नागपूर: मनीष, सागरची ‘खिचडी’ जमली रे जमली! ‘खिचडीवाला’ ला देशभर मागणी

  •  आणि सागर. 
  • दररोज तेचतेच खाऊन कंटाळा आला, फारशी भूक नसली तर प्रत्येकाच्या घरी हमखास बनणारा पदार्थ म्हणजे ‘खिचडी’. खिचडी प्रत्येकाच्या घरी शिजते आणि ती चवीनं खाल्लीही जाते, पण लग्नसमारंभ किंवा इतर कोणत्याही समारंभात खिचडीला मानाचं स्थान मिळालेलं नाहीय. यावरच मनीष आणि सागर नावाच्या दोन तरुणांनी जबरदस्त शक्कल लढवलीय. तब्बल १७ प्रकारात खिचडी बनवून त्यांनी सर्वांच्या तोंडचे पाणी पळवलेय.

मनीष खानचंदानी आणि सागर भजनी नावाच्या तरुणांनी खिचडीचाच उद्योग सुरू केला आणि नागपूर शहरात ते आज ‘खिचडीवाला’ नावानं प्रसिद्ध असं रेस्टॉरंट चालवतात. महाराष्ट्रातूनच नाही तर संपूर्ण देशातून त्यांना ‘खिचडीवाला’च्या फ्रेंचाईजीची मागणी होतेय.

अशी सुचली आयडियाची कल्पना

मनीष हा एमबीएचा विद्यार्थी तर सागर इंजिनिअरिंगचा. काहीतरी वेगळं करायचं म्हणून त्यांनी ‘एक्स्पेरिअल लर्निंग’ ची कार्यशाळा केली. या कार्यशाळेत त्यांना वेगवेगळ्या आयडिया सुचवायच्या होत्या. तिथंच त्यांना खिचडीची कल्पना सुचली आणि खिचडीवालाचा जन्म झाला.

सुरूवात

सुरूवातीला प्रयोग म्हणून त्यांनी धरमपेठच्या ट्रॅफिक पार्कला खिचडीचा स्टॉल लावला. त्यात त्यांनी सात प्रकारची खिचडी बनवली. ट्रॅफिक पार्कला चाट आणि इतर पदार्थ खायला येणाऱ्यांची पाऊलं खिचडीकडे वळू लागली आणि खवय्यांना खिचडी आवडायला लागली.

मागणी आणि खप

जसजशी खिचडीची मागणी वाढत गेली तसे त्यात अनेक प्रयोग मनीष आणि सागरनं केलेत. त्यातील काही प्रयोग हिट झाले तर काही फ्लॉप. या प्रयोगांपैकी १७ प्रकारच्या खिचडीचे फ्लेवर त्यांनी निवडले. नागरिकांना हेल्दी फूड द्यायचा निश्चय करून गायत्रीनगर इथं ‘खिचडीवाला’ नावानं पहिलं रेस्टॉरंट त्यांनी सुरू केलं. त्यात घरपोच सेवाही ते देऊ लागले. काही दिवसांमध्येच मनीष आणि सागरला लोकं खिचडीवाला म्हणून ओळखू लागले. आता त्यांची खिचडी खाण्यासाठी लोक रांगा लागतात. फोनवरून आधीच खिचडी बूक करून ठेवावी लागते. त्यांच्याकडे आता ८ ते १० जण कामाला आहेत. गरजवतांना त्यांनी रोजगारही मिळवून दिलाय.

गायत्रीनगरच्या रेस्टॉरंटनंतर वर्षभरातच धरमपेठ इथं त्यांनी दुसरं रेस्टॉरंट सुरू केलं. दोन वर्षाच्या चिमुकल्यापासून तर ८० वर्षांच्या वृद्धापर्यंत सगळेच इथे दालखिचडी चवीनं खातात.

मनीष आणि सागर हे दोघंही आता आपल्या खिचडीची चव कायम राहावी, तिची क्वॉलिटी बिघडू नये याची काळजी घेतात. खिचडीवाला इथं लसूण खिचडी, कर्ड राईस, मसाला खिचडी, टोमोटिना खिचडी असे प्रकार आपल्याला पाहायला मिळतील. यापैकी लसूण फ्राय खिचडीची सर्वाधिक मागणी असल्याचं मनीषनं सांगितलं.

मनीष आणि सागरकडे आता खिचडीची फ्रेंचाईजी देण्यासाठी पुण्यासह मुंबई, बडोदा, इंदूर, बंगळुरू, आंध्रप्रदेशातून अनेकांनी संपर्क साधला. आम्ही फ्रेंचाईजीबाबत विचार करत असल्याचं मनीष आणि सागर यांनी सांगितलं.