ऊर्मिला राजोपाध्ये

आरंभापासूनच अमिताभ बच्चन हे एक सच्चे कलावंत राहिले. त्यांच्यातली व्यावसायिकता फार कमी लोकांनी जाणली. म्हणूनच ते प्रत्येक माध्यमाचा सर्वेसर्वा बनल्यानंतर आश्चर्य व्यक्त केलं गेलं. मृत्यूच्या दाढेतून बाहेर पडलेला सुपरस्टार, अयशस्वी राजकारणी आणि दिवाळखोर व्यावसायिक या तीनही दु:खद विशेषणांना अमिताभ यांनी अत्यंत झपाटय़ाने सोडचिठ्ठी दिली. फाळके पुरस्काराच्या निमित्ताने घेतलेला या महानायकाच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध.

‘सदी का महानायक’ अशी सार्थ ओळख असणा-या अमिताभ बच्चन नामक महानायकाला मिळालेला दादासाहेब फाळके पुरस्कार हा या ख्यातकीर्त आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्त्वाचा उचित सन्मान आहे, असं म्हणावं लागेल. मायानगरीत येणा-या असंख्य चेह-यांमधला एक, या ओळखीपासून जगातल्या प्रभावी अभिनेत्यांमधला एक, इथपर्यंतच्या त्यांच्या वैभवशाली प्रवासावर उमटलेली समाजप्रियतेची ही सर्वोच्च मोहोर आहे. ‘बिग बी’ अथवा ‘शहेनशहा’ या टोपणनावामध्ये त्यांनी गाठलेल्या उंचीचं प्रतििबब दिसत असताना, हा महान कलाकार या सर्वोच्च सन्मानास सर्वार्थाने पात्र आहे, याबाबत दुमत असण्याचं कारण नाही. आज या वयातही कार्यरत असणा-या आणि रुपेरी पडद्याबरोबरच छोटय़ा पडद्याच्या माध्यमातून जनमानसावर गारूड घालणा-या अमिताभ बच्चन यांची कारकीर्द म्हणजे, यशापयशाची दोलायमान आंदोलनं राहिली आहेत. त्यामुळे सहजतेने मिळालेलं नव्हे, तर संघर्षातून त्यांनी मिळवलेलं हे यश उल्लेखनीय ठरतं. इतकी र्वष कार्यरत असूनही, त्यांचा करिश्मा कायम आहे. आजच्या तरुण अभिनेत्यांनाही त्यांच्याशी स्पर्धा करावीशी वाटते. बदलत्या तंत्रज्ञानाला ते नेमकेपणाने सामोरं जातात. ही क्षमता आणि मोहिनी फार कमी लोकांच्या ठायी पाहायला मिळते. म्हणूनच या मोहिनीचा उगम नेमका कुठे आहे, हे जाणून घ्यायला हवं.

अमिताभ बच्चन यांच्याबाबत एक किस्सा प्रसिद्ध झाला होता. त्यामध्ये ते घरात बारीक-सारीक गोष्टींवरून चिडचिड करतात, असं म्हटलं होतं. वस्तुस्थिती या किश्श्याला साजेशीच असावी. कारण, तेव्हा त्यांचा घसरणीचा काळ सुरू झाला होता. एके काळचा हा ‘अँग्री यंग मॅन’ संपला, असंच सर्वाना वाटू लागलं होतं. त्यातच ‘एबीसीएल’ ही त्यांची कंपनी डबघाईला आली होती. अमिताभ बच्चन दिवाळखोर होईपर्यंत मजल गेली होती. मात्र, ‘कौन बनेगा करोडपती’ला प्रारंभ झाला आणि चित्र पालटायला सुरुवात झाली. आज मनोरंजन विश्वावरील त्यांचं अधिराज्य प्रकर्षाने जाणवतं. आजही त्यांच्यासाठी भूमिका लिहिल्या जातात. दिग्दर्शकांची नवी पिढी त्यांच्यातल्या चैतन्याचा शोध घेते. अभिनयापासून जाहिरातीपर्यंत अमिताभ नावाचं गारूड आजही मोहिनी घालत आहे.

अमिताभ यांचे पिता हरिवंशराय बच्चन यांना प्रचंड प्रतिष्ठा होती, तर मातोश्री तेजी बच्चन या नावाभोवती सभ्यता आणि शिष्टाचाराचं वलय होतं. त्यामुळे या दाम्पत्याचा ताडमाड मुलगा चित्रसृष्टीत आला तेव्हा तो ‘अमिताभ’ बच्चन नव्हता, तर अमिताभ ‘बच्चन’ होता. सुरुवातीला अनेकांना याचं काही खरं नाही, असंच वाटत होतं. पण, या माणसानं स्वकष्टावर बॉलिवूडला आपल्यापुढे झुकायला लावलं. ‘अमिताभ’ या नावाचा दरारा वाढत गेला आणि त्यानं बॉलिवूडवरची पकड दिवसेंदिवस घट्ट केली. यशापयशांचे अनेक चढ-उतार सहन करत हे नाव पाय रोवून उभं राहिलं. ज्या आवाजाने उभ्या देशाला संमोहित केलं, तो आरंभी ‘बीबीसी’नं नाकारला होता. पण, अमिताभने जिद्द सोडली नाही. त्यांनी पाहता पाहता श्रेष्ठ अभिनेता ही बिरुदावली मिळवली. त्यांच्या अभिनयाची उंची जोखताना अनेकांकडून आक्षेप घेतला जाई. अमिताभ ही काळाची गरज होती, असं म्हणून त्यांच्यातल्या अभिनेत्यावर अन्याय केला जाई. या आक्षेपाने त्याच्या चाहत्यांना निश्चितच अस्वस्थ केलं; परंतु कालानुरूप साकारलेल्या त्यांच्या वैविध्यपूर्ण भूमिकांनी टीकाकारांना निरुत्तर केलं. म्हणूनच ‘अँग्री यंग मॅन’ची क्रेझ संपली तरी, अमिताभ संपला नाही.

आरंभापासूनच अमिताभ एक व्यावसायिक कलावंत होते. आपल्या लहरीसाठी त्यांनी निर्मात्यांचं आणि दिग्दर्शकांचं कोणत्याही प्रकारचं नुकसान होऊ दिलं नाही. अर्थात त्यांच्यातली व्यावसायिकता फार कमी लोकांनी जाणली. म्हणूनच ते प्रत्येक माध्यमाचा सर्वेसर्वा बनल्यानंतर सर्वानीच आश्चर्य व्यक्त केलं. मृत्यूच्या दाढेतून बाहेर पडलेला एक सुपरस्टार, अयशस्वी राजकारणी आणि दिवाळखोर व्यावसायिक या तीनही दु:खद विशेषणांना अमिताभ यांनी अत्यंत झपाटय़ाने सोडचिठ्ठी दिली. आजही त्यांची अपयश स्वीकारण्याची तयारी दिसते, जी ‘ठग्ज ऑफ िहदुस्तान’च्या रूपाने आपण पाहिली. विविध सामाजिक विषयांमध्ये सहभागी असूनही आणि मत व्यक्त करूनही स्वत:वर कोणतंही बालंट येणार नाही, याची दक्षता ते घेतात आणि पुन्हा एकवार अपयश येऊ शकतं, हे जाणून कामाची आखणी करतात. हे सर्व साधताना गुणांबरोबरच कष्टांचीही गरज पडते हे वेगळं सांगायला नको.

कारकिर्दीची आणि आíथक बाबतीतली गाडी उताराला लागलेली असताना, थोडक्यात निराश अवस्थेतही त्यांनी ‘कौन बनेगा करोडपती’ ही मालिका ज्या पद्धतीने सादर केली, ती शैली लाजवाब होती. कला आणि व्यावसायिकता यांचा तो अजोड मिलाफ नवनव्या पर्वाच्या रूपाने आजही बघायला मिळतो. यानंतर छोटय़ा पडद्यावर त्याचं वेगळंच रूप दिसू लागलं. पाहता पाहता ते जाहिरातींचे सम्राट बनले. काही वर्षापूर्वी ‘कॅडबरी’ कंपनीला आपलं उत्पादन विकणं अशक्य बनलं होतं. चॉकलेटमध्ये सापडलेल्या अळ्यांमुळे कंपनी गोत्यात येण्याची शक्यता होती. तेव्हा त्यांनी अमिताभ बच्चन यांच्याकडे धाव घेतली. तेव्हा बिग बी यांनी आधी कंपनीला भेट दिली आणि नंतरच जाहिरात करण्याचं मान्य केलं. ‘रिड अँड टेलर’ या कंपनीने तर तब्बल आठ र्वष बच्चन यांच्या जीवावर धंदा केला. याखेरिज ‘पेप्सी’, ‘नेरोलॅक पेंटस्’, ‘पार्कर’ आदी कंपन्यांनी त्यांच्याकडे धाव घेतली. त्यातल्या अनेकांचं बस्तान केवळ अमिताभ बच्चन या नावामुळे बसलं आहे. अर्थात या जाहिरातींचा बच्चन यांनाही प्रचंड लाभ होतो. ‘डाबर’ कंपनीच्या उत्पादनासाठी जाहिरातींचा दोन वर्षाचा करार केला तेव्हा त्यांनी त्यासाठी आठ कोटी रुपये घेतले होते. याखेरिज पोलिओ, एड्स्, कर्करोग आदींविषयी सजगता निर्माण करणा-या जाहिरातींमध्येही ते झळकले. शौचालयाचा वापर करण्याबद्दल त्यांनी समाजात सजगता निर्माण केली. थोडक्यात, मोठय़ा पडद्यावरील आपला सारा अनुभव आणि कौशल्य पणाला लावून त्यांनी छोटा पडदाही लिलया जिंकला.

त्यांची छोटय़ा पडद्यावरील कारकीर्द सर्वार्थाने गाजत आहे. कारकिर्दीच्या या दुस-या टप्प्यात याचा त्यांना आíथक लाभही झाला. इथे एखादा माणूस थांबला असता; परंतु अमिताभजींचं धोरण काही वेगळंच होतं. या नव्या संधीचा आणि त्यातून मिळालेल्या स्थैर्याचा त्यांनी पुन्हा एकवार चित्रपटांसाठीच वापर केला. आजही ते एका चित्रपटासाठी कोटय़वधी रुपयांची रक्कम घेतात. आपल्या वयाला शोभतील, अशा भूमिका स्वीकारतात. त्याही पुढे जाऊन भूमिकेसाठी स्वत:मध्ये आवश्यक ते बदल घडवून आणतात. ‘पा’ हे याचं सर्वात उत्तम उदाहरण ठरावं. या चित्रपटात भूमिका साकारताना मेक अपसाठी त्यांनी दिलेला वेळ आणि घेतलेले श्रम सर्वश्रुत आहेत. नव्या जमान्यात टिकायचं, तर बोलण्यापेक्षा कृती महत्त्वाची आहे, हे त्यांनी वेळीच ओळखलं. म्हणूनच त्यांच्याकडे तरुण दिग्दर्शकांची रांग लागते. ऋतूपर्ण घोष ते रोहन सिप्पी आणि श्रीधर राघवन ते जावेद अख्तर अशी अनुक्रमे दिग्दर्शक आणि पटकथा लेखकांची पिढी त्यांच्याकडे आकर्षति होते. आज तरुण दिग्दर्शकांना त्यांच्यासाठी भूमिका शोधणं आव्हान वाटतं.

असा हा महानायक प्रत्येक क्षणी जागरूक असतो. आजही ते पहाटे साडेपाचला उठतात आणि रात्री दोन-अडीच वाजता झोपतात. अवघ्या तीन तासांची झोप घेऊन ते सगळा व्याप सांभाळतात. साडेपाच ते साडे सात या काळात त्यांचा व्यायाम असतो. तासभर वृत्तपत्र वाचनात जातो. त्यानंतर कामासाठी घराबाहेर पडल्यानंतर रात्री साडेदहा वाजेपर्यंतचा वेळ बाहेरच जातो. त्यानंतर त्यांच्या कार्यालयीन बैठका सुरू होतात. रात्री दीड वाजता ते ई-मेल्सना उत्तरं देतात. आपली प्रत्येक जाहिरात आणि भूमिका ते पुन:पुन्हा पारखून स्वीकारतात. अमिताभजींच्या या भरगच्च कार्यक्रमात रविवार नावाची गोष्ट नाही. थोडक्यात, सुट्टीला ‘छुट्टी’ देऊन ते पूर्णपणे कार्यमग्न राहतात. आजही ते आपल्या कामाबद्दल पूर्णपणे समाधानी आहेत असं नाही. एकंदर गुणवत्तेच्या पन्नास टक्केच गुणवत्ता आपण वापरतो, असं त्याचं मत आहे. या पुढच्या काळात साकारायच्या भूमिकांमध्ये अतिमानवी असं काही नसावं, अशी त्यांची इच्छा आहे. ही मनोकामना पूर्ण होवो आणि त्यांना मनाजोगं काम करण्याची संधी मिळो, याच शुभेच्छा..!








by :- Daily Prahar