बुधवार, ३० डिसेंबर, २०१५

फेब्रुवारी 2006 मधली घटना आहे ही; सहा वर्षांपूर्वीची. घटना खूपच बोलकी, प्रेरणादायी आहे. त्यावेळी भारताचा संघ – क्रिकेटचा – पाकिस्तानच्या दौर्याधवर होता. या दौर्याीत भारत पाच एकदिवसीय सामने खेळणार होता; त्यातला तिसरा सामना चालू होता. पाकिस्तानने प्रथम फलंजाजी करत धावांचा डोंगर उभा केला होता; पण भारतानेही मोठय़ा दणक्यात सुरुवात करून या डोंगराएवढय़ा धावांचा पाठलाग सुरू केला होता. त्यात सिंहाचा वाटा उचलला होता सचिनने. त्या दिवशी त्यानं अक्षरशः पाकिस्तानी गोलंदाजांची पिसं काढली होती. शोएब अख्तर नावाच्या रावळपिंडी एक्सप्रेसच्या तर त्यानं चिंधडय़ा उडवल्या होत्या. खरोखरीच त्यादिवशी सचिनची बॅटिंग पाहणं हा एक नेत्रोत्सव होता. बघता बघता तो शतकाच्या उंबरठय़ावर पोहोचला होता; पण… पण दुर्दैवानं तो 95 धावांवर बाद झाला! त्याचं शतक हुकलं होतं खरं, पण विजयासाठी एक भक्कम लाँचिंग पॅड त्यानं उभं केलं होतं, आणि त्या समाधानातच तंबूत परतल्यावर त्यानं पॅडस् उतरवून थेट स्नानगृह गाठलं होतं. तिकडं मैदानावर सामना रंगला होता आणि इकडं सचिन शॉवरखाली उभा होता. अचानक त्याला प्रचंड आरडाओरडा आणि टाळ्यांचा प्रचंड कडकडाट ऐकू आला. त्यानं आतूनच ओरडून विचारलं; “काय झालं?” बाहेर हरभजनसिंगला हे ऐकू गेलं. त्यानंही तिथूनच ओरडून सांगितलं; “अपने माहीने चौका लगाया है यार!” “माही” म्हणजे महेंद्रसिंग धोनी. सचिन खूश. मध्ये काही सेकंद गेले. पुन्हा बाहेर गलबला. पुन्हा सचिनची विचारणा; “क्या हुआ?” आता हरभजन कॉमेंट्रेटर झाला होता. तो ओरडला; “एक और चौका.” मग मात्र सचिननं ठरवलं; “आता इथून हलायचं नाही. शॉवर बंद करायचा नाही. शॉवरखालीच उभं राहायचं!” मग काय, बाहेर मैदानावर मॅच सुरू, धोनी आणि युवराज पाकिस्तानी बोलर्सवर तुटून पडलेले, प्रेक्षकांनी मैदान डोक्यावर घेतलेले आणि तिकडे आतमध्ये सचिनने शॉवर डोक्यावर घेतलेला. किती वेळ? 15 मिनिटे? अर्धा तास? छे! मॅच जिंकेपर्यंत, तब्बल 45 मिनिटे सचिन शॉवरखाली उभा होता! याला कुणी अंधश्रद्धाही म्हणतील! पण मला तरी यात एकच गोष्ट दिसतीये, आणि ती म्हणजे सचिनचं अफाट क्रिकेट प्रेम! त्याचं टीम स्पिरीट. त्याचं देश प्रेम! अवघ्या 5 धावांनी शतक हुकलं म्हणून रडत न बसता संघ जिंकावा म्हणून 45 मिनिटं शॉवरखाली उभे राहणारा, संवेदनशील, भावुक मनाचा सचिन.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल