बुधवार, ३० डिसेंबर, २०१५

अपेक्षांचे न संपणारे शेपूट

 - निमीत्त -
 एक दुकानदार रात्री दुकान बंदच करत असतो, तेवढ्यात तोंडात पाकीट धरलेला एक कुत्रा येतो. पाकिटात सामानाची यादी आणि पैसे असतात. कुत्र्याच्या पाठीवर लावलेल्या पिशवीत दुकानदार त्या वस्तू भरतो आणि 'एवढा हुशार कुत्रा कुणाचा'? या कुतुहलाने त्याच्या मागेमागे जातो. कुत्रा बस स्टॉपवर जाऊन थांबतो. हवी ती बस आल्यावर शिस्तीत बसमध्ये चढतो. त्याच्या पट्ट्यात स्टॉपच्या नावाची चिट्ठी आणि पैसे असतात. आश्चर्यचकित कंडक्टर त्याला तिकीट देतो. स्टॉप आल्यावर कुत्रा शेपूट हलवून कंडक्टरला खुणावतो, बस थांबल्यानंतर उतरतो. दुकानदारही त्याच्या मागोमाग उतरतो. कुत्रा एका बंगल्याच्या दारावर पायांनी टकटक करतो. दोन-तीनदा वाजवल्यावर दार खाडकन उघडलं जातं आणि बाहेर आलेला मालक कुत्र्याला सटकन एक फटका ठेवून देतो. कुत्रा बिचारा कुंऽकुंऽ करत शेपूट घालतो. न राहवून दुकानदार मालकाला विचारतोच. मालक संतापानं सांगतो, गधड्यानं मला उठायला लावलंच. दाराची किल्ली विसरला. अपेक्षांचं असं असतं. त्यांना अंतच नसतो. कितीही केलं तरी 'वरिष्ठ' चिडचिडलेला राहतो आणि प्रशंसेची अपेक्षा असताना टीका झाल्याने काम करणाऱ्या कनिष्ठाचा वारंवार विरस होतो. कुठल्याही जवळचा आणि रोजचा संबंध असलेल्या व्यक्ती, उदा. बॉस-सहकारी, पती-पत्नी, सासू-सून, मित्र- मैत्रिणी यांच्या आनंदामध्ये अपेक्षा हा 'पर्मनन्ट बॅरिअर'असतो. त्यातही अपेक्षांच्या दुष्टचक्राची सुरवात करणारं नातं म्हणजे पालक- मुलांचं, खूप लहानपणापासूनचं. एका ग्रुप पिकनिकमध्ये धमाल चालू असताना शलाकाताईं मात्र नाराज असतात. त्यांच्या कुठल्याच अपेक्षा पूर्ण होत नसतात. हॉटेलची खोली लहान, खिडकी पश्चिमेला नसते, जेवण घरच्यासारखं नसतं, वेळापत्रक चुकत असतं. नवरा त्यांना एकदा हाक मारून कधीचा मित्रांमध्ये मिसळलेला असतो. त्यात भर म्हणून आपली पाच वर्षांची कन्या बरबटलेल्या तोंडानं तल्लीनपणे बोटं बुडवून चॉकलेट-केक खाताना पाहून त्यांचं डोकं इतकं सटकतं की त्या जोराने किंचाळतातच. छोटी भेदरून जाते; पण आपल्या मुलीनं चारचौघांत एवढं वेड्यासारखं गचाळ वागणं त्यांच्या अपेक्षेच्या पलीकडचं असतं (आणि तिच्यावर राग काढणं शक्यही असतं.). शहाण्यासारखं वागायचं, मोठ्यांनी सांगितलेलं लगेच ऐकायचं येथपासून एवढे मार्क पडलेच पाहिजेत, स्पर्धा जिंकलीच पाहिजेपर्यंत पालकांच्या मुलांकडून असंख्य अपेक्षा असतात. चौथीतल्या रीनाची आई सांगते, अर्ध्या तासात तिचा अभ्यास संपतो. समजलेलं असतं, मार्कही चांगले पडतात. पण इतक्या कमी अभ्यासावर एवढे पडतात तर रोज तीन तास करायला काय हरकत आहे? दुसरीतल्या रोहनला ड्रॉइंगचा क्लास लावल्याच्या तिसऱ्या दिवशी वडील सांगतात, क्लास लावलाय खरा, पण तिथे काढतो तेवढंच. घरी काही करत नाही, सातत्य म्हणून नाही. अपेक्षांचा बॅरिअरमध्ये आला की असं घडतं. किती वयाच्या मुलांकडून आपण अवास्तव अपेक्षा करतोय का? लहान मुलांचं आपल्याच नादात असणं नैसर्गिकच नाही का? याचं तारतम्य सुटून जातं. मुलांच्या जागी जाता येत नाही. परिणाम काय होतात? आज स्वत:हून आवडीनं अर्धा तास अभ्यास करणाऱ्या रीनाला पुढे कदाचित पुस्तकाचीच ऍलर्जी येते. तर रोहनला 'सातत्या'चा अर्थ कळत नसतो तेव्हापासून 'आपल्यात सातत्य नाही' याचा कॉम्प्लेक्स येतो. त्या वयात पालक आदर्श असल्याने दुसऱ्याकडून अनेक अपेक्षा करायच्या आणि त्या पूर्ण झाल्या नाहीत की टीका करायची असते, असाही संदेश (संस्कार) नकळतपणे घेतला जातो. आपल्या मुलाला काय हवंय? आवडतंय? जमतंय? याचा विचार न करता मुलांवर अपेक्षा, स्वप्नं लादली जातात किंवा दुसऱ्यांची मुलं अमुक करतात, यावर पालकांच्या अपेक्षा ठरतात तेव्हा गोंधळलेपण, न्यूनगंड आणि अपयशाशिवाय काही हातात पडत नाही. माझ्यात काहीतरी कमी आहे, अशी लहानपणी रुजलेली भावना आयुष्यभर वेगवेगळ्या रूपांत बहुतेकांना छळत राहते. आइनस्टाईन म्हणतो, 'मासा झाडावर कसा चढतो, यावरून त्याच्या हुशारीची परीक्षा होणार असेल, तर आयुष्यभर तो स्वत:ला मूर्ख समजूनच जगणार.' अशा विधानांना आपण दादही देतो; पण स्वत:च्या साचेबद्ध, अवाजवी अपेक्षा तपासल्या पाहिजेत असा बोध मात्र त्यातून घेत नाही. ही परिस्थिती बदलायची असेल तर काय करायला हवं? कुठल्याही अपेक्षांच्या- बॅरिअरशिवाय, मोकळ्या मनानं, आपल्या मुलांचं आधी निरीक्षण करायला हवं. विविध विषयांतली मजा कळण्यापर्यंत सोबत द्यायला हवी. वेगवेगळे अनुभव (एक्सपोजर) देऊन त्यांची आवड शोधायला मदत करायला हवी. मजा समजणं ही 'शिकायला' शिकण्याची 'किल्ली' असते. ती सापडल्यावर पुढे टप्प्याटप्प्याने जसं कौशल्य वाढतं, तसाच आत्मविश्वासही वाढतो. आपालक, शिक्षक किंवा सुजाण व्यक्ती म्हणून आपण नेमकं काय करायचं? नेहरूंच्या मुलांवरच्या प्रेमाच्या गोष्टी (मुलांनाच?) सांगायच्या? की नेहरूंसारखं निखळ प्रेम करायचं? व्हॉट्सऍपवर मुलांबाबतच्या सुविचारांचे मेसेजेस फॉरवर्ड करायचे? की आपल्या साकळलेल्या अपेक्षांचे बॅरिअर ओलांडून मुलांपर्यंत पोचण्यासाठी फॉरवर्ड व्हायचं? निर्णय आपणच घ्यायचा आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल