मंगळवार, २३ फेब्रुवारी, २०२१

‘श्री’मंत सरस्वती पूजक...

 ‘श्री’मंत सरस्वती पूजक



‘श्री’मंत सरस्वती पूजक
कराग्रे वसते लक्ष्मी | करमध्ये सरस्वती ||...
वर्षानुवर्ष हा श्लोक आपण ऐकतोय, म्हणतोय; पण आज त्याचा एक नवीन अर्थ समोर आला. लक्ष्मी ही हातांच्या बोटांवर (कराग्रे) आहे आणि सरस्वती हाताच्या मध्यभागी (करमध्ये) आहे. लक्ष्मी चंचल आहे, बोटांच्या टोकांवर असल्याने स्थिर नाही, पण सरस्वती हाताच्या मध्ये असल्याने स्थिर आहे. आपल काम चोख करा, पैसा आपोआप मागे येणारच, हे वर्षानुवर्षे सांगितलं गेलंय आणि ते तसेच आहे. पण या सोबत असाही एक समज आपल्याकडे पसरवलेला आहे कि सरस्वती पूजक असेल तर लक्ष्मीच्या मागे लागू नये. पण जर...

पण जर तुम्ही हाताची ओंजळ केली, तर लक्ष्मी सरस्वतीच्या दिशेने स्वत:हून येईल... आणि सरस्वतीचा भक्कम आधार असल्याने तिला स्थैर्य सुद्धा असेल.

जेव्हा तुम्ही एखाद्या श्रीमंत (लक्ष्मी – सरस्वती दोन्ही बाबतीत श्रीमंत) कलाकारांना भेटता तेव्हा ह्या सर्वाची तुम्हाला जाणीव होते. “कलेला जिवंत ठेवायचं असेल, तर कलाकाराला उद्योजक व्हावच लागेल” इतक्या सोप्या शब्दांत एक उद्योजक कलाकार आपले विचार मांडतो. ते कलाकार म्हणजेच ‘आधुनिक युगातील विश्वकर्मा’ प्रख्यात कला दिग्दर्शक ‘श्री नितीन चंद्रकांत देसाई”.
लक्ष्यवेध च्या ३५व्या लक्षसिद्धी सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून आलेल्या श्री नितीनजींना भेटायचा आणि ऐकायचा योग आला.
३३ वर्षांचा अनुभव ‘बोलतो’ म्हणजे काय हे सगळ्यांनीच अनुभवल. पण काही गोष्टी त्यांनी इतक्या सोप्या करून सांगितल्या कि ‘क्या बात’ अशी सहज प्रतिक्रिया होती.

तुम्ही जे निर्माण करताय त्याने लोकांना ‘कन्विन्स’ करू शकलात तर लोक स्वत:हून तुमच्याकडे येणारच.
कलाकार / उद्योजक (उद्योजक सुद्धा तसा ‘कलाकारच’ असतो म्हणा) कन्विन्स करायला कमी पडतो आणि मग नकळतपणे कामातल ‘प्रिसिजन’ (डिटेलिंग) हरवून बसतो. “Given Time, Given Budget and Given Circumstances.. do best what you can”. असलेल्या वेळेत, असलेल्या पैशांत आणि असलेल्या परिस्थितीत , तुम्ही तुमच्यातल ‘बेस्ट’ द्या आणि मग परिणामांची चिंता सोडून द्या.

१३ दिवस १३ रात्री घरी न जाणं, ३८७ दिवस सलग काम करण (त्यासाठी लग्नापासून – बारशापर्यंत सगळे महत्वाचे ‘मराठी’ सोहळे बुडवणे), एक परदेशी दिग्दर्शक ‘सोयी सुविधा नाहीत’ म्हणून परत गेल्यावर, ‘हा माझ्या देशाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे’ अस मनात घेऊन जागतिक दर्जाचा स्टुडीओ उभारण आणि अनेक दिग्गज परदेशी निर्मात्यांना भारताकडे पुन्हा घेऊन येणे; आणि या प्रवासात येणाऱ्या असंख्य अडचणींवर मात करून आपल्या ध्येयाप्रती वाटचाल करत राहणं ... हा अखंडित प्रवास सुरूच आहे.

१९९ पेक्षा अधिक चित्रपट, काही’शे’ सोहळे आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय असे ५०० हुन अधिक पूरस्कार प्राप्त केल्यावर सुद्धा आजही नवीन चित्रपटाची पटकथा हातात आल्यावर स्वत: (मांडी ठोकून म्हणतात तस ) बसून पहिलं ‘स्केच’ हाताने बनवण हे खऱ्या ‘सरस्वती’ पूजकाच लक्षण आहे.
काम, आई आणि परमेश्वरावर नितांत श्रद्धा आणि सहकाऱ्यांवर असलेला अखंड ‘विश्वास’ असणाऱ्या उद्योजक कलाकाराला ऐकायचा अनुभव शब्दातीत होता.

आधुनिक युगातील विश्वकर्मा या बिरुदाने यथोचित गौरवलेल्या या व्यक्तीचे अनेक पैलू आज ऐकायला आणि पहायला मिळाले. आणि मला तरी त्या मुलाखतीत लक्ष्याचा (आणि लक्ष्मीचा सुद्धा) वेध घेणारा सरस्वती पूजक अखंड दिसत होता.
या अनुभवासाठी अतुल राजोळी सर आणि ‘लक्ष्यवेध’ चे मनापासून धन्यवाद.

आपला नम्र
तेजस विनायक पाध्ये.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल