स्वप्नांना पंख भरारीचे....!
स्वप्नांना पंख भरारीचे....!
" विमान टाटा, येताना खाऊ आण...असं म्हणूनआकाशात उडणाऱ्या विमानाला अच्छा करणे हा आपल्या सगळ्यांचा लहानपणीचा आवडता खेळ. आपल्या सगळ्यांप्रमाणेच विमानाचे आकर्षण असल्याने श्री. अमोल यादव यांनी लहानपणी वैमानिक बनण्याचे स्वप्न पहिले, आणि ते नुसते पूर्णच केले नाही तर महाराष्ट्रातील सर्व शहरे हवाई मार्गाने जोडली जावी हे ध्येय बाळगुन Thrust Aircraft Private Limited च्या माध्यमातून पहिले भारतीय निर्मित सहा आसनी विमान निर्माण केले. कॅप्टन अमोल यादव हे मागील १७ वर्षांपासून मुख्य वैमानिक म्हणून Jet Airways मध्ये कार्यरत आहेत. वयाच्या १९ व्या वर्षी श्री.अमोल यादव यांनी अमेरिकेत वैमानिक प्रशिक्षणास सुरवात केली. प्रशिक्षणाच्या सहा महिन्यांतच मित्रांच्या मदतीने त्यांनी स्वतःचे एक जुने विमान खरेदी केले. वैमानिक बनण्याचे अतिशय खडतर असे प्रशिक्षण पूर्ण केल्यावर ते भारतात परतले. या अनुभवाने आपण स्वतः विमान निर्माण करू शकतो हा आत्मविश्वास त्यांना वाटू लागला होता.
विमान निर्मितीच्या प्रवासात वडील श्री. शिवाजी यादव यांनी त्यांना दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन केले. आधीच्या काळात त्यांच्या वडिलांनी त्यांना विमान निर्मिती ही गोष्ट कठीण आहे हे सांगितले, वडिलांचा विश्वास संपादन करण्यासाठी आधी थर्मोकॉल चे व नंतर त्यांनी लाकडाचे विमान तयार करून दाखवले. तरीही वडिलांचे समाधान न झाल्यामुळे अल्युमिनियम चे छोटेखानी विमान बनवून त्याचे यशस्वी उड्डाण करून दाखवले. जेव्हा त्यांनी प्रत्यक्ष विमान निर्मिती ला सुरुवात केली, तेंव्हा विमानाच्या इंजिन खरेदीसाठी त्यांच्या आईने आपले मंगळसूत्र गहाण ठेवून त्यांना पैसे दिले. आई व इतर कुटुंबीयांनीदेखील त्यांच्यावर विश्वास दाखवून मोलाची साथ दिली.
१९९८ मध्ये त्यांनी आपले पहिले विमान निर्माण केले, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे तो प्रयत्न पूर्ण नाही झाला. त्यानंतर त्यांनी पुन्हा १९९९मध्ये दुसरे मॉडेल निर्माण करण्यास सुरवात केली, २००३ मध्ये त्यांनी २ विमाने निर्माण केली,पण याही वेळी शासकीय नियमांमुळे या विमानांचे उड्डाण होऊ शकले नाही. विमान उभारणी साठी लागणारी जागा उपलब्ध नसल्याने राहत्या इमारतीच्या गच्चीवरच त्यांनी विमानाची निर्मिती केली. पण या अडचणींमुळे खचून न जाता त्यांनी २०१०साली पुन्हा एकदा TAC 003 या ०६ आसनी विमानाच्या निर्मितीस सुरुवात केली. Jet Airways मधील १० वर्षे नोकरीची कमाई ची त्यांनी या आपल्या स्वप्नामध्ये गुंतवणूक केली. अखेर २०१६ मध्ये TAC 003 विमान पूर्णत्वास आले. या कामात त्यांना Jet Airways मधील कामाचा अनुभव यंत्र सामग्री खरेदी व सुरक्षा तसेच इतर नियमांची पूर्तता करण्यासाठी झाला. अनेक अडचणींचा सामना करत, कुटुंबीय व मित्रपरिवाराच्या सहकार्याने २०१६ च्या भारत सरकारच्या Make In India प्रदर्शनात भारतात निर्माण झालेले पहिले वहिले विमान दाखल झाले. प्रदर्शनातील सहभागाने भारत सरकार,प्रसार माध्यमे व सामान्य जनतेने श्री. अमोल यादव यांचे स्वप्न उचलून धरले. नुकतीच त्यांच्या या विमानास सरकारकडून नोंदणीसाठी मान्यता प्राप्त झाली आहे.
तसेच महाराष्ट्र शासनाकडून विमान निर्मितीसाठी विशेष सहाय्य म्हणून पालघर येथे १५७ एकर जमीन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महारष्ट्रातील सर्व शहरे हवाई मार्गाने जोडण्याचे श्री. अमोल यादव यांचे ध्येय आहे, तसेच हा प्रवास अतिशय कमी वाहतूक खर्चात म्हणजे प्रत्येकी २०००/- रुपयांमध्ये उपलब्ध करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. " स्वप्न पहा आणि ती पूर्ण करण्यासाठी झटा " हेच आपण श्री अमोल यादव यांच्याकडून शिकतो.
- लक्ष्यवेधी ऋषिकेश आमराळे
Thanks - Atul Rajoli Sir
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा