेत. अधिक सुशिक्षित मंडळी आधुनिक आहारशास्त्र वाचून आपल्या मुलाबाळांकरिता पालेभाजी खाण्याचा आग्रह करीत असतात. तो आग्रह अतिशयोक्तीचा नसावा. धान्ये, कडधान्ये, फळे, दूध, मीठ, मांस, फळभाज्या, तोंडलावणी या अनेक प्रकारच्या अन्नपदार्थाचे प्रत्येकाचे काही खास वैशिष्टय़ आहे.
नुसती भाजी किंवा पोळी किंवा भाकरी खाऊन पोट भरेल; पण नुसत्या पालेभाज्या खाऊन किंवा त्यांचा रस पिऊन पोट भरणार नाही. पालेभाज्यांचे आहारात मर्यादित काम आहे. त्याकरिता त्या मर्यादा आपण समजावून घेणे आवश्यक आहे.
पालेभाज्या या अल्पायू आहेत. त्यांची वाढ दहा-पंधरा दिवसांत किंवा जास्तीत जास्त तीन आठवडय़ांत होते. या काळात त्यांनी जमीन, पाणी किंवा वातावरणातून घेतलेला जीवनरस हा असाच अल्पायू, कमी आयुष्य देणारा असतो. धान्ये, फळे, कंद यांच्यामध्ये त्या त्या द्रव्यांचा परिपोष झालेला असतो. तसे पालेभाजीत नाही. पालेभाजी शरीराला स्थैर्य देऊ शकत नाही. तरीपण जेव्हा विविध डॉक्टर मंडळी कॅल्शिअमच्या कमतरतेकरिता, कॅल्शियम गोळय़ा घ्यायला सांगतात, तेव्हा त्यांना पर्याय म्हणून पालेभाज्यांचा वापर करून शरीरात कॅल्शिअमची अपेक्षित वाढ होते का हे जरूर पाहावे.
पालेभाज्यांतील दुसरा दोष म्हणजे त्यांची उंची लहान असते. त्यामुळे त्यांचा जमिनीतील मातीशी जास्त संपर्क येतो. पालेभाजीच्या पानांमध्ये हजारो बारीक बारीक अतिसूक्ष्म जंतू असण्याची शक्यता असते. आपण मेथी, कोथिंबीर, चुका, चाकवत यांची गड्डी आणतो, धुतो, चिरावयास घेतो. स्वयंपाक करणारी मंडळी कटाक्षाने प्रत्येक पान न पान स्वच्छ धुऊन भाजी करीत असतील का? त्यामुळे खराब पाणी पिऊन ज्यांना कृमी, जंत, आमांश, पोटदुखी, जुलाब, उलटय़ा, उदरवात हे विकार नेहमी नेहमी होत असतात, त्यांनी पालेभाज्या काळजीपूर्वक निवडून स्वच्छ करूनच खाव्यात. पोटाची तक्रार असणाऱ्यांनी पालेभाजी टाळलेली बरी. खायचीच असेल तर त्यासोबत आले, लसूण, जिरे, मिरी, सुंठ, हिंग, मोहरी यांचा वापर असावा.
पालेभाज्यांतील आणखी एक दोष म्हणजे लघवी कमी होणे. लघवीची आग होणे, लघवी कोंडणे या तक्रारी असणाऱ्यांनी पालेभाज्या खाऊ नयेत. पालेभाज्यांत एक प्रकारचे क्षार असतात. चाळिशीच्या वर वय झालेल्या व्यक्तींना लघवीचा त्रास असला तर लघवीवाटे हे क्षार बाहेर टाकणे अवघड असते.
आयुर्वेदात फार प्राचीन कालापासून पथ्यकर व कुपथ्यकारक असे आहारपदार्थाचे केलेले वर्गीकरण ग्रंथात आढळते. या वर्णनात सांगितलेल्या काही वनस्पती आता मिळत नाहीत. कालौघात काही वनस्पती नाहीशा झाल्या. यातही बदल झाला असेल. पुणे-मुंबई व कोकण किंवा देशातील लहानमोठय़ा शहरांत भिन्न-भिन्न प्रकारच्या पालेभाज्यांचे खूपच प्रकार आढळतात. आताच्या संदर्भात सर्वत्र सहज मिळणाऱ्या पालेभाज्यांचा विचार आपण करीत आहोत.
वासनवेल (पाठा) कचोरा, कुरडू, विष्णुक्रांता, चाकवत, दुधी या भाज्या पथ्यकर, पचायला हलक्या व त्रिदोषहारक आहेत. कुरडूची भाजी दुबळेपणा दूर करते. चाकवत सारक आहे. पडवळ, शिकेकाई, कडुनिंब, सागरगोटा, बावची, गुळवेल, वेताची पाने, रिंगणी, डोरली, अडुळसा, ब्राह्मी, रानतीळ, करटोली, कारले, पित्तपापडा, वांगे, पुनर्नवा, दोडका या सर्वाची पाने मलावष्टंभ, वातूळ, पित्त कमी करणारी, थंड, चवीने कडू व वजन घटविणारी आहेत. आयुर्वेदात जिवंती ही सर्वश्रेष्ठ तर मोहरी सर्वात कनिष्ठ पालेभाजी मानली आहे.
अळू
अळू ही पालेभाजी शरीरास अत्यावश्यक असणारे रक्त वाढवणारी, ताकद वाढवणारी व मलप्रवृत्तीस आळा घालणारी आहे. बाळंतिणीस दूध कमी येत असल्यास अळूची भाजी भरपूर खावी. भाजीकरिता पाने व देठ दोन्हींचा उपयोग करावा. अळूच्या पानांचा रस व जिरेपूड असे मिश्रण पित्तावर उत्तम गुण देते. फुरसे किंवा अन्य विषारी प्राणी चावले असताना वेदना कमी करण्याकरिता अळूची पाने वाटून त्यांचा चौथा थापावा व पोटात रस घ्यावा. गळवे किंवा फोड फुटण्याकरिता अळूची देठे वाटून त्या जागी बांधावी. गळू फुटतात.
अंबाडी
अंबाडी ही पालेभाजी रुचकर आहे; पण डोळय़ाचे विकार, त्वचारोग, रक्ताचे विकार असणाऱ्यांनी वापरू नये. अंबाडी खूप उष्ण आहे, तशीच ती फाजील कफही वाढवते.
करडई
करडई पालेभाजी खूप उष्ण आहे. चरबी वाढू नये म्हणून याच्या तेलाचा उपयोग होतो. तसेच याची पालेभाजी वजन वाढू देत नाही. कफ प्रकृतीच्या लठ्ठ व्यक्तींना करडईची भाजी फार उपयुक्त आहे. या पालेभाज्यांच्या रसाने एक वेळ लघवी साफ होते. मात्र डोळय़ाच्या व त्वचेच्या विकारात करडई वापरू नये. करडईच्या बियांच्या तेलाची प्रसिद्धी सफोला या ब्रॅण्डनावामुळे झाली आहे. त्यात तुलनेने उष्मांक कमी असतात.
कुरडू
कुरडूच्या बिया मूतखडा विकारात उपयुक्त आहेत. कुरडूची पालेभाजीसुद्धा लघवी साफ करायला उपयोगी आहे. या पालेभाजीमुळे कफ कमी होतो. जुनाट विकारात कुरडूच्या पालेभाजीचा रस प्यावा. कोवळय़ा पानांचा रस किंवा जून पाने शिजवून त्याची भाजी खावी. दमेकरी जुनाट खोकला, वृद्ध माणसांचा कफविकार यात उपयुक्त आहे.
कोथिंबीर
कोथिंबीर भाजी का तोंडी लावणे हा वादाचा मुद्दा बाजूला ठेवू या. कोथिंबिरीचा जास्त करून वापर खाद्यपदार्थाची चव वाढवायला म्हणून प्रामुख्याने केला जातो. चटणी, कोशिंबीर, खिचडी, पुलाव, भात, विविध भाज्या, आमटी, सूप या सर्वाकरिता कोथिंबीर हवीच. बहुधा सर्व घरी, सदासर्वदा, सकाळ-संध्याकाळ पोळी, भाकरी, भात सोडून सगळय़ा पदार्थात कोथिंबीर वापरली जातेच. कोथिंबीर ताजीच हवी तरच त्याचा स्वाद पदार्थाची खुमारी वाढवतो. भाजीबाजारात काही वेळा कोथिंबीर खूप स्वस्त, तर उन्हाळय़ात सर्वसामान्य माणसाच्या आटोक्याच्या बाहेर असते. कोथिंबीर शीत गुणाची असूनही पाचक व रुची टिकवणारी आहे. जेवणात अधिक तिखट जळजळीत पदार्थ खाणाऱ्यांना उष्णता, पित्त याचा त्रास होऊ नये याची काळजी कोथिंबीर घेते. जेव्हा विविध स्ट्राँग औषधांची रिअॅक्शन येते, अंगावर पित्त, खाज किंवा गळवांचा त्रास होतो त्या वेळेस कोथिंबीर स्वच्छ धुऊन वाटावी, त्याचा रस पोटात घ्यावा, चोथा त्वचेला बाहेरून लावावा. बिब्बा, गंधकमुक्त औषधे, स्ट्राँग गुग्गुळ कल्प यांच्या वापरामुळे काही उपद्रव उद्भवल्यास कोथिंबिरीचा सहारा घ्यावा. रक्तशुद्धी, रक्तातील उष्णता कमी करणे, तापातील शोष हा उपद्रव कमी करायला ताज्या कोथिंबिरीच्या रसाचा वापर करावा. पथ्यकर भाज्यांत कोथिंबिर अग्रस्थानी आहे.
घोळ
घोळाची भाजी बुळबुळीत असली तरी औषधी गुणाची आहे. त्यात एक क्षार आहे. चवीने ओशट असलेली घोळाची भाजी थंड गुणाची असून अन्नपचनास मदत करते, यकृताचे कार्य सुधारते. रक्ती, मूळव्याध, दातातून रक्त येणे, सूज, अंगाचा दाह, मूत्रपिंड व बस्तीच्या विकारात उपयुक्त आहे. विसर्प किंवा धावरे, नागीण विकारात पाने वाटून त्यांचा लेप लावावा.
चाकवत
चाकवत ही पालेभाजी देशभर सर्वत्र सदासर्वदा मिळते. पालेभाज्यांत आयुर्वेद संहिताकार जिवंती श्रेष्ठ मानतात; पण ही वनस्पती संदिग्ध व वादग्रस्त आहे. व्यवहार पाहता चाकवताला श्रेष्ठत्व द्यावे. ज्वर, अग्निमांद्य किंवा दीर्घकाळच्या तापामुळे तोंडाला चव नसणे, कावीळ, छातीत जळजळ अशा नाना तक्रारींत ही भाजी वापरावी. शक्यतो किमान मसालेदार पदार्थाबरोबर ही पातळ पालेभाजी तयार करावी. व्यक्तिनुरूप व प्रकृतीप्रमाणे लसूण, आले, जिरे, धने, हिंग, ताक, सैंधव, मिरी, तूप, खडीसाखर, गूळ हे पदार्थ अनुपान म्हणून वापरावे. आंबट नसलेल्या ताकातील चाकवताची पालेभाजी हा उत्तम पदार्थ होय. शक्यतो पालेभाज्यांचे ज्यूस घेऊ नयेत.
चुका
बाराही महिने मिळणारी चुक्याची भाजी जास्त करून श्राद्धाकरिता अळूच्या भाजीबरोबरच वापरली जाते. नावाप्रमाणे चुक्याची चव आंबट आहे. पाने छोटी व त्याचे देठ पातळ भाजीकरिता वापरतात. चुका उष्ण, पाचक व वातानुलोमन करणारा आहे. त्याचबरोबर त्याच्या संग्राहक गुणामुळे चुक्रसिद्ध तेलाची पट्टी योनीभ्रंश, अंग बाहेर येणे याकरिता वापरली जाते. पचायला कठीण असणाऱ्या पदार्थाबरोबर चुक्याची पाने वापरावी.
तांदुळजा
तांदुळजा लाल, हिरवा कुठेही केव्हाही सहज येतो. ज्यांना शरीरात सी जीवनसत्त्व हवे आहे त्यांनी तांदुळजाची भाजी खावी. ही भाजी मधुर रसाच्या गुणांनी समृद्ध व शीतवीर्य आहे. उष्णतेच्या तापात विशेषत: गोवर, कांजिण्या व तीव्र तापात फार उपयुक्त आहे. विषविकार, नेत्रविकार, पित्तविकार, मूळव्याध, यकृत व पांथरी वाढणे या विकारांत पथ्यकर म्हणून जरूर वापरावी. उपदंश, महारोग, त्वचेचे समस्त विकार यामध्ये दाह, उष्णता कमी करावयास तांदुळजा फार उपयुक्त आहे. नाजूक प्रकृतीच्या व्यक्तीकरिता, बाळंतीण, गरोदर स्त्रिया यांच्यासाठी तांदुळजा वरदान आहे. डोळय़ाच्या विकारात आग होणे, कंड सुटणे, पाणी येणे, डोळे चिकटणे या तक्रारींत तांदुळजाची भाजी खावी. डोळे तेजस्वी होतात. जुनाट मलावरोध विकारात आतडय़ांना चिकटून राहिलेला मळ सुटा व्हायला तांदुळजाची भाजी उपयुक्त आहे. तांदुळजाची पातळ भाजी वृद्ध माणसांच्या आरोग्याकरिता जास्त उपयुक्त आहे. मोठय़ा आतडय़ास जास्त उपयुक्त घटक मिळतात. स्त्रियांच्या धुपणी विकारात तांदुळजाचा रस व तांदुळजाचे धुवण व मध असे मिश्रण फार त्वरित गुण देते. अनेक प्रकारचे विषविकार, चुकीच्या औषधांनी शरीराची आग होत असल्यास तांदुळजाचा रस प्यावा. लघवी स्वच्छ होऊन शरीर निदरेष होते. उंदीर, विंचू, पारा व इतर धातूंच्या विषारात याचा रस प्यावा. शरीराला आवश्यक सर्व घटक तांदुळजा भाजीत आहेत.
पालक
पालक ही अतिशय आरोग्यदायी पालेभाजी आहे. कोवळा पालक औषधी गुणांचा आहे. पालक शिजवताना पाणी थोडेच घ्यावे. पालक भाजीत लोह व काही प्रमाणात नैसर्गिक ताम्र असल्याने पांडू विकारावर अत्यंत उपयुक्त आहे. त्याचबरोबर हाडे बळकट करणारे क्षार पालकभाजीत आहेत. त्याकरिता हाडे ठिसूळ झाली असल्यास पालकभाजी खावी. हाडे जुळून यावी, लवकर ताकद यावी याकरिता शस्त्रकर्म झाल्यावर पालक भाजी किंवा त्याचा रस यांचा मुक्त वापर करावा. पालकाच्या हिरव्या पानात जीवनशक्ती आहे. कृश मुलांना अवश्य द्यावी. दुधाचा पर्याय म्हणून पालक भाजी वापरावी. त्यामुळे त्यांची प्रकृती सुधारून रक्त व अस्थी या दोनही धातूंची वाढ व्हायला मदत होते. पालक भाजीमुळे पोटात होणारा मुरडा थांबतो. वारंवार जुलाब होत असल्यास थांबतात. मात्र पालकभाजी स्वच्छ धुऊन घ्यावयास हवी. फुप्फुसातील दूषित वायू हटविण्यास उपयोगी आहे. काहींच्या मते पालकाच्या भाजीमुळे मूतखडा विरघळून जातो.
पुनर्नवा
पुनर्नवा, घेटोळी, वसू या नावाने ओळखली जाणारी भाजी दर पावसाळ्यात नव्याने येते. याची पालेभाजी कावीळ, उदर, जलोदर, पोट मोठे होणे, लिव्हर सिरॅसिस, पांथरी वाढणे या विकारात फार उपयुक्त आहे. पोटात पाणी झाले असताना अन्न खाल्ले की पोट फुगते. अशा वेळी पुनर्नव्याच्या पानांच्या भाजीत भात शिजवून द्यावा. पाणी होणे थांबते. पोटाची सूज कमी होते. पुनर्नव्याच्या पानांचा व मुळांचा रस काढून प्यावा. लघवी साफ होऊन शरीराची सूज ओसरते. पुनर्नव्याच्या पाल्याच्या रसाने रक्त वाढते.
माठ
माठ ही सदासर्वदा उपलब्ध असणारी पालेभाजी रानोमाळ आपोआपही उगवते व त्याची बागायती शेतीही केली जाते. रानोमाळचा माठ बहुधा काटेरी असतो. एरवी तांबडा व पांढऱ्या रंगाचा माठ मिळतो. माठाची पालेभाजी ही पथ्यकर, वजन वाढवायला व अम्लपित्त विकारांत विशेष उपयोगी आहे. मूतखडय़ाची तक्रार असणाऱ्यांनी माठाचा वापर टाळलेला बरा. तांबडा माठ हा गुणांनी श्रेष्ठ आहे. रक्तवर्धक म्हणून माठाची पालेभाजी जरूर वापरावी.
मुळा
कच्चा मुळा, पक्का मुळा, वाळलेला मुळा व डिंगऱ्या किंवा त्याच्या शेंगा असे मुळ्याचे चार प्रकार वापरात आहेत. कच्चा मुळा जास्त औषधी आहे. मलमूत्रप्रवृत्ती साफ करतो. दीपक, पाचक, त्रिदोषहारक आहे. मूतखडा विकारात मुळ्याच्या पाल्याचा रस दीर्घकाळ घ्यावा. मूतखडा विरघळतो किंवा त्याचे बारीक बारीक कण होतात. पांथरी वाढली असता कोवळा मुळा भरपूर खावा. मुळा तापामध्ये पथ्यकर आहे. त्यामुळे अग्निमांद्य दूर होऊन तापाचे कारण नाहीसे होते. कोवळ्या मुळ्यांच्या पानांचा जास्त औषधी उपयोग होतो. पक्व मुळा हा रूक्ष, उष्ण, पचायला जड व शारीरिक कष्ट करण्याकरिता उपयुक्त आहे. मूळव्याध, पोटातील कृमी, पक्वाशयात वायू धरणे, याकरिता पोसलेला मुळा मीठ लावून खावा. अजीर्ण, अपचन दूर होते. सुकलेला मुळा पचावयास हलका व कफ वात विकारात उपयुक्त आहे. वाळलेल्या मुळ्याचे चूर्ण विषावर उत्तम उतारा आहे. डिंगरी किंवा मुळ्याच्या शेंगा वातनाशक, गुणाने उष्ण पण उत्तम पाचक आहेत. मुळ्याचे बी लघवी व शौचास व्यवस्थित होण्याकरिता उपयुक्त आहे. मूतखडा मोडण्याकरिता मुळ्याच्या बियांचे चूर्ण खावे.
डिंगऱ्या
जून मुळ्याच्या शेंगा औषधी गुणाच्या आहेत. डिंगऱ्या मलावष्टंभक, तीक्ष्ण व गुरू गुणाच्या आहेत. बियांचा लेप गंडमाळा, दडस गावी, अर्बुद, शिबे या विकारात बाह्येपचारार्थ उपयुक्त आहे. मूतखडा, कष्टसाध्य गाठी, जुनाट सूज या विकारात डिंगऱ्यांची भाजीने फरक पडतो.
मेथी
मेथी हे मधुमेहींना वरदान आहेच. चवीच्या दृष्टीने पालेभाज्यांत मेथीचे महत्त्व फार मोठे आहे. मधुमेहाच्या प्राथमिक अवस्थेत मेथीची भाजी नियमित खाल्ली तर मेथीपूड मिसळून गव्हाची पोळी खाण्याची पाळी येत नाही. मेथीची पालेभाजी खाल्ल्यामुळे लघवीचा वर्ण सुधारतो. भूक सुधारते, पाचक स्राव वाढतात. बाह्येपचार म्हणून मेथी पालेभाजीचा लेप दुखणाऱ्या सांध्यावर करावा. दु:ख कमी होते. केस गळणे, कोंडा, केस निर्जीव होणे याकरिता मेथीच्या रसाने केस धुवावे.
राजगिरा
राजगिरा बियांचा वापर आहेच. राजगिरा पालेभाजी रक्तशुद्धीकरिता फार उपयुक्त आहे. गंडमाळा, क्षय, लघवीची जळजळ या विकारांत पालेभाजी किंवा त्या पानांचा वाटून लेप करावा. शरीरस्वास्थाकरिता लागणारी द्रव्ये राजगिरा पाने व बिया या दोन्हीही आहेत.
शतावरी
शतावरी पाने अगदी बारीक असतात. लहान मुलांच्या जुलाब, पित्त होणे, दातांचा त्रास या विकारांत रस द्यावा. पाने पौष्टिक आहेत. कंदातील स्तन्यजनन हे गुण पानात अल्प प्रमाणात आहेत. कुंडीत शतावरी शोभेकरिता लावतात. त्यातील पानांचा ताजा रस ताकद कमावण्याकरिता उपयुक्त आहे. गोवर, कांजिण्या, जीर्णज्वर, कडकी या विकारांत ही पालेभाजी पथ्यकर आहे.
शेपू
उग्र वासामुळे शेपूचा वापर कमी होतो. शेपूची पालेभाजी वात व कफविकारात फार चांगली. पाने स्वच्छ धुऊन घेतली की उग्र वास कमी होतो. अग्निमांद्य, पोटफुगी, गॅस, कुपचन या विकारांत लगेच गुण देणारी ही पालेभाजी आहे. सोबत जिरे, आले किंवा लसूण वापरावा. लहान मुलांच्या पोटदुखी, जंत, कृमी या तक्रारीवर एकवेळी दिलेली भाजी काम करते. ज्या स्त्रियांना मासिक स्राव व्यवस्थित येत नसल्यास त्यांनी काही दिवस शेपूची पालेभाजी खावी. विटाळ नियमित होतो. गळवे पिकण्याकरिता पानांचा लेप करावा. गंडमाळा विकारात पोटात घेण्याकरिता व बाहेरून पानांचा लेप अशा दोन्हीकरिता शेपूच्या पानांचा वापर करावा.
हादगा
हादग्याची फुले पांढरी किंवा जांभळ्या रंगाची असतात. चणापीठ पेरून हादग्याच्या फुलांची कोरडी भाजी फार चविष्ट होते. पूर्वी मिळणाऱ्या अनेक भाज्या अलीकडे दिसेनाशा झाल्या आहेत. हादग्याला आगस्ता असे संस्कृत नाव आहे. आयुर्वेदीय औषधीकरणात मनशीळ शुद्धीकरिता हादग्याच्या पानांच्या रसाचा वापर सांगितला आहे. ठेचाळलेल्या भागावर किंवा जखमेवर पाने ठेचून बांधावी. जखम भरून येते.
पथ्यातून आरोग्याकडे
आयुर्वेदामध्ये पाणी, भाज्या आणि फळांचे विविध प्रकारात वर्गीकरण केले आहे.
आपल्या दृष्टीने पाणी हे फक्त पाणी असतं, भाज्या फक्त भाज्या असतात, फळं फक्त फळं असतात. पण आयुर्वेदाने त्यात विविध प्रकारचे वर्गीकरण केले आहे.
काय आहे हे वर्गीकरण?
दंतविकार, दात हलणे, सळसळणे, दातांतून रक्त येणे, पूं येणे, ठणकणे, सूज येणे
पथ्य :
सोसवेल असे गार पाणी, दूध, नारळपाणी, तांदळाची पेज, ज्वारी, सुकी चपाती, मूग, मुगाचे कढण, तूर, नाचणी. सर्व फळभाज्या व पालेभाज्या. वेलची केळे, सफरचंद, डोंगरी आवळा.
झोपण्यापूर्वी व सकाळी दोन वेळा तुरट, तिखट व कडू रसाच्या झाडांच्या काडय़ांनी सुरक्षितपणे, हिरडय़ा व दातांचे मंजन करणे. प्रत्येक खाण्यानंतर व जेवणानंतर भरपूर चुळा खुळखुळणे. कात, कापूर, लवंग, तुपाचा बोळा, निलगिरी तेल, त्रिफळा चूर्ण यांचा तारतम्याने बाह्य़ोपचार म्हणून वापर. मलमूत्रवेग वेळच्या वेळी करणे.
कुपथ्य :
चहासारखी गरम गरम अकारण पेये, साखर गूळ असलेली सरबते, दही, आइस्क्रीम, लस्सी, बर्फ, गारगार पाणी. गहू, बाजरी, पाव, बिस्किट, केक, इ. दातांत अडकून राहतील असे पिष्टमय पदार्थ. वाटाणा, हरभरा, उडीद, चवळी, मटकी. बटाटा, रताळे, शिंगाडा, करडई, अंबाडी, शेपू, मुळा, पालक. लोणचे, पापड, इडली, डोसा, ढोकळा, आंबवलेले पदार्थ, मांसाहार, जाम, साखरंबा, मोरांबा, मसालेदार चमचमीत पदार्थ. लसूण, हिंग मोहरी, साखर, गूळ, यांचा फाजील वापर, सुकामेवा, मिठाई, चॉकलेट, व्हिनेगार, शिरका. जेवणावर जेवण, घाईत जेवण, रात्रौ उशिरा जेवण, जागरण, जाहिरातीला भुलून विविध प्रकारच्या टूथपेस्ट. मलमूत्रांचे वेग अडविणे. दात कोरणे. अपुरी विश्रांती व झोप. मशेरी, तंबाखू, धूम्रपान, मद्यपान.
आतापर्यंतच्या लेखांमध्ये आपण पथ्य-कुपथ्यांमध्ये कोणत्या गोष्टी करायच्या, कोणत्या टाळायच्या ते पाहिल्या. त्या अनुषंगाने पाण्याचे प्रकार, पातळ पदार्थ, कडधान्ये, पालेभाज्या, सुकामेवा, फळे, बेकरीचे पदार्थ असे उल्लेख आले. त्यात कोणकोणत्या गोष्टी समाविष्ट होतात तेही अनुषंगाने आले. पण तरीही वाचकांच्या माहितीसाठी ते सगळे प्रकार या लेखात पुन्हा एकत्रित देत आहे.
पाण्याचे प्रकार :
शरद ऋतूतील पाणी, गंगाजल, सुरक्षित व स्वच्छ पाणी, उकळलेले पाणी, गरम पाणी, उकळून गार केलेले ताजे पाणी. फ्रिजचे पाणी, साधे पाणी, गढूळ पाणी, अस्वच्छ व शंकास्पद पाणी, पहिल्या पावसाचे पाणी, शिळे पाणी. बोअरिंगचे पाणी, क्षारयुक्त पाणी, जड पाणी, हलके पाणी. सुंठपाणी, नारळ पाणी, धनेजिरे पाणी, लिंबू पाणी, सुधाजल (चुनखडीचे निवळीचे पाणी), चंदनगंधपाणी, मधपाणी, लाह्य़ापाणी, बेलाचे व पिंपळाचे पानांचे पाणी, उंबरजल, वाळापाणी.
पातळ पदार्थाचे प्रकार :
दूध, दही, लोणी, तूप, ताक, सायीशिवायचे दूध, गोड ताक, आंबट ताक. गाईचे, म्हशीचे, शेळीचे दूध. पेढे, बर्फी, मलई खवा. कोल्ड्रिंक, लस्सी, बर्फ, आइस्क्रीम, ज्यूस, उसाचा रस. कोकम सरबत, लिंबू सरबत, पन्हे, आवळा सरबत. चहा, कॉफी, कोको, कृत्रिम पेये.
धान्ये, कडधान्य्यांचे प्रकार :
भात, तांदूळ भाजून भात, नवीन तांदूळ, जुना तांदूळ, हातसडीचा तांदूळ, मऊ भात, लाह्य़ा, भाताची पेज (जिरेयुक्त), गहू, सुकी चपाती, मका, मक्याच्या लाह्य़ा, मेथी पोळी, एरंडेल चपाती.
ज्वारी, ज्वारीच्या लाह्य़ा, बाजरी, सातू, नाचणी, वरई.
नाचणी, तांदळाची ज्वारीची व बाजरीची भाकरी, भाजणीचे पीठ, मूग, मुगाची डाळ, मुगाचे कढण, खिचडी, तूर, मसूर, उडीद, हरभरा, वाटाणा, वाल, मटार, पावटा, राजमा, कुळीथ, चवळी, मटकी, कडधान्याचे भाजून पाणी, कडधान्ये उसळी, टरफलासकट कडधान्ये.
फळभाज्यांचे प्रकार :
बटाटा, कांदा, दुध्या, तांबडा भोपळा, पडवळ, दोडका, टिंडा, काटेरी वांगे, बियांचे वांगे, भेंडी, परवल, घोसाळे, मुळा, कोहळा, सुरण, तोंडले, कार्ले, करवेली, कोबी, फ्लॉवर, नवलकोल, बीट, गोवार, पावटा, डिंगऱ्या, श्रावण घेवडा, मटार, पापडी, शेवगा, चवळी शेंगा, ढोबळी मिरची, टमाटू, काकडी, डोंगरी आवळा. उकडलेल्या भाज्या.
पालेभाज्यांचे प्रकार :
अळू, अंबाडी, करडई, चाकवत, चुका, तांदुळजा, कोथंबीर, माठ, मेथी, राजगिरा, पालक, शेपू, घोळ, मायाळू, चंदनबटवा, उकडलेल्या पालेभाज्या.
चटणी व इतर :
धने, जिरे, मिरी, सुंठ, आले, पुदिना, लसूण, लिंबू, कैरी, चिंच, ओली हळद, मिरची, कढीलिंब, खसखस, तीळ, कारळे, मेथ्या, बाळंतशेपा, ओवा, बडीशेप, शेंगदाणे, खोबरे, हळद, ओले खोबरे, शिरका, व्हिनेगार, सॉस.
सुकामेव्याचे प्रकार :
बदाम, बेदाणा, खारीक, खजूर, सुके अंजीर, काळ्या मनुका, अक्रोड, काजू, पिस्ता, जरदाळू, काळा खजूर, हळीव, डिंक.
उसाचे पदार्थ :
गूळ, साखर, केमिकलविरहित गूळ, काकवी.
फळे :
वेलची केळी, हिरव्या सालीची केळे, संत्रे, गोड जुन्या बाराचे मोसंब, आंबा, चिक्कू, सफरचंद, अननस, पोपई, फणस, गोड द्राक्षे, जांभूळ, करवंद, बोरे, कलिंगड, ताडफळ, खरबूज, डोंगरी आवळा.
बेकरी व इतर पदार्थ :
पाव, बिस्किट, केक, खारी बिस्किटे, इडली- डोसा, ढोकळा, शेव, भजी, चिवडा, भेळ, मिसळ, फरसाण, भडंग, आंबवलेले पदार्थ, फरमेन्टेड फूड, शिळे अन्न, चॉकलेट, गोळ्या, श्रीखंड, पक्वान्ने इत्यादी. शिकरण, फ्रुट सॅलड, फळांचे ज्यूस.
मांसाहाराचे प्रकार :
अंडी, मटण, चिकन, मासे, सुकी मासळी.
हवेचे प्रकार :
मोकळी हवा, गार वारे, कोंदट हवा, बंदिस्त खोली, वातानुकूलित राहणी, समोरचे वारे, गरम हवा, पुरेसा सूर्यप्रकाश, थंडी, कोवळे ऊन, दमट हवा, कडक ऊन, ओल, हवापालट, खराब धूर व प्रदूषणयुक्त हवा.
जेवणाचे प्रकार :
वेळेवर जेवण, कमी जेवण, अपुरे जेवण, सायंकाळी लवकर जेवण, हलका आहार; जेवणावर जेवण, भूक नसताना जेवण, रात्रौ उशिरा जेवण, राक्षसकाली जेवण, जडान्न, अवेळी जेवण, शिळे अन्न, शंकास्पद अन्न, परान्न, हॉटेलमधील भोजन.
व्यायामाचे प्रकार :
सूर्यनमस्कार, पोहणे, फिरणे, रात्रौ जेवणानंतर किमान वीस मिनिटे फिरणे, दोरीच्या उडय़ा, कमान व्यायाम, पश्चिमोत्तानासन, शवासन, अर्धवज्रासन, शीर्षांसन, मानेचे व्यायाम, दीर्घ श्वसन, प्राणायाम, फाजील व्यायाम, व्यायामचा अभाव, गवतावर, मातीवर अनवाणी चालणे.
सायंकाळचे व्यायाम:
फाजील श्रम, बैठे काम, दीर्घकाळ ड्राइव्हिंग, फाजील वजन उचलणे, बागकाम, कमरेत वाकून फरशी पुसणे.
झोप व अंथरूणाचे प्रकार :
वेळेवर झोप, पुरेशी झोप, रात्रौ लवकर झोप व उशिरा झोप, दुपारी झोप, खंडित निद्रा, स्वप्ने, जागरण, उशीशिवाय झोपणे, फाजील उसे. कडक अंथरुण, गादी, फळी किंवा दिवाणावर झोप, चटई, ब्लँकेट, कांबळे, शाल, फोमची गादी.
विशेष उपचार :
नाकाने पाणी पिणे, साध्या पाण्याच्या भरपूर चुळा खुळखुळणे, मीठ हळद गरम पाण्याच्या गुळण्या, सकाळी व सायंकाळी तेल मसाज, डोळ्यांत लोणी, नाकांत तूप, कानशिले, कपाळ, तळहात व तळपाय यांना तूप चोळणे, जेवणाच्या अगोदर व शेवटी एक चमचा तूप खाणे. तूप व मिरेपूड मिश्रण, तुळसपाने, चंदनगंध व तुपाचा लेप, डोळे साध्या पाण्याने धुणे, कापूर, अंजन, स्वमूत्रोपचार, गोमूत्र, शिकेकाईने केस धुणे, केश्य चूर्ण. दांतवण गेरूयुक्त दंतमंजन, तुरट व कडू सालीच्या वापराचे मंजन. फिके व आळणी जेवण. लंघन, उपवास, रात्रौ न जेवणे, पूर्ण विश्रांती, मौन.
युक्ताहारविहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु।
युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दु:खहा॥
हा दु:खाचा नाश करणारा योग यथायोग्य आहार व विहार करणाऱ्याला, तसेच कर्मामध्ये यथायोग्य चेष्टा (देह व इंद्रिये यांचा व्यापार) करणाऱ्याला आणि यथायोग्य निद्रा आणि जागरण करणाऱ्याला साध्य होतो.
– श्रीमद्भगवद्गीता अ. ६. १७.
स्वास्थ्यपूर्ण जीवनासाठी
तब्येत ठीक असणे अनेक कारणांवर अवलंबून असते आणि तब्येत बिघडणेही अनेक कारणांवर अवलंबून असते. साधारणत: ज्या माणसांची प्रकृती ठणठणीत आहे असे वर वर दिसत असते त्याला अंतर्गत आजाराने ग्रासले असते किंवा एखाद्या विकृतीने घेरलेले असते. माणूस हा शारीरिक, मानसिक, भावनिक, सामाजिक आणि नैतिक अशा विविध स्तरांवर जगत असतो. या सर्व स्तरांवर तो स्वस्थ असेल तरच तो खऱ्या अर्थाने स्वस्थ असतो.
समाधान आणि आनंदाचे जीवन जगण्याची जशी कला आहे तसेच शास्त्रही आहे. शारीरिक स्वास्थ्याचा इच्छाशक्तीशी संबंध आहे. तुमच्या मनात अधिक चांगले होण्याचा आशावाद असेल, तर तुमची प्रतिकारशक्ती आपोआपच वाढेल. एखादा आजार झाला आणि तुमची वृत्ती सकारात्मक, होकारात्मक असेल तर तुम्ही आजारातून लवकर मुक्त व्हाल. तुम्ही तुमच्या मनाला ज्या सूचना द्याल त्याच सूचना मेंदूद्वारे शरीराला जातील आणि शरीरात बरे होण्याची एक स्फूर्ती निर्माण होईल; शरीरातील अनुकूल रसायन आणि रासायनिक प्रक्रियांना चालना मिळेल. विचार करणारे म्हणजे मन आणि न विचार करणारे म्हणजे तन या दोन भागांत मानवाचे अस्तित्व विभागले गेले आहे. माणसाच्या मेंदूच्या रचनेचा सातत्याने अभ्यास केला गेला आहे. आसपासच्या वातावरणाशी केवळ शरीर नाही तर शरीर आणि मन एकत्रितपणे संवाद साधतात, असे सिद्ध झाले आहे. मन आणि शरीर अद्वैत आहेत. एक आहेत. द बॉडी हॅज अ माइन्ड ऑफ इट्स ओन असे एक गमतीदार वाक्य आहे. अर्थात शरीराचेही स्वत:चे एक मन आहे.
हिंदू तत्त्वज्ञान मनावरच येऊन थांबत नाही. त्यांनी आत्मा आणि परमात्मा यांचाही विचार केला आहे. ‘मन’ विज्ञानाच्या आवाक्याबाहेरचे आहे, पण अध्यात्माच्या आवाक्यातले आहे.
मनातील सूक्ष्म अथवा स्थूल बदल रोगाला आमंत्रण ठरू शकतात. उतावीळपणा, गडबड, मसालेदार खाणे आणि आकारण चिंता रोगाला जन्म देतात. याचाच अर्थ स्वस्थ राहायचे असेल तर हे टाळले पाहिजे किंवा कमी केले पाहिजे. अशान्तस्य कुत: सुखम्? (गीता) म्हणजेच अशांत मनाच्या माणसाला सुख कोठून?
पौर्वात्य वैद्यकीय शास्त्रानुसार केवळ अन्न, झोप व औषध यामुळे स्वास्थ्य-लाभ शक्य नाही तर संपूर्ण व्यक्तीचा एकूण विचार करायला पाहिजे. व्यक्ती म्हटल्यावर शरीर तर आलेच, पण त्याचबरोबर मन, आत्मा, परमात्म्याशी त्याचे नाते, समाज, संस्कार सारे काही आले. आजकाल बडय़ा पगाराच्या नोकऱ्या करणाऱ्या लोकांना योगासने, आयुर्वेद आणि निसगरेपचार यांचे आकर्षण वाटू लागले आहे ते यामुळेच.
आयुर्वेदात तर मनाच्या नियंत्रणावर विशेष भर दिला जातो. आयुर्वेदात दोन तत्त्वांचा विचार निदान व उपचारासाठी केला जातो. ती तत्त्वे आहेत आहार आणि विहार (जीवनशैली). आयुर्वेदानुसार व्यक्तीला ठीक करायचे आहे रोगाला नाही.
असं म्हटलं जातं की या जगात ‘दुर्धर रोग’ नाहीत, पण ‘दुर्धर व्यक्ती’ आहेत. अशा व्यक्ती ज्या कोणत्याच उपचाराला प्रतिसाद देत नाहीत. भारतीय वैद्यकशास्त्रानुसार तब्येत चांगली राखण्यासाठी दोन तत्त्वे महत्त्वाची आहेत. समतोल आणि नियंत्रण.
जेव्हा चिडचिडेपणा संतापात बदलतो; जेव्हा आनंद व्यसन बनते; जेव्हा इच्छा अनावर भावना बनते तेव्हा अतिशय ताण पडतो आणि रोगाला वाव मिळतो. अर्थात भावना ताब्यात असल्यास व्यक्ती निरोगी असते, पण भावनेने व्यक्तीचाच ताबा घेतला तर व्यक्ती रोगी बनते.
एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीशी चांगले आणि परस्परपूरक नाते प्रस्थापित करू शकत असेल तर ती स्वस्थ आहे असे म्हणता येईल. जी व्यक्ती स्वत:शी समरस असेल तीच दुसऱ्याशी समरस होऊ शकेल. स्वत:शी समरस असणे म्हणजे स्वस्थ असणे होय.
स्वस्थ जीवन म्हणजे उत्कृष्ट शारीरिक स्वास्थ्य, खणखणीत मानसिकता. स्वस्थ व्हायचे असेल तर मनाच्या शक्तीचे आणि श्रद्धेचे बळ ओळखले पाहिजे. मनाची शक्ती वाढवावी यासाठी दुसऱ्याबद्दल सहानभूती, स्वस्थ नाती-गोती, जीवनात निश्चित ध्येय, समाजात रस या गोष्टी आवश्यक आहेतच याशिवाय खेळ, काम, सृजन आणि आत्मा यांच्यात समन्वय हवा.
पथ्य :
• शरीराला परिणामी सुखावह असणाऱ्या आहारविहारास पथ्य आणि असुखावह असणाऱ्या आहारविहारास अपथ्य म्हणतात.
• हितभुक् मितभक् सोऽरुक् । (जो हितकर म्हणजेच पथ्यकर) संयमित खातो तो अरुक् म्हणजे अरोगी; निरोगी बनतो.
• पथ्याची व्याख्या : पथ = आरोग्याचा मार्ग. म्हणजेच आरोग्याच्या मार्गाला सोडून जे नाही ते पथ्य होय.
• औषध आणि उपचार यांना साहाय्यभूत होणारा आहारविहार = पथ्य.
• पथ्य पाळा, खर्च वाचवा, दु:ख टाळा.
औषधाविना उपचार : चौरस आहाराकरिता कडधान्ये
तांदूळ, गहू, ज्वारी व काही प्रमाणात बाजरी या अन्नधान्याबरोबरच कडधान्ये मूग, तूर, मसूर, उडीद,
तांदूळ, गहू, ज्वारी व काही प्रमाणात बाजरी या अन्नधान्याबरोबरच कडधान्ये मूग, तूर, मसूर, उडीद, कुळीथ, वाटाणा, मटार, हरभरा, मटकी, पावटे, चवळी, राजमा यांचे आपल्या दैनंदिन आहारात मोठेच योगदान आहे. ही कडधान्ये आपल्या शरीराचा रोजचा गाडा नीट चालवण्याकरिता आवश्यक असणारी, चरबी-मांसवर्धक घटक, स्टार्च-पीठ, तेल, चोथा-फायबर, राख-अॅश व फॉस्फरससारखी द्रव्ये पुरवतात. बहुतेक सर्व कडधान्ये आपल्या देशात विविध राज्यात होतात. तरीपण अनेक कडधान्ये परदेशातून मोठय़ा प्रमाणावर आयात होतात. मूग चीन, म्यानमार व ऑस्ट्रेलियातून येतो. तुरीची आयात चीन व म्यानमारमधून होते. राजमा चीनमधून येतो. राजमा व डॉलर चवळी अमेरिकेतून येते. कॅनडातून सफेद वाटाणा, हिरवा वाटाणा व काबुली चण्याची आवक होते. इथिओपिया व ऑस्ट्रेलियातूनही काबुली चणा येतो. अमेरिकेतून सफेद वाटाणा मोठय़ा प्रमाणावर येतो.
उडीद
काळे, हिरवे, भुरकट रंगांचे असे तीन प्रकारचे उडीद असतात. वैद्यक ग्रंथात उडिदाचे पौष्टिक म्हणून अनेक प्रयोग सांगितले आहेत. त्याकरिता उडीद काळ्या रंगाचा प्रशस्त मानला जातो. उडिदाची तुलना मांसाहाराशी केली जाते. ज्यांना आपल्या आहारामध्ये मांसाहाराचे शरीर पुष्ट करण्याचे गुणधर्म हवे आहेत, त्यांनी उडिदाचा नियमित वापर करावा. रानउडीद ही जात वेगळी आहे. आयुर्वेदात जीवनीय गणात उडदाला स्थान आहे. उडदाला ‘वृषांकुर’ असे सार्थ नाव आहे. शुक्रधातूची वाजवी वाढ करण्याकरिता उडदाचा उपयोग होतो.
उडीद सबंध, त्याची डाळ, लापशी, भिजवलेले उडीद, उडदाच्या पिठाचे लाडू, उडदाचे पापड, सिद्ध तेल असा विविध प्रकारे उडदाचा वापर आहे.
उडीद चवीने गोड रसाचे, भरपूर स्निग्ध, प्रकृतीचे उष्ण आहेत. उडीद बहुमलकारक, रुचकर, कफपित्त वाढवणारे, तृप्तीकारक आहेत. उदीड मांस, मेदवर्धक आहेत. उडिदामध्ये एक प्रकारचा स्त्रंसन गुण आहे. रक्तपित्त विकार, श्रम, दम लागणे, तोंड वाकडे होणे, अर्धागवातानंतरची दुर्बलता, गुडघे, पाठ, कंबर व खांदे याचे वातविकार याकरिता उडदाचा उपयोग आहे.
समस्त वातविकारात उडदाच्या काढय़ात सैंधव किंवा मीठ मिसळून सिद्ध केलेले ‘माष सैंधवादि तेल’ मसाजकरिता उपयुक्त आहे. विशेषत: हातापायात जोम आणून, अॅटॅकने निर्जीव झालेल्या स्नायूंना बल मिळते. मळ कमी बनत असल्याने मलावरोध होत असल्यास उडदाची डाळ उपयुक्त ठरते.
चमचा-दोन चमचे उडीद रात्रौ पाण्यात भिजत टाकून सकाळी दुधात त्याची लापशी नियमितपणे घेतली तर खात्रीपूर्वक वजन वाढते. विशेषत: खुजी किंवा अतिकृश मुले-मुली खुरटलेले स्तन यांच्या प्राकृत वाढीकरिता उडदाचा मुक्त वापर करावा. ज्यांचा अग्नी मंद आहे, पचनास त्रास आहे, त्यांनी सोबत लसूण, आले, मिरी, हिंग हे पदार्थ वापरावे.
शारीरिक श्रम, ओझी वाहणे, घाम येईल अशी भरपूर कामे करणाऱ्यांनी जेवणात पापड, आमटी किंवा उसळ, डाळ या स्वरूपात उडदाचा वापर करावा. उडीद पाण्यात वाटून त्याचा लेप पांढरे डाग, चाई किंवा आगपैण या विकारात उपयोग करून पाहण्यासारखा आहे. उडदामध्ये २२ टक्के मांसवर्धक द्रव्ये, ५५ टक्के पीठ, २ टक्के चोथा,४ टक्के राख व १ टक्का फॉस्फरिक अॅसिड असते.
कुळीथ (हुलगे)
कुळीथ किंवा हुलगे हे एक कडधान्य एक काळ गरीब जनतेच्या फार वापरात होते. कोकणात कुळीथ व देशावर हुलगे असे वर्णन केले जाते. रानटी कुळीथ म्हणून आणखी एकजात वापरात आहेत. शुक्र व रक्त विकारात कुळथाचा विचार करू नये.
कुळथाचे कढण किंवा सूप आजारी व्यक्तींकरिता प्रसिद्धच आहे. भरपूर ताकात कुळीथ शिजवून जिरे, तुपाची फोडणी दिली की उत्तम कढण तयार होते. हे कढण वातनाशक, रुची उत्पन्न करणारे आहे.
कुळथाच्या काढय़ाने लघवी साफ होते. अवघड जागी किडणीमध्ये घट्ट बसलेले मूतखडे मरणप्राय वेदना देतात. लघवीला त्रास होतो. अशा मूतखडय़ाच्या अॅटॅककरिता, कुळथाच्या काढय़ात थोडी सुंठ व पादेलोण मिसळून प्यावा. लघवी मोकळी होते. तात्पुरता आराम पडतो. लघवीची वारंवार होणारी जळजळ, अडखळत होणारी लघवी सुधारते. ज्यांना मूतखडय़ाचे शस्त्रकर्म टाळावयाचे आहे त्यांनी मुळ्याच्या पानांवर कपभर रसाबरोबर ५ ग्रॅम कुळीथ चूर्ण दोन वेळा काही दिवस प्यावे. खूप कफ असलेला खोकला, दमा या विकारात कुळथाचा काढा उपयोगी आहे. कोरडा किंवा सुकलेल्या कफ विकारात कुळीथ उपयोगी नाही. कुळीथ लेखन, भेदन करणारे, उष्ण गुणांचे आहेत. हाच गुण धातूंची आयुर्वेदीय पद्धतीने भस्म करण्याकरिता धातूंच्या शुद्धी प्रक्रियेत वापरला जातो. निरींद्रिय धातूंचे भस्मांना सेंद्रियत्न प्राप्त करून देण्याकरिता कुळिथाचा काढा धातूंचे घट्ट कण विलग करण्याचे मोठेच कार्य करतो. गंडमाळा, मूळव्याध, शुद्ध आमवात, यकृत, प्लीहेची सूज या विकारात कुळथाचा काढा उपयुक्त आहे. रक्ती मूळव्याध, आप्लपित्त या विकारात कुळीथ वज्र्य करावे. कुळिथामध्ये मांसवर्धक द्रव्ये २२.५ टक्के, पीठ ५६ टक्के, तेल २ टक्के, चोथा ५ टक्के, राख ३ टक्के व फॉस्फरिक अॅसिड १ टक्के असतात.
तूर, मसूर
तूरडाळ अतिशय चविष्ट डाळ आहे. मसुराची डाळ शिजायला सोपी म्हणून त्याचा वापर अधिक आहे. औषधी गुण दोन्हीत फार कमी आहेत. याउलट अनेक विकारांत तूर व मसूर डाळ खाऊ नये, असे सांगावे लागते. दोन्ही डाळी उष्ण, तीक्ष्ण, शरीरात पित्त वाढविणाऱ्या आहेत. त्यामुळे विशिष्ट रुग्णांनी तूर व मसुराची डाळ टाळावी. शारीरिक श्रम करण्याऱ्यांकरिता मसुराची डाळ उपयुक्त आहे.
आम्लपित्त, उलटय़ा होणे, अल्सर, इसब, गजकर्ण, नायटा, सोरायसिस, अंगावर गांधी उठणे, शीतपित्त, खरूज, हातापायांची व डोळय़ांची आग होणे, मलावरोध, भगंदर, संडासवाटे रक्त पडणे, अंगाला खाज सुटणे, गोवर, कांजिण्या, कावीळ, फिशर किंवा परिकर्तिका, तांबडे डाग, कोड, गरमी, परमा, घाम खूप येणे, दातातून रक्त येणे, फिट्स येणे, अंगावर जास्त विटाळ जाणे, रक्ताचे विकार इ.
बाहय़ोपचार म्हणून खरूज, इसब, गजकर्ण या विकारात दहय़ात तुरीची डाळ वाटून लेप लावून पाहावा. मसुराच्या डाळीचे पीठ आंघोळीच्या वेळेस लावल्यास त्वचा नरम व कांतीदायक होते. रासायनिक विश्लेषणात अखंड तुरीमध्ये मांसवर्धक पदार्थ १७ टक्के, तर तूरडाळीत २२ टक्के, अखंड तुरीत पीठ ५६ टक्के, तूरडाळीत ६० टक्के, अखंड तुरीत तेल २.५ टक्के, तूरडाळीत २ टक्के, अखंड तुरीत चोथा ७ टक्के, तर डाळीत १ टक्के, राख दोन्हीतही ३ टक्के असते. तसेच अखंड मसुरामध्ये मांसवर्धक पदार्थ २४ टक्के, तर डाळीत २५ टक्के, अखंड मसुरात पीठ ५६ टक्के, तर डाळीत ५८ टक्के, तेल दोन्हीतही १ टक्के, राख दोन्हीतही २ टक्के; तर अखंड मसुरामध्ये चोथा ३ टक्के, डाळीत १ टक्के असे प्रमाण असते.
मूग: हिरवे, पिवळे
शिंबिधान्य किंवा शेंगांतून निघणाऱ्या धान्यांत मूग श्रेष्ठ आहेत. मूग हिरवे, पिवळे, काळे तीन प्रकारचे मिळतात. हिरवा मूग सर्वश्रेष्ठ आहे. तुरट व मधुर रस असलेले मूग थंड गुणाचे असतात. मूग पचायला हलके आहेत. शरीराला आवश्यक असणारी ए, बी ही व्हिटामिन, लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस ही द्रव्ये मुगाच्या टरफलात भरपूर प्रमाणात आहेत. त्यामुळे मुगाचे जीवरक्षक म्हणून सांगितले जाणारे गुण टरफलासकट मुगात आहेत. मूग कफ, पित्त व रक्तासंबंधी विकारात फार उपयुक्त आहेत. मूग क्वचित पोटात वायू उत्पन्न करतात. मुगाबरोबर हिंग, मिरी वापरावी. मुगाचे पिठले, सबंध मूग कढण, उसळ, आमटी, पापड, लाडू, खीर अशा विविध प्रकारे मूग उपयुक्त पडतात. औषधे म्हणून मुगाचा काढा करण्याचा प्रघात आहे. मुगाचे ‘पायसम’ हे एक अफलातून पक्वान्न आहे.
ज्वरामध्ये मुगाच्या किंवा रानमुगाच्या पानांचा काढा प्यावा. जीर्णज्वरांत ताकद भरून येण्याकरिता व चांगल्या झोपेकरिता मुगाच्या पानांचा काढा उपयुक्त आहे. डोळे आल्यास मुगाची पुरचुंडी डोळय़ांवर बांधावी.
पिवळय़ा मुगास कीड लवकर लागते. त्यांच्यात भुंगे लवकर होतात. त्यामुळेच की काय, पिवळय़ा मुगाची पैदास खूपच कमी आहे. पिवळय़ा मुगाची सर हिरव्या मुगाला येत नाही.
पिवळय़ा मुगाचे भाजून तयार केलेले पीठ फार पौष्टिक आहे. थोडी पिठीसाखर व चांगल्या तुपावर परतलेले पिवळय़ा मुगाचे पीठ उत्तम टॉनिक आहे. कृश मुले, दुपारी उशिरा जेवणारी मंडळी यांनी सकाळी चहाऐवजी चांगल्या तुपावर भाजलेल्या मुगाच्या पिठाचे लाडू खावे. माझ्या मुंबईच्या तीन दिवसांच्या मुक्कामी मी मुगाचे दोन लाडू सकाळी खाऊन त्यानंतर दुपारी एकपर्यंत अखंड काम करू शकतो. बाळंतिणीस भरपूर दूध येण्याकरिता मुगाच्या पिठाचे लाडू तत्काळ गुण देतात.
शारीरिक कष्ट खूप करावयास लागणाऱ्यांनी रोज किमान एक वाटी मुगाची उसळ खावी. खूप लठ्ठ व्यक्तींनी मुगाची आमटी नियमित घ्यावी. कृश व्यक्तींनी मुगाची उसळ खावी. मुगामुळे मेद वाढत नाही, पण स्नायूंनाबळ मिळते. अर्धागवात, संधिवात, आमवात, आम्लपित्त, अल्सर, डोकेदुखी, तोंड येणे, त्वचेचे विकार, कावीळ, जलोदर, सर्दी-पडसे, खोकला, दमा, स्वरभंग या तक्रारीवर मूग अत्यंत उपयुक्त आवश्यक अन्न आहे. त्याकरिता मूग भाजून त्याचे नुसते पाणी किंवा कढण हे अर्धागवात, मधुमेह, रक्तदाबवृद्धी या विकारांत उपयुक्त आहे. घशाच्या, जिभेच्या, गळय़ाच्या कॅन्सरच्या विकारात जेव्हा अन्न किंवा पाणी गिळणे त्रासाचे होते त्या वेळेस हिरवे मूग उकळून त्याचे पाणी पुन:पुन्हा पाजावे. शरीर तग धरते. आयुष्याची दोरी बळकट असली तर नुसत्या मुगाच्या पाण्यावर माणसे कॅन्सरवर मात करू शकतात. मधुमेहात भरपूर मूग खावे. थकवा येत नाही.
डोळय़ाचे कष्टसाध्य किंवा असाध्य विकारांत मुगाचा विविध प्रकारे उपयोग होतो. रेटिना, काचबिंदू, मधुमेह किंवा रक्तदाब वाढल्यामुळे क्षीण होणारी दृष्टी या अवस्थेत मूग भाजून त्याचे पाणी, गाईच्या दुधात शिजवून केलेली मुगाच्या पिठाची खीर किंवा पायसम् मुगाच्या पिठाचे पापड, मुगाची उसळ, मुगाच्या डाळीची खिचडी असे विविध प्रकारे मूग वापरावे. चवीकरिता हिंग, जिरे, मिरी वापरावी. मुगाच्या आहारातील वाढत्या वापराने नुकसान होत नाही. डोळय़ांना नवीन तेज प्राप्त होते.
रासायनिक विश्लेषणात मुगात मांसवर्धक द्रव्ये २३ टक्के, पीठ ५४ टक्के, तेल २ टक्के, चोथा ५ टक्के, राख ४ टक्के आहे. सालीत चोथ्याचे प्रमाण फार असते. मुगाची टरफले वज्र्य करावी. यात फॉस्फरिक अॅसिड आहे.
हरभरा
थंडीत ओला हरभरा मंडीत केव्हा येतो याची लहानथोर सर्व जण आतुरतेने वाट पाहात असतात. ओला हरभरा खाल्ला नसेल असा महाभाग विरळच! हरभरा किंवा चणा अनेक प्रकारचा आहे. हरभऱ्याची आंब, हरभरा डाळ, हरभऱ्याचे कढण, चण्याचे पीठ, उसळ असे विविध प्रकार सर्वाच्या वापरात असतात. श्रावण महिन्यात शुक्रवारी व फाल्गुन महिन्यात हरभरा डाळीचे पुरण असणारी पुरणपोळी एकूण जेवणाला वेगळीच लज्जत देते. संक्रांतीच्या वाणात सुगडामध्ये हरभऱ्याचे घाटे हवेच. हरभऱ्याचे वैशिष्टय़ त्याच्या पानांच्या आंबटपणात, हरभऱ्याच्या आंब या पदार्थात आहे. चांगल्या आंबेचे १०-२० थेंब कसलीही पोटदुखी लगेच थांबवतात. अजीर्ण, अग्निमांद्य, अरुची, वायुगोळा, पोटात वायू धरणे याकरिता आंब वापरावी. मात्र ती खात्रीची हवी. त्याअभावी हरभरा टरफले पाण्यात उकळून त्याचा काढा प्यावा. मंद अग्नी असणाऱ्यांना हरभऱ्याची डाळ मानवत नसल्यास हरभऱ्याचे कढण वापरावे. हरभरा पित्तशामक आहे. हरभरे भाजून खाल्ले व काही तास पाणी प्यायले नाही, तर ते अधिक चांगले अंगी लागतात. मधुमेह, स्थौल्य, रक्तदाब विकार, अजीर्ण, अपचन, गॅस, मूळव्याध, भगंदर या विकारांत हरभरा वज्र्य करावा.
अखंड हरभऱ्यात मांसवर्धक पदार्थ १९ टक्के, पीठ ५३ टक्के, तेल ४ टक्के, चोथा ७ टक्के, राख ३ टक्के आहे, तर हरभरा डाळीत मांसवर्धक पदार्थ २१ टक्के, पीठ ५९ टक्के, तेल ४ टक्के, चोथा १ टक्के, राख २.५ टक्के, फॉस्फरिक अॅसिड १ टक्का असते.
राजमा (चवळी)
शिम्बी व शाकभाजी वर्गातील या वेलाची लागवड पावसाळय़ात व नंतरच्या खरीप हंगामात केली जाते. चवळीचे लहानमोठे व रंगाप्रमाणे वेगवेगळे प्रकार आहेत. काळय़ा, लालचुटूक व गुलाबीसर चवळय़ांना राजमा या नावाने संबोधले जाते. गुजराती चवळी लहान आकाराची, मध्य प्रदेशातील चवळी मोठय़ा आकाराची असते. डॉलर चवळी असा नवीन वाणही बाजारात उपलब्ध आहे. आयुर्वेदशास्त्रानुसार चवळी स्वादिष्ट, सारक, तृप्तीकारक व बल्य व स्तन्यवर्धक आहे. रुची राखून शरीरातील संतुलन राखण्याकरिता रूक्ष गुण चवळीत आहे.
राजम्यात २४ टक्के मांसवर्धक द्रव्ये, ५६ टक्के पीठ, १ टक्के तेल, ४ टक्के चोथा, तर राख ३.५ टक्के व फॉस्फरिक अॅसिड १ टक्का असते.
वाटाणा
वाटाणा, मटार, कलाय या नावाने अनेक प्रकारची शेंगधान्ये स्थळपरत्वे बाजारात मिळतात. वाटाणा हे अन्न मांसवर्धक आहे. यात तुलनेने पिष्टमय भाग कमी आहे. वाटाणा शीत गुणाचा व रूक्ष आहे. वात प्रकृतीच्या व्यक्तींनी वाटाणा टाळावा. खावयास असल्यास सोबत लसूण, आले असे वातानुलोमन करणारे पदार्थ हवेत. गर्भिणी व नवजात बाळंतिणींनी मटार, वाटाणा टाळावा. बाळाच्या पोटाचे विकार सुरू होतात. वाटाणा, मटार हे पोटभरू अन्न, ज्यांना शारीरिक श्रम खूप आहेत त्यांच्याकरिता उपयुक्त आहेत. भाजलेले वाटाणे वाटून त्याचे उटणे लावल्यास त्वचा-कांती सुधारते. वाटाण्यात २३ टक्के मांसवर्धक घटक, ६४ टक्के पीठ, १ टक्का तेल, १ टक्का चोथा, तर २.५ टक्के राख असते.
मटकी
मटकी म्हटले की खवय्यांच्या मनात मिसळ या पदार्थाची आठवण होते. शेंगधान्यात मटकी हे क्षुद्र धान्य समजले जाते. मटकी चविष्ट आहे. कांदा, लसूण याबरोबर शिजवलेली मटकीची उसळ सगळय़ांनाच हवीहवीशी असते; पण समस्त वातविकारात, अजीर्ण, अपचन, उदरवात, पोटदुखी, मलावरोध, मूळव्याध, आतडय़ाची सूज या विकारांत मटकी वज्र्य करावी. मटकी अतिशय रूक्ष व वातवर्धक आहे. गुणाने उष्ण आहे. सर्दी, पडसे, कफ या विकारांत मटकीच्या उकळलेल्या पाण्याचा उपयोग करावा. मटकीच्या उसळीपेक्षामटकीचे कढण किंवा उकळलेले पाणी जास्त उपयुक्त आहे. रासायनिक विश्लेषणात मांसवर्धक द्रव्ये २३ टक्के, पीठ ५६ टक्के, चोथा ४ टक्के, तर राख ३.५ टक्के असते.
पावटे, वाल
पावटे, वाल, कडवे वाल एकाच गुणाचे आहेत. त्या वालाची उसळ सर्वाना हवीहवीशी वाटणारी आहे. ज्यांचा अग्नी चांगला आहे त्यांच्याकरिता, विशेषत: भरपूर श्रम करण्याकरिता शेंगांच्या धान्यांत वाल जास्त चांगले धान्य आहे. श्रीवर्धन, हरिहरेश्वर या भागांतील वालात काही वेगळीच अनोखी चव असते. या वालांच्या उसळीत बिरडय़ाची उसळ असे नाव प्रचारात आहे. वाल रात्रभर गरम पाण्यात भिजवून किंवा त्यांची पुरचुंडी घट्ट फडक्यात बांधून ठेवली जाते. मोड आल्याशिवाय वाल्याच्या उसळीला मजा नाही. वाल वातवर्धक, उष्ण गुणाचे पौष्टिक व पचावयास जड आहेत. त्यामुळे सोबत आले, लसूण वापरले तर पोटात वात धरत नाही. वालाचे कढण किंवा सूप चांगले होतेच. ज्यांचा अग्नी मंद आहे, मूळव्याध, भगंदर, अतिसार, पोटदुखी, मलावरोध इत्यादी महास्रोतसाचे विकार ज्यांना आहेत, त्यांनी वाल वज्र्य करावे. बाळंतिणींना भरपूर दूध यायला वालाच्या उसळीचा उपयोग होतो. वालाच्या डाळीत मांसवर्धक द्रव्य २४ टक्के, पीठ ५७ टक्के, तेल १.५ टक्के, चोथा १ टक्का, राख ३ टक्के, तर अखंड वालात मांसवर्धक द्रव्य २० टक्के, पीठ ५३ टक्के, तेल २ टक्के, चोथा ५.५ टक्के, तर राख ३.५ टक्के असते.
औषधाविना उपचार : फळभाज्या आणि शेंगभाज्या
आपल्या आहारातल्या फळभाज्या, शेंगभाज्या हे नुसते तोंडी लावणे नसते. या भाज्या आपल्या पोषणासाठी महत्त्वपूर्ण हात भार लावतातच शिवाय त्या बहुगुणी आहेत. विविध विकारांमध्ये त्या गुण देणाऱ्या आहेत.

आपल्या रोजच्या आहारात धान्ये, कडधान्ये यांचे जसे महत्त्व आहे तसेच महत्त्व फळभाज्यांना आहे. त्यांना नुसते ‘तोंडीलावणे’ असे न म्हणता मुख्य अन्नाबरोबर साहाय्यक अन्न म्हणून वाजवी सहभाग द्यायला हवा. गहू, भाताबरोबर फळभाज्या, शेंगभाज्या असल्या तरी मानवी शरीराचे सम्यग् पोषण होते. फळभाज्यांमुळे आपल्या मोठय़ा आतडय़ात फायबरयुक्त पुरेसा मळ तयार होतो.
कटरेली
कटरेली, ककरेटी, कंकेली या नावाने झुडपाच्या आश्रयाने पावसाळय़ात वेल वाढतात. त्या वेलांवर सुरेख, हिरव्या रंगाची काटेरी फळे येतात. चवीला तिखट पण रुची आणणारी फळे चातुर्मासात धार्मिक महत्त्व म्हणून आवर्जून खाल्ली जातात. ही फळे अग्निमांद्य दूर करतात. स्वादिष्ट व पथ्यकर भाजी होते. पोटमुखी, वायुगोळा, कृमी, जंत, त्वचेचे विकार, दमा, खोकला, वारंवार लघवी होणे या विकारात कटरेली हे फळ विशेष उपकारक आहे. मलप्रवृत्ती सुखकर होते.
करांदा
करांदा किंवा काटे कणंगचे कांदे शिजवून खावे. ते पौष्टिक नाहीत पण मूळव्याध, रक्त पडणे, पोट बिघडणे, अरुची, मंदाग्नी यावर उपयुक्त आहेत.
कारले
वीस-पंचवीस वर्षांच्या मागे कारले खाणारी महाराष्ट्रात फार थोडी माणसे भेटत. उत्तरेत, विशेषत: दिल्ली, राजस्थान, कानपूर या ठिकाणी पंजाबी डिशमध्ये मात्र आवर्जून ‘कारेला’ भाजी लोक आवडीने खाताना दिसायचे. गेल्या पंचवीस वर्षांत आपल्यात खूप ‘सुधारणा’ झाली असे लोक म्हणतात. समृद्धी, पैसा, आराम आला. त्याबरोबर त्याचे रोगही आले. सर्व रोगांचा या जगातील राजा म्हणजे मधुमेह, त्याचा प्रचार, प्रसार जसा वाढतोय तसतसे कारले या भाजीचा महिमा, मागणी, किंमत, वापर वाढत चाललाय.
कारले फळ, पाने, फळाची पावडर, रस अशा विविध स्वरूपात वापरले जाते. कारले खूप कडू असते. तशा अनेक भाज्या कडू आहेत. पण ‘संतर्पणोत्थ’ व्याधी म्हणजे जास्त खाऊ शकू अशी दुसरी भाजी नाही. कडू रसाचे पदार्थ, स्वत:ची चव खराब असली तरी अरुची, कृमी, विषविकार, खूप तहान लागणे इत्यादी कफ विकारात उत्तम काम देतात. कारले बहुमूत्र प्रवृत्ती, थकवा, ग्लानी, कृमी, जंत, मोठे जंत कृमीमुळे सर्दी, खोकला, खाज, त्वचारोग, डोळे जड होणे, जीभ पांढरी होणे, जखमा चिघळणे, जखमांतून पू वाहणे, यकृत-प्लाहा वृद्धी, विषमज्वर, पांडू, अजीर्ण, शोथ, पित्तप्रकोप, आमवात इत्यादी विविध तीनही दोषांच्या तक्रारीत काम करते. मधुमेह, मधुमेही जखमा, स्थौल्य व स्तनांचे विकार यावरती कारले विशेष प्रभावी कार्य करते. औषध म्हणून चांगल्या कारल्याची निवड असावी. सरळ आकाराची, फार जून नाही अशी कारली उपयोगी आहेत. लहान बालकांच्या मधुमेहात शक्यतो कारले हे फळ वापरू नये.
कारल्याच्या पानांचा रस विषमज्वर व यकृत प्लीहावृद्धीमध्ये परिणामकारक उपाय देतो. विषमज्वर किंवा टायफाईड हा खराब पाणी व त्यातील जंतूंमुळे उद्भवणारा विकार आहे. अन्नवह महास्रोतसांत हे जंतू पुन:पुन्हा ज्वर उत्पन्न करतात. ताप नॉर्मल येऊ देत नाहीत. त्याकरिता कारल्याच्या पानांचा रस प्यावा. यकृत प्लीहा वाढलेली नसताना अग्नीचे बल कमी पडते. रक्तातील श्वेत कण वाढतात. अशा वेळी कारल्याचा पानांचा रस यकृत व प्लीहेच्या उत्तेजनाचे काम करतो. त्यामुळे नवीन जोमाने रक्त बनू लागते. बालकांचा कफ ही एक समस्या असते. त्यांना ओकारी सहजपणे झाली तर बरे वाटते. त्याकरिता कारल्याच्या पानांचा चमचा दोन चमचे रस उत्तम काम देतो. लहान बालकांचा दमा, यकृत-प्लीहा शोथ, हातापायाच्या काडय़ा या विकारात पानांचा रस फार प्रभावी उपाय आहे. बालकांचे पोट साफ होते. मुले वाढीला लागतात. मधुमेहात तळपायांची आग होते. त्याकरिता कारले पानांचा रस प्यावा. रातांधळे विकारात डोळय़ावर बाहेरून कारल्याच्या पानांचा रस व मिरपूड असा लेप लावावा.
मधुमेहाकरिता कारले रस, पावडर, भाजी यांचा सर्रास प्रचार चालू आहे. इथे थोडय़ा तारतम्याची गरज आहे. ताज्या कारल्याचा रस फार प्रभावी आहे. तरुण बलवान, भरपूर रक्तशर्करा वाढलेल्या मधुमेही रुग्णाला पहिले चार-आठ दिवस कारल्याचा पाव अर्धा कप रसाने बरे वाटते. त्यानंतर पुन्हा आठ दिवसांनी रक्तशर्करा तपासावी. ती खूप कमी असेल तर कारले रसाचे प्रमाण कमी करावे. कारल्याचा रस घेऊन ज्यांना गरगरू लागते, त्यांनी रस घेणे लगेच थांबवावे. अर्धा चमचा साखर किंवा खडीसाखरेचा खडा खावा. वृद्ध रुग्णांनी, आठ वर्षांच्या वरच्या मधुमेंहींनी कारल्याच्या फळीचे सावलीत वाळवून केलेल्या चूर्णाचा वापर करावा. त्याचे प्रमाण कमी-जास्त करता येते. लघवीला वास येणे जोपर्यंत आहे, लघवी गढूळ आहे तोपर्यंत कारले चूर्ण नियमित घ्यावे. लघवीचा वर्ण निवळला की प्रमाण कमी करावे.
रक्तातील साखरेचे नियंत्रण झाल्यावर कारल्याचे लोणचे, कमी गूळ घालून केलेले पंचामृत, कारल्याचा कडूपणा कमी करून तयार केलेली भजी असा वापर चालू ठेवावा. पित्तविकार, सांधेदुखी, मधुमेहात वजन घटणे या तक्रारी असणाऱ्यांनी कारले खाऊ नये. पंजाबी ढंगाची भरपूर तेल, डालडा असलेली भाजी काहीच गुण देणार नाही.
कोबी
कृश व्यक्ती, दमछाक झालेले रुग्ण, थोडय़ाशा श्रमाने फाफू होणारे, थकवा, गळाठा, खूप घाम येऊन विश्रांती घ्यावीशी वाटणाऱ्यांकरिता कोबीचा रस किंवा कच्च्या कोबीची कोशिंबीर फार उपयुक्त आहे. कोबी तुलनेने स्वस्त भाजी आहे. मजूर माणसांकरिता कोबी हे उत्तम टॉनिक आहे. तोंड कोरडे पडणे, चेहऱ्यावर टापसा, चिडचिडेपणा, राग येणे, भय, निराशाग्रस्त, रसक्षय झालेल्या रुग्णाकरिता कोबी हे सोपे औषध आहे. छातीत धडधड होणे, उगाचच उमासे येणे, तोंड येणे या तक्रारीत कोबी भाजी नियमित खावी. कोबीमध्ये कीड नाही याची मात्र काळजी घ्यावी लागते. कारण कोबी प्रत्येक पान वेगळे करून चिरला जात नाही. कोबीला भोक पाडून कीड खोलवर गेलेली असू शकते. मूतखडा विकार किंवा लघवी कमी होण्याची तक्रार असणाऱ्यांनी कोबी खाऊ नये.
कोहळा
कुष्मांड या नावाने कोहळा आयुर्वेदात ओळखला जातो. पांढऱ्या जाड सालीचा, भरपूर बिया असलेला व जून कोहळा अधिक चांगला असे शास्त्रवचन आहे. कोवळा कोहळा भाजी म्हणून चांगला असला तरी आयुर्वेदशास्त्राप्रमाणे तो हितकारक नाही. उलट विषसमान आहे. शरीरातील आद्यधातू रसधातू होय. धातूच्या कमतरतेमुळे शरीरात रुक्षता येते. श्रम सहन होत नाही. शरीर शुष्क होते. ग्लानी येते. रसधातूच्या क्षीणतेमुळे जरासा कमी-जास्त शब्द सहन होत नाही. माणसाला चटकन राग येतो. बारीकसारीक गोष्टीत दोष दिसतात. नको तेथे माणूस चिडचिड करतो. अशा रसक्षय विकारात कोहळय़ाचा रस विलक्षण गुण देतो. ताज्या कोहळय़ाचा रस, त्याबरोबर गरजेप्रमाणे मध किंवा साखर मिसळून घ्यावा. किंवा कोहळय़ाच्या वडय़ा, कोहळेपाक घ्यावा. विशेषत: डिहायड्रेशन किंवा जुलाब, कॉलरा या विकारातील बलक्षयावर कोहळा फारच प्रभावी उपाय आहे.
भाजल्यामुळे शरीराला अपाय झाल्यास, त्वचा लवकर सुधारावी म्हणून कोहळा रस पोटात घ्यावा, चोथा त्वचेवर थापावा. त्वचेचा नैसर्गिक रंग परत येतो. कृश बालके, बल गमावलेले वृद्ध, नेत्रक्षीणतेचे रुग्ण, अनिद्रा, पांडुता या विकारात कोहळय़ाचा रस किंवा भाजी अतिशय उपयुक्त आहे. कष्टाने किंवा कमी प्रमाणात लघवी होत असल्याने कोहळा रस नियमाने घ्यावा. लघवी मोकळी सुटते.
कांदा
कांदा श्रीमंतांपासून गोरगरिबांकरिता रोजच्या जेवणातील आवश्यक पदार्थ आहे. काही धार्मिक कारणांकरिता काही जण कांदा खात नाहीत. पण ज्यांना औषधाशिवाय ताकदीकरिता उपाय हवा, त्यांना कांद्याचा आश्रय करावयास हवा. गोरगरिबांकरिता विशेषत: मोलमजुरी, श्रमाची कामे, हमाली, खाणीतील, समुद्रातील किंवा शेतीकाम करणाऱ्यांना इतके स्वस्त दुसरे टॉनिक मिळणार नाही.
कांदा वजन वाढवावयास मदत करतो. तो थंड का उष्ण हा वादाचा भाग आहे. तरीपण कफ व पित्त दोन्ही प्रकारच्या विकारांत तो सारखाच उपयुक्त आहे. कांदा उष्ण, तीक्ष्ण, कफवर्धक, पित्तवर्धक असला तरी बलवर्धक नक्कीच आहे. कांद्यामुळे रुची येते. तो शुक्र धातूचे पोषण करतो, वीर्य वाढवते. स्त्री-पुरुषांनी गमावलेली ताकद भरून आणण्याकरिता कांद्याची मदत फार मोलाची आहे. कांदा फाजील प्रमाणात घेतला तर पोटात वायू धरण्याची खोड उत्पन्न होते. कांद्याचे अजीर्ण बरे करणे अवघड आहे. त्याकरिता धर्मशास्त्राने पावसाळ्यात कांदा चार महिने खाऊ नये असे सांगितले असावे. पावसाळ्यात अग्निमंद असतो. आधुनिक मताप्रमाणे कांद्यात तिखट चवीचे, उग्र गंध असलेले तेल व गंधक असते. नवीन मताप्रमाणे कांदा उत्तेजक, मूत्रजनक उष्ण व कफघ्न आहे. कांदा खायला लागल्यापासून कफ मोकळा होऊन सुटतो. नवीन कफ होणे बंद होते. तसेच आतडय़ाची ताकद सुधारून शौचास साफ होते. याकरिता अंग बाहेर येणे, कफप्रधान मूळव्याध व काविळीमध्ये कांदा वापरावा असे एक मत आहे.
आम्हा वैद्य लोकांच्या अनुभवात मात्र कांदा अजीर्णाचे कारण आहे. ज्यांचा अग्नी अगोदरच मंद झालेला आहे त्यांनी कांदा खाल्ला की अजीर्णाचे रूपांतर मलावरोध, उदरवात, पोटफुगी, पोटदुखी, जुलाब, मूळव्याध, आम्लपित्त, गुदभ्रंश अशा नाना विकारांत होते. कांदा खायचा असला तर पेण, अलिबाग येथील माळेचा कांदा खावा. तो बाधत नाही. सांबार करण्याकरिता खूप छोटय़ा आकाराच्या लाल कांद्याचा वापर करावा. तो दक्षिण भारतातून येतो. चवीने गोड असतो.
नेत्रक्षीणता किंवा डोळ्यांचे विकार झालेल्या रुग्णांनी कांदा जरूर खावा. विशेषत: पांढरा कांदा नियमित खावा. डोळ्यांची भगभग थांबते. डोळ्यांत तेज येते, डोळे आले असताना कांद्याचा रस व मध असे मिश्रण डोळ्यात काही थेंब टाकावे. थोडे झोंबते, पण नंतर बरे वाटते. तीव्रवेगी तापाकरिता हातापायाला, कानशिलाला कांदा वाटून चोळण्याचा प्रघात आहेच. बाह्येपचार म्हणून तीव्र उन्हाळ्यात कांदा वाटून चोळण्याचा प्रघात आहेच. बाह्येपचार म्हणून तीव्र उन्हाळ्यात कांदा फार उपयुक्त आहे. फार पूर्वी दुपारी कडक उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून टोपीत कांदा बाहेर पडायचा प्रघात होता. ऐन उन्हाळय़ात आलेल्या पांथस्थाला गूळ-पाणी देण्याचा जरा प्रघात आहे, तसा प्रघात म्हणून तळपायाला कांद्याचा रस चोळला तर उष्माघात होणार नाही. तापाचे प्रमाण वाढल्यास, डोक्यात ताप जाऊ नये म्हणून कांद्याचा रस तळहात, तळपाय, डोळे यांना चोळावा. तापाचे प्रमाण कमी होते. कांदा टोचावा व तो मधात बुडवून ठेवून सात दिवसांनी खावा. शुक्रधातू मजबूत होतो. त्याकरिता रोज एक कांदा थोडय़ा मधात, आठवडय़ाने खाण्याकरिता तयार करावा. घुसमटणाऱ्या कफविकारात विशेषत: लहान बालके व वृद्ध यांना कांदा किसून त्याचा रस द्यावा. कफ मोकळा होतो. अंगातील कडकी दूर होण्याकरिता कांदा उपयुक्त आहे. कॉलरा, पटकी या विकारांत एकदोन उलटी जुलाब झाल्याबरोबर कांद्याचा रस द्यावा. बहुधा उतार पडतो. कृश व्यक्तींना झोप येण्याकरिता रात्रौ कांदा खाणे हा उत्तम उपाय आहे. ज्यांना फिट्चे झटके नेहमी येतात त्यांनी रोज सकाळी नाकात कांद्याचा रस दोन थेंब टाकावा. फिट्स येत नाहीत.
काकडी
काकडीचे देशपरत्वे खूप प्रकार आहेत. सर्वात चांगली काकडी म्हणजे मावळी काकडी होय. त्याच्या खालोखाल नेहमीच्या मिळणाऱ्या काकडय़ा व तीन क्रमांकाच्या काकडय़ा म्हणजे तवसे म्हणून लांबलचक मोठय़ा काकडय़ांचा प्रकार होय. मावळी काकडी गोड आहे. त्याच्या अधिक सेवनाने कफ, सर्दी, खोकला सहसा येत नाही. विशेषत: कोणत्याही आजारपणानंतर ‘लघुआहार’ सुरू करताना ही काकडी (सिझन असल्यास) जरूर खावी. त्या काकडीमुळे आतडय़ांचा क्षोभ कमी होतो. कमीअधिक औषधांनी जेव्हा आतडय़ांना दाह होतो, मुलायमपणा कमी होतो तेव्हा काकडी आपल्या स्निग्ध गुणाने आतडय़ांचे रोपण किंवा संधानकार्य करतात.
काकडी ही मूत्रल आहे. पण त्याच्या बारक्या बिया या मूतखडय़ाचा पाया होऊ शकतात. म्हणून कॅल्शिअम ऑक्झलेट या काटा असणाऱ्या मूतखडय़ात काकडी निषिद्ध-कुपथ्यकारक आहे. कमी बियांची किंवा काकडी किसून पिळून त्याचा रस मूत्रल म्हणून घ्यावयास काहीच हरकत नाही. गरमी, परमा, हातापायांची जळजळ, तीक्ष्णोष्ण खाण्यापिण्याने, दारू, तंबाखू, धुम्रपान सेवनाने जेव्हा शरीरात उष्णता वाढते तेव्हा एकवेळ काकडीच्या रसावर राहावे. काकडी शुक्रवर्धक आहे.
एड्स या महाभयंकर विकाराच्या जागतिक लढाईत तवशासारख्या काकडीचा, त्याच्या मुळांचा उपयोग जगातील अनेक शास्त्रज्ञ प्रयोग म्हणून करू पाहत आहेत. आपण किमान रोजच्या आहारात पित्तशामक म्हणून जरूर वापरावी.
गाजर
‘गाजराची पुंगी’ हा वाक्प्रचार लक्षात न घेता सर्वसामान्य माणसाने ताकदीकरिता आठवडय़ातून एक वेळा तरी गाजर जरूर खावे. गाजर हे घोडय़ांकरिता मोठे अन्न आहे हे आपणा सर्वाना माहीत नाही. गाजर कितीही महाग असले तरी किंमतवान घोडय़ाच्या आहारात ते आवश्यक आहे. गाजर रुचीवर्धक व पाचक आहे. दिल्ली गाजर व गावरान गाजर अशा दोन जाती येतात. गावरान गाजर गुणांनी श्रेष्ठ आहे. गाजर रस, कच्चे, शिजवून किंवा किसून तयार केलेली खीर किंवा गाजरहलवा अशा नाना प्रकारे गाजराचा वापर करता येतो. गाजराचा रस पिऊन रक्त वाढते. हाडे मजबूत होतात. गाजराची भाजी खाऊन दात बळकट होतात. हिरडय़ा मजबूत होतात. शरीराला स्थैर्य, टिकाऊपणा, काटकपणा गाजर सेवनाने येतो.
गोवार
पथ्यकर पालेभाज्यांत विशेषत: कफप्रधान विकारात गोवारीच्या शेंगांना वरचे स्थान आहे. गोवार रूक्ष, वातवर्धक आहे. सर व दीपन गुणांमुळे मलावरोध, मधुमेह, रातांधळेपणा विकारात गोवारीचे महत्त्व सांगितले आहे. रोग निवारण्याकरिता गोवारीची भाजी तुपावर परतून सैंधव मिसळून खावी. गोवारीची भाजी फार तेलकट बनवू नये. औषधी गुण जातात. मेदस्वी माणसाने गोवारीच्या शेंगा नुसत्या वाफारून खाव्यात. जून गोवार खाऊ नये. गोवारीची कडू जात म्हणजे बावची होय.
श्रावणघेवडा
श्रावणघेवडा ही थंड गुणाची, वातवर्धक व पित्तशामक भाजी आहे. मलमूत्र साफ होत नसले तर ताज्या व कोवळ्या घेवडय़ाची एक वेळ भरपूर भाजी खावी. एक टाइम पोट साफ होते. लघवी सुटते.
घोसाळी
घोसाळी भज्यांकरिता प्रसिद्ध आहेत. याशिवाय घोसाळय़ाची कडू चवीची जात जास्त उपयुक्त असते. घोसाळय़ाची भाजी खाऊन लघवी साफ होते. छातीत खूप कफ झाल्यास उलटी करवण्याकरिता घोसाळय़ांचा रस प्यावा. त्रास न होता उलटी होते. जीर्ण, जुनाट, चिघळलेल्या जखमा असणाऱ्या रुग्णांनी घोसाळय़ाची भाजी खावी. जखमा लवकर भरून येतात. यकृत किंवा प्लीहा हे अवयव वाढल्यामुळे पोट मोठे झाल्यास घोसाळय़ाची शिजवून बिनतेला-तुपाची भाजी किंवा नुसता रस प्यावा. पोटाची सूज कमी होते.
वजन कमी करण्याकरिता घोसाळी उकडून त्याचे तुकडे मोठय़ा प्रमाणावर खावेत. पोट फुगणे, खडा होणे, स्वप्नदोष, लघवी अडखळत किंवा तिडीक मारून होणे, उष्णतेच्या कामामुळे थकवा येणे या तक्रारीत घोसाळी ही पथ्यकर पालेभाजी आहे.
टिंडा
ही एक पथ्यकार भाजी आहे. टिंडे कोवळे असतील, जून बिया त्यात याची काळजी घ्यावयास हवी. टिंडय़ाची भाजी घेवडय़ाप्रमाणेच पित्तशामक, शीत गुणाची, रुची उत्पन्न करणारी आहे. आजारी माणसांनी टिंडा भाजी अवश्य खावी. टिंडा भाजीसोबतची पोळी अंगी लागते. आहार वाढवते. क्षुद्बोध उत्पन्न होतो.
टोमॅटो
टोमॅटोला फार पूर्वी कोणी बेलवांगे म्हणत. का? त्याचा कार्यकारणभाव लागत नाही, पण शरीराच्या सार्वत्रिक वाढीकरिता वांग्यासारखाच टोमॅटोचा उपयोग होतो, याबद्दल दुमत नाही. टोमॅटोमुळे रुची उत्पन्न होते. अग्निवर्धन होते. शरीर सुकले असताना टोमॅटोचा रस हा एक सहारा आहे. ज्यांना कोणत्याच पदार्थावर वासना नाही, पांडुता आहे, त्यांना टोमॅटोचा रस उत्तम काम देतो. रक्त बिघडणे, दातातून रक्त येणे, हिरडय़ा झिजणे, रक्त येणे या तक्रारीत टोमॅटो द्यावा. सोबत आल्याचा तुकडा द्यावा.
मांसाहार करणाऱ्यांकरिता टोमॅटो फार उपयुक्त आहे, नव्हे आवश्यक आहे. मांसाहारामुळे होणारी जळजळ, लागणारी खूप तहान, पोट जड होणे याकरिता जोडीला टोमॅटो ‘माफक’ प्रमाणात हवा. सुका खोकला, मेदस्वी शरीर याकरिता रसधातू वाढविण्याकरिता टोमॅटो खावा. गर्भवती स्त्रीने १००/२०० ग्रॅम टोमॅटो नियमित खावा. गर्भाचे उत्तम पोषण होते. मानसिक श्रम, अशांत झोप असणाऱ्यांनी टोमॅटो नियमितपणे खावा. पोटात वायू धरण्याची खोड ज्यांना आहे, मूतखडा असणाऱ्यांनी टोमॅटो वज्र्य करावा. टोमॅटोसोबत हिंगपूड व मीठ वापरावे. टोमॅटो बाधत नाही. आंबट टोमॅटो वज्र्य करावा.

तोंडली या वेलाची फळे, पाने व मूळ औषधी उपयोगाची आहेत. तोंडल्याच्या मुळांचा रस सैंधव चूर्ण मिसळून घ्यावा. मधुमेहावर उपयुक्त आहे. मधुमेही रोग्यांकरिता भाजी उपयुक्त आहे. पोटभर खावी. गरोदर स्त्रियांना क्वचित अंगावरून जात असल्यास लगेच तोंडल्याची भाजी खावी. जिभेला कात्रे पडले असल्यास पानांचा रस जिभेला लावावा. पानांचा रस व्रणरोपणाचे काम करतो. पाने वाटून जखमेवर बांधावीत. पोटात रस घ्यावा. बाळंतिणीला भरपूर दूध येण्याकरिता तोंडल्याची भाजी उपयोगी पडते. पातळ जुलाब होत असल्यास, तोंडाला चव नसल्यास तोंडल्याची उकडून भाजी खावी. सोबत सुंठपाणी घ्यावे. काविळीत तोंडल्याची भाजी पथ्यकर आहे. मधुमेहात पायांची आग होते. ती थांबवण्याकरिता तोंडल्याची भाजी खावी. मार, मुरगळा, सूज याकरिता तोंडल्याचे वाटून शिजवून पोटीस करून बांधणे. तोंडली खाल्ली तर बुद्धी कमी होते हा समज चुकीचा आहे. स्त्रियांच्या धुपणी या विकारात तोंडल्याच्या मुळांचा काढा घ्यावा. जननेंद्रियांच्या विकारात व्रणरोपण, रक्तसंग्रहणाच्या कार्यात तोंडल्याची भाजी उपयुक्त आहे.
टोमॅटोचे औषधी सार
तापामध्ये टोमॅटोचे ‘औषधी सार’ द्यावे. दोन मोठे टोमॅटो व दोन कप पाणी कल्हईच्या पातेल्यात मंद आचेवर उकळत ठेवावे. शिजवून गरम झाल्यावर त्याच पाण्यात एकजीव झाल्यावर कोळावे. चवीपुरते कोथिंबीर, जिरे, आले व साखर मिसळावी. तूप, जिरे, हिंगाची फोडणी द्यावी. पांडू व अशक्तपणात हे सार उत्तम काम देते.
गाजरपाकाचे टॉनिक
गाजरपाक हे मोठे टॉनिक आहे. गाजर किसून तुपावर परतून त्यात थोडे बदाम, वेलची, जायफळ, खडीसाखर मिसळून वडय़ा कराव्यात. थंडीमध्ये घेण्यासाठी गाजरपाक हे उत्तम टॉनिक आहे. खूप भाजले असता गाजर खावे. त्वचा लवकर सुधारते. गळवांवर बांधण्याकरिता गाजर शिजवून त्याचे पोटीस बांधावे. तसेच पोटात गाजर रस घ्यावा. गळवे बरी होतात. गाजराच्या मुळात साखर असते. गाजराच्या बियांत तेल असते. आर्तवशुद्धी व मासिक पाळी व्यवस्थित जावी याकरिता गाजराचा काढा उपयुक्त आहे. वाजीकरणाकरिता गाजर बी उपयुक्त आहे. काविळीत गाजरकाढा घ्यावा. व्रणावर बांधल्यास व्रण भरून येतो.
गरज समृद्ध आयुर्वेद ग्रंथालयांची
लहानपणापासून मला वाचनाची विलक्षण आवड. आमच्या घरी त्या काळातली नियतकालिके यायची.
पुस्तके ज्ञानार्जन करणाऱ्यांपर्यंत पोहोचण्याची गरज आहे
आयुर्वेद हे आपल्या पूर्वजांनी पिढय़ान्पिढय़ा जतन करून आपल्यापर्यंत पोहोचवलेले आपले सांस्कृतिक, बौद्धिक संचित आहे. ते टिकवायचे आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायचे तर चांगली ग्रंथालये निर्माण करायला हवीत.
न हि ज्ञानेन सहशां पवित्रमिह विद्यते।
‘नॉलेज इज टू नो दॅट यू नो नथिंग’
– सॉक्रेटिस
लहानपणापासून मला वाचनाची विलक्षण आवड. आमच्या घरी त्या काळातली नियतकालिके यायची. ही कोणी अगोदर वाचायची याबद्दल माझा व आईचा वाद व्हायचा. स्वा. सावरकर यांचे ‘१८९७ चे स्वातंत्र्यसमर’ हे पुस्तक प्रदीर्घ बंदीनंतर प्रसिद्ध झाले. त्या काळातील किंमत दहा रुपये म्हणजे फारच महाग. वडिलांना मी पुस्तक विकत घेण्याबद्दल सुचविले. ते म्हणाले, आपल्याकडे दहा रुपये नाहीत. ‘एक वर्षभर मी नाटक सिनेमा पाहणार नाही, पण पुस्तक हवे’ असा माझा बालहट्ट पाहता पुस्तक आले. तिथपासून कितीएक धार्मिक, राजकीय, ऐतिहासिक ग्रंथ, कादंबऱ्या मी विकत घेत गेलो. पुणे नगर वाचन मंदिराचा मी खूप लहानपणापासून सभासद होतो. मला त्या काळात ऐतिहासिक पुस्तके, बखरी इ. वाचनाचे फार वेड होते. त्यानंतर त्यांची जागा क्रांतिकारकांच्या चरित्रांनी घेतली. शाळेतील अभ्यासाची पुस्तके ही पहिल्या आठ पंधरा दिवसांतच वाचून संपवीत असे. माझा अनुभव असा आहे की ज्याला वाचनाचे वेड आहे. त्याला कोणताच विषय बहुधा निषिद्ध नसतो. त्यामुळे रद्दीतले कपटेसुद्धा वाचावेसे वाटतात. भारतीय विमान दलात असताना इंग्लंडचे दमदार नेते विन्स्टन चर्चिल यांची पहिल्या महायुद्धावरची चौदा व दुसऱ्या महायुद्धाच्या इतिहासाची पानोपानी रोमहर्षता असणारी सहा पुस्तके व युद्धस्य कथा असणारी डझनांनी पुस्तके वाचली. भारतीय विमानदलाच्या समृद्ध ग्रंथालयांना त्या काळात माझ्या आग्रहाने निवडक मराठी पुस्तकेही विकत घ्यायला लावली. असो. असे हे वेड मला आयुर्वेदाच्या शिक्षण क्षेत्रात १९६८ मध्ये प्रवेश घेतल्यावर सारखे सतावू लागले.
माझ्या आयुर्वेद ग्रंथालयाची सुरुवात काही विलक्षण योगायोगाने झाली. माझे लहानपणापासूनचे मित्र व एक प्रख्यात विधिज्ञ यांना
आयुर्वेदाचा डी. एस. ए. सी हा अभ्यासक्रम पुरा करावयाचा होता. त्यांनी सार्थ वाग्भट, रसरत्न समुच्चय, तर्कशास्त्र विषतंत्र इ. इ. अनेक पुस्तके खरेदी केली होती. मी आयुर्वेदाच्या अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेतला आहे म्हटल्याबरोबर त्यांनी सर्व ग्रंथांची अमूल्य भेट मला तत्क्षणी दिली. त्यावेळेस वडिलांनी विकत घेतलेला एकमेव ग्रंथ सार्थ वाग्भट घरात होता. माझे आयुर्वेद प्रवीणचे शिक्षण चालू असताना मला लॉटरीपेक्षा भाग्यवान असे गुरुजी वैद्यराज बापूराव नरहर पराडकर भेटले. त्यानंतर माझ्या आयुर्वेद ग्रंथालयाला रोज नित्य नवे बाळसे यायला लागले. वैद्यराज हे पुस्तकांचे ‘भुकेले’ होते. त्यांची प्राप्ती नाममात्र होती, तरीपण वैद्यकाची लहानमोठी, कमी किमतीची व महागडी पुस्तके विकत घेऊन वाचायची त्यांना दांडगी हौस. आमच्या दोघांची पुस्तकमैत्री जमली. पुढे तर त्यांची सर्वच पुस्तके माझी झाली. ती एक वेगळीच कथा आहे. ‘घरगुती औषधे’ नावाचे मराठी भाषेतील अनेक आवृत्त्या झालेले वैद्यतीर्थ आप्पाशास्त्री साठे यांचे पुस्तक आहे. आप्पाशास्त्री साठे हे त्यांच्या काळातील मुंबई गिरगावातील ज्येष्ठ अनुभवी वैद्य. आयुर्वेदाच्या चळवळीत, डॉ. गिल्डर या आरोग्यमंत्र्याशी, संघटनेद्वारे दोन हात करणारे म्हणून प्रसिद्धी पावून होते. त्यांच्याकडे खूप वैद्य पुस्तकांचा संग्रह होता. त्यांच्या पश्चात त्यांच्या चिरंजीवांनी काही काळ वैद्यक व्यवसाय केला. त्यांच्या निधनानंतर आप्पाशास्त्रींच्या सुनबाईंनी- ताईंनी मला एकवेळ तरी दवाखाना चालवा म्हणून सुचविले. मुंबईत दर सोमवारी सायंकाळी त्यांचा दवाखाना मी सांभाळत असे. माझा आयुर्वेदाचा रोजचा अभ्यास, खटाटोप पाहून त्यांनी घरच्या आयुर्वेद पुस्तकांचा संग्रह भेट म्हणून दिला. या संग्रहामुळे आमच्या वैद्य खडीवाले वैद्यक संशोधन संस्थेच्या अंतर्गत ‘वैद्यतीर्थ आप्पाशास्त्री साठे वैद्यकीय ग्रंथालय’ हा विभाग जन्माला आला. त्या काळात उत्तम औषधी निर्माण, पंचकर्म, नवनवीन संशोधन प्रयोग व त्याबरोबर समृद्ध संदर्भ ग्रंथालय याकरिता मी व वैद्यराज पराडकर गुरुजी झपाटल्यासारखे काम करीत होतो. पुणे- मुंबईच्या पुस्तकांच्या दुकानात आमची स्वारी धडकायची, रस्त्यावर फेरीवाले भेटायचे. सर्वाकडून आयुर्वेदाची खूप प्रकारची पुस्तके गोळा करायचो. त्याबरोबर युनानी, होमिओपॅथी, बाराक्षार, निसगरेपचार, वनस्पती व थोडय़ा प्रमाणात आधुनिक वैद्यकाची पुस्तके विकत घ्यायचो.
‘दिव्याने दिवा लागतो’, तसे आमच्या छंदाची कीर्ती पसरत चालली. एक दिवस ‘अद्वैतवादी असाध्य रोगांवरील अनुभविक चिकित्सा’, ‘मानवाचे कामशास्त्र’, ‘हिंदू धर्मातील मूर्तिपूजेचे तत्त्वज्ञान’ या पुस्तकांचे लेखक व अफाट अभ्यासकांची – डॉ. नारायण बाळाजी कुलकर्णी यांच्या कन्या रजनी व आशा या माझ्याकडे त्यांच्या वडिलांचा ग्रंथसंग्रह भेट देण्याकरिता आल्या. त्या गं्रथाचे वैशिष्टय़ असे की प्रत्येक ग्रंथात अधोरेखित अशी सर्व अभ्यासू टिपणे होती. वैद्यराज कुलकर्णीनी वेद, पुराणे, बृहत्रयी, लघुत्रयी इत्यादी ग्रंथांचा आयुर्वेद, वैद्यक व आर्य वैद्यकाच्या भूमिकेतून खूप अभ्यास केल्याचे पुरावे पानोपानी होते. आमचे संदर्भ ग्रंथालय समृद्ध होत चालले. माझ्या वडिलांचे एक मित्र एस. आर. सामंत हे बांद्रा, पश्चिम मुंबई येथे राहात होते. त्यांना वैद्यकाची पुस्तके विकत घेऊन वाचायची, प्रयोग करण्याची दांडगी हौस. पोर्ट ट्रस्ट ऑफ इंडियामध्ये काम करूनही फावल्या वेळात पांढरीसावरीसारखी दुर्मीळ झाडे लावून त्यावरचे प्रयोग चालू असत. माझ्या संपर्कात आल्यावर त्यांनी आपला ग्रंथसंग्रह आपणहून माझ्या स्वाधीन केला. शनिवार पेठेत मेहुणपुरा भागात मोडक म्हणून एक सद्गृहस्थ राहायचे. ते शिक्षण खात्यात मोठय़ा पदावर असूनही आयुर्वेदाचा अभ्यास-मूलगामी अभ्यास करायचे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबाने- माझ्या गुरुजींच्या आग्रहाला मान देऊन काही अमोल पुस्तके दिली. आयुर्वेद शिक्षण नसूनही मोडक यांचा आयुर्वेदीय गं्रथांचा सटीक, सखोल अभ्यास त्यांच्या संग्रहातील प्रत्येक पुस्तकात दिसून येत होता. जुन्या पिढीतील वैद्यराज शं. गो. वर्तक शनिवार पेठेत अहिल्यादेवी हायस्कूलजवळ, रामदास विश्रांतीगृहापाशी राहात होते. वैद्यराज पराडकरांच्या आग्रहाने मी त्यांच्या घरी जाऊन वैद्यकचर्चा करीत असे. एक दिवस त्यांनी आपली खूप गं्रथसंपदा नाममात्र किमतीने दिली. आमचे अष्टांग आयुर्वेद महाविद्यालयातील एक शिक्षक फावल्या वेळातील उद्योग म्हणून वैद्यकाच्या पुस्तकांचा- विशेषत: जुनी पुस्तकं विकण्याचा धंदा करीत. त्यांच्याकडून काही दुर्मीळ ग्रंथ मिळाले. वैद्यराज गुरुवर्य गणेशशास्त्री शेण्डय़े हे आम्हा अनेक वैद्यांचे ज्येष्ठ गुरुजी. त्यांच्या घरात अष्टवैद्यक- आठ वैद्य होते. तरी त्यांनी एकदिवस मला बोलावून घेऊन आपला वैद्यक पुस्तकांचा संग्रह माझ्या स्वाधीन केला. त्यांच्या मते त्यांच्याजवळच्या आयुर्वेदीय पुस्तकांना योग्य न्याय देण्याला बहुधा मी अधिक पात्र असावा.
आमच्या ग्रंथालयात देणग्यांव्यतिरिक्त इतरही ग्रंथांची वारंवार भर पडत होती. पुणे शहरातील अप्पा बळवंत चौकातील तसेच मुंबई- दादर, गिरगाव येथील अनेकानेक पुस्तकांची दुकाने मी वैद्यकीय विशेषत: आयुर्वेदीय पुस्तकांकरिता पिंजून काढत असे. निर्णयसागर प्रेस, चौखंबा प्रकाशन, मोतीलाल बनारसी दास व अन्य छोटय़ा-मोठय़ा प्रकाशकांची पुस्तके विकत घेत घेत ग्रंथालयाला खऱ्या अर्थाने समृद्ध ग्रंथालयाचे स्वरूप आले. अनेकांशी चर्चा करून त्या पुस्तकांचे वर्गीकरण करून प्रशस्त हॉलमध्ये हे ग्रंथालय गेली वीस वर्षांच्यावर काम करीत आहे. या ग्रंथालयाचे पोटविभाग आमच्या कल्पनेतून पुढील प्रमाणे केले आहेत.
१) चरित्र, इतिहास, सिद्धांत, पदार्थ विज्ञान, वेद व उपनिषदे
२) स्वस्थवृत्त, आहारविहार
३) ग्रंथालयांची तांत्रिक माहिती, घरगुती लघू उद्योग इ.
४) आयुर्वेदीय निदान व चिकित्सा; विविध रोग व उपचार व औषधी संग्रह
५) औषधीकरण, आसवारिष्ट इत्यादी
६) शेती, जनावरे, दूधदुभते इत्यादी
७) द्रव्यगुणशास्त्र, वनस्पतिज्ञान
८) आयुर्वेद परिचय, दोषधातूमल विज्ञान
९) वैद्यविषयक कायदे, विषतंत्र
१०) बालरोग व स्त्रीरोग चिकित्सा
११) बालमानसशास्त्र व मंत्रतंत्र संमोहन विद्या इ.
१२) योग, व्यायाम, खेळ इ.
१३) रसशास्त्र, धातूवाद इ.
१४) रसायन, वाजीकरण, पुरुषरोग
१५) शल्यशालाक्य दंत, नेत्र व इतर
१६) शरीर विज्ञान
१७) रुग्णपरिचर्या
१८) आयुर्वेदीय संशोधन
१९) संस्कृत वाङ्मय आयुर्वेदेतर व कोशवाङ्मय
२०) संहिता भाग १- बृहत्त्रयी
२१) संहिता भाग २- लघुत्रयी व इतर संहिता
२२) विविध आयुर्वेदीय नियतकालिके व संकीर्ण ग्रंथ
गेली वीस वर्षांहून अधिक काळ या गं्रथालयाचा भरपूर उपयोग मला स्वत:ला झालाय. माझी लहानमोठी पुस्तक व पुस्तिका मिळून शंभर सव्वाशे प्रकाशित साहित्याला या ग्रंथालयाची खूपच मदत झाली. सुवर्णमाक्षिकादि वटी या हृद्रोगावरच्या प्रबंधामुळे एका फॉर्माकॉलॉजिस्ट महिलेला डॉक्टरेट मिळाली. त्यांना या संदर्भ ग्रंथालयाची खूप मदत झाली. डॉ. जोशी या एक ज्ञानी बॉटनिस्ट. त्यांच्या आयुष्यभराच्या संशोधनपर इंग्रजी भाषेतील महान ग्रंथ- संपादनाला या गं्रथालयाची मौलिक मदत झाली. माझ्या पंचवीस-तीस वर्षांच्या अनुभवावरून आदर्श आयुर्वेद ग्रंथालय कसे असावे याचे काही निकष सर्वाकरिता उपयुक्त आहेत. माझ्या संपर्कात आलेल्या अनेक वैद्यवरांना माझ्या ग्रंथ जमा करण्याच्या वेडामुळे थोडय़ा छोटय़ा प्रमाणावर ग्रंथ गोळा करता आले. त्यातील उल्लेखनीय दोन व्यक्ती म्हणजे विद्यार्थी प्रिय कै. वैद्य मा. वा. कोल्हटकर व पाचगणी येथील वैद्य श्रीधर चितळे या होत.
आदर्श आयुर्वेद ग्रंथालयाचे ढोबळ मानाचे दोन भाग करता येतील. एक म्हणजे दीर्घकाळ वैद्यक व्यवसाय केलेल्या, ज्ञानी, बहुश्रुत वैद्यांचे सर्वाकरिता शिष्य, मित्रपरिवार व त्याचबरोबर स्वत:करिता संदर्भ ग्रंथालय. या ग्रंथालयात, चरक, सुश्रुत, वाग्भट यांचे बृहत्रयी ग्रंथ, भावप्रकाश, माधव निदान, शाङ्र्गधर संहिता ही लघुत्रयी; योगरत्नाकर, भैष्यज रत्नावली, भारत भैष्यज रत्नाकर- पाच भाग, रसयोग सागर दोन भाग, रसहृदयतंत्र, रसकामधेनु, रसचंडाशु, रसरत्नसमुच्चय इ. इ. अनेकानेक ग्रंथ हवेच. त्याच बरोबर कर्मविपाक व त्यावरील उपाय सांगणारे वैद्य लाळे यांचा आयुर्वेद कलानिधी ग्रंथ; डॉ. वामन गणेश देसाई यांचे औषधी संग्रह व भारतीय रसशास्त्र, आयुर्वेद महासंमेलनाचे संस्थापक वैद्य शंकरदाजी शास्त्री पदे यांचे वनौषधी गुणादर्श, आर्यभिषक व अन्य पन्नासच्यावर लहानमोठी पुस्तके, डॉ. नाडकर्णी यांचा मटेरिया मेडिका, वैद्यतीर्थ आप्पाशास्त्री साठे यांचे घरगुती औषधे; आचार्य यादवजी त्रिकमजी यांची द्रव्य गुणावरची चार अमोल पुस्तके, युनानी द्रव्यगुण विज्ञान व सिद्धौषधी संग्रह ही व अशी अनेक पुस्तके हवीतच.
आयुर्वेद गं्रथालयाचे एक वैशिष्टय़ असे आहे की प्राचीन काळी जे प्रमुख ग्रंथ लिहिले गेले त्या ग्रंथावर टीका गं्रथ अनेक आहेत. श्री चरकाचार्याची अग्निवेश संहिता, अष्टांग हृदय, सुश्रुसंहिता यावर पूर्वी थोरा-मोठय़ांनी आपापल्या परीने खूप विस्तृत ग्रंथ लिहिले आहेत. गेल्या पन्नास- साठ वर्षांत आधुनिक आयुर्वेद महर्षी उदा. डॉ. भा. गो. घाणेकरांसारख्या प्रकांड पंडितांनी सुश्रुत संहितेवर अत्युत्तम ग्रंथ लिहिला आहे. अष्टांग हृदय ग्रंथावर उपलब्ध टीका किमान वीस आजमितीस उपलब्ध आहेत. ज्या आयुर्वेद अभ्यासकांना सखोल अभ्यास करायचा आहे त्यांना हे सर्व सटीक ग्रंथ माहीत पाहिजेतच. चक्रपाणीदत्त, उल्हण इत्यादींच्या टीका ग्रंथावरही अलीकडे छोटे छोटे ग्रंथ आहेत. या सगळ्या आयुर्वेद तत्त्वज्ञानाच्या गं्रथाबरोबरच रसशास्त्र विषयावर किमान दीडशे ग्रंथ उपलब्ध आहेत. ज्यांना तसा अनुभव आला तसे भारतभरच्या विविध प्रांतातील वैद्य व औषध निर्माण तज्ज्ञांनी छोटी छोटी चोपडीही प्रसिद्ध केली. या सगळ्या ग्रंथांचे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून वाचन व्हायला लागले. पुण्यातील वृद्ध वैद्यत्रयी श्रीयुत अनंतराव आठवले, वैद्या निर्मला राजवाडे व वैद्य शि. गो. जोशी यांनी लिहिलेला व्याधिविनिश्चिय, शल्यशालायबय व कौमरभृत्य हे तीन ग्रंथ अलीकडच्या आयुर्वेद वाङ्मयातील मानदंड आहेत. वैद्यवर मामा गोखले याचे छोटे पुस्तक ‘आयुर्वेद म्हणजे काय? हे सर्वसामान्यांकरिता ग्रंथालयात हवेच. रसशास्त्र व औषधीनिर्माणविषयक सर्वात मोठा ग्रंथ म्हणजे भारत भैष्यज रत्नाकर. एकूण सहा भाग व त्या सर्वाचा संकलित ग्रंथ सार संग्रह यांना रसशास्त्रातील मुकुटमणी म्हणावयास हवे. पं. वैद्य यादवजी निकमजी यांनी परिश्रमपूर्वक तयार केलेला स्वानुभवाचा औषधी सार संग्रह माझ्या नित्य वाचनात असतो. अथर्ववेदविषयक पं. सातवळकरांच्या वाङ्मय आयुर्वेद ग्रंथालयात हवेच. त्याशिवाय अर्थवेदात सांगितलेला कुडा आजही अतिसाराकरिता वापरात आहे. आयुर्वेदाचे अनंत, अपार, वैश्विक महत्त्व त्याच्या उल्लेखाने, त्याच्या वाचनाने लक्षात येते.
आयुर्वेदीय ग्रंथालयावर मोठे ऋ ण आहे. वैद्य शंकरदाजी शास्त्री पदे या प्रथम प्रकाशकांपासून ते थेट गजानन बुक डेपोपर्यंत मुंबईतील निर्णयसागर, पॉप्युलर प्रकाशन, दिल्लीतील मुन्शीलाल मनोहरलाल, मोतीलाल बनारसीदास, श्री सद्गुरु पब्लिकेशन्स व इंडियन बुक सेंटर; वाराणसी येथील चौखंबा संस्कृत सेरीज, चौखंबा आयुर्वेद साहित्य, विश्वभारती, कृष्णादास अकादमी, पुण्यातील कॉन्टिनेंटल व वैद्यक ग्रंथ भांडार, नागपूर येथील डॉ. प. ग. आठवले यांच्या दृष्टार्थ माला; इ. इ. पर्यंत सर्वाशी संपर्कात राहिल्यास आयुर्वेद गं्रथालय ‘आपल्या खिशाला परवडेल’ असे समृद्ध करता येते. अलिगड (उ.प्र.) येथील विजयगढ येथून धन्वंतरी वनौषधी विशेषांक शे-सव्वाशेपेक्षा जास्त आयुर्वेद विशेषांक प्रसिद्ध झाले. अशा हिंदी भाषेतील ग्रंथांची दखल घ्यावयास हवी. दक्षिणेकडे कोट्टेकेल व अन्य ठिकाणी चिकित्सा ग्रंथ, वनस्पतीविषयक ग्रंथ मुसा व अन्य प्रकाशकांनी प्रसिद्ध केलेले संग्रही हवेतच. उज्जन येथील वनस्पती चंद्रोदय, श्री गोपाळकृष्ण औषधालय कालेडा, गुजराथ येथील प्रकाशनेही बहुमोल वाचनीय व संग्राह्य आहेत.
महाराष्ट्रात आयुर्वेद महाविद्यालये पन्नासचे आसपास आहेत. यांना दरवर्षी आयुर्वेद ग्रंथ विकत घेणे अनिवार्य असते. एककाळ या महाविद्यालयात ग्रंथसंपदा फक्त प्राचीन गं्रथांची असे. आता विषयांची, पोटविषयांची विविधता वाढली आहे. गेले काही वर्षे आयुर्वेद पदवीधर, आयुर्वेदीय शिक्षणसंस्था, आयुर्वेद अध्यापक, आपला शैक्षणिक दर्जा; हा एमबीबीएस शिक्षणक्रम घेणाऱ्या विद्यार्थी व त्या संस्थांच्या दर्जाच्या तोडीस तोड असणाऱ्या प्रामाणिक प्रयत्न करीत आहेत. पूर्वीचे आयुर्वेदीय ग्रंथ हे संहितास्वरूप, एका व्यक्तीच्या अनुभवाला धरून पण खूपच व्यापक असतं. आताच्या ग्रंथाचे स्वरूप आयुर्वेद अभ्यासक्रमाला धरून विषयवार वा पोटविषयवार असते. उदाहरणार्थ- रसशास्त्र, वनस्पतीशास्त्र, भस्मे, काढे, आसवारिष्टे, वाटिका गुटिका, चूर्णे, धृत, मलम इ.इ. वेगवेगळी पुस्तके असतात. आयुर्वेद तत्त्वज्ञान, इतिहास, दोषधातूमल विज्ञान, विकृती विज्ञान, रोगनिदान, निदान पंचक, रोगवार चिकित्सा, पंचकर्म, स्वस्थवृत्त, बालरोग, स्त्रीरोग अशा पोट विषयांवर; महाराष्ट्रातील लहानमोठय़ा शहरांतील प्रथितयश वैद्य मंडळींनी खूपच पुस्तके लिहिलेली आढळतात. कौमारभृत्य, शल्यशालाक्य, विकृती विज्ञान या विषयांवरचे कोणते ग्रंथ विद्यार्थी मंडळींना घ्यायला सांगावे, असा प्रश्न स्थानिक अध्यापकांना पडतो.
आयुर्वेद महाविद्यालयातील संख्या दिवसेंदिवस वाढती आहे. या महाविद्यालयात सर्वच विद्यार्थ्यांनी पुस्तके वाचावी असा आग्रह धरला तर बऱ्याच वेळा इष्टापत्ती येते. पुस्तके मोठय़ा प्रमाणावर असावी लागतात. त्यामुळे ग्रंथांची निवड काळजीपूर्वक करावी लागते. या व्यतिरिक्त वैद्य रमेश नानल, वैद्य विलास नानल, गुरुवर्य वैद्य शि. गो. जोशी, य. गो. जोशी, वैद्यराज वा. ब. गोगटे, वैद्या दुर्गाताई परांजपे, वैद्यराज प. ग. आठवले अशा नामांकित व्यक्तींचे अभ्यासक्रम सोडूनही बरेच ग्रंथ असतात. मी स्वत: छोटय़ामोठय़ा अनेक पुस्तिका लिहिल्या आहेत. असे सर्व ग्रंथ महाविद्यालयांच्या गं्रथालयात ठेवणे अशक्य असते. तरीपण सखोल वाचन ज्या अभ्यासू विद्यार्थ्यांना करायचे आहे त्यांच्याकरिता तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमाकरिता नुसतीच क्रमिक भाषेतील पुस्तके असून चालणार नाही. संदर्भग्रंथांचा भरपूर साठा असला तरच पदव्युत्तर विद्यार्थ्यांना नीरक्षीरविवेकाच्या न्यायाने निवड करता येईल.
दिवसेंदिवस माहितीच्या ज्ञानाचे जाळे प्रचंड प्रमाणावर विस्तारत आहे. इंटरनेटवर सर्व माहिती घरबसल्या थोडय़ा पैशांत व श्रमाशिवाय मिळते असे काहींना वाटते. तरीपण आयुर्वेदाच्या प्राचीन गं्रथभांडाराचे सर्वच्या सर्व ज्ञान इंटरनेटवर तसेच्या तसे मिळेल का याबद्दल मी साशंक आहे. उदाहरणार्थ- जगभर जरामांसी, ब्राह्मी, वेखंड, शंखपुष्पी या वनस्पतींवर मानसरोगांकरिता संशोधन चालू आहे; शुक्रवर्धन, रसायन, वाजीकर म्हणून आस्कंध, भुई कोहळा, कवचबी, अमरकंद, तालिमखाना, चिकना अशा विविध वनस्पतींवर कार्य चालू आहे; काविळीच्या बी वायरसवर कोरफड, भुई आवळी, शरपुंखा- उन्हाळीवर संशोधन सुरू आहे. एडस्- एचआयव्ही व्हायरसवर आस्कंध, गुळवेल, चंदन, काकडीचे बी, कोरफड, कडुनिंब पाने इ.इ. वनस्पतींवर संशोधन कार्य चालू आहे. असे विविध विषय पोटविषयांवरचे संशोधन कार्य पदव्युत्तर विद्यार्थी व अध्यापक यांना मिळणे ही काळाची गरज आहे. भारतात विविध संशोधन संस्था अनेक विषयांवर संशोधन कार्य करीत आहेत. त्यांची विविध प्रकाशने आहेत. ती प्रकाशने जर सर्वच संस्थांना आपले विद्यार्थी व अध्यापक यांना पुरवता आली तर त्यांना आपले भावी शैक्षणिक कार्यात भरपूर प्रगती करता येईल.
आज जग लहान झाले आहे. जगातील स्वास्थ्यसमस्या बिकट होत आहेत. नवनवीन रोग जन्माला येत आहेत. जगातील रोगपीडित जनता आयुर्वेदाकडे आपल्या रोगसमस्यांचा ‘हल’ व्हावा म्हणून मोठय़ा अपेक्षेने पहात आहे. उद्याचे वैद्यकीय जग हे आयुर्वेदाचे निश्चित आहे. त्याकरिता कधी नव्हे ते आयुर्वेद ग्रंथालये समृद्ध, सखोल ज्ञान देणाऱ्या ग्रंथ व अन्य माहितीची साधने – कॅसेट, टेप यांनी परिपूर्ण असे हवे. थोर तत्त्ववेत्ता सॉक्रेटिस यांनी सांगितल्याप्रमाणे कोणतेच ज्ञान परिपूर्ण नाही. तसेच ज्ञान हे पवित्र आहे. ते आपल्या वाचकांना- विद्यार्थी, अध्यापक, सामान्य वाचक यांना देणे ही आदर्श आयुर्वेद ग्रंथालयाची मोठी गरज आहे
हे दै. लोकसत्तातील वैद्य प. य. खडीवाले यांच्या विविध लेखांचे संकलन आहे ...
दोघांनाही मनापासून धन्यवाद !...

chaan mahiti. mulanchya totrepanavar upay sanga please.
उत्तर द्याहटवाखुप उपयुक्त माहीती याची आज सर्वांना खुप गरज आहे.
उत्तर द्याहटवासंजय वारडे
उत्तर द्याहटवाधन्य ते प य खडीवाले वैद्य.... आयुर्वेदावरील त्यांची निष्ठा, प्रेम काय वर्णाने! त्यांची चिकित्सा पद्धती व रामबाण औषधे सर्व लिंग, प्रांत व प्रकृतीच्या रुग्णांसाठी सदैव लाभकारी
उत्तर द्याहटवाआहेत. ईश्वर त्यांना उदंड दीर्घायुरोग्य देवो ही प्रार्थना.